20 November 2017

News Flash

भूगोलाचा इतिहास आणि वर्तमान..

मानवाच्या वंशशास्त्राचा जगभरातील इतिहास काहीही

लोकसत्ता टीम | Updated: May 20, 2017 5:01 AM

वंशशास्त्राच्या परंपरागत संकल्पनांनाच छेद देणाऱ्या संशोधनातून मानवजातीच्या हित-अहिताबाबत नव्याने मांडणी करावी लागेल.

मानवाच्या वंशशास्त्राचा जगभरातील इतिहास काहीही असला, तरी त्या इतिहासाच्या बऱ्याचशा पाऊलखुणा वर्तमानात धूसर झाल्या आहेत आणि भविष्यात तर त्या कदाचित दिसणारही नाहीत अशी चिन्हे आहेत. मानवी वंशशास्त्र ही एक गूढ अशी संकल्पना हजारो वर्षांपासून माणसाने जपली, जोपासली. ‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी’ असा संदेश आपल्या समाजात दृढ झाल्यावर त्याची सांगड मानवी वंशशास्त्राशी घालून जातिभेद, वंशभेद, धर्मभेद जोपासणाऱ्यांचे फावले आणि त्यातूनच ‘ऑनर किलिंग’सारख्या भयावह रूढी फोफावल्या. हे वंशशास्त्राच्या इतिहासाचे विकृत वर्तमान रूप असले, तरी ते आता बदलणे अपरिहार्य ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत मानवी जन्माची अनेक गूढ गुपिते उलगडणे शक्य झाल्यानंतर, वंशशास्त्राला विज्ञानाचीही जोड मिळाली आणि ‘टेस्ट टय़ूब बेबी’ हा काही वर्षांपूर्वी केवळ चित्रपटाच्या कथानकातच शोभला असता असा प्रकार वास्तवात आला. आता तर, मनाजोगत्या माणसांची पैदास करण्याचे कारखानेदेखील वास्तवात येतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. हजारो वर्षांपूर्वीच्या वंशशास्त्रीय संकल्पनेला वर्णसंकर मान्य नव्हता. आपण ज्याला धर्मग्रंथ मानतो, त्या भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात तर कुलधर्म आणि जातिधर्माची मूलतत्त्वे सांगताना, वर्णसंकरामुळे होणाऱ्या कुळाच्या हानीचे वर्णन केले गेले आणि ते शिरसावंद्य मानून समाजातील काही घटकांनी वंशभेद आणि वर्णभेद पाळणे हाच धर्म आहे असा खुळचट समजही करून घेतला. ‘दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसंकरकारकै:, उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता:’ – वर्णसंकरामुळे कुळाचा घात होतो, कुलधर्म आणि जातिधर्म नष्ट होतो, असा संदेश देणारी भगवद्गीता शेकडो वर्षे मस्तकी धरली गेली आणि वर्ण-जातिभेदाच्या विरोधातील लढाईत धर्मशास्त्राचे दाखले अडाणीपणाने ढालीसारखे पुढे केले जाऊ  लागले.

पण एक गोष्ट नक्की! काळ हे अनेक समस्यांवरील शाश्वत उत्तर असते. काळ पुढे जाऊ  लागला, विज्ञान प्रगत होऊ  लागले, पुराणकथा आणि इतिहासातील अनेक अनाकलनीय गूढांची विज्ञानाच्या निकषांवर उकल होऊ  लागली आणि हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानावर आधारलेले सिद्धान्त वर्तमानाच्या रेटय़ात कालबाह्य़ होत असल्याचे ध्यानात येऊ  लागले, तसा भूगोलावरील वंशशास्त्राचा इतिहासही बदलत गेला. प्रगत होत गेला. पण अजूनही तो समूळ उखडला गेलेला नाही. वंशाभिमान, वर्णाभिमानाची बीजे सर्वत्र आहेत. अशी बीजे केवळ भारताच्याच मातीत रुजून राहिली, हा तर निव्वळ भ्रम आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र वंशभेद आणि वर्णभेदाची जाज्वल्य उदाहरणे दिसतात आणि त्यांचे उदात्तीकरणही केले जाते. राजघराण्याचा वारसा, राजघराण्याचे वंशज आणि राजघराण्याचे रक्त ही एक संकल्पना प्रगत देशांमध्ये आजपर्यंत रुजून राहिलेली आहे, यामागेही अशाच अभिमानाचा अंश असावा. अन्यथा, राजघराण्यात जन्मलेल्या व्यक्तीला सामान्य समाजातील व्यक्तीशी वैवाहिक संबंध ठेवण्याची कल्पनादेखील असह्य़ मानणाऱ्या प्रगत राष्ट्रांच्या परंपरा आजवर जपल्या गेल्याच नसत्या. ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्तींनी सामान्य समाजातील व्यक्तींशी विवाह केल्यामुळे त्यांना राजघराण्याचे वारसा हक्क नाकारले गेल्याच्या गेल्या दोन-तीन शतकांतील घटना याच मानसिकतेची साक्ष देणाऱ्या नाहीत काय? सन १७७२ मध्ये ब्रिटनच्या संसदेने एक कायदा संमत केला. राजघराण्याच्या प्रतिष्ठेला कमीपणा येईल अशा व्यक्तीशी विवाह करण्यावर या कायद्याने अनेक बंधने घातली आणि या कायद्यावर प्रखर टीका होऊ  लागल्याने २०१५ मध्ये अखेर तो रद्द करण्यात आला. काही बंधने शिथिल करण्यात आली आणि बदलत्या काळासोबत परंपरांचे विळखे सैल करावे लागतात हे सिद्ध झाले.

पण एवढय़ाने जगाच्या पाठीवरील वंशशास्त्राच्या परंपरागत समजुतींना मूठमाती मिळाली असे झाले नाही. जपानच्या राजघराण्यातील सम्राट अकिहितो यांची नात एका सामान्य घराण्यातील तरुणाशी विवाहबद्ध होणार असल्याने, जपानी साम्राज्याच्या कायद्याचा पुन्हा एकदा कीस पडणार आहे. या कायद्यानुसार, राजघराण्यातील या तरुणीने सामान्य माणसाशी विवाह केल्यानंतर तिला राजघराण्याचे दरवाजे बंद होणार आहेत आणि या तरतुदीमुळेच जपानी राजघराण्याच्या कायद्यावर नव्याने चर्चा झडू लागल्या आहेत. सामान्य घराण्यातील एका तरुणाशी राजघराण्यातील या तरुणीशी ओळख होते, त्याचे रूपांतर मैत्रीमध्ये होते, प्रेमाचे धागे जुळतात आणि परंपरेची बंधने झुगारून ती तरुणी त्या तरुणाची जीवनसाथी होण्याची स्वप्ने पाहू लागते, असे हे कथानक! याच कथानकाचा पहिला अंक जपानच्या राजघराण्यात २००५ मध्ये होऊन गेला होता. प्रिन्सेस सायाको हिने एका सामान्य माणसाशी विवाह केला आणि कायद्यानुसार साम्राज्यशाहीच्या साऱ्या सुखांना तिलांजली देऊन पतीसोबत एका लहानशा घरात संसार थाटला. आता जपानी साम्राज्याचा वारस कोण असणार असा राजघराण्याला भेडसावू लागल्याने, साम्राज्यशाहीच्या वंशहिताचा हा पारंपरिक कायदा बदलण्याबाबत विचार सुरू झाला. शेवटी, पुढे सरकणारा काळ हाच परंपरेला छेद देऊ  शकणारे धारदार शस्त्र असते, हे वास्तव वर्तमान आता जपानच्या साम्राज्यशाहीलाही स्वीकारावे लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

जगाच्या पाठीवर वंशाभिमानाच्या संकल्पना अशी वळणे घेऊ  लागल्या असताना त्या बदलाच्या वाऱ्यांवर स्वार होणे ही आपलीही गरज ठरणार आहे. वंशशास्त्राच्या पारंपरिक संकल्पना खुंटीवर टांगाव्या लागतील असे बदल विज्ञानाच्या साह्य़ाने होऊ  घातले आहेत. वंध्यत्वावर मात करणाऱ्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करून, आपल्याला पाहिजे त्या गुणसूत्रांची व रूपांची मुले उत्पादित करणे आता वैद्यकशास्त्राला साध्य होणार आहे. एखाद्या पोल्ट्रीमध्ये जशी कोंबडय़ांच्या पिल्लांची पैदास होते, तशी माणसांच्या मुलांची पैदास करणाऱ्या प्रयोगशाळा सुरू करण्याएवढी मजल विज्ञानाने मारली आहे.

आजपासून तब्बल ८५ वर्षांपूर्वी, सन १९३२ मध्ये आल्डस हक्सले या भविष्यवेधी शास्त्रज्ञ लेखकाने ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ नावाची एक कादंबरी लिहिली आणि भूगोलावरील मानववंशशास्त्राच्या इतिहासाचे आणि यंत्राधिष्ठित मानववंशाचे एक भेदक भविष्यच त्याने अधोरेखित केले. त्या काळी केवळ काल्पनिक कथानक वाटणारी ती संकल्पना आता वास्तवात येऊ  लागली आहे. मानवी जनुकाचे गूढ उलगडणारे शास्त्रज्ञ क्रेग व्हेंटर यांनी प्रयोगशाळेत सजीवाची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. कृत्रिम सजीव नावाचा एक नवा वर्ग मानववंशशास्त्राला छेद देण्यासाठी सिद्ध होत आहे. या शोधामुळे मानवातील आनुवंशिक आजार दूर करून मानवाला आरोग्यसंपन्न बनविता येईल असा व्हेंटर यांचा दावा असला, तरी या शोधामुळे वादाची वलये निर्माण झाली आहेत. वंशशास्त्राच्या परंपरागत संकल्पनांनाच छेद देणाऱ्या या संशोधनातून मानवजातीचे हित साधेल की भविष्यात मानवाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल या दोन्ही शंकांची वादळे घोंघावू लागली आहेत. अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये कृत्रिम गर्भाशय निर्मितीचे संशोधन यशस्वी झाले आहे. त्याच्या जोरावर कृत्रिम सजीवाची निर्मिती करता येईल, असा दावाही संशोधकांनी केला आहे.

एकीकडे वंशशास्त्राच्या परंपरागत समजुती निकालात काढणारे धक्के विज्ञानाकडून दिले जात असताना, आपल्या घराचे काही कोपरे मात्र, पुराणकथांच्या आधारावर वंशशास्त्राचे निकष घासून तपासू लागले आहेत आणि या निकषांबरहुकूम तेजस्वी राष्ट्रभक्त मानववंश निर्माण करण्याच्या प्रयोगशाळा थाटल्या जात आहे. अवघ्या भूगोलावरील वंशशास्त्राचा इतिहास बदलू पाहत असताना, मानववंशाच्या भविष्याला नवे वेध लागले असताना, इथे मात्र, कोणी पुराणकथांच्या पिवळ्या पडलेल्या पानापानांत वंशशास्त्र आणि वर्णाभिमानाचे दाखले शोधू पाहत असेल, तर भविष्य कोणते असेल याचा विचार करावयास हवा. ती वेळ टळून जाता कामा नये..

First Published on May 20, 2017 5:01 am

Web Title: lineage tradition casteism marathi articles