नैतिकता ही जशी निवडक असू शकत नाही तद्वत विचारस्वातंत्र्याचा पुरस्कारही निवडकांपुरता असू शकत नाही..

कलेचे प्रयोजन काय? जीवन आधी की कला? या अशा प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. आणि उत्तरही दिले. जगद्विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याचे या संदर्भातील उत्तर वास्तववादी ठरते. ‘‘दैनंदिन आयुष्य जगताना आपल्या आत्म्यावर जी धूळ बसते ती झटकणे हे कलेचे खरे उद्दिष्ट’’, असे पिकासो म्हणतो. ते एकदा मान्य केले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेने धुरळा का उडाला ते समजून घेता येते. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. देशमुख यांनी ‘राजा तू चुकत आहेस’, असे विधान केले. ‘या राजाने सुधारायला हवे’, असेही संमेलनाध्यक्ष म्हणाले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अशी टोकदार भूमिका घेतल्याबद्दल प्रथम देशमुख यांचे अभिनंदन. या साहित्यिकांच्या, संमेलने आयोजित करणाऱ्यांच्या निबर मनांवर केवळ धूळच नव्हे तर धुळीची पुटे साठलेली होती. पिकासो म्हणतो त्याप्रमाणे ती झटकणे हे कलेचे उद्दिष्टच. तेव्हा ती वाङ्मयीन व्यासपीठावरून लेखकाकडून झटकली गेली असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून असे काही ऐकावयाची सवय सध्या ना रसिकांना आहे ना ती आहे संमेलने आयोजित करणाऱ्या ढुढ्ढाचार्याना. तेव्हा या अशा विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असल्यास नवल नाही. काहींनी देशमुख यांचे हे भाषण न ऐकल्यासारखे केले तर काहींनी त्यात साहित्यिक मूल्य कसे नाही, यावर काथ्याकूट करून मूळ मुद्दय़ास बगल देण्याचा प्रयत्न केला. राजकीय विचारधारेत मध्यिबदूच्या उजवीकडील गटांनी देशमुख हे मुदलात साहित्यिकच कसे नाहीत, हे सांगणे सुरू केले तर डावीकडील विचारवंतांना हा कोणी विचारस्वातंत्र्याचा उद्धारकर्ताच जणू भूतलावर आल्याचा भास होऊन त्यांनी आनंदोत्सव सुरू केला. नंतरचे दोन दिवस साहित्य संमेलन याच एका विधानाभोवती फिरले. आता ते संपले असल्याने जे काही झाले त्याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की हे देशमुख म्हणजे काही दुर्गाबाई भागवत नव्हेत. दुर्गाबाई असणे याचा अर्थ सर्व प्रकारच्या, सर्व रंगांच्या राजकीय दंडेलीविरोधात उभे राहणे. आपल्याकडील साहित्यिक वा कलाकारांच्या एका वर्गास एका विचारधारेचे लांगूलचालन करण्यात कमीपणा वाटत नाही. अशी मंडळी पुरोगामी या नावाने ओळखली जातात. एके काळचे समाजवादी, कालानुरूप असहाय जगणे वाटय़ास आलेले साम्यवादी आदी या गटांत मोडतात. यांचा वैचारिक स्वातंत्र्यास पािठबा असतो. परंतु निवडक. डाव्यांच्या दंडेलीविरोधात हा गट काही बोलत नाही. खरे तर मुळात डावे दंडेली करतात हेच यांना मान्य नसते. परंतु असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर डावे हे उजव्यांइतकेच कडवे आणि असहिष्णु असतात, हे काळाच्या ओघात अनेकदा सिद्ध झालेले आहे. तेव्हा त्याचे पुरावे नव्याने देण्याची गरज नाही. या गटांतील मंडळींना शरद पवार यांच्या रमण्यातील रांगेत उभे राहण्यास कमीपणा वाटत नाही. पवार यांच्यासारख्यांकडून साहित्य संस्थांना देणग्या घेण्यात, पद्म पुरस्कारांसाठी वशिला लावण्यात अथवा गेलाबाजार पाचदहा टक्के कोटय़ातील घरांसाठी लांगूलचालन करण्यात काहीही अयोग्य आहे असे वाटत नाही. परंतु उजवीकडील फडणवीसाने असे काही करणे हे यांच्या विचारस्वातंत्र्यावर घाला आणणारे असते. या अशा मुद्दय़ांवर दुर्गाबाई हाच मापदंड अजूनही आदरणीय आहे कारण त्यांनी असा दांभिकपणा केला नाही. आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवरच्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाणांना सुनावण्यास त्यांनी जसे कमी केले नाही तसेच ९५ साली लोकशाही मार्गाने निवडल्या गेलेल्या शिवसेना-भाजप सरकारचा अधिक्षेप करणाऱ्या पुष्पा भावे यांनाही चार खडे बोल सुनावण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. हे त्या करू शकल्या कारण वैचारिक स्वातंत्र्यांवर, लेखकाच्या अधिकारावर पक्षीय बांधिलकीपलीकडे त्यांचे प्रेम होते.

हे असे प्रेम विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष देशमुख यांचेही आहे असे अद्याप तरी सिद्ध झालेले नाही. ते नोकरशहा होते. म्हणजे ज्या राजास ते तू चुकलास असे म्हणतात त्या वा तशाच एका राजाच्या पदरी देशमुख यांनी चाकरी केली. अर्थात यात काही गर आहे असे अजिबात नाही. परंतु आपल्याकडे घटनात्मक पदे भूषविणाऱ्यांना वा ज्येष्ठ नोकरशहांना सेवानिवृत्तीनंतर कंठ फुटतो. सेवेत असताना हे सर्व शासकीय व्यवस्थेचे जू मानेवर वागवतच व्यक्त होत असतात. ते योग्यही आहे. कारण सेवेत असताना शासकीय नियम मानायलाच हवेत. या काळात तोंड दाबून सहन कराव्या लागणाऱ्या माराविरुद्धचा हुंकार देशमुख यांच्याकडून निवृत्तीनंतर व्यक्त होत असेल तरी ते समजून घेण्यासारखे आहे. फक्त अपेक्षा इतकीच की अन्य पक्षाचा राजा सत्ताधारी झाल्यावरही देशमुख आपला हा अधिकार इतक्याच तडफेने गाजवतील. नैतिकता ही जशी निवडक असू शकत नाही तद्वत विचारस्वातंत्र्याचा पुरस्कारही असा निवडकांपुरता असू शकत नाही. तो तसा असेल असे आताच मानणे देशमुखांवर अन्याय करणारे ठरेल. तूर्त त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल ते अभिनंदनास खचितच पात्र ठरतात.

हा निवडक विचारस्वातंत्र्याचा मुद्दा का महत्त्वाचा ठरतो ते याच संमेलनात काहींनी देशमुख यांच्या भाषणावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांतून समजून येते. देशमुख यांचे भाषण चांगले, पण त्यात काही साहित्यिक मूल्य नव्हते, अशी टीका कोणी केली तर अन्य कोणास देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणामुळे साहित्यिक अवकाशाचा विस्तार झाला नाही, याबद्दल दुख झाले.

हे दोन्हीही मुद्दे नितांत दांभिक वा सध्या काय सुरू आहे याकडे गांधारीच्या डोळ्यांनी पाहणारेच व्यक्त करू शकतात. साहित्य हे त्या काळापासून तोडता येते काय? तोडता येत असेल तर त्या साहित्यिकास वास्तवाचे भान आहे असे म्हणता येईल काय? साहित्य हे काळावर पुरून उरते वा उरायला हवे हे जरी खरे असले तरी त्या त्या काळाचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. निदान पडायला हवे. सांप्रत काळी विचारस्वातंत्र्याचा गळा घोटला जात असेल, कोणी काय खावे, प्यावे यावरून दंडेली होणार असेल, भिन्न धर्मीय/ भिन्न जातीय प्रेमिकांची निर्घृण हत्या केली जात असेल, आपल्या खिशातील प्रचंड आर्थिक ताकदीच्या जोरावर एखादा उद्योग समूह मानवी हक्कांची पायमल्ली करीत असेल तर या आणि अशा सगळ्याच घटनांचे पडसाद त्या त्या काळच्या साहित्यात उमटायलाच हवेत. या तात्कालिक पडसादांना कालबंधनातून सोडवून त्यांचे रूपांतर कालातीत अशा कृतीत करू शकतो, तो खरा साहित्यिक. तेव्हा वर्तमानकाळाकडे दुर्लक्ष करून संमेलनाध्यक्षांच्या भाषणात केवळ साहित्यिक मूल्य शोधणे म्हणजे आपण साहित्यिक नसणे याची कबुली देणे होय. साहित्य हे जेव्हा प्रचलित कालापासून तुटते तेव्हा साहित्यिक मसाप किंवा कौतिकराव ठालेपाटील किंवा श्रीपाद जोशी वा तत्सम उचापतखोरांच्या दावणीला बांधला जातो.

आपले असे होणे टाळायचे असेल तर देशमुख यांना आपल्या भूमिकेत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय कार्यकालानंतर सातत्य ठेवावे लागेल आणि ही भूमिका पक्षनिरपेक्ष आहे, असेही सिद्ध करावे लागेल. ‘‘प्रत्येक कलाकारात दोन व्यक्ती दडलेल्या असतात. एक कवी आणि दुसरा कारागीर. पहिला जन्मत:च असतो आणि दुसरा जगताना घडतो’’, असे विख्यात फ्रेंच कादंबरीकार एमिल झोला म्हणून गेला. आपण जातिवंत कवी आहोत की कारागीर हे सिद्ध करण्याचा क्षण लेखक म्हणवून घेणाऱ्या सर्वासमोर आला आहे. यात संमेलनाध्यक्ष देशमुखही आले.