अस्मितांचे अंगार फुलवून, इतिहासाचे चक्र उलटे फिरवण्यातच अलीकडे अनेकांना रस दिसतो..

‘‘हे विश्व आणि माणसाचा मूर्खपणा अनंत आहेत. परंतु या दोहोंतील विश्वाविषयी काही अंदाज तरी बांधता येईल, दुसऱ्याबाबत मात्र तसे करणे अशक्य आहे’’,  असे द्रष्टा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे विधान आहे. याचा अर्थ विश्वाचा आकार एकवेळ मोजता येईल, पण माणसाचा मूर्खपणा नाही. सांप्रत काळी यातील मूर्खपणाची जागा संकुचितपणा घेऊ शकेल. किंवा खरे तर मूर्खपणास संकुचितपणाची जोड मिळेल. आइन्स्टाईन यांच्याशीच संबंधित दोन देशांनी घेतलेले निर्णय याचे प्रतीक आहेत. यापैकी एक आहे इस्रायल आणि दुसरा जर्मनी. इस्रायल या देशाने स्वतची ओळख एक यहुदी देश अशी करण्याचा निर्णय घेतला तर जर्मनीचा विख्यात फुटबॉल खेळाडू मेसुत ओझील याने देशातील वाढत्या वंशवादामुळे राष्ट्रीय संघातून स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. या दोन्ही देशांत जे काही घडत आहे त्यातील बळी हे मुसलमान आहेत, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी. प्रथम इस्रायल या देशातील घटनांविषयी.

आजमितीस इस्रायल हे लोकशाही राष्ट्र आहे आणि त्या देशातील सर्व धर्मीय नागरिकांना समानाधिकार आहेत. प्राय: हा देश यहुदी धर्मीयांचा आहे हे जरी मान्य केले तरी या देशातील अरबांची संख्याही लक्षणीय आहे. सरकारची सूत्रे यहुदी धर्मीयांच्या हाती असली तरी अरबांना काहीच किंमत नाही, असे वातावरण त्या देशात नाही. अनेक पदांवर अरबदेखील नेमले जातात. अशा वेळी या देशाच्या सरकारने टोकाचा निर्णय घेतला असून देशासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार यापुढे फक्त यहुदींनाच राहणार आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा की त्या देशातील अरब, पॅलेस्टिनी वा अन्य अल्पसंख्याकांना त्या देशात कोणतेही स्थान असणार नाही. असलेच तर ते केवळ दुय्यम नागरिकाचेच असेल. याचाच अर्थ स्वातंत्र्य हे एक मूल्य सोडले तर त्या देशातील नागरिक समान दर्जाचे राहणार नाहीत.

हे भयंकर आहे. इस्रायलसारख्या प्रगतिशील, आधुनिक देशाने शेजारील अरबांइतका मागास निर्णय घ्यावा हे सध्याच्या जागतिक वातावरणास साजेसे असले तरी उद्विग्न करणारे आहे. त्या देशाने आधीच बळजबरी करून पॅलेस्टिनींना त्यांची न्याय्य भूमी देण्यास नकार दिला आहे. विद्यमान पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू हे इस्रायली राष्ट्रवादाचा अर्क म्हणता येतील असे. नेत्यान्याहू कमालीचे युद्धखोरदेखील आहेत. जागतिक मताची कोणतीही पर्वा न करता त्यांनी शेजारील पॅलेस्टिनी भूमी बळकावणे बिनदिक्कत सुरू ठेवले. सध्या जगात ठिकठिकाणी बहुसंख्याकवादाने अभद्र आणि विकृत स्वरूप धारण केल्याचे दिसते. इस्रायल हा त्याचाच एक नमुना. वास्तविक नेतान्याहू यांच्यासारखे नेते सामान्य जनतेस राष्ट्रवाद या एकाच भावनेभोवती प्रक्षुब्ध ठेवून आपलीच पोळी भाजून घेत असतात. या अशा नेत्यांसाठी देशप्रेम वगैरे केवळ बोलायच्या गोष्टी. देशप्रेम म्हटले की सामान्य नागरिकाची विचारशक्ती रजा घेते. इस्रायलमधे त्याचेच प्रत्यंतर येत असून या देशप्रेमी म्हणवणाऱ्या पंतप्रधानावरच अमाप संपत्ती केल्याचा आरोप आहे. नेतान्याहू यांच्या पत्नीचे अनेक उद्योग वादग्रस्त ठरले आहेत. तेव्हा या सगळ्यावरून सामान्य नागरिकाचे लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून असेल परंतु त्यांनी इस्रायल हा यहुदी देश म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

याचे अनेक गंभीर परिणाम संभवतात. यामुळे त्या देशातील अरब आदी अल्पसंख्याकांत नाराजीची लाट निर्माण झाली नाही तरच नवल. दुसऱ्याची भूमी जबरदस्तीने बळकावून ठेवायची आणि आपल्या भूमीतही त्याला स्थान द्यायचे नाही, असे हे राजकारण आहे. त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा दहशतवादाचे थमान सुरू झाले तर आश्चर्याचे कारण नाही. या संदर्भात या देशाचे संस्थापक डेव्हिड बेन गुरियन यांनी दिलेला इशारा लक्षात घ्यायला हवा. १९६७ साली अरबांविरोधातील महत्त्वाचे युद्ध जिंकल्यानंतर इस्रायलमधे जो राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण झाला त्याची दखल घेत गुरियन यांनी आपल्या देशाच्या नेत्यांना अरबांची बळकावलेली भूमी परत देण्याची सूचना केली. ‘तसे न करणे हे स्वहस्ते आत्मनाशाची बीजे पेरण्यासारखे आहे’, असे गुरियन यांचे शब्द होते. आपल्या देशातील अल्पसंख्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवून इस्रायल सरकारने गुरियन यांचा इशारा खरा ठरेल अशीच व्यवस्था केली, असे म्हणता येईल. आता त्या देशाच्या पावलावर पाऊल टाकून अन्य अनेक देशांत अशीच खोटय़ा राष्ट्रवादाची उबळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इस्रायलप्रमाणेच जर्मनीतील काही मूठभरांनीही अशाच राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले. परिणामी ओझीलसारख्या अव्वल दर्जाच्या फुटबॉलपटूवर राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेण्याची वेळ आली. जर्मन संघातून ९२ सामने खेळलेल्या, विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या खेळाडूवर अशी वेळ आली, त्यामागे जर्मनीतील वाढता वंशवाद कारणीभूत आहे. गेल्या काही वर्षांत जर्मनीत नव नाझी म्हणवून घेणाऱ्यांची चळवळ जोम धरत असून स्थलांतरित, अल्पसंख्य, अन्य वंशीय अशांना जर्मनीतून हाकलायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. ओझील याच्याबाबत असेच काहीसे घडले.

हा खेळाडू वंशाने तुर्क आणि धर्माने मुसलमान. जन्म जर्मनीतला आणि पुढचे सारे कर्मही जर्मनीतच घडलेले. इतके दिवस सारे काही सुरळीत होते. प्रश्न निर्माण झाला तो नुकत्याच संपलेल्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीस दारुण पराभव सहन करावा लागल्यानंतर. या स्पर्धेआधी ओझील याने तुर्कस्तानचे वादग्रस्त अध्यक्ष एर्दोगान यांची भेट घेतली. त्यावेळी तुर्कस्तानात निवडणुकीची हवा होती आणि एर्दोगान यांना आव्हान उभे राहील अशी अटकळ होती. तसे काही झाले नाही. सत्ता एर्दोगान यांच्याकडेच राहिली. अशा वेळी ओझील आणि एर्दोगान भेटीचा मुद्दा विस्मरणात गेला असता. परंतु तसे झाले नाही. कारण जर्मनीचा या स्पर्धेतला पराभव.

त्यासाठी जर्मन फुटबॉल संघटनेतील काहींनी ओझील यांच्यासारख्या खेळाडूस दोष देण्यास सुरुवात केली आणि त्याचा उल्लेख ‘तुर्कवंशीय जर्मन खेळाडू’ असा वारंवार केला जाऊ लागला. वास्तविक जर्मन संघात पोलंड आदी देशांतील खेळाडूदेखील आहेत. परंतु त्यांचा उल्लेख कधी ‘पोलिश वंशाचे जर्मन’ अशा तऱ्हेने केला गेला नाही. परंतु ओझील याच्याबाबत मात्र तसे वारंवार झाले. ‘‘आपण मुसलमान आहोत म्हणून आपली अशा तऱ्हेने हेटाळणी होते’’,  असे ओझील याचे म्हणणे. ते सहजपणे खोडून काढता येण्यासारखे नाही. कारण जर्मन फुटबॉल संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ओझील याच्या जर्मन निष्ठांविषयीदेखील प्रश्न निर्माण केला. ‘‘संघ जिंकतो तेव्हा माझा उल्लेख जर्मन असाच केला जातो आणि पराभूत झाला की मात्र मला स्थलांतरित म्हणून हिणवले जाते,’’ अशा शब्दांत ओझील याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आणि संघाचा निरोप घेतला.

या दोन्ही घटना कमालीच्या दुर्दैवी आणि प्रतीकात्मक आहेत. अनेक देशांत सध्या अशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रत्येक समूहास आता केवळ आपल्या अस्मितांचे अंगार फुलवण्यातच रस असून किमान मानवी मूल्यांनादेखील पायदळी तुडवण्यात कोणास काही वाटत नाही. काही शहाण्या, सुसंस्कृत नेत्यांनी हे जग राहण्यायोग्य बनवण्यासाठी प्रयत्न केले. आता हे इतिहासाचे चक्र उलटे फिरवण्यातच अनेकांना रस दिसतो. हा तेजातुनी तिमिराकडे असा प्रवास अंतिमत: सर्वाचेच नुकसान करणारा असेल.