News Flash

कन्नड कोंडी

देवेगौडा, कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर पक्षास अवघी १८.५ टक्के इतकी मते मिळाली.

प्रतिनिधिक छायाचित्र

कर्नाटकातील निवडणुकीने अनेकांना भानावर आणले आहे तसेच सर्वाच्याच मर्यादा दाखवून दिल्या आहेत.

कर्नाटकात १९८५ पासून दर पाच वर्षांनी सत्तांतर होत आले आहे. तेच या वेळी घडले. सत्ताधारी काँग्रेस पराभूत झाली. पण तरी भाजपचा विजय झाला असे म्हणता येणार नाही. सत्ताधारी काँग्रेस निर्विवाद पराभूत झाली असली तरी भाजपचे सत्ताग्रहण (झाल्यास) ते निर्विवाद आणि निष्कलंक असणार नाही. याचाच अर्थ कर्नाटकात कोणा एका नेत्याची जादू, करिश्मा, अजेय निवडणूक व्यवस्थापन याचा पूर्ण परिणाम झाला असे उगाच अतिशयोक्तपूर्ण दावे करणे अयोग्य ठरेल. अर्थात हे खरे की प्रत्येक निवडणुकीत सत्तांतर घडवायचेच हा कर्नाटकचा पायंडा या वेळी मोडला जाईल असे मानले जात होते. निदान तसा काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा होता. तो खरा ठरू शकतो अशी शक्यताही होती. याचे कारण त्यांच्या विरोधात वातावरण नव्हते. कन्नड नेता या अर्थाने सिद्धरामय्या यांना काही एक स्थान होते. त्यामुळे ही पंचवर्षीय सत्तांतरांची प्रथा या वेळी मोडली जाण्याची शक्यता होती. पण ते झाले नाही. याचे श्रेय अर्थातच भाजपला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तऱ्हेने प्रत्येक निवडणूक हा जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखी लढवतात त्यामुळे या सत्तांतर प्रथेचा भंग होण्याचे टळले. म्हणजे या निवडणुकीतील भाजपच्या यशाचे श्रेय हे सर्वथा मोदी आणि शहा या दुकलीचे. कमालीची ऊर्जा, अथक भाषणे देत हिंडण्याची क्षमता, त्यास संघटनेचे असलेले पाठबळ आणि या सगळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होणारा अव्याहत कार्यकर्ता पुरवठा हे भाजपच्या यशाचे मर्म आहे. रास्व संघाचा पािठबा याहीआधी भाजपला होताच. परंतु त्याचे चीज करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारे मोदी आणि शहा याआधी भाजपकडे नव्हते. या दुकलीच्या उदयानंतर कोणतीही निवडणूक हवी तशी फिरवता येऊ शकते हा विश्वास आणि ती फिरविण्याचे मुद्दे स्वत:च्या हाती राखण्याचे कसब भाजप २०१४ पासून सातत्याने दाखवीत आहे. या निवडणुकीत त्याचा पुन्हा प्रत्यय आला. या यशासाठी भाजप अभिनंदनास पात्र ठरतो.

पण हे अभिनंदन निवडणूक निकालाचे वास्तव दर्शवणारे नाही. हे वास्तव या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला साधारण ३८ टक्के इतकी मते मिळाली तर भाजपच्या पारडय़ात ३६ टक्के मते पडली. म्हणजे काँग्रेसची मते भाजपपेक्षा अधिक आहेत. देवेगौडा, कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर पक्षास अवघी १८.५ टक्के इतकी मते मिळाली. आपल्याकडील निवडणूक पद्धतीत सर्व विरोधकांपेक्षा एक जरी मत जास्त असेल तरीही तो उमेदवार विजयी ठरतो. मतांच्या टक्केवारीस महत्त्व नसते. तेव्हा कमी मते पडूनही अधिक विजयी उमेदवार पदरी असल्यामुळे भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले. हा अटीतटीची लढत देणाऱ्या काँग्रेससाठी धडा ठरतो. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जे केले ते निवडणुकीच्या आधी करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला असता तर आज निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. काँग्रेस आणि जनता दल यांना मिळालेली एकूण मते ५० टक्क्यांपेक्षाही अधिक आहेत. पण हे बेरजेचे राजकारण करण्याचा शहाणपणा काँग्रेसला दाखवता आला नाही. अलीकडेच झालेल्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत हा समंजसपणा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाज यांनी दाखवीत निवडणूकपूर्व युती केली आणि भाजप विरोधातील मतांचे विभाजन रोखले. कर्नाटकात जनता दल आणि काँग्रेस यांना हे शक्य झाले नाही. परिणामी या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

निकालानंतर काँग्रेस आणि जनता दल या दोन्ही पक्षांनी आघाडीचे चित्र निर्माण करीत सत्तास्थापनेचा दावा केला खरा. पण हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. भाजपचे विद्यमान नेतृत्व हे कोणी जना कृष्णमूर्ती वा कुशाभाऊ ठाकरे यांच्याकडे नाही. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा या निष्ठुर दुकलीकडे आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करणे हे त्यांचे ध्येय आहे आणि ते त्यांनी कधीही लपवलेले नाही. त्यामुळे कर्नाटकात हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास ते सोडतील अशी सुतराम शक्यता नाही. याआधी गोवा, मणिपूर, मेघालय अशा राज्यांत बहुमत सोडाच पण सर्वात मोठा पक्ष नसतानाही राजभवनाच्या माध्यमातून भाजपने सत्ता हस्तगत केली. इतक्या छोटय़ा राज्यांसाठी भाजपने हे केले. तेव्हा कर्नाटकसारख्या मोठय़ा राज्यात भाजप उदार अंत:करणाचे दर्शन घडवीत सत्ता सोडेल ही शक्यताच नाही.

कारण ही अशी उदारता भाजपच्या स्वभावातच राहिलेली नाही. इतकी वर्षे काँग्रेस आणि काँग्रेसी मुशीतील कथित पुरोगाम्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे भाजप कमालीचा कडवा आणि असहिष्णू बनलेला आहे. या दोघांच्या अभद्र युतीने इतकी वर्षे बहुसंख्याकांच्या प्रेरणा आणि आकांक्षा यांची दखल घेतली नाही. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी बेगडी वर्तणूक असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसी निधर्मीमरतडांना भाजपने प्रच्छन्न बहुसंख्याकांच्या राजकारणातून उत्तर दिले. लोकशाहीप्रेमी जनतेचे दुर्दैव हे की भाजपच्या या राजकारणास यशाची फळे अजूनही लागताना दिसतात. कर्नाटकात तेच घडले. भ्रष्टाचार, कुशासन आदी कोणताही मुद्दा नसताना भाजपने ही निवडणूक आपल्या बाजूने खेचून आणली. २०१४ नंतर वास्तविक भाजप स्वतस भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ मानू लागला आहे. निदान तसे तो दाखवतो. परंतु या निवडणुकीत खाण घोटाळा कलंकित रेड्डी बंधूंना भाजपने निर्लज्जपणे काटकोनात का असेना परंतु स्वतच्या पंगतीत बसवून घेतले. त्यांच्या विरोधात काहीच पुरावा नाही असा केंद्रीय गुप्तचर खात्यास या निवडणुकीच्या तोंडावर बरोबर साक्षात्कार झाला. स्वत: येडियुरप्पा तुरुंगाची हवा खाऊन आलेले आहेत. परंतु भाजपच्या नवनैतिकतेत त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध झालेला नाही. अशी वाटेल ती कारणे देत भाजपने या निवडणुकीत आपले घोडे जोरदारपणे दामटले. ते पळाले. पण स्वत:च्या जिवावर विजयी काही होऊ शकले नाही.

तेव्हा या निवडणूक निकालाचे परिणाम आगामी राजकीय वातावरणावर आणि २०१९ साली होऊ घातलेल्या संसदीय निवडणुकांवर होणार, हे निर्वविाद. सर्वप्रथम या वातावरणाची दखल घ्यावी लागेल ती भाजपला. कर्नाटकात मागासवर्गीय, अल्पसंख्य यांची मते भाजपच्या वाटय़ास आलेली नाहीत. कर्नाटकात बहुजन समाजवादी आणि मायावती यांना काहीही स्थान नाही. तरीही निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या प्रचारामुळे जनता दलाची मते अधिक संघटित झाली. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता दलास इतक्याच जागा होत्या. याचा अर्थ त्यात वाढ झाली नाही हे खरे. परंतु भाजपच्या उदयाने यात घट झालेली नाही, हेही खरे. म्हणजेच जनता दल आणि समान विचारांचे पक्ष एकत्र आले तर भाजपच्या निव्वळ हिंदुत्ववादास आव्हान ठरू शकतात. दुसरा धडा काँग्रेससाठी. आपले गतवैभव पार धुपून गेले आहे आणि ‘काप गेले आणि भोके राहिली’ अशी आपली अवस्था आहे, हे त्या पक्षास लक्षात घ्यावेच लागेल. त्यामुळे घोडय़ावरून उतरून अन्य सहकारी पक्षांशी बरोबरीच्या नव्हे तर कमीपणाच्या भावनेतूनच बोलावे लागेल. तिसरा धडा स्वत:स भाजप नको आणि काँग्रेसही नको असे म्हणणाऱ्या पक्षांसाठी. या दोनांतील एकास बरोबर घेतल्याखेरीज या पक्षांचा गाडा पुढे जाणारा नाही, हे या निवडणुकीने दाखवून दिले. तेव्हा भाजप वा काँग्रेस या दोन ध्रुवांपैकी एकाची तरी निवड अन्य पक्षांना करावी लागणार आणि काँग्रेसला ती मान्य करावीच लागणार.

अशा तऱ्हेने या एकाच निवडणुकीने अनेकांना भानावर आणले, असे म्हणता येईल. काँग्रेसला सत्ताच्युत करण्याचे समाधान भाजपला मिळाले खरे, पण स्वत:च्या जिवावर सत्ता बनवता येत नसल्याची हुरहुर त्या पक्षास लागेल. जनता दलाशी हातमिळवणी करणारच नाही, असे काँग्रेसचे सिद्धरामय्या म्हणत. निवडणुकीनंतर त्याच जनता दलाशी हातमिळवणी करणे काँग्रेसला भाग पडले. तसेच भाजप वा काँग्रेस अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवू पाहणाऱ्या जनता दलास आपल्या नावातील निधर्मी या शब्दाशी जागण्याची वेळ मतदारांनी आणली. या कन्नड कोंडीने सर्वाच्याच मर्यादा दाखवून दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 3:19 am

Web Title: karnataka voters throwing up a fractured mandate in assembly elections 2018
Next Stories
1 ना ‘देना’ ना लेना..
2 निर्भय नियामक
3 ‘फ्लेक्स’ उतरवले पाहिजेत..
Just Now!
X