शीना बोरा हत्या प्रकरणात तिला अक्करमाशी ठरवण्यापासून तिच्या आईवर झालेल्या बलात्कारापर्यंत सगळे काही माध्यमांत चघळले गेले. सनसनाटीच्या हव्यासातून आपण न्यायाधीशाच्या खुर्चीवर तर बसलो, पण न्याय कशाशी खातात हेच माहीत नाही अशी काही वृत्तपत्रांची आणि वाहिन्यांची गत झाली.

बारा दिवस. अहोरात्र. आपले राष्ट्र एकच गोष्ट जाणून घेऊ इच्छित आहे, की इंद्राणी मुखर्जीने तिच्या मुलीला का मारले? हे राष्ट्र आहे वृत्तवाहिन्यांचे, त्यांच्या क्षणोक्षणी धडकणाऱ्या खास बातम्यांचे, गटचर्चाचे, त्यातील तृतीयपर्णी तज्ज्ञताऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे. या राष्ट्रासमोर अन्य कोणतेही उद्योग नाहीत, प्रश्न नाहीत. ते इंद्राणीच्या इंद्रजाली गुन्ह्य़ातच अडकले आहे. इतके, की जणू हे सगळे राष्ट्रच त्या तपासचक्राचा भाग बनले आहे. तेच पोलीस, तेच दंडाधिकारी. त्यांना जाणून घ्यायचे आहे, की इंद्राणी ही काय गोष्ट आहे? ती एक महत्त्वाकांक्षी, लालची, लोभी, कैदाशीण यावर राष्ट्राने शिक्कामोर्तब केले आहेच. आता प्रश्न फक्त हेतूंचा आहे. आपल्या मुलीची -शीना बोराची- हत्या तिने का केली? आई आपल्या पोटच्या गोळ्यांना असे थंड डोक्याने योजना वगरे आखून कधी मारते का? हिने का मारले? ही सुशिक्षित, श्रीमंत, कितीशे कोटींची मालकीण. पण हाव चढली का तिला? त्याशिवाय का तिने इतकी लफडी-कुलंगडी केली. विवाह तरी किती केले तिने? शेवटचा तर आपल्याहून वयाने किती तरी मोठय़ा पुरुषाशी? त्याला मुलीची ओळख करून दिली ती आपली बहीण म्हणून. नंतर म्हणे तिची मुलगी आणि त्याचा मुलगा हेही लग्न करणार होते. नात्यांची नुसती गुंतागुंत. कोण कुणाची मुलगी, कोण कुणाचा बाप, कोण कुणाचा प्रियकर, सगळाच गुंता. आमचे वाहिन्यांचे राष्ट्र यातच गुंतले आहे. कुटुंब व्यवस्था, नतिक-अनतिकता, सामाजिक सभ्यता सगळ्याच्या चिंधडय़ा जुळवत बसले आहे. कधी आश्चर्याने, कधी औत्सुक्याने, कधी सात्त्विक संतापाने तर कधी मनस्वी वेदनेने. मागे प्रिन्स नामक एक बालक एका िवधनविहिरीच्या खड्डय़ात पडले होते. तेव्हाही हे राष्ट्र त्या बालकाच्या काळजीने असेच गुंग झाले होते. आतून आणि बाहेरून चित्रवाणीच्या पडद्याला चिकटून बसले होते. पण तेव्हा, चाललेय ते योग्य नाही, असे सांगायला येथील वृत्तपत्रांचे आणि वाचकांचे एक वेगळे राष्ट्र होते. शहाण्यांचे. वैचारिक उच्चभ्रूंचे. पण आता तेही -खासकरून आंग्ल वृत्तपत्रे आणि त्यांचे वाचक यांचे राष्ट्र- याचाच भाग बनले आहे. वृत्तपत्रांच्या पानोपानी शीना बोरा खटल्याच्या बातम्या अशा छापल्या जात आहेत की जणू कोण्या गुन्हेगारी धारावाहिक कादंबरीची प्रकरणे. हे सगळे पाहून कोणाही विचारी माणसाला प्रश्न पडावा, की हे नेमके काय चालले आहे?
वृत्तपत्र म्हणजे साबणासारखेच एक उत्पादन हे समाजाने मान्य करून पचवले त्याला अनेक वष्रे झाली. हे अमान्य असणारी वृत्तपत्रे येथे आजही आहेत. पण ती अल्पसंख्यच. बाकीच्यांनी मात्र ओठांस लाली लावून स्वत:स विकण्याचेच व्रत हाती घेतले. एकदा विक्री, अधिकाधिक विक्री हाच तारा समोर ठेवला की पायतळी अंगार येण्याचा प्रश्नच उरत नाही. सारेच सोपे होते. उरतो प्रश्न तो फक्त आपल्या वाचकांची मर्जी राखण्याचा. त्यातील निम्मे तर धड वाचकही नसतात. वाचण्यासाठी वेळच कुठे असतो त्यांच्याकडे? ते चाळकच. पाने चाळणारे. त्यांच्या डोक्याला ताप देणे म्हणजे महापाप. तेव्हा त्यांना रिझवणारे, जोजविणारे, सुखविणारे काही द्या. नुसतीच माहिती देऊन ज्ञान दिल्याचा आभास द्या. विचारांऐवजी मनास चाळविणारे काही द्या. त्यात गुन्हेगारी, लैंगिकता हे छानच घट्ट बसते. अनेक वाचकांना वाटते की वाचकांना हे आवडत नाही. त्यांना विधायक बातम्या भावतात. पत्रमहर्षी नानासाहेब परुळेकरांनी पुण्यातून वृत्तपत्र सुरू केले तेव्हा त्यांच्यासमोर नेमका हाच प्रश्न आला होता. वाचकांना कोणत्या बातम्या आवडतात? तेव्हा त्यांनी वाचकांसाठीच आकर्षक बातम्यांची स्पर्धा भरविली. त्यातून सर्वेक्षण केले आणि स्पष्टच झाले की गुन्हेविषयक बातम्या वाचकांना विशेष आवडतात. ही गोष्ट सप्टेंबर १९३२ची. तेव्हा आजच्या कलीयुगातच वाचकांना याची गोडी आहे असे नाही. मनातील आदिम भावनांना साद घालणाऱ्या गोष्टींचे आकर्षण माणसाच्या गुणसूत्रांतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवायचे तर तेथे वैचारिक संस्कारांचा अंकुश लागतो. तो दुर्मीळच. शीना बोरा प्रकरण माध्यमांतून चघळले जात आहे ते वाचकांची ती ‘आपली आवड’ आहे म्हणूनही. त्यासाठी माध्यमांना झोडपणे सोपे आहे. माध्यमे टीआरपीसाठी हे करतात हे तर शतप्रतिशत सत्यच. पण या सत्याचा अर्थ फारच कडू आहे हे आपण लक्षात घेत नाही. वाहिन्यांना टीआरपी मिळतो याचा अर्थ त्या जे दाखवतात ते मोठय़ा प्रमाणावर पाहिले जाते. हे पाहणारे डोळे आपलेच आहेत. आपण प्रेक्षक म्हणून त्यांना टीआरपी मिळवून देतो. या सनसनाटी-शरणतेची जबाबदारी घ्यायला मात्र ना ती माध्यमे तयार आहेत, ना प्रेक्षक वा वाचक. दोघेही एकमेकांना दोष देत आहेत आणि शीना हत्या प्रकरण दोघेही चवीने चघळत आहेत.
माध्यमांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे असे नाही. पन्नासच्या दशकातील नानावटी हत्या प्रकरण असेच गाजले होता. तेव्हा अर्थातच दूरचित्रवाणी नव्हती. परंतु तेव्हाच्या वृत्तपत्रांतून या खटल्याला मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती. आर. के. करंजियांचे ब्लिट्झ त्यात आघाडीवर होते. त्या खटल्याच्या काळात २५ पशांचा ब्लिट्झ दोन रुपयांना विकला जात होता. जोशी-अभ्यंकर हत्याकांड किंवा अलीकडच्या काळातली निठारी हत्याकांड, आरुषी खूनखटला ही अशीच काही उदाहरणे. सार्वजनिक स्मरणशक्ती नेहमीच अधू असल्याने तेव्हाचे माध्यमवर्तन फारसे कोणास आठवत नाही एवढेच. शीना बोरा प्रकरणात पाहायचे असेल तर ते हे माध्यमवर्तन. इंद्राणी मुखर्जीला अटक झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिने जिची हत्या केली ती तिची बहीण नसून मुलगी असल्याचे उघडकीस आले. तेव्हापासून माध्यमांना डिटेक्टिव्हगिरीची जी िझग चढली आहे ती अजून उतरलेली नाही. यंत्रणा आपले काम करीत नसतील, काही लपवीत असतील तर माध्यमांनी जरूर ते उघडकीस आणावे. पण येथे पोलीसच सगळे काही करीत होते. फक्त सांगत काही नव्हते. पोलीस या प्रकरणी अधिकृतरीत्या केवळ दोनदाच माध्यमांशी बोलले आहेत. तेही अगदी थोडक्यात. बाकीचा सगळा मसाला माध्यमांचा. त्याला कसलाच धरबंध नाही. त्यात हत्या झालेल्या मुलीला अक्करमाशी ठरवण्यापासून तिच्या आईवर झालेल्या बलात्कारापर्यंत सगळे काही चघळले गेले. एकीकडे बातम्यांची ही तऱ्हा, तर दुसरीकडे च्यानेलांच्या खिडक्यांतून चाललेली स्वयंघोषित सज्जनांची नतिक प्रवचने. प्रकरण शीना बोराच्या खुनाचे आहे की इंद्राणीच्या चारित्र्याचे याचेही भान सुटले. त्यातून आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करणारा, मुलीचा खून झाल्याचे कळूनही लपून बसणारा बाप आपण निष्पाप ठरवत आहोत हे कोणाला समजलेच नाही. सामाजिक नतिकतेची वेसण अजूनही एकटय़ा बाईच्याच नाकात असते हे या च्यानेली चर्चानी पुन्हा एकदा लख्खपणे समोर आणले. माध्यमे जबाबदारीच्युत झाली ती अशा प्रकारे.
सनसनाटीच्या हव्यासातून आपण न्यायाधीशाच्या खुर्चीवर तर बसलो, पण न्याय कशाशी खातात हेच माहीत नाही अशी या काही वृत्तपत्रांची आणि वाहिन्यांची गत झाली. हे साधे खुनाचे प्रकरण असताना खुद्द पोलीस आयुक्त दहा-दहा दिवस पोलीस ठाण्यात येऊन आरोपींचे जबाब घेत आहेत ते कशासाठी यांसारखे प्रश्नही मग माध्यमांना पडेनासे झाले. हे केवळ एकटय़ा इंद्राणी प्रकरणापुरते इंद्रजाल म्हणून सोडून देता येणार नाही. याच्या मुळाशी माध्यमे आणि वाचक-प्रेक्षक या दोघांच्याही प्रगल्भतेचा प्रश्न आहे. विचार व्हायला हवा तो त्याचा, त्या इंद्राणीजालाचा.