News Flash

तंत्राग्नी

एकविसावे शतक सुरू होताना वेबसाइट्सचे..

एकविसावे शतक सुरू होताना वेबसाइट्सचे.. म्हणजे माहिती महाजालातल्या थांब्यांचे जसे झाले होते.. तसे आता नवउद्योगांचे झाले आहे.

ज्या वाऱ्याच्या वेगाने देशात नवउद्योगांची साथ पसरली त्यापेक्षाही अधिक वेगाने हे नवे उद्योग मिटून जाताना दिसतात. मग त्यांना ज्यांनी भांडवल पुरवले त्यांचे काय? त्यात काम करणाऱ्यांचे काय? ज्यांनी कोणी हा नवउद्योग स्थापन केला त्याचे भवितव्य काय? असे नुसते प्रश्नच प्रश्न. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याकडे आता नवीनच एक प्रथा सुरू झाली आहे..

व्यक्ती काय किंवा संस्था काय? जे काही जन्माला येते ते जाणारच. हा जगाचा नियम. अंतिम सत्य म्हणता येईल असा एकमेव. पण हे जाणे पिकलेपणानंतरचे जाणे असेल तर त्या आधीच्या असण्यास काही न्याय मिळू शकतो. परंतु काही अभागींना ती संधी मिळत नाही. आला नाहीत तोवर तुम्ही जातो म्हणता काय.. असा प्रश्न गदिमांच्या ओळीच्या आधाराने त्यांना विचारता येतो. पण त्याचे उत्तर मिळेलच असे नाही. हे जसे व्यक्तींचे होते तसे व्यक्तींना उभ्या केलेल्या संस्था, कंपन्या आदींचेही होऊ शकते. महाराष्ट्रात तर उभ्या असलेल्या कंपन्यांपेक्षा आडव्याच झालेल्या कंपन्यांची संख्या किती तरी जास्त असावी. काही काही कंपन्या त्या त्या काळात किती मोठय़ा होत्या. आता त्यांचे नावही नाही. या महाराष्ट्रात जन्मलेल्याचे तोंड एके काळी गोड व्हायचे ते रावळगावने. ते चॉकलेट नव्हते. ती श्रीखंड गोळी नव्हती. ते फक्त रावळगाव होते. त्याच्या आठवणीने आज अनेकांच्या तोंडाचा चिकटा दूर होईल. या महाराष्ट्राच्या कित्येक पिढय़ा रावळगाव चघळत मोठय़ा झाल्या. आज त्याची नामोनिशाणीही नाही. घराघरांत पूर्वी डालडा नावाचा चिकट, तेलकट, तुपकट पदार्थ यायचा. आधी पत्र्याच्या डब्यांत आणि नंतर निमुळत्या होत जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांत. दुहेरी उपयोग असे त्याचा. त्यातला पदार्थ शंकरपाळी, करंज्या वगैरे तळण्यासाठी केला जायचा आणि तो ज्यातून येत असे त्याचा उपयोग टमरेल ते दोन खोल्यांमधले जमिनीवरचे वा लटकते तुळशी वृंदावन वा डाळतांदुळाचे डबे अशा विविध कामांसाठी होत असे. या डालडय़ाचे डबे त्या काळी घराघरांत असत. भरलेले आणि रिकामेही. मरावे परी कीर्तिरूपे उरावे.. ही म्हण जन्माला आली ती या डालडय़ासाठी असावी. पिढय़ान्पिढय़ा हे डालडय़ाचे डबे वापरले गेले या महाराष्ट्रात. त्या वेळी या देशातील नागरिकांच्या रक्तवाहिन्यांना कोलेस्टेरॉल या पाश्चात्त्य दैत्याचा स्पर्श व्हायचा होता. त्यामुळे माणसे बिनदिक्कत डालडा वापरीत. आता तेही गायब झाले. गरवारे या उद्योग घराण्याचाही असाच एके काळी दबदबा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात रावबहादूर वगैरे उपाधी जशी आदराने उच्चारली जात असे त्या आदराने आबासाहेब गरवारे हे नाव उच्चारले जात असे. तूर्त पुणेकरांना डेक्कनवरच्या त्रिकोणी उड्डाणपुलामुळे तरी ते माहीत असावे. परंतु अन्यत्र नव्या पिढीस या उद्योग घराण्याचा तितका काही परिचय नसावा. किती दाखले द्यावेत असे काळाच्या पडद्याआड गेलेल्यांचे? माकडछाप काळी टूथ पावडर, सँटोमिक्स जंताच्या गोळ्या, चंचल नावाचे गुलाबी दंतमंजन, वंदना खाकी फेस पावडर, अफगाण स्नो, जाई काजळ, नेत्रांजन, अ‍ॅल्युमिनियम पत्र्याचे दप्तर.. असे एक ना दोन. हे सगळे आपापले आयुष्य जगून काळाच्या पडद्याआड गेले. यातला मुख्य भाग म्हणजे त्यांना जगण्याची उसंत मिळाली. बरे-वाईट, काटकसरीचे कसे का असेना काही दिवस काढता आले.

परंतु आता अनेक उद्योगांना तेही भाग्य नसते. काल उभे राहायचे, आज बोलबाला आणि उद्या खेळ खतम. असे यातील अनेक उद्योगांचे आयुष्य. त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवउद्यमी म्हणून जी काही पिलावळ आली आहे ती तर फारच अभागी. सातव्या महिन्यात जन्मलेले अर्भक जसे नाजूक असते, असे म्हणतात. तसे या नवउद्योगांचे. कल्पना उत्तम. त्यांची प्रसिद्धीही उत्तम. आता प्रसिद्धी काय म्हणा हल्ली कशालाही मिळू शकते. माध्यमांचा छचोरपणा इतका की २४ तास चालवण्यासाठी कशालाही प्रसिद्धी देतात. अमुकढमुक कल्पनेचा जगातील आगळा उद्योग असे म्हणत दर दिवशी नव्यानव्या उद्योगांच्या बातम्या कानावर आदळत असतात. एकविसावे शतक सुरू होताना वेबसाइट्सचे.. म्हणजे माहिती महाजालातल्या थांब्यांचे जसे झाले होते.. तसे आता नवउद्योगांचे झाले आहे. त्या वेळी जन्माला येणारी प्रत्येक वेबसाइट नवीन आणि जगावेगळी असायची. आणि आठवडाभराने महाजालातल्या कृष्णविवरात ती विरून जायची. आज नवउद्यमींचे हे असे झाले आहे. नवीन कल्पना. दररोज. मग कोणी घरबसल्या किराणा पोचवणार, कोणी ताज्या भाज्या पुरवणारे अ‍ॅप तयार करणार, कोणी आजारी पडल्यावर डॉक्टर कसे शोधाल त्याचे मार्गदर्शन करणार, कोणी घरातल्या पाळीव प्राण्याची सरबराई करणार, कोणी विवाह जुळवणार तर कोणी मोडलेल्या विवाहात काय कराल त्याचे सल्ले देणार. असे काहीही. बरे या सर्व उद्योगांना सुरू करण्यासाठी बँकांनी नाही तरी खासगी व्यक्तींनी चांगला पतपुरवठा केलेला असतो. या उद्योजकांच्या भाषेत देवदूत गुंतवणूकदार म्हणतात त्यांना. एंजल इन्व्हेस्टर. हा देवदूती गुंतवणूकदार आपली खासगी संपत्ती वा निधी या उद्योगांच्या विकासासाठी पणाला लावतो. त्यामुळे या उद्योगांची सुरुवात मोठी जोमात होते. अशी जोमात की प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्याच पानावर त्यांच्या पानपानभर जाहिराती. तेव्हा पाहणाऱ्यास वाटावे काय मोठी नवीन कल्पना जन्माला आली आहे आणि तिच्यावर आधारित हा नवा उद्योग. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली स्टार्टअप इंडियाची हाक. तेव्हा मित्रों.. आता आपले जगणेच बदलणार.

परंतु कसचे काय? महिनाभरात तो उद्योग, ते अ‍ॅप आणि तो देवदूत गुंतवणूकदार, सगळेच गायब झालेले असतात. अशा अनेक नवउद्योजकांच्या नवउद्योगांची कलेवरे माहिती महाजालात आणि अन्यत्र आज विखुरलेली आढळतात. ज्या वाऱ्याच्या वेगाने देशात ही नवउद्योगांची साथ पसरली त्यापेक्षाही अधिक वेगाने हे नवे उद्योग मिटून जाताना दिसतात. एके काळी वेबसाइट्सचे जे होत होते तेच आता या नवउद्यमींचे होत आहे. मग त्यांना ज्यांनी भांडवल पुरवले त्यांचे काय? त्यात काम करणाऱ्यांचे काय? ज्यांनी कोणी हा नवउद्योग स्थापन केला त्याचे भवितव्य काय? असे नुसते प्रश्नच प्रश्न. यांची उत्तरे मिळणार कशी? आणि नाही मिळाली ती तर पुढच्यास काय चुकले ते कळणार तरी कसे?

याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याकडे आता नवीनच एक प्रथा सुरू झाली आहे. नवउद्योगांची अंत्ययात्रा. अनेक चांगल्या कल्पनांप्रमाणे हीदेखील अमेरिकेतच जन्माला आलेली. अमेरिकेत काही वर्षांपूर्वी भारतात सध्या जे होत आहे ते होत होते. नवउद्योगांना मारणारी साथच आली होती. तेव्हा ही कल्पना जन्माला आली. त्यांच्या अंत्यविधीची. अमेरिकेत तो अगदी साग्रसंगीत असतो. म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू येऊन ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.. वगैरे प्रार्थनाही करतो. त्यामानाने आपल्याकडचा अंत्यव्यवहार तसा सुटसुटीत. जो उद्योग गतप्राण झाला आहे त्या उद्योगाच्या कार्यालयात वा त्या उद्योग प्रवर्तकाच्या घराच्या गच्चीत वगैरे त्या दिवशी संध्याकाळी जमायचे. आपल्या उद्योगाचे प्राणोत्क्रमण नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले याचा प्रामाणिक आढावा घ्यायचा. तो घेताना त्या उद्योगाच्या मालकाने अथपासून ते इतिपर्यंत त्या उद्योगाच्या जन्माची आणि नंतरच्या प्रवासाची कहाणी सांगायची. त्या उद्योगासंदर्भात अन्य कोणा संबंधितास बोलावयाचे असेल तर त्याने आपली श्रद्धांजली वाहायची. आणि नंतर तिथल्या तिथे तेराव्याच्या महाभोजनाचा प्रसाद घ्यायचा आणि आपापल्या घरी जायचे. या सगळ्याचा हेतू हा की पुढे असा कोणा उद्योग करणाऱ्यास आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे आणि आदल्याच्या चुका पुढच्याने टाळाव्यात.

बेंगळुरूमध्ये  या अशा उद्योगांच्या अंत्यव्यवहारांची प्रथा चांगलीच रुळू लागली आहे. त्या शहरात अनेक स्त्रीपुरुष जथ्याजथ्याने अशा अंत्यव्यवहारांत सहभागी होतात. चांगलेच म्हणायचे. पूर्वी ही प्रथा असती तर मधल्या काळातले अनेक उद्योग वाचले असते. असो. पण पूर्वी झाले नाही म्हणून आता होऊ नये असे थोडेच. तेव्हा या प्रथेचे आपण स्वागतच करावयास हवे. आपल्याकडे मृतांस मंत्राग्नी, भडाग्नी, मुखाग्नी वगैरे देतात. तसा हा तंत्राग्नी. अन्य मृत्यूंप्रमाणेच बरेच काही शिकवून जाणारा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 3:13 am

Web Title: industry manufacturing investment economy
Next Stories
1 सिन्हा आणि त्यागी
2 अंकभ्रमकार
3 छिद्र की भोक?
Just Now!
X