मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शिद आणि शकील अहमद या काँग्रेसच्या तीन वाचाळवीरांनी जी वाह्य़ात विधाने केली त्याबद्दल त्यांना फटकारणे गरजेचे असताना गांधी मायलेकांनी ते केले नाही. कॉँग्रेसची सत्ता जाण्यात अशा वाचाळवीरांनीच हातभार लावला होता, हे भाजपनेही वेळीच ओळखलेले बरे..

राजकीय शहाणपण आणि विवेक या गुणांनी काँग्रेसला कायमचीच सोडचिठ्ठी दिलेली दिसते. त्या पक्षाचे मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शिद, शकील अहमद या तीन ज्येष्ठांची वक्तव्ये आणि त्यानंतर त्यावर पक्षाच्या श्रेष्ठींनी बाळगलेले मौन शहाणपणा आणि विवेकाच्या अभावाची खात्री देतात. या तीन नतद्रष्ट वाचाळवीरांची वाह्यात बडबड कमी म्हणून की काय पक्षाचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा पुढे आला असून त्याचेही समाधानकारक समर्थन वा खुलासा काँग्रेसला अद्याप करता आलेला नाही. यातील शेवटचा मुद्दा उपस्थित करण्याचे पुण्यकर्म सुब्रमण्यम स्वामी यांचे. एरवी स्वामी यांना गांभीर्याने घ्यावे असे काही नाही. स्वामी म्हणजे आधुनिक राजकारणातील विचित्रवीर्य. राजकीय विरोध कमालीच्या वैयक्तिक पातळीवर नेणे हे त्यांच्या समाजकारणाचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. त्यातूनच आपल्या राजकीय शत्रूंविरोधात त्यांनी आतापर्यंत वाटेल ते आरोप केले. त्या आरोपांचे- आणि एका अर्थी स्वामी यांचेही- पुढे काहीच झाले नाही, ही बाब आरोपांतील तथ्यातथ्यता दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे. परंतु राहुल गांधी यांच्यावर स्वामी यांनी केलेला ताजा आरोप यास अपवाद ठरावा. चि. राहुलबाबांनी इंग्लंडमध्ये उद्योग स्थापन करताना आपण ब्रिटिश नागरिक आहोत, असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे स्वामी यांचे म्हणणे. त्यात तथ्य दिसते. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली. यातील अंतिम सत्य अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चि. राहुलबाबांनी काही तरी गडबड केली आहे, असा प्राथमिक निष्कर्ष नक्कीच निघू शकतो. चि. राहुलबाबा जी कंपनी काढू पाहत होते तीत पुढे प्रियांका गांधी यांची मालकी प्रस्थापित झाली आणि नंतर ती कंपनीच निकालात निघाली. हे ठीक. परंतु आक्षेपार्ह बाब म्हणजे नागरिकत्वाविषयी चि. राहुलबाबांनी केलेला कथित घोटाळा. त्यांनी स्वत:ला आधी ब्रिटिश नागरिक म्हटले, मग भारतीय आणि नंतर पुन्हा ब्रिटिश आणि पुन्हा भारतीय असे या संदर्भातील कागदपत्रे दर्शवतात. हे खरे असेल तर त्या पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारास हे शोभणारे नाही. खरे तर चि. राहुलबाबांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या इटालियन मुळाविषयीचा वाद संपुष्टात आला असताना चिरंजीवांनीही त्याच मुद्दय़ावर वादंग निर्माण करावा हे वर्षांनुवष्रे सत्ता भोगण्याची सवय झाल्याने आलेला माज आणि मांद्यत्वाचे लक्षण आहे.
तीच बाब मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शिद आणि शकील अहमद यांची. या तिघांनी एकापेक्षा एक जे काही तारे तोडले ते पाहता एकास झाकावा आणि दुसऱ्यास काढावा असे म्हणता येईल. अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन, तेथील दूरचित्रवाणीवरील चच्रेत सहभागी होत भारत-पाक शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूर सारायला हवे, असे विधान केले. अय्यर हे उच्चविद्याविभूषित आहेत आणि त्यांना आपल्या ज्ञानाची घमेंड आहे. ती त्यांच्या बोलण्यातून उतू जात असते. गतसालीही निवडणुकांदरम्यान त्यांनी मोदी यांच्याविषयी काही असभ्य उद्गार काढले होते. त्यातून त्यांचा क्षुद्रपणा दिसला. परंतु आताच्या विधानातून दिसतो त्यांचा शुद्ध नालायकपणा. उच्चशिक्षिताचे सोडा. पण काही किमान अक्कल असलेली कोणतीही व्यक्ती हे असले बेजबाबदार विधान करणार नाही. तेदेखील पाकिस्तानात जाऊन. अय्यर राजनतिक अधिकारी होते. तेव्हा त्यांना किमान याची जाणीव हवी की ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्याच पक्षाच्या हाती प्राधान्याने देशाची सत्ता होती. तेव्हा हे संबंध सुधारण्यापासून त्या पक्षास कोणी रोखले होते काय? खेरीज, काँग्रेसच्याच काळात देशाला चीन आघाडीवर पराभवाची नामुष्की सहन करावी लागली, त्याचे काय? वास्तविक इतके बेजबाबदार विधान करणाऱ्या नेत्यास काँग्रेसने घरी बसवावयास हवे. अलीकडे अनेक प्रश्नांवर चि. राहुलबाबांना कंठ फुटला आहे. मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर त्यांनी अलीकडेच टीका केली. तेव्हा देशहितजागृत चि. राहुलबाबांनी या मणिशंकरास कानपिचक्या, त्यादेखील जाहीर, द्यावयास हव्या होत्या. परंतु या मुद्दय़ावर चि. राहुलबाबांची दातखीळ बसलेली दिसते. ती सलमान खुर्शिद यांच्याबाबतही बसली. खुर्शिद हे परराष्ट्र खात्याचे मंत्री होते. त्यामुळे राजशिष्टाचार, राजनतिक संबंध, सभ्यता आदींशी त्यांची तोंडओळख तरी झाली असणार. त्या कशाचीही जाणीव न ठेवता खुर्शिद यांनी इस्लामाबादेत भाषण ठोकताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची तर तारीफ केलीच पण त्याच वेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी शरसंधान केले. काँग्रेसच्या या माजी परराष्ट्रमंत्र्याच्या मते भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पाक पंतप्रधान जितके कष्ट करीत आहेत त्याच्या जवळपासही पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न नाहीत. पाक पंतप्रधानांसमोर शांतता प्रयत्न रेटायचा म्हटले तरी आव्हाने आहेत, परंतु मोदी यांना या आव्हानांची काहीही जाणीव नाही. सबब ते शरीफ यांची आव्हाने कमी व्हावीत यासाठीही काही पावले उचलत नाहीत, असेही खुर्शिद यांचे म्हणणे. पाकिस्तानात जाऊन ही भाषा करणारी व्यक्ती जर परराष्ट्रमंत्री होऊन गेलेली असेल तर ती निवड किती चुकली यापेक्षा वेगळे ते काय यातून ध्वनित होईल? हे दोघेही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी चोपून भारताने शांततेसाठी काय करावयास हवे याचा सल्ला देणाऱ्या बोलघेवडय़ांमधले. अशा दीडशहाण्यांचे अलीकडे मोठेच पेव फुटलेले आहे. ते माध्यमांतूनही दिसते. सुधारण्याचा सल्ला फक्तिहदूंनाच देणाऱ्या आणि अन्य धर्मीयांपुढे कुíनसात करणाऱ्या आधुनिक निधर्मीवाद्यांप्रमाणे हे आधुनिक शांततावादी. पाकिस्तानात जाऊन तुमचेही काही चुकते आहे, ही तेथील राज्यकर्त्यांस सुनावण्याची त्यांची िहमत नाही. त्यामुळे तेथे जाऊनही ही मंडळी केवळ भारताविरोधात दुगाण्या झाडणार आणि तरीही वर देशात असहिष्णुता किती वाढत आहे असे रडगाणे गाणार. बहुसंख्य भारतीय समाज या मंडळींना चार हात दूर ठेवतो तो त्यांच्या या दांभिकतेमुळेच. वास्तविक इतक्या बेजबाबदार विधानानंतर चि. राहुलबाबाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निर्णयाविरोधात जसा जाहीर राग प्रकट केला होता तेवढा नाही तरी त्याच्या जवळ जाणारा संताप खुर्शिद यांच्याविरोधात दाखवून देण्यास हरकत नव्हती. परंतु ते त्यांनी वा त्यांच्या मातोश्रींनीही केले नाही. पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांनी तर छोटा राजन आणि उल्फाचा संस्थापक अनुप चेटिया यांचा धर्म काढला आणि हे दोघे मुसलमान असते तर मोदी कसे वागले असते, त्याबाबत अनावश्यक भाष्य केले. यानंतरही स्वत:स निधर्मीवादाचे प्रतीक मानणाऱ्या काँग्रेसने शकील अहमद यांना फटकारले नाही.
आता इतकी बेजबाबदार विधाने केल्यानंतर त्यांस अनुल्लेखाने मारण्यातच शहाणपणा होता. परंतु ते शहाणपण भाजपलादेखील दाखवता आले नाही. त्या पक्षाचे संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या या महाभागांची तुलना आयसिसच्या प्रवक्त्यांशी केली. हे वक्तव्यदेखील तितकेच बेजबाबदार. काँग्रेसने ज्याप्रमाणे आपल्या तीन नेत्यांचे वाह्य़ात विधानांबद्दल कान उपटले नाहीत त्याचप्रमाणे भाजपनेही या बोलक्या राघूस गप्प केले नाही. या असल्या वाचाळवीर पात्रांनी काँग्रेसची सत्ता घालवण्यास हातभार लावला. भाजपला हे लक्षात आले नाही तर त्यांनाही याच परिणामांस सामोरे जावे लागेल, तेदेखील अपेक्षेपेक्षा लवकर, याचे भान असलेले बरे.