पाकमधील जिओ या वाहिनीवर बंदी कोणी घातली हे कळालेच नाही आणि ती उठवली कोणाच्या आदेशानुसार हे सांगण्याची गरज कोणासही वाटलेली नाही...

लोकशाही ही केवळ व्यवस्था नाही. ते जीवन तत्त्वज्ञान आहे. याचा अर्थ असा की केवळ मते देण्याचा वा व्यक्त करण्याचा अधिकार म्हणजे लोकशाही नव्हे. मते केवळ बाह्य़रूप. परंतु या वरवरच्या वातावरणालाच अनेक जण भुलतात आणि लोकशाही आहे म्हणून समाधान मानू लागतात. परंतु नागरिकांस मत व्यक्त करण्याचा अधिकार देऊनही लोकशाहीची कशी आणि किती पायमल्ली करता येते याचे अनेक दाखले आज जगात अनेक देशांत दिसत आहेत. ते आहेत याचे कारण लोकशाही हे तत्त्वज्ञान म्हणून या देशांना अंगीकारता आलेले नाही. कितीही भिन्न असले तरी विरोधी मताचा आदर करणे आणि मुळात आपले मत सर्वमान्य व्हावे यासाठी अधिकाराचा वापर टाळणे हे खऱ्या लोकशाहीचे लक्षण. सर्वार्थाने मुक्त प्रसार माध्यमे हे खऱ्या लोकशाहीचे खरे लक्षण. मुळात लोकशाही ही पाश्चात्त्य कल्पना. त्यामुळेही असेल परंतु ती अद्याप अनेक आशियाई देशांत मुरलेली नाही. या देशांत कागदोपत्री लोकशाही आहे. पण लोकशाही हे तत्त्व म्हणून मुरण्यापासून अनेक योजने दूर आहे. आपला शेजारी पाकिस्तान हे याचे मूर्तिमंत उदाहरण. हा देश आपल्याप्रमाणेच १९४७ साली स्वतंत्र झाला. परंतु आपल्याइतकीदेखील लोकशाही त्या देशात रुजू शकलेली नाही. धर्माच्या आधारे देश बांधता येऊ शकतो अशी ज्यांची धारणा आहे त्यांच्यासाठीही पाकिस्तान हे जिवंत उदाहरण आहे. धड लोकशाही मूल्यांचे रुजणे नाही आणि त्यास अप्रामाणिक धार्मिक अस्मितेची जोड यामुळे पाकिस्तानचे रूपांतर सर्वार्थाने असफल देशात झाले असून त्या देशातील ताज्या घडामोडींतून हेच पुन्हा दिसून येते.

जिओ या खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवर त्या देशातील सर्वोच्च सत्ताधीशांनी लादलेली अघोषित बंदी ही ती ताजी घटना. कोणतेही कारण वगैरे न देता या वाहिनीचे प्रसारण अचानक बंद झाले आणि जागतिक स्तरावर निषेध झाल्यानंतर ते आपोआप सुरू झाले. बंदी कोणी घातली हे कळावयास मार्ग नाही आणि ती उठवली कोणी, कोणाच्या आदेशानुसार हे सांगण्याची गरज कोणासही वाटलेली नाही. यानिमित्ताने जे काही घडले ते पुरेसे बोलके आहे आणि तिसऱ्या जगातील देशांचे नेतृत्व करणाऱ्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवणारे आहे. म्हणून ते दखलपात्र ठरते. माध्यमांचा गळा आवळायचा. आवळून घेतला गेला तर ठीक. पण फारच त्या विरोधात बभ्रा झाला तर तो सोडायचा, ही ती तिसऱ्या जगातील देशांचे नेतृत्व करणाऱ्यांची मानसिकता. पाकिस्तानातील घटनेमुळे याचेच पुन्हा एकदा दर्शन घडले. पाकिस्तानशी असलेले आपले भौगोलिक सख्य लक्षात घेता जे काही झाले त्याचे सविस्तर विवेचन उद्बोधक ठरावे.

जिओ ही वाहिनी इंडिपेंडट मीडिआ कॉर्पोरेशन या कंपनीतर्फे चालवली जाते. आखातातील अनेक स्वतंत्र अशा वृत्तवाहिन्या आपले प्रसारण दुबई, दोहा आदी शहरांतून करतात. याचे कारण त्यांच्या त्यांच्या देशातील दहशत. जिओदेखील याच धर्मानुसार काम करते. त्याचप्रमाणे या कंपनीच्या मालकीची काही दैनिकेदेखील आहेत. पाकिस्तानातील लोकप्रिय असे ‘जंग’ हे दैनिक याच कंपनीतर्फे चालवले जाते. हे वर्तमानपत्र दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाले तर वृत्तवाहिनी अलीकडची. ती २००२ साली अस्तित्वात आली. आल्यापासून आपल्या वृत्तांकनासाठी ती ओळखली जाते. या वाहिनीच्या पत्रकारांना दहशतवादी वगैरेदेखील काही दिवसांपूर्वी ठरवले गेले. पाकिस्तानातील सर्वशक्तिमान गुप्तहेर यंत्रणा आयएसआय हिच्याविरोधात बातमी दिली म्हणून हल्ला झालेला हमीद मीर हा पत्रकार याच जिओ वाहिनीचा. पाकिस्तानसारख्या देशात काम करणे माध्यमांपुढे तिहेरी आव्हान असते. एका बाजूला निरंकुश सत्ता राबवू पाहणारे सरकार. दुसरीकडे या सत्तेविरोधात उभी ठाकलेली धर्मसत्ता. या धर्मसत्तेस बऱ्याचदा सरकारची नाही तरी सरकारातील काहींची साथ असते. आणि तिसऱ्या कोनातून उभे असतात ते राष्ट्रवादाचा डांगोरा पिटणारे, या दोन्हींच्या संगनमताने आपले हित साधणारे लष्करशहा. या वातावरणातील प्रेक्षकही सुजाण नसतात. त्यांना स्वतंत्र विचारांची सवय असतेच असे नाही. त्यामुळे त्यांना घडवणे हे मोठे आव्हान असते आणि माध्यमांना ते पेलता येऊ नये अशीच सरकारची इच्छा असते.

तेव्हा अशा वातावरणात काम करणाऱ्या जिओ या वाहिनीने पाकिस्तानातील लष्करशहांच्या हितसंबंधांना उजेडात आणणारी वृत्तचित्रफीत तयार केली. हे फारच धाडसाचे. याचे कारण पाकिस्तानात भले जरी सरकार निवडणुकीच्या मार्गाने वगैरे येत असले तरी खरी सत्ता लष्कराचीच असते. अलीकडच्या काही पंतप्रधानांची जी काही अवस्था लष्कराने केली त्यावरून लष्कराच्या सामर्थ्यांची कल्पना यावी. जगातील अन्य कोणत्याही लष्कराप्रमाणे पाकिस्तानचे लष्करदेखील युद्धखोरीस सोकावले असून राष्ट्रवादाच्या बुरख्याआड हे गणवेशधारी असल्याने त्यांना कोणी काही जाब विचारण्याची सोय त्या देशात नाही. जगाचा इतिहास सांगतो की दहशतवाद आणि त्यास रोखण्याचा दावा करणारे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि दोघांचेही हितसंबंध परस्परांत गुंतलेले असतात. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे लष्कर आणि इस्लामी मूलतत्त्ववादी यांचे साटेलोटे आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकारी हे त्या देशात राजकारण्यांपेक्षाही भ्रष्ट असून त्यांनी केलेली माया थक्क करणारी आहे. ही माया जमवण्याची आणि स्वार्थ साधत राहण्याची अव्याहत क्षमता म्हणजे युद्धखोरी. वातावरणात युद्धज्वर कायम राहिला तर लष्करास हवी ती आणि हवी तेवढी साधनसंपत्ती पुरवली जाते. हा असा कायमचा रसदपुरवठा देशप्रेमींनादेखील आनंद देतो. तेव्हा अशा वातावरणात फावते ते लष्करी अधिकाऱ्यांचेच. पाकिस्तानात नेमके हेच सुरू होते. त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न जिओ या वाहिनीने केला. वाढत्या दहशतवादात असलेले लष्कराचे हितसंबंध हा त्या वृत्तांकनाचा विषय होता. हे असे काही जिओवरून सादर केले जाणार आहे याची कुणकुण लागल्या लागल्या या वाहिनीचे प्रसारण खंडित होऊ लागले. ही वाहिनी खासगी. पाकिस्तानच्या ९० टक्के भागांत तिचे प्रसारण हे केबलमार्फत होते. त्यामुळे अनेक प्रदेशांतील केबलधारकांनी तिचे प्रसारण अचानक बंद केल्यावर त्याबाबत प्रश्न निर्माण झाले. हे केबलचालकांनी का केले याचा कोणताही खुलासा झाला नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील खासगी वृत्तवाहिन्यांचे नियंत्रण करणाऱ्या सरकारी यंत्रणेसही याबाबत काही सांगता आले नाही. या वाहिनीवर निर्बंध जारी करण्याचा कोणताही आदेश आपण दिला नव्हता, इतके स्पष्टीकरण काय ते या यंत्रणेने दिले. तसेच सरकारी माहिती आणि प्रसारण खात्यानेही याबाबत कानावर हात ठेवले. आपण असे काहीही केलेले नाही, असे या खात्याचे म्हणणे. प्रत्यक्षात ते खरे होतेही. पण या वाहिनीचे प्रसारण बंद झाले, हेदेखील खरेच होते.

तेव्हा संशयाची सुई पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांच्याकडे वळली असून त्यांनी मात्र मौन पाळले आहे. सलग दोन दिवस पाकिस्तानच्या बव्हश: भागांत ही वाहिनी दिसेनाशी झाली. अमेरिका, युरोप आदींतील माध्यमांनी या विरोधात जोरदार आवाज उठवला. खुद्द जिओचे व्यवस्थापनदेखील ताठ उभे राहिले. त्यांनी तर जनतेस आव्हान केले, प्रक्षेपण दिसत नसेल तर सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. त्यासाठी त्यांनी संबंधितांचा संपर्क क्रमांकदेखील दिला. त्यानंतर या अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा इतका पाऊस पडला की ही बंदी उठवावी लागली. हे त्या अशक्त देशातील सशक्त माध्यमांचे यश. म्हणून त्या देशातील लोकशाहीप्रेमी नागरिक जुग जुग जिओ, असेच म्हणत असतील.