धर्मगुरूच सर्वोच्च सत्तास्थानी असलेल्या इराणची गेल्या ४० वर्षांतील वाटचाल इतकी अधोगतीची कशी?

राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा किंवा धर्मसत्तेच्या हातीच राजशकट हवा असे मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग जगात सर्वत्र आहे. हा वर्ग धर्माकडे भाबडय़ा (पक्षी विचारशून्य) नजरेतून पाहतो आणि त्यास धर्मग्रंथातील स्वप्ननगरी प्रत्यक्षात आणणे शक्य आहे, असे वाटत असते. किंबहुना ही स्वप्नावस्था हेच त्याच्या ठायीचे धर्माकर्षण. परंतु ‘स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीसह उडाले’ असेच प्रत्यक्षात होते. कारण सत्ता – मग ती कोणाचीही असो – तीस निरंकुशता हा शाप आहे. त्यापासून कोणत्याही सत्तेस मुक्ती नाही. आणि तो शाप एकदा लागला की त्या वाळवीपासून वाचण्याची कोणत्याही सत्तेस संधी नाही. धर्मसत्तेस देखील. याचे उत्कट प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर आपल्या शेजारील इराण या देशाचे उदाहरण महत्त्वाचे ठरेल. या देशातील धर्मक्रांतीची आज चाळिशी.

शहा महंमद रझा पहलवी यांची विलासी, पाखंडी राजवट उलथून पाडण्याचे आश्वासन देत अयोतोल्ला रूहल्ला खोमेनी यांनी ही धर्मक्रांती घडवून आणली. पॅरिस येथे वास्तव्य करून इराणातील शहा-विरोधकांना फूस लावत राहिलेले खोमेनी १९७९ साली तेहरान येथे उतरले आणि शहा यांची राजवट उलथून पाडली गेली. एके काळचा हा देशप्रमुख पण त्यानंतर साध्या औषधालाही मोताद झाला आणि कर्करोगाच्या असाध्य आजारात अमेरिकेत प्राण गमावून बसला. वास्तविक माणुसकी हा कोणत्याही धर्माचा आत्मा. आणि इराणात तर साक्षात सर्वोच्च धर्मगुरू सत्तास्थानी. पण तरीही शहा यांच्या अवस्थेची कीव या धर्ममरतडांना आली नाही. शहा यांना आधी देश आणि मग जगच सोडावे लागले. अमेरिकेच्या अध्यक्षपदी त्या वेळी होते अशक्त जिमी कार्टर. ते इराणातील दंग्याविषयी काहीही करू शकले नाहीत. पुढे तर त्यांना अधिकच नामुष्कीस तोंड द्यावे लागले. या क्रांतीचा भाग म्हणून खोमेनी यांच्या धर्मस्वयंसेवकांनी तेहरानमधील अमेरिकी दूतावासात घुसखोरी करून तेथील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. हे ओलीसनाटय़ तब्बल ४४४ दिवस सुरू होते.

त्यातही धर्मास लाजिरवाणी बाब म्हणजे खोमेनी यांनी अमेरिकी निवडणुकांच्या तोंडावर कार्टर यांचे प्रतिस्पर्धी रोनाल्ड रेगन यांच्याशी समझोता केला. त्यानुसार अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक होईपर्यंत इराणातील अमेरिकी दूतावासातील ओलिसांची सुटका न करण्याचे खोमेनी यांनी मान्य केले. कारण ती केली तर कार्टर यांना निवडणुकीत त्याचा फायदा होण्याची शक्यता होती. त्यामुळे खोमेनी यांनी ती केली नाही आणि या धर्मगुरूने त्या बदल्यात रेगन यांच्याकडून आर्थिक मोबदला घेतला. त्या वेळच्या या आर्थिक घोटाळ्यात खोमेनी यांना साथ देण्यास धर्मवेडा म्हणून दाखवला जाणारा इस्रायलसारखा देशदेखील होता, ही बाब महत्त्वाची. म्हणजे ख्रिस्ती, इस्लाम आणि यहुदी अशी सर्वधर्मीय हातमिळवणी त्या वेळी झाली आणि त्यातून आलेल्या निधीतून पुढे निकाराग्वाचे काँट्रा शस्त्रपुरवठा प्रकरण घडले. त्याचा बभ्रा नंतर झाला आणि अमेरिकेत काहींना शिक्षाही झाली. पण इराण वा इस्रायल या देशांत त्याचे काहीही घडले नाही. अशा तऱ्हेने ही धर्मक्रांती यशस्वी झाली. आज ४० वर्षांनंतर याबाबतची परिस्थिती काय?

अयातोल्ला यांनी सत्ता हाती घेतल्या घेतल्या केले काय? तर पहिल्यांदा तेलविहिरींना टाळे ठोकले. म्हणजे इराणची चूल ज्यावर पेटत होती तीच त्यांनी बंद केली. साहजिकच त्या देशास मोठय़ा आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागले. परिस्थिती गंभीर झाल्यावर हा निर्णय त्यांना बदलावा लागला. खोमेनी यांनी सत्ता हाती घेतली त्या वेळी शेजारील इराक देशात सुधारणावादी सद्दाम हुसेन याची राजवट होती. तेथे महिलांना बुरख्यात राहावे लागत नसे आणि शिक्षणादी संधी सहज मिळत. ते खोमेनी यांना पटणारे नव्हते. त्यांनी धर्मनियमांचा अतिरेक त्या देशात सुरू केला. पश्चिम आशियाच्या वाळवंटात जीव असलेल्या तत्कालीन अमेरिकेसही तेच हवे होते. सुन्नी प्रभावाखालील सौदी अरेबियाविरोधात सत्तासंतुलन व्हावे यासाठी अमेरिकेने इराणच्या शिया पंथीय खोमेनी यांना उत्तेजन दिले. एकाच वेळी अमेरिका इराकचा सद्दाम हुसेन आणि त्याविरोधात इराणचे खोमेनी या दोघांनाही आर्थिक आणि शस्त्रास्त्र पुरवठा करीत होता. धर्माच्या आधारे आपली सत्ता टिकवू पाहणारे पुढे जागतिक आर्थिक ताकदींच्या हातातील खेळणे बनतात हा यातील धडा. पुढे सौदी अरेबियासारख्या देशानेही त्यातून काहीही न शिकता त्याच चुका केल्याच. पण या चुकीची शिक्षा इराणने सर्वाधिक भोगली.

धर्माचा अतिरेक आणि त्यासाठी साध्या विवेकास दिलेली सोडचिठ्ठी यामुळे तो देश सातत्याने पाठोपाठ चुकाच करीत गेला. मग ती चूक सीरियातील असाद कुटुंबीयांस पाठिंबा देण्याची असो किंवा महमूद अहमदीनेजाद यांसारख्याने रशियाच्या व्लादिमीर पुतिन यांच्याशी केलेली हातमिळवणी असो. इराणचे फासे सतत चुकतच गेले. परिणामी जागतिक व्यापारात त्या देशास आर्थिक र्निबधांना तोंड द्यावे लागले. त्यात इराणच्या किमान तीन पिढय़ांचे नुकसान झाले. इस्लामी क्रांतीनंतर दहा वर्षांनी, १९८९ साली खोमेनी गेले. त्यानंतर चुकलेली वाट सुधारण्याची संधी इराणला होती. ती साधणे त्या देशास जमले नाही. खोमेनी यांच्यानंतर खामेनाई यांच्याकडे सत्तासूत्रे आली आणि धर्माचे राज्य तसेच अबाधित सुरू राहिले. दरम्यानच्या काळात रफसंजानी आदी त्यातल्या नेमस्तांना अधिकारपदे मिळाली खरी. पण अंतिम अधिकार अयातोल्ला खामेनाई यांच्याकडेच राहिला. धर्मसत्तेची पकड सल होऊ शकली नाही.

आज परिस्थिती अशी की त्या देशातील नागरिकांची पुढची पिढी देशात राहावयास तयार नाही. गेल्या काही वर्षांत इराणने प्रचंड प्रमाणावर स्थलांतर अनुभवले. अन्य इस्लामी देशांच्या तुलनेत इराणातील परिस्थिती बरीच बरी म्हणावी लागेल, हे खरेच. पण तरीही आधुनिकतेपासून दूर गेलेल्या या देशात प्रगतीच्या संधी नाहीत म्हणून तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणावर देशत्याग करताना दिसतो. अर्थव्यवस्था अत्यंत खिळखिळी झालेली. अमेरिकेतील बराक ओबामा यांच्या काळात नाही म्हणायला प्रगतीची एक खिडकी इराणसाठी उघडली. पण नंतर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ती पुन्हा बंद केली. त्यामुळे पुन्हा एकदा इराणवर आर्थिक र्निबधांचा अंमल सुरू झाला. याचा थेट परिणाम म्हणून त्या देशाशी आता कोणी आर्थिक व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे इराणची चहूबाजूंनी घुसमट होत असून आर्थिकदृष्टय़ा त्या देशावर मोठी विपन्नावस्थाच आली आहे. तरीही धर्माचे राजकारण करण्याची त्या देशाची खुमखुमी अजून गेलेली नाही. सीरियात त्या देशाचे सुरू असलेले उद्योग आणि सौदी अरेबियाविरोधातील कागाळ्या यांतून हे दिसून येते. इराणच्या तुलनेत सौदीची आर्थिक ताकद प्रचंड आहे आणि अमेरिकेच्या पंखाखाली सतत राहिल्याने त्याचाही फायदा त्या देशास मिळालेला आहे. सौदी राजे दुहेरी जगतात. मायदेशात ते धर्मवादी असतात आणि पाश्चात्त्य विश्वात आधुनिक. त्याचा साहजिकच मोठा फायदा सौदी अर्थव्यवस्थेस झाला असून आज जगातील अत्यंत बडय़ा अशा अनेक उद्योगांत सौदीची गुंतवणूक आहे.

या तुलनेत इराण सातत्याने मागेच पडत गेला. धर्मवादाच्या अतिरेकाने त्या देशाची ना भौतिक प्रगती झाली ना नागरिक समाधानी होऊ शकले. आज खामेनाई ८० वर्षांचे आहेत अणि त्यांची प्रकृती हा चिंतेचा विषय आहे. इराणला गत्रेत गेलेला पाहणारे ते सलग दुसरे अयातोल्ला. दोघांचीही कारकीर्द धर्मवादाचा पराभवच अधोरेखित करते. सत्ताकारणात धर्म आला की काय होते याचा इराण हा वस्तुपाठ ठरावा.