24 October 2020

News Flash

सेतू बांधा रे!

त्या सेतूचे महत्त्व भक्कमपणात नव्हे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पंचाहत्तरीची उमर गाठलेल्या त्या सेतूचे महत्त्व भक्कमपणात नव्हे, तर प्रबोधन काळ आणि आधुनिक काळ यांना जोडणाऱ्या योगदानात मोजावे लागेल.

पूर्वेकडच्या आनंदनगरीतील, कोलकात्यातील हावडा सेतूला गतसप्ताहात ७५ वर्षे पूर्ण झाली. भारतासारख्या प्राचीन इतिहासाचे दृश्य अलंकार अंगाखांद्यावर मिरवीत असलेल्या देशात एखाद्या पुलाचा ७५वा वर्धापन दिन ही काही फार मोठी बाब नाही. हा पूल एवढी वर्षे टणकपणे टिकला ही कौतुकास्पद बाब. पण ते कौतुक एकटय़ा हावडा सेतूचेच करावे असेही नाही. असे अनेक पूल आपल्याकडे आजही वाहतुकीचे ओझे वाहात ताठ उभे आहेत. त्यातल्या काहींनी तर शंभरीही ओलांडली आहे. ब्रिटिशकालीन स्थापत्याचे ते उत्तम नमुने. हावडा सेतू हाही त्यातलाच एक. तेव्हा त्याच्या पंचाहत्तरीचे सोहळे घातले गेले असतील तर घालू देत. आता वयवर्ष वाढते त्यात काही कोणाच्या फार मोठय़ा कर्तृत्वाचा भाग असतो असे नाही. तरीही आपण वय वाढले याचा सार्वजनिक आनंद साजरा करतोच. तेव्हा त्या आनंदनगरीने हावडा सेतूच्या वर्धापन दिनानिमित्ताने झगमगाट केला असेल तर त्यात काय विशेष? ते आपल्या सोहळाप्रियतेला साजेसे असेच झाले असे म्हणता येईल. पण ते तसे नाही. हावडा सेतूची पंचाहत्तरी ही केवळ एखाद्या पुलाची पंचाहत्तरी नाही. कारण तो केवळ हुगळीनामक एका नदीवर बांधलेला, कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा पूल नाही. हावडा सेतू हा कोलकात्याच्या शहरवास्तूचा शिरपेच आहे. ती कोलकात्याची सांस्कृतिक धरोहर आहेच. पण त्याहून तो प्रबोधन काळ आणि आधुनिक काळ यांना जोडणारा एक भक्कम सेतू आहे. असे सेतू आज कमकुवत होत चालले असताना, ते पाडून नव्या दऱ्या निर्माण केल्या जात असताना, हावडा सेतूचे हे महत्त्व समजून घेणे आवश्यक ठरते.

एरवी हावडा सेतूची अनेक वैशिष्टय़े सांगता येतील. बिग बेन टॉवर हे जसे लंडनचे, ‘भारताचे प्रवेशद्वार’ हे जसे मुंबईचे, तसेच हावडा सेतू हे कोलकात्याचे प्रतीक. त्याचा आकार, त्याचे स्वरूप हे सगळेच अनोखे. सेतू हे अभियांत्रिकी कौशल्यकौतुक तसे भारताला नवे नाही. रामसेतू हा तर आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक काव्य आणि इतिहासाचा भाग. प्राचीन काळीही येथे लाकडी साकवांपासून दगडी कमानीच्या पुलांपर्यंत अनेक पूल बांधले गेले आहेत. परंतु हावडा सेतू हा त्या सगळ्यांहून वेगळा होता. याचे एक कारण म्हणजे तो संपूर्णत: पोलादात बांधण्यात आलेला आहे. त्याच्या बांधकामासाठी २६ हजार ५०० टन पोलाद वापरण्यात आले होते. त्या काळी अशी सगळी सामग्री ब्रिटनहून जहाजांतून मागविण्यात येई. ते ब्रिटिशांचे धोरणच होते. परंतु या पुलाच्या बांधकामाच्या वेळी ब्रिटिश राज्यकर्त्यांचा जरा नाइलाजच झाला. तो काळ महायुद्धाचा. त्यामुळे ब्रिटनला युद्धसामग्रीसाठी पोलादाची गरज होतीच. शिवाय जहाजातून ते भारतात पाठवायचे तर त्यात धोका होता. त्यामुळे या पुलासाठी ब्रिटनहून आले अवघे तीन हजार टन पोलाद. बाकीचे सगळे पुरविले टाटा स्टीलने. या भारतीय पोलादातून हे भौमितिक आकाराचे, एकही नटबोल्ट नसलेले आश्चर्य उभे राहिले. त्याला उभे राहिले असे म्हणणेही अयोग्य ठरेल. कारण हा आडवालांब पूल बिनखांबी आहे. त्या दृष्टीने तरंगताच तो. पण त्याचा पाया शोधू गेलो तर आपणांस तो सापडेल भारताच्या प्रबोधन काळामध्ये. इंग्रजी शिक्षणपद्धतीला नावे ठेवण्यातून हल्ली आपणांस मोठे राष्ट्रवादी समाधान मिळत असते. मेकॉलेने हिंदुस्थानला कसे सांस्कृतिक गुलाम बनविले याचे पाठही हल्ली व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठांतून सातत्याने दिले जात असतात. परंतु इंग्रजी विद्यापीठांतून मिळालेल्या आधुनिक विज्ञाननिष्ठ शिक्षणाने येथे जी प्रबोधनाची परंपरा निर्माण झाली, त्यातूनच या देशात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, कुशल कामगार यांची फळी उभी राहिली. हावडा सेतूचे बांधकाम ब्रिटिश कंत्राटदारांनी केले हे खरे. परंतु त्यासाठीचे पोलाद जसे टाटांच्या कारखान्यातील भारतीय तंत्रज्ञांनी घडविले होते, तसेच पुलाच्या बांधकामातही भारतीय तंत्रज्ञांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग होता, ही बाब विसरता येणार नाही. १९४३ मध्ये या पुलावरून वाहतूक सुरू झाली. याबाबतही हा सेतू अन्य पुलांहून वेगळा ठरतो. उद्घाटनाचा शासकीय सोहळा, मंत्र्यांची भाषणे, ते फीत कापणे, ते निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने होणारे रुसवेफुगवे आणि बहिष्काराची नाटके यापैकी काहीही न होता हा सेतू वाहतुकीसाठी खुला झाला. हे झाले जगावेगळेच. पण त्याचे कारण जपानच्या भीतीमध्ये होते. उगाच उद्घाटनाच्या जाहिराती द्यायच्या, रंगारंग कार्यक्रम ठेवायचा आणि ते समजल्यानंतर जपानने त्यावर बॉम्बगोळे टाकायचे असे व्हायला नको म्हणून उद्घाटनाचा कार्यक्रमच ठेवण्यात आला नव्हता. तो तसाच सुरू झाला. आता त्यावरून कोलकात्याची ट्राम गाडी सुरू झाली. मोटारी धावू लागल्या. पादचाऱ्यांनाही त्यावरून प्रवासाची परवानगी होती. या सगळ्या वाहतुकीने केवळ हावडा जिल्हा आणि कोलकाता शहर यांनाच जोडले नाही. भारतामध्ये सुरू झालेल्या आधुनिक कालखंडाच्या प्रारंभाला हा पूल आहे हे विसरता येणार नाही.

हावडा सेतूचे बांधकाम विसाव्या शतकातील ३०च्या दशकात सुरू झाले आणि ते पूर्ण झाले १९४३ मध्ये. हाच काळ आपल्याकडील आधुनिकतेच्या प्रारंभाचा आहे. याचा अर्थ तत्पूर्वी येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग नव्हते असे नव्हे. येथे कापडगिरण्या होत्या. रेल्वे होती. टाटांचा पोलाद कारखाना उभा राहिलेला होता. तेव्हा उद्योग होते. परंतु नुसते उद्योग असून चालत नसते. त्यासाठी आधुनिक मानसिकता आणि संस्कृती असावी लागते. ती अजून रुजायची होती. प्रबोधन काळाने तिची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याची फळे साधारणत: द्वितीय महायुद्धाच्या काळात दिसू लागली असे म्हणता येते. हावडा सेतू नेमका त्या वळणावर उभा राहिला होता. कोलकात्यातील भद्र संस्कृतीला पुढे डावे वळण लागले. त्याला या पुलावरून झालेल्या वाहतुकीने किती बळ मिळाले याचा अभ्यास एकदा व्हायला हवा. आज हावडा सेतू कोलकात्याच्याच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक कलाव्यवहारातही ठाण मांडून आहे. दुर्गापूजेपासून चित्रपटांपर्यंत पसरलेला आहे तो. परंतु त्याचबरोबर तो पश्चिम बंगालच्या औद्योगिक संस्कृतीचेही वहन करतो आहे. कोलकात्याला हावडा जिल्हा त्यापूर्वीही जोडला गेला होताच. परंतु हावडा सेतूने ती जोडणी अधिक बळकट केली आणि त्यातून व्यापार आणि उद्योग यांचा जो विकास झाला त्याची नेमकी आकडेवारी काढता नाही येणार. परंतु पुढे ग्रामीण नक्षलबारीतील उठावाला शहरी कोलकात्याने दिलेली साथ पाहिली तर त्या विकासाच्या प्रक्रियेतून तेथे कोणती सांस्कृतिक-राजकीय खळबळ जन्माला आली होती हे लक्षात येते आणि हावडा सेतू हा भद्र कोलकाता आणि ग्रामीण कास्तकार-कामगारांचा बंगाल यांच्यातील एक सेतूही होता हेही त्यातून ध्यानात येते. बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ काय किंवा मणिरत्नम यांचा ‘युवा’ काय, त्यातील संघर्षांच्या काही प्रसंगांना पाश्र्वभूमी म्हणून येणारा हा हावडा सेतू एका वेगळ्याच अर्थाने त्या संघर्षांच्या मुळाशी आहे, ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे.

सांस्कृतिक वा वैचारिक बाबी या कुठे हवेतून उगवत नसतात. भवतालच्या भौतिकातून त्या येत असतात. हावडा सेतू या भौतिक रचनेकडे या दृष्टिकोनातून पाहिले, म्हणजे त्याच्या महत्त्वाचा पत्ता लागतो. आणि म्हणूनच हा सेतू पंचाहत्तरीचा झाला ही बाब कौतुकास्पद वाटते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, तो ब्रिटिशांनी उभारलेला असूनही त्याचा बंगाली भद्रजनांना आनंदच आहे हे अधिक सुखावह वाटते. अशा वास्तू या आपणांस आपल्याच इतिहासाशी, संस्कृतीशी, मुळांशी जोडणाऱ्या असतात हे भान त्या आनंदात आहे ही त्यातील सुखदायक गोष्ट आहे. असे ‘सेतू बांधा रे’ हे म्हणणे तर दूरच, परंतु निदान आहेत ते पाडू नका रे, असे कळकळीने सांगण्याची वेळ आलेल्या काळात हे असे सुख दुर्मीळच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 2:11 am

Web Title: kolkata howrah bridge celebrates 75th anniversary
Next Stories
1 खाणी आणि खाणे
2 गुंतवणूक चुंबक
3 वयम् खोट्टम्..
Just Now!
X