कुलभूषण जाधवांची आई व पत्नीशी भेट घडवून आणण्याचे पाकिस्तानी पाऊल अविश्वासार्ह आहे एवढे सांगण्यावर भारताने थांबून राहता कामा नये.

आंतरराष्ट्रीय राजकारणात मानवतावाद या शब्दाच्या आड अनेकदा प्रच्छन्न स्वार्थ, क्रौर्य आणि फसवणूक या गोष्टीच दडलेल्या असतात याची प्रचीती पाकिस्तानने पुन्हा एकदा आणून दिली. या वेळी त्याला निमित्त ठरले ते कुलभूषण जाधव प्रकरण. सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या जाधव यांना भेटण्यास त्यांच्या आई आणि पत्नीस परवानगी देऊन आपण फार मोठे मानवतावादी कृत्य करीत आहोत, इस्लामी संस्कृतीला अनुसरून आपण काही तरी पुण्यकर्म करीत आहोत, असा आव पाकिस्तानने आणला असला तरी ते सारेच किती फसवे आणि स्वार्थप्रेरित होते हे ती भेट ज्या पद्धतीने घडवून आणण्यात आली त्यातून दिसून आले. हे सारेच अत्यंत संतापजनक आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी या संदर्भात जारी केलेल्या निवेदनातूनही हाच संताप मुखर होत आहे. भेटीचा तो संपूर्ण प्रकारच ‘अविश्वासार्ह’ होता अशा कडक शब्दांतून भारतीय परराष्ट्र खात्याने भारतीय नागरिकांचीच भावना व्यक्त केली आहे. अखेरीस कोणत्याही दोन देशांतील नात्यांमध्ये मानवी संबंध आणि भावना यांना महत्त्व असतेच. कुलभूषण प्रकरणातून पाकिस्तानने कोटय़वधी भारतीयांच्या भावनांचाही विचार करणे आवश्यक होते. तसे न करता त्याचा केवळ प्रोपगंडा या हेतूने वापर करण्यात आला. हे सर्व केल्यानंतर त्या दुखावलेल्या भारतीय भावनांचा परिणाम भारत-पाक संबंधांवर होणार नाही असे पाकिस्तानी मुत्सद्दय़ांना वाटत असेल, तर ते मूर्खाच्याच नंदनवनात राहात आहेत असे म्हणावे लागेल. परंतु यात पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचीही चूक नाही. कुलभूषण प्रकरणाचा उद्गमच मुळी भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी करण्याच्या हेतूंमधून झाला असल्याने आणि त्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याने, त्यांच्या परराष्ट्र खात्याच्या हातातही काही उरलेले नाही. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या संघटनेच्या षड्यंत्राची चाके फिरवत राहणे याशिवाय त्यांच्यासमोर अन्य पर्याय नाही.

हे षड्यंत्र आहे भारताच्या बदनामीचे आणि कुलभूषण जाधव हे त्यातील केवळ एक प्यादे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. काश्मिरातील हिंसाचार, मुंबईवरील दहशतवादी हल्ला अशा अनेक घटनांमधील पाकिस्तानच्या आयएसआयचा सहभाग लपून राहिलेला नाही. स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणवून घेणे हा पाकिस्तानचा आवडता छंद आहे. तसे रडगाणे गायले म्हणजे अमेरिकेबरोबरच विविध पाश्चात्त्य देश आपले सांत्वन करण्यास डॉलर घेऊन येतात हेही पाकिस्तान पूर्वीपासूनच ओळखून आहे. या आंतरराष्ट्रीय सहानुभूतीत अडसर येऊ शकतो तो भारताकडून सादर करण्यात येणाऱ्या पुराव्यांचा. भारताने अजमल कसाबसारख्या दहशतवाद्याला इतके दिवस जिवंत ठेवून त्याचा पाहुणचार का केला, असा बिनडोक सवाल आपल्याकडे अनेकदा विचारला जातो. येथे हे लक्षात घ्यायला हवे, की तो एक ‘पुरावा’ होता. त्या जोरावर आपण पाकिस्तानची गचांडी पकडू शकत होतो. त्यातून होणारी गोची लक्षात घेऊन पाकिस्तानने गेल्या कित्येक वर्षांपासून भारत हेही दहशतवादी राष्ट्र आहे असा धोशा लावलेला आहे. यापूर्वी अल्ताफ हुसेन, मूर्तझा भुट्टो यांच्यासारख्या पाकिस्तानी नेत्यांना वा बंडखोरांना ‘रॉ’चे दहशतवादी म्हणून पाकिस्तानकडून सादर केले जात असे. सिंध, बलुचिस्तानातील फुटीरतावादी चळवळींमागे भारताचा हात आहे येथपासून ‘तहरिक-ए-तालिबान’ला रॉचा पाठिंबा आहे असा प्रचार केला जात असे. कुलभूषण जाधव यांना पकडल्यानंतर तशा प्रचाराला मोठेच बळ प्राप्त झाले. एक तर कुलभूषण हे नौदलाचे माजी कमांडर. तशात त्यांना – इस्लामाबादच्या म्हणण्यानुसार – बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली. बलुचिस्तानमधील स्वतंत्रतावाद्यांना भारताचे समर्थन आहे हा पाकिस्तानचा आरोपच होता. त्याचा ‘पुरावा’च त्यांना कुलभूषण या ‘रॉ गुप्तचरा’च्या रूपाने मिळाला. या आधी एवढय़ा मोठय़ा पदावरील व्यक्ती अशा प्रकारे पाकिस्तानच्या हाती लागलेली नव्हती. त्यामुळे कुलभूषण यांचे मोल अधिक आहे. त्याचाच वापर पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्यासाठी करीत आहे.

कुलभूषण यांचा ‘रॉ’शी काहीही संबंध नसल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले असूनही पाकिस्तानने त्यांच्याविरोधात लष्करी न्यायालयात खटला चालवला. त्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हे करताना सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संकेतांचा पाकिस्तानने भंग केला आहे. कोणत्याही परदेशी नागरिकाला अटक झाल्यानंतर तो नागरिक असलेल्या देशाच्या संबंधित राजनैतिक अधिकाऱ्यांना त्याची भेट घेऊ देणे हा एक साधा संकेत. पण २५ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१७ या काळात तब्बल १३ वेळा मागणी करूनही पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण यांना भेटू दिले नाही. दरम्यानच्या काळात भारताने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले. तेथे पाकिस्तानला मोठी चपराक मिळाली. कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली. यातून आपलीच बदनामी होत आहे, दुसरीकडे अमेरिकेसारखा देशही आपल्याबाबत साशंक आहे हे सगळे पाहून पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आईला व पत्नीला त्यांच्या भेटीची परवानगी दिली. त्यासाठी निवडण्यात आलेली वेळही लक्षणीय आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिज सईद मोकाट सुटलेला आहे. तो पाकिस्तानी राजकारणात घुसू पाहात आहे. या घटनेवरून जगाचे लक्ष उडविण्यासाठी कुलभूषण प्रकरण हुशारीने माध्यमांमध्ये आणण्यात आले, यात जशी शंका नाही, तशीच त्याचा वापर पाकिस्तान प्रोपगंडासाठी करणार यातही शंका नव्हती. त्यांनी तो तसा केलाही. कुलभूषण यांनी या भेटीबद्दल पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे कसे आभार मानले हे दाखविणारी चित्रफीत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसृत केलीच. त्यालाही कोणाचा फारसा आक्षेप नव्हता. पाकिस्तानचा स्वभाव पाहता ते स्वाभाविकच मानले जात होते. परंतु यानंतर पाकिस्तानने या भेटीचा जो तमाशा केला तो मात्र संतापजनकच होता. कुलभूषण यांच्या आईला व पत्नीला त्या भेटीपूर्वी मंगळसूत्र, बांगडय़ा आणि कुंकवाची टिकलीही काढण्यास भाग पाडण्यात आले. आपल्या मुलाला इतक्या महिन्यांनंतर आणि अशा परिस्थितीत भेटणाऱ्या त्या मातेच्या भाषेवरही बंधने घालण्यात आली होती. त्या तिघांनाही भेटीदरम्यान मातृभाषा – मराठीतून बोलण्यास मनाई करण्यात आली होती. यालाच पाकिस्तानच्या भाषेत बहुधा मानवतावाद म्हणत असतील. या भेटीच्या वेळी त्या दोन्ही महिलांना, खास करून पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींकडून मिळालेली वागणूकही संतापजनक होती. कुलभूषण यांना पाकिस्तानी तुरुंगात कशा प्रकारची अमानवी वागणूक मिळत आहे हेही या भेटीतून उघड झाले आहे. कुलभूषण यांच्यासारखा नौदलात काम केलेला अधिकारी अनेकदा पढविल्यासारखे बोलतो याचा अर्थ त्यांचा कोणत्या पातळीवर छळ केला जात असेल हे स्पष्टच आहे. या सर्व बाबींचा भारतीय परराष्ट्र खात्याने तीव्र निषेध केला ते योग्यच झाले. हा निषेध म्हणजे पाकिस्तानी प्रोपगंडाला भारताने दिलेले सणसणीत उत्तरच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कम करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल.

परंतु या सर्व प्रकरणाचा अर्थ एवढाच आहे का? ही केवळ प्रचाराची राजनैतिक लढाई आहे का? एका माणसाचे प्राण यात पणाला लागलेले आहेत. त्याच्या सुटकेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याची ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. पण अखेर गुण प्रयत्नांना मिळत नसतात. ते मिळतात परिणामांना. देशवासीयांना प्रतीक्षा आहे ती त्यांची, कुलभूषण यांच्या सुटकेची. ते रॉचे गुप्तचर असल्याचे पाकिस्तानने रचलेले पाखंड आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोडून काढणे, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणे हा त्यासाठीचा एक मार्ग असू शकतो. मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा पाहता त्यांना ते फारसे अवघड जाणार नाही अशी आशा आहे.