X

गरिबीचे गोडवे

आर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यापेक्षा, खेळांचे प्रशासन आणि सुविधा, मदत यांकडे पाहायला हवे..

आर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यापेक्षा, खेळांचे प्रशासन आणि सुविधा, मदत यांकडे पाहायला हवे..

दारिद्रय़ आणि खेळातील प्रावीण्य यांतील संबंधांचे बऱ्याचदा भोळसटपणे उदात्तीकरण होते. सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंना अ‍ॅथलेटिक्समध्ये जे घवघवीत यश मिळाले, त्याबाबतही हे असे सुरू झाले आहे. यात पदके मिळवणाऱ्यांतील अनेक खेळाडू आर्थिक विपन्नावस्थेतून दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतुक करायलाच हवे, यात शंका नाही. परंतु ते करताना त्यांच्या दारिद्रय़ाच्या कोडकौतुकाची काही गरज नाही. दारिद्रय़ आणि खेळांतील प्रावीण्य यांचा संबंध असता तर जवळपास प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धात अमेरिकी खेळाडू पदकांची लयलूट करते ना. तसेच टेनिसमधील आंद्रे आगासी, जगज्जेता रॉजर फेडरर, आपला अभिनव बिंद्रा आदी अनेक तर उत्तम आर्थिक स्थितीतून आलेले खेळाडू. तेव्हा गरिबी आणि खेळाडूंची कामगिरी यांच्याविषयी उगाचच रम्य भावना बाळगण्याचे काही कारण नाही. मग ताज्या जकार्ता स्पर्धातील काही भारतीय खेळाडूंची विपन्नावस्था आणि त्यांची कामगिरी यांचा संबंध कसा लावणार?

तो असा की आर्थिकदृष्टय़ा हलाखीतून आलेले खेळाडू जिवाची बाजी करून स्पर्धात उतरतात. कारण त्यांचे मागे जाण्याचे दोर कापलेले असतात आणि जगण्याच्या अनेक आघाडय़ांवर सुरू असलेल्या संघर्षांत त्यांना खेळाच्या मदानावरील पराभवाची भर घालायची नसते. या स्पर्धातील हिमा दास, स्वप्ना बर्मन आदी खेळाडूंनी आपल्याला यश मिळाले तर त्याद्वारे मिळालेल्या पशावर आपले घर चालणार आहे, नाही तर उपासमारीस तोंड द्यावे लागणार आहे अशी भावना व्यक्त केली. तीत त्यांच्या यशाचे कटू वास्तव आहे. परंतु हे यांच्याच बाबत झाले वा होते असे नाही.  भारताच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राचा नावलौकिक आजपर्यंत ज्यांनी उंचावला आहे, अशा मिल्खा सिंग, पी. टी. उषा, कविता राऊत, ललिता बाबर आदी अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंची आर्थिक परिस्थिती बेताची वा वाईटच होती. त्यामुळे त्यांना किती कष्टातून पुढे यावे लागले याची कल्पना येऊ शकते. भारताची सुवर्णकन्या उषा ही केरळमधील पायोली या खेडय़ातून पुढे आलेली. तीच गोष्ट कविता राऊतची. ती नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या आदिवासी परिसरातील. जागतिक स्तरावर कीर्तिमान कामगिरी करणारे उसेन बोल्ट, शेली अ‍ॅन फ्रेझर या जमेकाच्या धावपटूंनाही हलाखीतून अ‍ॅथलेटिक्स करिअर करावे लागले आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक मिळविणारी स्वप्ना बर्मन हिचे वडील सायकलरिक्षा चालवितात. गेले अनेक महिने ते मोठय़ा आजारामुळे अंथरुणास खिळून आहेत. साहजिकच स्वप्ना हिला घरचा आर्थिक भारही सोसावा लागतो. हेप्टॅथलॉनसारख्या खेळात धावणे, फेकी व उडय़ा आदी सात क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. त्यामुळे सर्वच क्रीडा प्रकारांचा सराव तिला करावा लागतो. तिच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. शस्त्रक्रिया करून घेण्याचा तिला सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यासाठी लागणारा खर्च करणे तिला जड वाटले. त्यामुळे या अडथळ्यासही ती आत्मविश्वासाने सामोरी गेली. हिमा दास हिचे वडील शेतकरी आहेत. जेमतेम दैनंदिन गुजराण होईल एवढेच त्यांना शेतीद्वारे उत्पन्न मिळते. अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धात्मक करिअरसाठी हिमा हिला तिच्या गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुवाहाटी येथे राहावे लागले. स्वप्ना, हिमा, मनजीतसिंग, जॉन्सन जिन्सन आदी सर्वच पदक विजेत्या खेळाडूंपुढे आर्थिक अडचणी होत्या. पूर्वीही त्या होत्याच. आता त्यात काहीसा बदल झाला आहे.

याचे कारण खेळाडूंना पाठबळ देणारी व्यवस्था. क्रीडा खात्याचे मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड हे स्वत: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज. त्यांनी क्रीडा खात्याचे मंत्रिपद हाती आल्यावर ऑलिम्पिक पदक व्यासपीठ या योजनेंतर्गत नपुण्यवान खेळाडूंना आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. पूर्वी खेळाडूंना विविध स्पर्धासाठी मदत मिळविताना अनेक अडचणी येत असत. अनेक वेळा खेळाडू स्पर्धा संपवून आल्यानंतरच ही मदत मिळत असे. राठोड यांनी खेळाडूंची ही अडचण दूर करण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या खात्यात थेट शिष्यवृत्ती व आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली. आर्थिक निधीच्या मार्गातील ‘दलाल’ त्यांनी दूर केले. केवळ खेळाडू नव्हे तर त्यांच्याकरिता नियुक्त केलेल्या मदतनीसांनाही  मानधन देण्याची व्यवस्था केली. खेळाडूंच्या सराव व स्पर्धामधील सहभागाबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार खेळाडूंचा परदेश प्रवास सुकर झाला. परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, क्रीडा मानसतज्ज्ञ यांच्यासाठीही शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाले. शासनाच्या बरोबरीने अनेक विश्वस्त संस्थाही खेळाडूंना भरपूर साह्य करीत आहेत. प्रकाश पदुकोण, गीत सेठी आदी ज्येष्ठ खेळाडूंनी एकत्र येऊन ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही संस्था सुरू केली. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, मित्तल ट्रस्ट, लक्ष्य फाउंडेशन आदी अनेक विश्वस्त संस्था गेली दहा-बारा वष्रे ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या गरजू खेळाडूंना मदत करीत असतात. आंधळेपणाने मदत न करता खरोखरीच या खेळाडूकडे पदक मिळविण्याची गुणवत्ता आहे की नाही याची चाचपणी केली जाते. या संस्था शारीरिक प्रशिक्षण, क्रीडा मानसतज्ज्ञ यांचीही नियुक्ती करीत असतात. वेळोवेळी खेळाडूंच्या कामगिरीचाही आढावा घेतला जात असतो. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हे स्वत: ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी झालेले धावपटू असल्यामुळे कोणत्या खेळाडूंना कोणते प्रशिक्षक पाहिजेत, परदेशात कोणत्या ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धात्मक सराव होणार आहे आदी गोष्टींचा अभ्यास करूनच त्यांनी खेळाडूंच्या मदतीसाठी विविध कंपन्या व केंद्रीय क्रीडा मंत्रालयास प्रस्ताव दिले. रोजीरोटीचा प्रश्न सुटला तर मानसिक दडपण दूर होते हे लक्षात घेऊनच नपुण्यवान खेळाडूंना नोकरीची संधी निर्माण करून देण्यासाठी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पुढाकार घेतला आहे.

त्यामुळेच भारताला यंदा अ‍ॅथलेटिक्सने तारले आहे. बाकी बऱ्याच स्पर्धात आपला आनंदच आहे. कबड्डी हा आपल्यासाठी सुवर्णपदकाचा हुकमी खेळ. पण तिथे आपण अगदी नव्या संघांकडूनही हरलो. हॉकीचेही तेच झाले. मलेशियाविरोधात खेळताना तर बरा खेळणारा आपला संघ संशयास्पदरीत्या कच खाता झाला आणि जिंकत आलेला सामना हरवून बसला. म्हणजे एका बाजूने आपले अ‍ॅथलेटिक्समधले खेळाडू त्यातल्या त्यात बरी कामगिरी नोंदवीत असताना आपल्या अन्य खेळाडूंची कामगिरी फारच सुमार झाली. ज्या खेळांत आपण पराभूत झालो त्यातील खेळाडू काही धनाढय़ वर्गातील आहेत असे नाही. पण तरीही ते हरलेच. तेव्हा आर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यात काही शहाणपण नाही.

याचे कारण आपल्याकडे आधीच ‘धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती’ अशी दळभद्री वचने संस्कृतीत रुतून बसलेली आहेत. वास्तविक ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना प्रगतीची संधी आपली व्यवस्था नाकारते याचा आपणास खेद हवा. ते राहिले दूर. उलट आपण त्यांच्या गरिबीचे उदात्तीकरण करतो. यात लबाडी आहे. ती आशियाई स्पर्धासारख्या तुलनेने कमी स्पर्धात्मकतेत खपून जाते. पण ऑलिम्पिक स्पर्धात पदके जिंकायची तर या सगळ्यावर पुरून उरणारी गुणवत्ता लागते. ती गाठण्याचा प्रयत्न करायला हवा. आशियाई विजेत्या खेळाडूंच्या गरिबीचे गोडवे गात बसणे फार शहाणपणाचे नाही.