कलेच्या प्रवाहास कोणत्याही बंधनाविना मुक्तपणे वाहू देण्यातच समाजाचे भले आणि प्रगतीची हमी असते, हे न्या. धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन आश्वासक ठरते..

‘कला आणि राजकारण यात फारकत असावी अशा प्रकारच्या विधानातच खरे तर राजकारण आहे,’ असे अद्वितीय लेखक जॉर्ज ऑर्वेल म्हणून गेला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे एका अर्थी ऑर्वेलचे विधान अधोरेखित करतात. ‘स्वातंत्र्य-कल्पनेचे कलेसंदर्भात चिंतन’ या विषयावर न्या. चंद्रचूड यांनी आपल्या अप्रतिम व्याख्यानात काही मूलगामी भाष्य केले. सद्य:स्थितीत वैचारिक दुभंग आणि द्वैत अनुभवणाऱ्या कला, साहित्य क्षेत्राने या भाषणाची दखल घ्यायला हवी. त्यातही राजकारणाकडे ‘एक समृद्ध अडगळ’ म्हणून आणि कला क्षेत्राकडे चार घटका मनोरंजन याच नजरेतून पाहणाऱ्या मराठी मध्यमवर्गीय जाणिवांवर पोसलेल्या साहित्यविश्वाने तर न्या. चंद्रचूड यांच्या भाषणाने खडबडून जागे व्हायला हवे. ‘प्रत्येक कलाकृती राजकीय भाष्य असते आणि तसे नसेल तर कलाकृतीचे स्वरूप हे शब्द, रंग आणि स्वर यांच्या एखाद्या (निर्जीव) शोभेच्या दागिन्यासारखे उरेल,’ हा न्या. चंद्रचूड यांनी मांडलेला मुद्दा आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

‘आपल्याकडे’ असे म्हणायचे, याचे कारण कलाकार आणि त्या कलेचा आस्वाद घेणारे या दोघांनीही कलेसाठी राजकारण वर्ज्य मानले. ‘राजकारणास कलेपासून दूर ठेवा,’ असे मध्यमवर्ग म्हणत राहिला आणि त्याचा लबाड फायदा घेत कलाकार मनोरंजनीकरणात आपल्या तुंबडय़ा भरत राहिले. या परिस्थितीमागील कारणांवर भाष्य करण्यापूर्वी कला क्षेत्रातील ‘चांगले’ आणि ‘महान’ यांतील फरक समजून घ्यायला हवा. चार्ली चॅप्लिननंतर त्याच्यासारखे, पण विदूषकी चाळे करणारे आपल्याकडे आणि जगभरही कमी नाहीत. ते फार तर फार चांगले विदूषक होऊ  शकतील. पण चॅप्लिन महान ठरतो. याचे कारण त्याच्या कलाविष्कारात राजकीय भाष्य होते. बोरिस पास्तरनाक, अंतोन चेकाव्ह, अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन आदी लेखक महान ठरले ते त्यांच्या त्यांच्या काळातील व्यवस्थेवर त्यांच्या कलाकृती काहीएक भाष्य करतात म्हणून. इतकेच काय, शेक्सपीअरच्या ‘ए मिडसमर नाइट्स ड्रीम’ वा ‘द कॉमेडी ऑफ एर्स’ या कलाकृती अपार आनंद देतात. पण महान साहित्याच्या पंगतीत स्थान आहे ते ‘हॅम्लेट’, ‘किंग लिअर’ वा ‘मॅक्बेथ’ यांनाच. मातृभाषेच्या पातळीवर यावयाचे तर पु. ल. देशपांडे या व्यक्तिमत्त्वाभोवती एक प्रभावळ दिसते, ती काही ‘व्यक्ती आणि वल्ली’ वा ‘बटाटय़ाची चाळ’ यांची नाही. दुर्गाबाई भागवतांविषयी जो एक दरारा आहे ती काही ‘ऋतुचक्र’ची देणगी नाही. या दोन्हीमागे या दोन्ही लेखकांची राजकीय भूमिका आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विजय तेंडुलकर वा गो. पु. देशपांडे यांचे थोरपण त्यांच्या कलाकृतींत असलेल्या राजकारणात आहे. जागतिक वा देशी पातळीवरील असे अनेक दाखले देता येतील. हे स्पष्ट झाल्यानंतर आपल्याकडे कला आणि राजकारण यांत एवढी फारकत का असते, या प्रश्नास सामोरे जावे लागेल.

असे असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे कलाविष्कार फक्त दोन पातळ्यांवरच मर्यादित राहिले. एक म्हणजे लोककला आणि दुसरी दरबारी कला. एका बाजूने तळागाळातील वर्गास लोककला रिझवीत राहिली आणि अभिजनवर्ग दरबारी कलेच्या आसक्तीत मश्गूल राहिला. कलाविश्वाला त्यामुळे आपल्याकडे आस असते तीच मुळी ‘दरबारा’ने आपली दखल घ्यावी याची. त्यात, आपली कलाजाणीव वा कलासाक्षरता विकसित करण्यात मागे पडलेला समाज ‘दरबारी दखलपात्र’ कलाकारांना मोठे मानू लागतो. हे दुष्टचक्र आहे. त्याची दशा बदलण्याचा वा त्याच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न फारच थोडय़ा कलाकारांनी केला. पाश्चात्त्य देशांत हे असे आढळत नाही. याचे कारण युरोपातील पंधराव्या शतकातील रेनेसाँ. या प्रबोधनकाळात सर्वच क्षेत्रांतील मानवी क्षमतांचे पुनरुत्थान घडून आले आणि विज्ञानापासून चित्रकला, संगीत अशा अनेक आघाडय़ांवर फुललेल्या प्रतिभेने कलेस सर्व बंधनांतून मुक्त केले. या रेनेसाँचा प्रभाव पाश्चात्त्य कला आणि समाजजीवनावर आजही आहे. इतका की, १९८९ साली बर्लिनच्या कोसळत्या भिंतीने साम्यवादाच्या अंताचा प्रारंभ झाला तो क्षण साजरा करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या दग्ध सीमेवर झालेल्या संगीत जलशात बिथोवेनची ‘ओड टु फ्रीडम’ वाजवली गेली आणि त्याचे जगभर प्रसारण झाले. हे संगीताविष्कारातील राजकीय भाष्य होते. बिथोवेन खरे तर रेनेसाँच्या पाठीवर आलेल्या क्लासिकल काळाचा प्रतिनिधी. त्याच्या या सिंफनीमागेही त्यातील राजकारण आहे. बिथोवेन सुरुवातीला नेपोलियनच्या शौर्यावर भाळलेला आणि भारावलेला होता. परंतु नेपोलियनच्या सत्ताकांक्षेने त्याच्यातील ‘मर्त्य’ राजकारण्याचे दर्शन झाल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला आणि तो त्याचा कडवा टीकाकार बनला. नेपोलियनने त्याच्या एका सिंफनीवर बंदी घातली. तीच ही ‘ओड टु फ्रीडम’!

सारांश : उत्तम कलाविष्कार आणि राजकारण यांचे नाते नसावे असे मानणेच अयोग्य. आपल्याकडे गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’तील पदांवर बंदी घालावी असे ब्रिटिशांना वाटले होते, यातूनही हेच सत्य दिसते. त्यामुळे न्या. चंद्रचूड जे म्हणतात त्यात निश्चित सत्य आहे. त्याचबरोबर त्यांचा या अनुषंगाने आलेला दुसरा मुद्दाही तितकाच सत्य ठरतो.

तो आहे कलाविष्कारावरील निर्बंध हा. ‘जैसे थे अवस्थेस आव्हान देणाऱ्या वा त्याबाबत प्रश्न निर्माण करणाऱ्या कलाविष्काराकडे व्यवस्था क्रांतिकारी म्हणून पाहाते. पण म्हणून अशा कलाविष्कारावर निर्बंध आणणे अयोग्य आहे. समाजातील वाढती असहिष्णुता अशा कलाविष्काराची मुस्कटदाबी करते किंवा तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न करते आणि तेही जमले नाही तर अशा कलाविष्कार वा कलाकारास स्वत:च्या बाजूने सामील करून घेते,’ हे न्या. चंद्रचूड यांचे विधान मूलगामी ठरते. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी जे दाखले दिले ते महत्त्वाचे आहेत. मुस्कटदाबी सहन करावी लागलेल्या कलाकृतींच्या न्या. चंद्रचूड यांनी केलेल्या उल्लेखांत टी. एम. कृष्णा यांची ‘पर्फॉर्मिग द पेरिफरी’ ही गायनमैफल, चित्तप्रसाद भट्टाचार्य यांचे ‘हंग्री बेंगाल’ हे प्रदर्शन, ‘बँडिट क्वीन’, ‘पद्मावत’ हे चित्रपट, ‘दलित पँथर’ची चळवळ यांच्या जोडीला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचाही उल्लेख होता, ही आवर्जून दखल घ्यावी अशी बाब.

‘जे आपल्यासारखे नाहीत वा आपल्या मताचे नाहीत, त्यांच्याविरोधात गरळ ओकण्याचा मार्ग म्हणून सध्या (अभिव्यक्ती) स्वातंत्र्याकडे पाहिले जाते,’ हे न्या. चंद्रचूड यांचे विधान हे त्यांच्या भाषणाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. या त्यांच्या विधानास समलिंगी, भिन्नलिंगी यांना मिळणारी वागणूक येथपासून ते राजकीय/धार्मिक प्रस्थापितविरोधी राजकीय मतधाऱ्यांची केली जाणारी संभावना असे अनेक संदर्भ आहेत. समलैंगिकतेस गुन्हा ठरवणारा कायदा रद्द करणारा ऐतिहासिक निकाल देणाऱ्यांत न्या. चंद्रचूड होते हा भाग लक्षात घेतल्यास, त्यांच्या भूमिकेचे संदर्भ आणि तीमधील सातत्य लक्षात येतील. कलेच्या प्रवाहास कोणत्याही बंधनाविना मुक्तपणे वाहू देण्यातच समाजाचे भले आणि प्रगतीची हमी असते, हे त्यांचे प्रतिपादन आश्वासक ठरते. किंबहुना ही अशी रूढ आचारविचारांबाबतची मतभिन्नता हाच खरा कलेचा कणा असतो. तो ताठ राहण्याचे महत्त्व भावी सरन्यायाधीशाने सांगणे यात कलाक्षेत्र आणि न्यायव्यवस्था यांचे मोठेपण आहे.