मराठीत सौम्य शब्दांचाही चपखल वापर करून राजकीय विरोधकांची पंचाईत करण्याचा काळ होता..

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

पवारांना परवाच चिपळ्या नसलेला नारदम्हणणाऱ्या केशवराव धोंडगे यांनी विधिमंडळात आणि बाहेर वापरलेल्या मराठीची उदाहरणे अनेक आहेत. अत्रे आणि धोंडगे हे दोघेही विधिमंडळात असताना तर बहारच होती..

उपहास, उपमा, उत्प्रेक्षा, गुदगुल्या, कोपरखळ्या, चिमटे, ठोसे, टोले (आणि प्रसंगी मुकेही) अशी भाषेची अनेक वैशिष्टय़े सांगता येतात. भाषा येणे म्हणजे या वैशिष्टय़ांचा उपयोग आणि आनंद घेता येणे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राज्यभरात सर्वत्र जे काही कार्यक्रम घडले त्यातील नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात या वैशिष्टय़ांचा बहर अनुभवता आला. तसे पाहू गेल्यास या कार्यक्रमाचे प्रयोजन भाषा दिन साजरा करणे हे नव्हते. पवार यांच्या सुवर्णमहोत्सवी संसदीय कारकीर्दीचा गुणगौरव हा त्याचा उद्देश. त्यासाठी आयोजकांनी केशवराव धोंडगे यांना पाचारण केले. कार्यक्रमाची सुरुवातच वयाच्या शंभरीकडे झपाटय़ाने निघालेल्या केशवरावांनी नुकतीच पंचाहत्तरी साजरी करणाऱ्या शरदरावांचा मुका घेऊन झाली. त्याने उपस्थितांना धक्का बसल्याचे वृत्त आहे; परंतु पुढे केशवरावांच्या मुखातून मराठी भाषिक सौंदर्याच्या ज्या काही लाह्या फुटल्या त्या पाहता त्यासाठी अशी सुरुवात रास्तच म्हणावी लागेल. लाह्या फुटण्यासाठी भट्टी चांगली तापावी लागते. धोंडगे यांनी या एकाच कृतीतून ती तापवून घेतली असावी. त्यानंतर केशवरावांचे पुढचे भाषण त्यांच्या या तापलेल्या तोंडाची साक्ष देत होते.

पवार यांचे वर्णन केशवरावांनी ‘चिपळ्या नसलेला नारद’ अशा शेलक्या शब्दांत केले. पवार यांच्या राजकारणाची सर्वव्यापी क्षमता अधोरेखित करणे हा त्यामागील उद्देश असावा. पवार यांची बारामती ही प्रत्यक्षात भानामती आहे, असेही केशवराव म्हणाले. याविषयी जुना संदर्भ द्यायला हवा. १९८८ साली पवार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत आले त्या वेळी विधानसभेत त्यांच्या गुणगौरवाची भाषणे झाली. पवार यांची राजकीय समज, त्यांचा अभ्यासआवाका आदींचे दाखले अनेकांनी दिले. परंतु त्या वेळी गाजले होते ते याच केशवरावांचे भाषण. विधानसभेतील अन्य साऱ्या आमदार, मंत्री यांच्याकडे पाहत केशवराव म्हणाले, यातल्या कोणाची बुद्धिमत्ता एकेरी असेल, कोणाची दुहेरी. परंतु पवार यांची मात्र ती बारापदरी आहे, म्हणून आपण सारे एकमती आणि ते बारामती. केशवराव विचाराने पवारांच्या पक्षाचे नव्हेत. ते शेतकरी कामकरी पक्षाचे. परंतु तरीही पवार यांच्या एकूणच बेरजेच्या राजकारणातील शिल्लक म्हणून ते कायम होते. शेकाप या पक्षाची राजकीय श्रीशिल्लक तशी बेताचीच. आज एक रायगड आणि गणपतराव देशमुखांचा सांगोला सोडला तर हा पक्ष औषधालाही सापडणार नाही. गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, दत्ता पाटील, एन. डी. पाटील आदी एकापेक्षा एक नेते या पक्षाने दिले. परंतु राजकीय पातळीवर शिवसेना ते काँग्रेस व्हाया भाजप अशा अनेकांशी या पक्षाचा घरोबा होऊन गेला. या पक्षनेत्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते नावाप्रमाणे मातीशी जोडलेले. त्यांची भाषा नेहमीच त्यांच्या राजकीय बांधिलकीची साक्ष राहिलेली. तेव्हा नांदेड येथील कार्यक्रमात केशवरावांनी पवार यांचे वर्णन चिपळ्या नसलेला नारद असे केले ते त्यांच्या नेहमीच्या वाक्चातुर्याचेच द्योतक होते.

परंतु त्यामागे त्यांची एक विचित्र वेदना असावी. केशवराव हे सर्वच बाबतीत कलासक्त. ही आसक्ती त्यांना अनेक ठिकाणी- बऱ्याचदा नको त्या ठिकाणीही- घेऊन जात असे. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या पवार यांना केशवरावांच्या या मुशाफिरीची खडान्खडा माहिती होती. पुढे एकदा केशवरावांनी मुख्यमंत्री पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. विषय होता राज्यातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था. या विषयावर भाजपचे दिवंगत प्रेमकुमार शर्मा, दिवंगत रामदास नायक अशांचे विशेष प्रेम. ते सातत्याने हा विषय सभागृहात मांडत. एकदा या विषयावरील चर्चेत केशवराव या भाजपच्या मंडळींना जाऊन मिळाले आणि त्यांनी पवार यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. ते सगळे ऐकल्यावर चर्चेस उत्तर देताना पवार यांनी केशवरावांना उद्देशून तुमचे मुद्दे रास्त असल्याचे सांगितले. त्यावरून सगळेच अचंबित झालेले असताना पवार यांनी एकदम केशवरावांना २४ तास पोलीस सुरक्षा देण्याची तयारी दाखवली. यावर हादरून जाण्याची वेळ केशवरावांवर आली. कारण पोलिसांचे लटांबर घेऊन ईप्सित ठिकाणी मौजेसाठी जाणे भलतेच जोखमीचे ठरले असते. परिणामी केशवरावांची बोलतीच बंद झाली. हे काय झाले आणि यामुळे काय होणार याचा अंदाज सदनातील अन्यांना येण्यास क्षणाचा अवधी गेला. आणि ते लक्षात आल्यावर सारे सभागृह हास्यात बुडून गेले. नंतर दुसऱ्या एका प्रसंगात केशवरावांनी राज्याच्या क्रीडामंत्र्याची दांडी गुल केली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात या क्रीडामंत्र्याने आटय़ापाटय़ा या खेळास सरकारी मान्यता देण्याचा विचार असल्याचे सांगितले. वास्तविक हा खेळ त्यास मान्यता देण्याइतका मोठा नसूनही काही लांगूलचालनासाठी सरकार असे करू पाहत आहे हे जाणवल्यावर केशवरावांनी क्रीडामंत्र्याच्या उत्तरावर प्रतिप्रश्न विचारला : ‘‘आटय़ापाटय़ांबरोबरच ‘चुळ चुळ मुंगळा, पळ पळ गेला,’ या खेळाला मान्यता देणार आहात काय?’’ त्या वेळी हा प्रश्न खरोखर कितपत गांभीर्याने घ्यावा हे न कळल्याने क्रीडामंत्र्यांवर गोंधळून जाण्याची वेळ आली होती. केशवरावांनी अशीच अवस्था एकदा क्रीडा राज्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचीही केली. राज्य सरकारतर्फे योगासनांची सचित्र माहिती देणारी पुस्तिका त्या वेळी नुकतीच प्रसृत झाली होती. केशवराव त्यावर उपप्रश्न विचारत या पुस्तिकेत कोणकोणती आसने आहेत हे सांगा, या प्रश्नाचा धोशा लावून सुशीलकुमार यांना बेजार करण्याचा प्रयत्न केला. यात ते आसने या शब्दाचा असा काही उल्लेख करीत की ऐकणाऱ्यास काय ते कळावे. शेवटी केशवराव ही आसने काही सोडावयास तयार नाहीत, हे जाणवल्यावर सुशीलकुमारांनी दिलेले उत्तरही तितकेच चपखल होते. शिंदे त्यांना म्हणाले : या पुस्तिकेत सर्वाग आसने आहेत याची खात्री बाळगा.

हे असे केशवराव आणि दुसरे केशवकुमार, म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे हे एकाच वेळी काही काळ विधानसभेत होते. त्या वेळी या दोघांना ऐकणे हे किती आनंददायी असेल याची आजचे चित्र पाहता कल्पनाही करता येणार नाही. दोघांनाही भाषा वश. या दोघांच्या सवालजबाबाचा एक दाखला द्यायलाच हवा. त्या वेळी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिचा साडीचोळी आणि पारंपरिक नथ देऊन गौरव केला. त्यावर केशवरावांनी राज्य सरकारला विचारले : ही भेट देण्यापूर्वी नथ घालण्यासाठी राणीच्या एकातरी नाकपुडीस भोक आहे याची खातरजमा सरकारने केली होती काय? या त्यांच्या प्रश्नाने सरकारची अपेक्षित भंबेरी उडाली आणि त्यात काही सदस्यांनी भोक या शब्दास आक्षेप घेत छिद्र या शब्दाचा उपयोग केला. या चर्चेत अखेर प्र. के. अत्रे यांनी उडी घेतली आणि अत्यंत छिद्रान्वेषी नजाकतीने या दोन शब्दांतील फरकाचे विश्लेषण करीत नाकाचे भोक हाच शब्द कसा योग्य आहे, हे समजावून सांगितले. ते ऐकताना संपूर्ण सभागृहाच्या हसूनहसून मुरकुंडय़ा वळल्या हे सांगणे नलगे.

ही अशी भाषिक श्रीमंती हे एकेकाळी महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे वैशिष्टय़ आणि मोठेपणही होते. विचारांचे मतभेद घेऊन वेगवेगळ्या राजकीय तंबूंत असलेल्या व्यक्ती अनेक मुद्दय़ांवर एकत्र असत आणि परस्परांविषयीचा राजकीय विरोध अत्यंत सभ्य, संयत आणि सुसंस्कृतपणे मांडत. अलीकडेच पार पडलेल्या पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत याच मराठी भाषेच्या हिंस्र आणि हिडीस स्वरूपाचा जो शिमगा प्रत्ययास आला त्या पाश्र्वभूमीवर नांदेड येथील हा भाषिक वसंत अत्यंत आल्हाददायक म्हणावा लागेल. त्याचा आनंद वाचकांपर्यंत पोहाचवावा यासाठीच हा प्रपंच.