कोपा अमेरिका, युरो कप आणि विम्बल्डन या स्पर्धातून लक्षात राहिली ती मेस्सी, रोनाल्डो, फेडरर यांची जिद्द आणि त्यांच्या मर्यादा यांमधील हारजीत..

तिकडे अटलांटिकपल्याडच्या कोपा अमेरिकात मेस्सी याची चुकलेली पेनल्टी आणि इकडे युरोपात पेनल्टीपर्यंत पोहोचण्याची क्षमताच हरवून बसलेला रोनाल्डो.. या दोघांपैकी रोनाल्डोचे दु: अधिक भाग्यवान!

दुष्काळापासून ते दहशतवादापर्यंतच्या टप्प्यातील समस्यांनी ग्रासलेल्या समस्त मानवजातीसाठी मागील साधारण तीस दिवस आनंदात गेले. या समस्या या काळात लुप्त झाल्या होत्या हे कारण या आनंदामागे नाही. तर या समस्यांवर मात करून आनंद देतील अशा एकापेक्षा एक सरस क्रीडा स्पर्धा या महिनाभरात झडत होत्या आणि मानवी क्षमतांची मर्यादा किती वाढवता येते याचे दर्शन देत होत्या. एका बाजूला संकुचित आणि क्षुद्रातिक्षुद्र होत चाललेले जग आणि त्याच जगात राहून या क्षुद्रत्वाला वाकुल्या दाखवणारे हे खेळाडू! मोठा आनंददायी विरोधाभास होता तो. प्रथम कोपा अमेरिका, युरो कप आणि मग त्यामागून आलेले विम्बल्डन अशी ही आनंदाची त्रिवेणी या महिनाभरात अनुभवता आली. त्यांचा रसास्वाद सादर करणे ही त्या आनंदाची उजळणीच.

यातील कोपा अमेरिका ही अमेरिका खंडातल्या एकापेक्षा एक बलाढय़ देशांतील फुटबॉल स्पर्धा चिली या देशाने पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेटिनाचा पराभव करीत जिंकली तर युरो कप स्पर्धेत तितक्याच लहानग्या पोर्तुगालने युरोपातील महासत्ता असलेल्या फ्रान्सचा पराभव केला. जागतिक फुटबॉल क्षेत्रातील दोन झगमगते तारे या दोन स्पर्धातील अंतिम सामन्यांत निष्प्रभ होताना दिसले. अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी हा कोपा अमेरिका स्पर्धेत काहीही प्रभाव पाडू शकला नाही. अंतिम सामन्यात तर आपली पेनल्टीची संधीदेखील त्याने गमावली. युरो कप स्पर्धेत विजयी ठरलेल्या पोर्तुगालच्या रोनाल्डो यालादेखील अंतिम फेरीतील विजयात काहीही वाटा उचलता आला नाही. रोनाल्डो यास दुखापतीने ग्रासले. तरीही मैदानात राहण्याचा प्रयत्न त्याने दोन वेळा करून पाहिला. आपल्या देशासाठी युरो कप मिळवण्याच्या ऐतिहासिक क्षणात त्यास आपला वाटा उचलायचा होता. पण ते जमले नाही. या महत्त्वाच्या सामन्यात पायाने दगा दिल्याच्या दु:खास अश्रूंद्वारे वाट करून देत त्याने अखेर मैदान सोडले तो क्रूर महाभारती क्षण पाहताना फुटबॉलचे सच्चे प्रेमी मनापासून हळहळले. तो ना आपल्या देशाचा ना भाषेचा. पण तरीही आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकाराचा स्वर ऐन मैफलीत हरवून जावा आणि त्या कलाकाराची तगमग हळवी करून जावी तसे रडत रडत मैदान सोडून जाणाऱ्या रोनाल्डो यास पाहून अनेकांना वाटून गेले असेल. तिकडे अटलांटिकपल्याडच्या कोपा अमेरिकात मेस्सी याची चुकलेली पेनल्टी आणि इकडे युरोपात पेनल्टीपर्यंत पोहोचण्याची क्षमताच हरवून बसलेला रोनाल्डो यांना पाहून असंख्य घरांत चुकचुकाट निनादला. परंतु तरीही या दोघांपैकी रोनाल्डोचे दु:ख अधिक भाग्यवान. कारण त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या संघाने बलाढय़ फ्रान्सला झुंजवले आणि अतिरिक्त वेळेत गोल करून मातृगृही- पॅरिसमध्येच- त्यास पराजित केले. वास्तविक या संपूर्ण स्पर्धेत पोर्तुगालने विजयी व्हावे असे काहीही नाही. आपल्या साखळी सामन्यांतील सातपैकी फक्त एकात पोर्तुगाल विजयी ठरला आणि अन्यांत पराभूत न होणे हीच त्याची कामगिरी ठरली. स्पेन, जर्मनी आणि बेल्जियमसारखे संघ या स्पर्धेत अगदीच निष्प्रभ ठरले आणि पराभव टाळता आला या एका कामगिरीवर पोर्तुगाल विजयी ठरला. असो. सुरुवातीला रशियन आणि ब्रिटिश हुल्लडबाजांनी घातलेला गोंधळ, त्याही आधी पॅरिसचे दोन भाग करीत निवांत वाहणाऱ्या सीन नदीने आपल्या मर्यादा ओलांडत शहरात केलेला प्रवेश आणि त्याआधी वर्षभरात झालेले हादरवून सोडणारे दहशतवादी हल्ले या पाश्र्वभूमीवर फ्रान्समधील या स्पर्धा कशा काय पार पडणार अशी सार्वत्रिक चिंता व्यक्त होत होती. आपल्या वेळेनुसार रविवारी उत्तररात्री रंगलेला अंतिम सामना संपला आणि मगच या चिंतांची जाणीव झाली इतकी उत्तम ही स्पर्धा झाली.

कोपा अमेरिकास तुलनेने अशा काही कोणत्या चिंतांचा स्पर्श नव्हता. परंतु तरीही युरोच्या तुलनेत ही स्पर्धा म्हणावी तशी उंची गाठू शकली नाही. त्यामागे अनेक कारणे असावीत. ऑलिम्पिकचा यजमान असलेल्या आणि म्हणून घरातल्या स्पर्धात सुवर्णाची आशा बाळगणाऱ्या ब्राझीलने कोपा अमेरिकात नेयमारसारख्या खेळाडूस मायदेशी ठेवूनच या स्पर्धेत प्रवेश केला आणि उरुग्वेचा संघही जखमी, ‘चावऱ्या’ लुइस सुआरेझ याच्याशिवायच स्पर्धेत उतरला. साहजिकच हे दोन्ही संघ पहिल्या काही फेऱ्यांतच गारद झाले. परिणामी ही स्पर्धा तशी एकतर्फीच झाली. चिलीने मेक्सिकोचा ७-० असा उडवलेला धुव्वा आणि अर्जेटिनाने ४-० अशी अमेरिकेवर केलेली मात हे विजय या असंतुलनाचेच प्रतीक. आणि त्यात चिलीने जगज्जेत्या अर्जेटिनावर चटका लावणारा विजय मिळवला. तोदेखील पेनल्टी शूटआऊट मार्गाने. हे म्हणजे उत्तम अभ्यासासाठी विख्यात असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल छापाकाटा मार्गाने लावण्यासारखे. पण त्यास इलाज नव्हता. कारण अतिरिक्त वेळेतही हे दोन्हीही संघ खडाखडीतच आनंद मानत राहिले. त्यामुळे या सामन्याच्या निकालापेक्षाही जास्त चर्चिला गेला तो मेस्सी याचा निवृत्तीचा निर्णय.

वर्षांनुवर्षे आपल्याला आनंद देणाऱ्या जगज्जेत्याचे हे असे मर्त्य मानवाप्रमाणे विरून जाणे वेदनादायी असते. विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडरर याने ही वेदना जागवली. खरे तर उपउपांत्य फेरीत आपला गुरू गोरान इवानसेव्हिक याच्या तोफगोळ्या खेळाची आठवण करून देणाऱ्या चिलीचचे आव्हान ज्या पद्धतीने फेडररने फेडले ते केवळ विस्मयचकित करणारे होते. पाच सेट्स चाललेला हा सामना वयाच्या चाळिशीपासून अवघ्या पाच वर्षांवर असणाऱ्या फेडररने असा काही झुंजवला की तारुण्य आणि वय यांचा काहीही संबंध असतो हे खरेच वाटू नये. इतक्या डोळे दिपवणाऱ्या विजयानंतर विम्बल्डनचे अंतिम विजेतेपद त्यालाच मिळणार याची जणू खूणगाठच टेनिसशौकिनांनी मनातल्या मनात बांधली आणि उपान्त्य सामन्यातील त्याची लढत गृहीत धरली. तिथेच घात झाला. तो सामनाही पाच सेट्स चालला. परंतु या सामन्याच्या निकालात दृश्यबदल झाला. येथे तगडय़ा ताडमाड रौनिच याने फेडररला पराभूत केले. रौनिचचे रौद्ररूप असे तेज की वाटले आता तोच अंतिम विजेता. सणसणीत उंचीस साजेशी शरीरयष्टी आणि तुफान वेगाने जाणारी सव्‍‌र्हिस याच्या जोरावर कॅनेडियन रौनिच हाच यंदाचा विम्बल्डन विजेता ठरणार असेच सगळ्यांचे मत होते. पण इतक्या तगडय़ा खेळाडूस इंग्लंडच्या किरकिऱ्या मरे याने सरळ सेटमध्ये पराभूत केले. हा सामना इतका बिगरअंतिम दर्जाचा झाला की फेडररला हरवणारा हाच का तो रौनिच असा प्रश्न पडला. अंतिम सामन्यात तरण्याबांड रौनिच याचा पराभव झाल्याचे दु:ख नाही. पण मधल्या मधे फेडररला हरवणारा काळ तेवढा सोकावला. असो. शेजारी महिला विभागात सेरेना विल्यम्स हिने अपेक्षेप्रमाणे विजेतेपद हिसकावून घेतले. तिचा खेळ पाहताना पु. ल. देशपांडे यांच्या ‘सिंधु कसली, सिंधुदुर्गच तो..’ या वाक्याची आठवण प्रकर्षांने होते. तशी ती होणे स्त्रीद्वेष्टेपणाच्या आरोपास निमंत्रण देणारे असले तरी त्यास इलाज नाही. तिचा ‘नमवी पहा भूमि’ हा थाट महिला टेनिसमध्ये निव्वळ दरारा निर्माण करणारा आहे हे मात्र निश्चित.

या तीनही स्पर्धा संपल्या. आता वेध लागतील ते पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकचे. भ्रष्टाचार, ढासळती अर्थव्यवस्था अशा समस्यांनी ग्रासलेल्या देशातील रिओ द जानेरो येथे हे ऑलिम्पिक सामने सुरू होतील. त्या वेळी मानवी क्षमतांची मर्यादा ओलांडण्याची क्षमता पुन्हा सिद्ध होईल आणि त्यातून मायकेल जॉर्डन या विख्यात अमेरिकी बास्केटबॉलपटूच्या वचनाची आठवण होईल. ‘मर्यादा या भीतीप्रमाणे काल्पनिकच असतात, त्यांची तमा बाळगायची नसते’, असे मायकेल म्हणतो. खेळ हेच सिद्ध करतात. म्हणूनच ते आनंददायी असतात.