भारतीय सौजन्यशीलतेचा गैरफायदा घेत इव्हान्का ट्रम्प यांनी जे काही तारे तोडले त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची दखल घेणे आवश्यक ठरते..

समर्थाच्या घरच्या श्वानासही मान द्यायचा असतो, हे आपण शिकत आलेलो आहोतच. परंतु समर्थाच्या लेकीलाही डोक्यावर घ्यायचे असते हे आपल्याला इव्हान्का ट्रम्प यांच्या भारत भेटीने शिकवले. जागतिक उद्यमशीलता परिषदेसाठी ही ट्रम्पकन्या दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी हैदराबादेत येऊन गेली. ही कथित परिषद हे एक निमित्तच तसे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जातीने आपल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीस भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. आता पंतप्रधानच बोलावीत आहेत म्हटल्यावर न जाणेही तसे बरे नाही, असा विचार ट्रम्प पितापुत्रीने केला असणार. म्हणून त्यांनी लेकीस भारतात धाडले. इव्हान्काचा हा दौरा अमेरिका-भारत मैत्रीपूर्ण संबंधांतील महत्त्वाचे पाऊल आहे असे एक लोणकढी विधान ट्रम्प यांनी या संदर्भात केले. अमेरिकी शैलीनुसार ते योग्यच. परंतु या ट्रम्प महाशयांसाठी भारताबरोबरचे संबंध हा इतकाच महत्त्वाचा विषय होता तर आपल्या १२ दिवसांच्या आशिया खंड दौऱ्यात त्यांनी या भरतभूवर चरणस्पर्श करण्यास हरकत नव्हती. अगदी अलीकडे हे ट्रम्प कोरिया ते चीन अशा प्रदीर्घ दौऱ्यात होते. परंतु भारतात येण्याची गरज त्यांना वाटली नाही. येथे मात्र त्यांनी आपल्या कन्येस पुढे केले. इतकेच नव्हे तर या ट्रम्पकन्येच्या भारत दौऱ्यात अमेरिकी प्रशासनातील एकही उच्चस्तरीय अधिकारी तोंड दाखवायलादेखील आला नाही. एरवीच्या प्रथेप्रमाणे अमेरिकी परराष्ट्र वा गृहमंत्री अथवा ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी या दौऱ्यात ट्रम्पकन्येस साथ द्यायला हवी होती. तसे काहीही झाले नाही. म्हणजे या एकाच उदाहरणावरून अमेरिकेच्या लेखी अध्यक्ष कन्येच्या या भारत दौऱ्यास किती महत्त्व होते, ते समजून घेता येते.

आपण मात्र अतिथी देवो भव या उक्तीस जागून लवलवून अध्यक्षकन्येचे पायघडय़ा घालून स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी जातीने हजर राहून आपल्या गुजराती आतिथ्यशीलतेची चुणूक अध्यक्षकन्येस दाखवून दिली. ट्रम्पकन्येने आपल्या पाहुणचाराचे पांग फेडले असे म्हणावे लागेल. भारताची महानता, पंतप्रधानांचे कर्तृत्व, देशाचे जगाच्या राजकारणातील स्थान वगैरे अनेक विषयांवर स्तुतिसुमने उधळून ट्रम्पकन्या आपल्या खाल्ल्या मिठास जागली यात शंका नाही. त्याकडेही दुर्लक्ष करता आले असते. परंतु या दौऱ्यात आपल्या सौजन्यशीलतेचा गैरफायदा घेत इव्हान्का यांनी जे काही तारे तोडले त्यामुळे या दौऱ्याची दखल घेणे आवश्यक ठरते. महिलाशक्ती, महिलांचे सक्षमीकरण वगैरे केवळ परिसंवादातच शोभतात अशा काही विषयांवर या अध्यक्षकन्येने या दौऱ्यात भाष्य केले. अशा वेळी, ‘बाई, तुमच्या देशात निर्मितीनंतर जवळपास दीडशे वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, स्वतंत्र भारतात मात्र पहिल्या दिवसापासून महिलांना समानाधिकार आहे,’ असे तीस उपस्थितांपैकी कोणी तरी सुनावणे आवश्यक होते. परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाने बहुधा उपस्थित जनगण भारलेले असल्यामुळे असे काही सुनावण्याची गरज तेथे कोणास वाटली नाही. वास्तविक महिला अधिकार, महिलांचे सक्षमीकरण या मुद्दय़ांचे महत्त्व आपण आधी आपल्या तीर्थरूपांना पटवून द्यायला हवे, ते का करीत नाही, असेही अध्यक्षकन्येस विचारणे प्रसंगोचित ठरले असते. परंतु आपणास जे जमले नाही ते याआधी जर्मनीने करून दाखवलेले आहे. या इव्हान्काबाईंनी जर्मनीच्या दौऱ्यात आपल्या तीर्थरूपांचे स्त्रीदाक्षिण्य आदींवर भाष्य करीत पोपटपंची सुरू करताच उपस्थित प्रेक्षकांनी त्यांचे भाषण बंद पाडले होते. इतका थोर त्यांच्या पिताजींचा लौकिक. ही अगदी अलीकडची घटना. अर्थात जर्मनीत या इव्हान्काबाई तेथील देशप्रमुखाची पाहुणी नसल्याने तेथे असे करणे उपस्थितांना शक्य झाले. असे काही येथे होण्याची शक्यता नव्हती. असो. मुद्दा इव्हान्का यांना आपण कशी वागणूक दिली, हा नाही. तर या दौऱ्यात त्यांनी काय भाष्य केले हा आहे.

वास्तविक बालक आणि महिलांचे शोषण, त्यांचे हक्क यावर ही अध्यक्षकन्या येथे मोठय़ा तोंडाने आपणास उपदेशामृत पाजत होती तरी तिचा याबाबतचा लौकिक काही अभिमानास्पद नाही. अमेरिकेत बाल-लैंगिकशोषणाचा मुद्दा गाजत असताना त्यावर काही भूमिका घेणे इव्हान्का हिने टाळले होते. ‘लहानग्यांशी असे वागणाऱ्यांना नरकात विशेष वागणूक मिळते,’ एवढीच काय ती त्यांची या गंभीर विषयावर टिप्पणी. बरे हा मुद्दादेखील कोणा ऐऱ्यागैऱ्यासंदर्भात नव्हता. ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉय मूर यांच्यावरच बाल- लैंगिक शोषणासंदर्भात टीका झाली होती. इव्हान्का यांनी ती अशा प्रकारे झटकून टाकली तर वडील डोनाल्ड ट्रम्प यांनी मूर यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र दिले. म्हणजे या विषयांवर हे बापलेक किती गंभीर आहेत, ते दिसून येते. त्याचप्रमाणे इव्हान्का यांच्या तयार कपडय़ांच्या कारखान्यातही महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप आहे आणि तो त्यांनाही खोडून काढता आलेला नाही. या बाईंचे तीर्थरूप जनतेस अमेरिकी उत्पादने वापरा असे आवाहन करीत असतात. परंतु त्यांच्या कन्येचा, म्हणजे इव्हान्का यांचा, वस्त्रप्रावरणांचा कारखाना मात्र बांगलादेश आणि इंडोनेशिया येथे आहे. या दोन्हीही देशांत महिलांना राबवून घेऊन अत्यंत कमी वेतनात त्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात पुरावेदेखील दिले गेले. परंतु ट्रम्प कुटुंबीयांनी यावर मौनच बाळगलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर आणि इव्हान्का यांची व्हाइट हाऊसमध्ये प्रतिष्ठापना झाल्यावर त्यांनी या कंपनीशी कागदोपत्री संबंध तोडले हे खरे. परंतु म्हणून त्यावरील त्यांची मालकी काही संपुष्टात आलेली नाही.

आणखी मुद्दा इव्हान्का यांच्या कर्तृत्वाचा. या बाईंच्या उद्यमशीलता आदींचे गोडवे या वेळी गायले गेले. परंतु तीर्थरूप अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होईपर्यंत इव्हान्का यांचे कर्तृत्व जगास दिसले नव्हते. वडील व्हाइट हाऊसमध्ये स्थिरावल्यावर या इव्हान्का यांनी आपल्यासाठीही तेथे स्थान निर्माण करून घेतले असून कोणत्याही वेतनाखेरीज आपण तेथे देशाची सेवा करतो, हे त्या अभिमानाने सांगतात. अर्थात त्यांच्या देशसेवेसाठी वडिलांनी अध्यक्ष होणे गरजेचे होते, ही बाब अलाहिदा. या इव्हान्का यांचे पती जेरेड कुशनेर हे मोठे उद्योगी गृहस्थ आहेत आणि निवडणूक काळात आपल्या श्वशुरांनी रशियात केलेल्या (नको त्या) उद्योगात त्यांचा हात आहे, असेही पुढे आले आहे. सध्या तर अमेरिकेचे पश्चिम आशिया धोरण हे जेरेड हेच ठरवतात, अशी वदंता आहे. ती खोटी असण्याची शक्यता नाही. याचे कारण सौदी राजपुत्र सलमान याने आपल्या सर्व नातेवाइकांना तुरुंगात डांबले; त्याआधी या जेरेड यांच्याशी त्याची मसलत झाली होती. तात्पर्य इतकेच की वडील अमेरिकेचे अध्यक्ष नसते तर इव्हान्का ट्रम्प यांना इतके महत्त्व आले नसते. खरे तर आपल्या सरकारला घराणेशाहीचा कोण राग. तरीही तो बाजूला ठेवून आपण इव्हान्का यांचे जोरदार स्वागत केले यातच काय ते आले.

तेव्हा या इव्हान्का यांच्या दौऱ्याने कोणाचे काय भले झाले, हा प्रश्नच आहे. एक चकचकीत सेल्फी समारंभ इतपतच त्याचे महत्त्व. तरीही आपल्या व्यवस्थेने त्यास इतके महत्त्व देणे योग्य होते का, हा प्रश्न आहे. यात ना चर्चा झाली H1B  व्हिसा मुद्दय़ावर ना अन्य कोणत्या मुख्य मुद्दय़ावर. हे इव्हान्का उपाख्यान म्हणजे नुसतीच फसफस.