सत्तास्थापनेसाठी तुमच्याकडे आमदार कोठे आहेत? या प्रश्नाचे उत्तर भाजपचा प्रवक्ता आमच्याकडे अमित शहा आहेत, असे देत असेल, तर तो पक्ष विजयकमानीचा मध्यबिंदू ओलांडून पुढे निघाला आहे, असे बेलाशक समजावे. कर्नाटकाने आज तेच सिद्ध केले. कमालीचा गंड, आपण काहीही करू शकतो ही घमेंड आणि या सगळ्यावर खोटय़ा नैतिकतेचा टेंभा हे सध्याच्या भाजपचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे तो पक्ष टोकाचा साहसवादी बनला असून, विधिनिषेधशून्यतेकडे त्याची वाटचाल जोमाने सुरू होती. दोन घटकांनी ती रोखली. पहिला घटक कर्नाटकी जनता आणि दुसरा सर्वोच्च न्यायालय. यातील पहिल्या घटकाच्या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ काढून राज्यात सत्ता बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. तो दुसऱ्या घटकामुळे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयामुळे, टळला. सर्वोच्च न्यायालय आडवे आले नसते तर भाजपने गोवा, मणिपूर वा मेघालयाप्रमाणे कर्नाटकचाही घास घेत नैतिक ढेकर दिला असता. ते टळले याचे पक्षीय लोकशाही मूल्यांवर विश्वास असलेल्यांकडून स्वागतच होईल.

याचे कारण प्रश्न भाजपचे काय होणार हा नव्हता, तर लोकशाहीचे भवितव्य काय हा होता. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या विरोधात जणू यज्ञ पुकारला असल्याचा आव आणायचा आणि त्याच वेळी त्या यज्ञाचे पौरोहित्य भ्रष्टशिरोमणींकडेच द्यायचे आणि तरीही समोरच्यांनी आम्ही देतोय तो प्रसाद गोड मानून घ्यायलाच हवा, असे भाजपचे म्हणणे होते. त्यांच्या वागण्यातील विसंवाद दाखवून दिला तरी त्यांना तो अमान्य असतो. ६० वर्षे काँग्रेस हेच करीत आला आहे, असा त्यांचा त्यावर प्रतिवाद. तो केवळ हास्यास्पदच नव्हे, तर अतार्किकदेखील आहे. अत्यंत क्षीण विचारशक्ती असणारेदेखील तो मान्य करणार नाहीत. कर्नाटकात भाजपचे जे काही सुरू होते ते या युक्तिवादावर आधारित होते.

सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता, तर याआधीही जे घडले तेच आताही झाले असते. तरीही आपले काही चुकले असे भाजपस वाटत नाही. इतक्या सर्व लाजिरवाण्या पर्वानंतर भाजपच्या कर्नाटकी प्रभारींचा युक्तिवाद काय? तर आम्ही काँग्रेस म्हणत होती तसे वागलो असतो तर बहुमत सिद्ध करून दाखवले असते. याचा अर्थ आमदार विकत घेऊ शकलो असतो. ते घेता आले नाहीत, हे भाजपचे दु:ख आहे.

विद्यमान भाजपची काळजी वाटावी असा भाग कोणता असेल तर हा. पण कोणताच माज कधी चिरंतन राहत नाही, हे या पक्षाने लक्षात घ्यावे. काँग्रेसची जी काही वाताहत झाली ती या माजामुळेच. कितीही मोठा असला तरी कोणताही विजय कायमस्वरूपी नसतो, असे दुसरे महायुद्ध जिंकून देणारे विन्स्टन चर्चिल म्हणत. जागतिक लोकप्रियतेच्या कळसावर असलेल्या त्या नेत्यास महायुद्धोत्तर निवडणुकीत ब्रिटिश जनतेने पराभूत केले, हा परदेशी असला तरी स्वदेशप्रेमी भाजपने लक्षात घ्यावा असा इतिहास आहे. त्या महाइतिहासाची पुनरावृत्ती येथील निवडणुकांतही होऊ शकते. याचे भान नसल्यामुळे भाजप मिजाशीत गेला. त्या ऐवजी भाजपने थोडे शहाणपण दाखवत काँग्रेस आणि जनता दलास सरकार बनवू दिले असते, तर ते त्याच्या कर्माने गेले असते आणि भाजप उजळून निघाला असता. पण माझे ते माझे आणि तुझे तेही माझे असे मानणाऱ्या विद्यमान भाजप नेतृत्वास असा सभ्यपणा मंजूर नाही. त्यामुळे ही नामुष्कीची वेळ आली. जे काही झाले त्यापेक्षा साधा पराभव परवडला असता, असे भाजपतील काही मोजक्या शहाण्या मंडळींना वाटेल. कारण हा साधा मुखभंग नाही. तो साग्रसंगीत मुखभंग आहे. यातून काही शिकावेसे वाटले तर ठीक. अन्यथा..