05 July 2020

News Flash

गिऱ्हाईक फसकलास आसा..

‘गिऱ्हाईक’ म्हणून मात्र आपली तब्येत ठणठणीत.. जगात अव्वल! निल्सन ही पाहणी-संस्थादेखील हेच सांगते आहे..

‘कन्झ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स’ पाहणीत प्रत्येक वेळी भारताचा अव्वल नंबर

साक्षरता, स्वच्छता, आरोग्य, सदाचार, स्त्रीचा आदर-सन्मान, सामुदायिक स्वास्थ्य आणि मानव विकास निर्देशांकांच्या बाबतीत आपली गणती कुठेच नाही, पण ‘गिऱ्हाईक’ म्हणून मात्र आपली तब्येत ठणठणीत.. जगात अव्वल! निल्सन ही पाहणी-संस्थादेखील हेच सांगते आहे..

दुरून न्याहाळावे आणि कौतुक करावे बस्स. गच्च भरलेले बाजार आणि खरेदीदारांपेक्षा बघ्यांचीच गर्दी अधिक. ‘‘काय भारी हां बाजार. पण जे बरो दिसतला पण तेंच्या किमती पाहशाल? सेल म्हणतले, पण दरात एक पसो कुणी कमी करूक नाय.’’ गावाकडचा बाबल्या तेली मोठा दुकानदार माणूस. झिलग्याच्या हौसेखातर मुंबईत दिवाळीच्या खरेदीला आला आणि त्रागा करू लागला. डोळे दिपवणाऱ्या या झगमगाटात कावराबावरा झालेल्या बाबल्याचे हौशी ग्राहकपण जिनसांच्या किमती पाहून जणू विरूनच गेले..

भले बाबल्यासारखेच सही सही नसेल पण यंदासुद्धा अनेकांना सणावारीची ही बाजारपेठ म्हणजे दुरून डोंगर साजरेच असेल. पण तरीदेखील साल-दरसाल सण येतात. बाजार भरतच असतो आणि कमी-जास्त फायदा गाठीशी बांधून उठत असतो. डोंगर, माळ, जंगले, नद्या- त्यांची कोरडी पात्रे, दुष्काळाचे करडय़ा-पिवळ्या रंगाचे पसरलेले भकास साम्राज्य.. आणि त्यातच विविध रंगांची उधळण असलेला बाजारही. मोठा बाजार, आठवडी बाजार, कबाडी बाजार, चोरबाजार ते बिग बझार, हायपर मार्केट, सुपरमार्केट आणि नव्या जमान्यातल्या डील आणि कार्टच्या ई-पेठा.. सारे बाजाररंग ओसंडून वाहत आहेत. बाजार आपल्या अंगवळणी पडला आहे. खरे तर संपूर्ण देशच पंचखंडातील एक विशाल ग्राहकपेठ असल्याचे बिरुद मिरवत आहे. परवाच्या निल्सन पाहणीने यावर परत एकदा शिक्कामोर्तब केले इतकेच. जगात दुसरा असा देश सापडणार नाही जेथे भारताइतका भरवशाचा ग्राहक सापडू शकेल. बरे हे एकदा नव्हे तर गेल्या दीड वर्षांत प्रत्येक तीन महिन्यांनी झालेल्या निल्सनच्या पाहणीतून पुढे आले आहे. या ‘कन्झ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स’ पाहणीत प्रत्येक वेळी भारताचा अव्वल नंबर. आर्थिक संपन्नतेच्या तुलनेत आपल्यापुढे असणाऱ्या अमेरिका आणि चीनलाही आपण ग्राहकसंपन्नतेत खूप मागे सोडल्याचे दर्शविते.
या जागतिक पाहणीतून ग्राहक आत्मविश्वासाच्या मोजपट्टीवर भारताला सलग सहाव्या तिमाहीत मिळालेल्या अव्वल गुणांनी तुम्ही-आम्ही फक्त समाधान मानायचे. फारच वाटले तर आनंदही मानू, पण एक पेचही त्याने उभा केला आहे. साक्षरता, स्वच्छता, आरोग्य, सदाचार, स्त्रीचा आदर-सन्मान, सामुदायिक स्वास्थ्य आणि मानव विकास निर्देशांकांच्या बाबतीत आपली गणती कुठेच नाही, पण ‘गिऱ्हाईक’ म्हणून मात्र आपली तब्येत ठणठणीत.. कोडय़ात पडावे असे यात काही नाही. सव्वा अब्ज लोकसंख्या असलेला भारत आणि त्यातही जवळपास निम्मे वय वष्रे पंचविशीखालील. तरुणाईनेच आपले राष्ट्र घडले अन् आपला हा बाजारपेठ तोंडवळाही! तरुण म्हटले की हौस-मौज, आशा-अपेक्षांचे नवनवे तरंग आलेच. वर्षांतले उणेपुरे शेकडय़ाने दिवस सण-उत्सवांच्या धामधुमीचे, दरसाल दीड-पावणेदोन कोटी लग्नसोहळे, मग जवळपास तितकेच बारसे, मुंज, नामकरण, बाप्तिस्मा, वाढदिवस वगरे सोहळे. त्यासाठी कपडेलत्ते, दागिन्यांची खरेदी, उत्सवी रोषणाईचे साजसामान, जेवणावळी वगरे ओघाने आलेच. इतक्यापुरती जरी उलाढाल गृहीत धरली तरी आकडेमोड कितीवर जाते याचा नुसता अंदाजच चक्रावून सोडणारा आहे.

तर निल्सनच्या पाहणीत सहभागी दोन-तृतीयांश भारतीयांनी यंदा त्यांनी जे मनांत योजून ठेवले आहे ते सर्व खरीदण्याचा बेत बनविल्याचे सांगितले आहे. इच्छिले त्यावर खर्च करण्याच्या उत्सुकतेची मात्रा गेल्या वर्षांच्या तुलनेत शहरी ग्राहकांमध्ये बळावल्याचे ही पाहणी सांगते. अर्थात पाहणीवर नोंदविला गेलेला प्रतिसाद ऑनलाइन धाटणीचा आणि प्रामुख्याने महानगरांतील मध्यम व उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांकडून आला आहे. तो तसा नसता तरीही पाहणीचा निष्कर्ष काही बिघडला नसता. आता मध्यमवर्ग कुणाला म्हणायचे, त्यांच्या उत्पन्नाच्या स्तराबाबत सर्वसंमत अशी मात्रा अस्तित्वात नाही. तरी जागतिक बँकेने केलेल्या व्याख्येप्रमाणे मासिक सुमारे २० हजार रुपये वा अधिक मिळकत असलेली कुटुंबे मध्यमवर्गात मोडतात. सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारतातील २५ कोटी कुटुंबांतील (कुटुंबामागे सरासरी पाच सदस्य गृहीत धरले तर) जवळपास निम्मी कुटुंबे मग कनिष्ठ, मध्य, उच्च यापकी कोणत्या तरी एका मध्यमवर्गात येतील. किंबहुना या कुटुंबांना ते मध्यमवर्गात गणले जावेत अशी आस आहे, असे मागे एका सर्वेक्षणातूनच पुढे आले आहे. दरडोई उत्पन्न आणि दरडोई क्रयशक्तीचे प्रमाण यात भले भारत जगातील १६४ देशांच्या सूचीत अनुक्रमे १२० आणि १०६ व्या क्रमांकावर असेल. तरी येथील बारा-साडेबारा कोटी मध्यमवर्गीय कुटुंबांचा आकडा मोठा मोहक आहे. तुलनाच करायची, पुढारलेल्या २७ राष्ट्रांच्या युरोपीय महासंघातील निम्म्या देशांमधील खर्च करण्याची ऐपत असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांची एकंदर संख्याही याहून कमी भरेल. पुढील पाच वर्षांत जगातील एकूण मध्यमवर्गीय लोकसंख्येचा दोन-तृतीयांश हिस्सा हा आशियाई देशांतून म्हणजे मुख्यत: भारत-चीनमधून येईल. या वर्गाकडून होणाऱ्या सेवा व वस्तूंच्या उपभोगाची जागतिक तुलनेत हिस्सेदारी ५९ टक्क्यांवर गेलेली असेल.

सर्वत्र प्रगती, समृद्धी, विकास अन् चंगळीसाठी तुंबळ स्पर्धा सुरू आहे. आर्थिक, सामरिक, राजकीय वर्चस्व आणि त्यासाठी युद्ध, बंडाळी, दहशतवादी कारवायांपासून मुक्त असलेला जगात कुठला कोपरा सापडणे आज दुरापास्त आहे. युरोपातील अनेक देशांना तर आर्थिक अरिष्टाने ग्रासले आहे. तशा तेथील स्थितीत ग्राहक मानसिकतेची अगदी भिन्न दिशेला असलेली दोन टोके दिसून येतात. एका गटाच्या मते पसा खर्ची घालणे हा तेथील विध्वंसक व भ्रष्ट राजवटीला निमंत्रण वा तिच्यावरील विश्वासाची पावती ठरेल, तर दुसरा गट जे अटळ आहे अशा उदासीन वातावरणाला सामोरे जाणारी उद्विग्न प्रतिक्रिया म्हणून उधारीवर का होईना खर्च नव्हे उधळपट्टीचे प्रतिनिधित्व करणारा आहे. याचाच अर्थ असाही की ग्राहकांचा विश्वास हा त्या त्या देशातील आíथक-राजकीय व्यवस्थेला दिलेल्या बऱ्या-वाईट प्रतिसादाला प्रतििबबित करीत असतो. एकीकडे मंदीचा, युद्ध, यादवीचा वेढा पडल्याने आत्मविश्वास गमावलेल्या ग्राहकांचा युरोपसह जगात मोठा हिस्सा आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला उभारी देऊ शकेल असे स्थिर सरकार असलेली आपली राजकीय व्यवस्था आहे. अशा दोन्ही अंगाने भारताला एक बाजारपेठ म्हणून आकर्षक स्थान असणे आजच्या परिस्थितीत केवळ अपरिहार्यच ठरते. निल्सन ही बडय़ा उद्योगांसाठी त्यांच्याकडून प्रस्तुत झालेल्या अथवा येऊ घातलेल्या उत्पादन-सेवांसाठी बाजार सर्वेक्षण करणारी जागतिक प्रतिष्ठेची संस्था. तिच्या पाहणीतून भारताला बाजारपेठ म्हणून वरचे गुण असणे नवलाचे नाही, कारण गेल्या दोन दशकांपासून भारताचे हेच आणि एकमेव असे व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. विकसित जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुदलात एक उमदी बाजारपेठ असाच आहे. आपले हे अंगभूत सामथ्र्य ओळखून तिचे अधिकाधिक भांडवल करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दशकांत केंद्रात व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुरेपूर केला. उदारीकरण, मुक्त बाजारपेठ धोरण आपण स्वीकारले. मग बाजारपेठेच्या ओढीनेच विदेशातून मोठमोठय़ा गुंतवणुकाही आल्या. तर या बाजारपेठेत राहून गेलेल्या खाचाखोचा भरून काढून तिला एकसंध व आसेतुहिमाचल एकसारखे रूप प्रदान करण्यासाठी वस्तू व सेवा कायदा (जीएसटी) मंजुरीसाठी राज्यकर्त्यांची कळकळ, सत्ताधारी पक्ष बदलला तरी आजही दिसते. बाजाराभोवतीच नवी आशा, नवी ईर्षां आपला समाज आणि राजकीय व्यवस्थाही गुंफत आली आहे. देशाला जोडून ठेवणारा, किंबहुना राष्ट्र घडविणारा हा एक महत्त्वाचा धागा ठरतो आहे. कदाचित दिवाळीनिमित्त खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या मनीही अशीच भावना असेल.. अलीकडे प्रत्येक गोष्टीशी राष्ट्रभावना जोडली जाण्याचा तसाही प्रघात आहेच.

..नाही तर बाबल्या म्हणतलो, ‘‘गिऱ्हाईक फसकलास आसत, सांगाकच नको. पण निसतो तेच.. बाकी कशाक सर नाय.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2015 12:41 am

Web Title: india tops nielsen consumer confidence survey
Next Stories
1 बाजारात तुरी ..
2 सरकारी ‘हज’ यात्रा!
3 हलक्या हाताची गरज
Just Now!
X