17 November 2017

News Flash

‘सरस्वती’चा शोध

वैज्ञानिकांनी अलीकडेच लावलेला एक खगोलीय शोध अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो..

लोकसत्ता टीम | Updated: July 15, 2017 2:53 AM

पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अलीकडेच लावलेला एक खगोलीय शोध अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो..

प्रश्न पडणे आणि विचारणे हे माणसातील जिवंतपणाचे लक्षण. पण प्रश्न असा आहे, की प्रश्न विचारणारी माणसे हवी आहेत का आपल्याला? नाही तर, ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ आणि ‘महाजनो येन गत: स: पंथा:’ यास समाजमान्यताच मिळाली नसती. सद्गुरूच्या पुढे जायचे नसते हे सांगण्याची सोय गुरूंना उरली नसती. श्रद्धा हाच ज्ञानाचा राजमार्ग बनला नसता. परंतु असे असतानाही हे मार्ग नाकारणारे निर्माण झालेच आपल्याकडे. याचे कारण मानवी मनाला सतत उद्युक्त करणारे कुतूहल, औत्सुक्य, जाणून घेण्याची आस. जे आहे ते भलेही लोकप्रिय असले तरी त्याला सवाल करण्याचे धैर्य. या धैर्याचा पहिला उद्गार आढळतो तो ऋग्वेदात. त्यातील दहाव्या मंडलातील एका सूक्ताची देवताच आहे – क:. म्हणजे कोण. आपण कोणाची प्रार्थना करीत आहोत, असा प्रश्न त्या चार हजार वर्षांपूर्वीच्या ऋचाकर्त्यां ऋषीला पडणे हे आजच्या संदर्भात तर विशेष कौतुकास्पद. एका प्रबळ ज्ञानजिज्ञासेतून ते तत्त्ववेत्ते आपल्या भवतालाचा, आपल्या जगाचा आणि पर्यायाने विश्वाचा शोध घेत होते. त्यांना प्रश्न पडत होते, की हे सारे कोठून आले आहे? ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं..’ – पृथ्वीच्या प्रारंभी सत् नव्हते, असत्सुद्धा नव्हते. असणे नव्हते, नसणे नव्हते. अंतरिक्ष नव्हते. आकाश नव्हते. त्याला कसला आश्रय होता? कसले आवरण होते? मग हे कशातून आले? अशा प्रश्नांतूनच त्यांची ज्ञानवृद्धीची वाट जात होती. त्याच वाटेवर पुढे उपनिषदे आली. विज्ञान आले. आजही तो शोध संपलेला नाही. आजही आपले वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ त्या गूढाचा शोध घेत आहेत. त्या शोधातून ज्ञान आणि विज्ञानाचा मार्ग रुंद करीत आहेत. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात वसलेल्या ‘आयुका’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी नुकताच लावलेला एक खगोलीय शोध महत्त्वाचा ठरतो तो यामुळेच.

हा शोध आहे एक दीर्घिका (गॅलक्सी) समूहाचा. पृथ्वीपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका प्रचंड आकाराच्या आकाशगंगांच्या समूहाचा. तिला त्यांनी नाव दिले ‘सरस्वती’. ‘आयुका’ आणि ‘आयसर’ या संशोधन संस्थेतील वैज्ञानिक गेली पंधरा वर्षे या दीर्घिका समूहाच्या मागे होते. तिचे निरीक्षण करीत होते. माहिती जमवत होते. काम सोपे नव्हते. या विश्वाचे आपल्याला ज्ञात असलेले आकारमान आहे १३.८२ अब्ज प्रकाशवर्षे. अफाटच ते. आपल्या डोक्याला कल्पनाही करता येऊ  शकणार नाही त्याची. असे म्हणतात, की जग केवढे, तर आपल्या डोक्याएवढे. खरेच आहे ते. आपल्या कल्पनांचे अश्व जेथवर धावू शकतात तेथवरच आपले विश्व. ही पृथ्वी, हे चंद्र-सूर्य-ग्रह, झालेच तर आपली ‘मिल्की वे’ म्हणजे ‘आकाशगंगा’ ही दीर्घिका. साधारणत: एवढीच आपली विश्वाची कल्पना असते. तीच आपली मर्यादा असते. त्या जोरावरच आपण आपल्याला ज्ञानसंपन्न मानत असतो. ‘मी किती अज्ञानी आहे या वस्तुस्थितीपलीकडे मला काहीही माहिती नाही,’ असे म्हणणारा धीमंत एखादाच असतो, सॉक्रेटिससारखा. बाकीचे सारे आपापल्या विश्वात खुडूकखूश असतात. पण हे विश्व आपल्या ‘डोक्या’हूनही मोठे आहे. आपली ही महाप्रचंड आकाशगंगा. तीसुद्धा अशाच एका दीर्घिका महासमूहाचा भाग आहे. त्याचे नाव ‘लॅनिआकेया’. किती दीर्घिका असाव्यात या समूहात? वैज्ञानिक सांगतात किमान एक लाख. म्हणजे आपल्या आकाशगंगेसारख्या किमान लाखभर आकाशगंगा त्या एका समूहात आहेत. अशा अनेक समूहांनी मिळून हे भलेथोरले विश्व बनले आहे. असंख्य दीर्घिका आहेत त्यात. असंख्य सूर्य आहेत. आणि याहून चक्रावून टाकणारी बाब म्हणजे हे महाविश्व अजिबात स्थिर नाही. त्याची उत्पत्ती एका महास्फोटातून झाली असे म्हणतात. जन्मल्यापासून हे बाळ फुगतच चालले आहे. पसरतच चालले आहे. ही मात्र कविकल्पना नाही. त्याच्या प्रसरणाचे प्रायोगिक पुरावेच वैज्ञानिकांना मिळाले आहेत. पण अजून त्यांच्या हे लक्षात येत नाहीये, की ते प्रसरण पावते आहे तर कशात? त्याला प्रसरण पावायचे असेल तर त्यासाठी जागा लागणार. ती जागा कशात असेल तर एखाद्या पोकळीत. पण मग ती पोकळी कशात आहे? आणि हे ‘महान उपजले’ ते कसे? साराच गुंता. असंख्य वैज्ञानिकांना भंडावून सोडले आहे त्या पोकळीने. अगदी ऋग्वेदकाळापासून ते या पोकळीचा शोध घेत आहेत. ‘आयुका’ आणि ‘आयसर’चे संशोधक हे त्यांचेच वारसदार. त्या गूढाच्या शोधयात्रेत त्यांना सापडली ती ही ‘सरस्वती’. हजारो दीर्घिकांचा आणि अब्जावधी सूर्याचा समावेश असलेली. त्यातील काही दीर्घिका तर आपल्या आकाशगंगेहून मोठय़ा. गुरुत्वाकर्षणाच्या धाग्याने एकत्र बांधलेल्या. यातही मौज अशी की आपल्या या वैज्ञानिकांना दिसत असलेली ‘सरस्वती’ ही आताची नाहीच. आजमितीला ती तेथे अस्तित्वात आहे की नाही, याचाही त्यांना पत्ता नाही. कदाचित नसेलही ती. कदाचित तिच्यातील अब्जावधी सूर्य केव्हाच विझलेही असतील. कारण आता जी दिसत आहे ती सरस्वती आहे सुमार चारशे कोटी प्रकाशवर्षांपूर्वीची. तेथून निघालेला प्रकाशकिरण आपल्यापर्यंत पोचायला एवढीच वर्षे लागतात. पण मग आज या शोधाचे एवढे अप्रूप का? याचे कारण म्हणजे यातूनच कदाचित आपल्याला दीर्घिकांच्या निर्मितीचे रहस्य समजू शकते. त्या महासमूहातील वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम जाणून घेता येऊ शकतो. खगोलशास्त्रातील या नव्या संशोधन क्षेत्राला सरस्वतीच्या शोधाने चालनाच मिळणार आहे. आता प्रश्न असा येऊ शकतो, की या शोधांची गरजच काय? तिकडे ‘सर्न’च्या प्रयोगशाळेत वैज्ञानिक कधीपासून कोणा दैवी कणाचा शोध घेत आहेत आणि महास्फोटाचा अभ्यास करीत आहेत. त्याची आवश्यकताच काय? मूलभूत विज्ञान आणि उपयुक्ततावादी तंत्रज्ञान यांत फरक असतो हे विसरायला झाले की असे प्रश्न रास्त वाटू लागतात. खरे तर आपल्या विश्वाबद्दलचे आपले ज्ञान यातून वाढणार आहे या उत्तरानेही हा सवाल मिटायला हवा. परंतु आपण हल्ली भलतेच भौतिक व उपयुक्ततावादी झालो असल्याने तेवढय़ाने कदाचित आपले समाधान होणार नाही. अशा शोधांतून कदाचित मानवजातीला टिकून राहण्याचे साधन मिळू शकते. आजच्याहून वेगळे अजब काही तंत्रज्ञान सापडून मानवी जीवन अधिक सुकर करणारी वेगळीच यंत्रे यातून निर्माण होऊ शकतात. थोडक्यात उद्या यातून काय हाती लागेल याची कल्पनाही आज करता येत नाही. काहीही मिळू शकते. कदाचित ‘समांतर विश्वा’चा शोधही लागू शकतो, काय सांगावे? वैज्ञानिक शोधयात्रा सुरू ठेवायच्या असतात, प्रश्न विचारायचे असतात, ते त्यासाठीच. अखेर हा ज्ञानतृष्णेचा सवाल आहे.

ही तहान काही आजची नाही. ती सातत्याने प्रश्न विचारून आपल्या तत्त्ववेत्त्यांनी, संशोधकांनी, वैज्ञानिकांनी तेवती ठेवली आहे. या विश्वाचा शोध घेणाऱ्या ऋषींनी नासदीय सूक्तात त्याची काही उत्तरेही देऊन ठेवली आहेत. ते सांगतात, ‘परम आकाशातून हे सारे पाहणारा जो आहे. तो हे सारे जाणतोच.’ पण मग त्या ऋषींनाही प्रश्न पडतो. ‘खरेच का तो हे जाणतो, की त्यालाही हे माहीत नाही?’ ही खरी विज्ञाननिष्ठा. त्यातूनच ‘सरस्वती’चा शोध लागू शकतो.. नाही तर मग काय, सरस्वती पूजनाचे कर्मकांड आपण डोळे झाकून करतच असतो!

First Published on July 15, 2017 2:53 am

Web Title: indian scientists discover saraswati galaxy