News Flash

मै नाचूँ, तू नचा..

अलीकडच्या काळात अमरसिंग हेच मुळात भाजपच्या संस्कारी पाणवठय़ाकडे आकृष्ट झाले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

भाजपच्या तळ्यावर जमणाऱ्यांचे एकमेकांत पटले नसेल. पटणारही नसेल. पण तरीही हे सर्व तूर्त या राजकीय पाणवठय़ावर आनंदाने जमा होताना दिसतात..

दुष्काळ पडला, अवर्षण दिसू लागले की माणसे बाहेर पडतात. व्यंकटेश माडगूळकर त्यास माणसे जगायला बाहेर पडली असे म्हणतात. करपणारी, भेगाळलेली जमीन आणि गुराढोरांची खपाटीला गेलेली पोटे पाहवत नाहीत शेतकऱ्यांस. तेव्हा जगण्यासाठी घराबाहेर पडणे हाच एक मार्ग असतो. दुष्काळात जे शेतकऱ्यांचे होते ते निवडणुकांच्या काळात राजकीय नेत्यांचे होते. कंत्राटे नाहीत, भकास डोक्यांनी बसून राहिलेले कार्यकत्रे, विचारायला कोणी नाही हे मोठे करुण दृश्य असते राजकीय नेत्यांसाठी. तेव्हा जगण्यासाठी बाहेर पडणे आवश्यकच. घरच्या गुराढोरांना वैरण कोण देणार हा दुष्काळकालीन शेतकऱ्यांचा प्रश्न; तर निवडणूक काळात आणि नंतर कार्यकर्त्यांची सुटलेली पोटे भरणार कोण हा राजकीय नेत्यांना पडणारा प्रश्न. दुष्काळात स्थलांतर जसे शेतकरी करतात तसे प्राणीही करतात. या कठीण काळात पाणथळ जागा हा मोठा आसरा. दोन घास खायला मिळण्याची हमी अशाच ठिकाणी मिळू शकते.

सांप्रत काळी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा अशी सर्वोत्तम पाणथळ जागा. विविध पक्षांतील विविध आकारांचे, स्वभावाचे नेते, उपनेते, कार्यकत्रे या पाणथळ जागी झुंडीझुंडीने जमा होताना दिसतात ते याचमुळे. जंगलाच्या राज्यात या पाणथळ जागेचा म्हणून एक अलिखित नियम असतो आणि तो पाळला जातो. अर्थात जंगल म्हणजे शहर नव्हे. जंगलांशी माणसांचा संबंध नसल्याने तेथे नियम पाळले जातात, यात तसे विशेष काही नाही. तो नियम असा की पाणवठय़ावर आलेल्याची शिकार करणे प्राणितत्त्वांनुसार निषिद्ध आहे. भले त्यांचे एकमेकांशी कधी काही पटत नसेल, पटले नसेल. पण प्राणी ही माणसे नसल्याने ते आपली भांडणे पाणवठय़ावर घेऊन जात नाहीत. त्यामुळे सार्वजनिक नळांवर कडाकडा भांडणाऱ्या माणसांप्रमाणे पाणवठय़ावर भांडणारे प्राणी दिसणार नाहीत. एकतर प्राणी पाणवठय़ावर कधी कोणी जावे याचेही संकेत पाळतात. म्हणजे वाघ आणि हरीण एकमेकांच्या सौजन्याची चाचणी घेण्यासाठी उगाचच एकमेकांसमोर पाणी पीत नाहीत. हा नियम राजकारण्याच्या जंगलातही पाळला जातो. सध्या राजकारणाच्या दुष्काळातील एकमेव पाणवठा असलेल्या भाजपच्या तळ्यावर जमणाऱ्यांचे एकमेकांत पटले नसेल. पटणारही नसेल. पण तरीही हे सर्व तूर्त या राजकीय पाणवठय़ावर आनंदाने जमा होताना दिसतात. ही तळ्यातल्या पाण्याची महती. लवकरच वैशाखवणव्यात होरपळू लागणाऱ्या राजकीय धरतीत भाजपच्या या तळ्यात पाणी आहे, हा मोठा दिलासाच असणार अनेक राजकीय पक्षांतील दुष्काळी उपेक्षितांसाठी.

हे तळे राष्ट्रीय पातळीवरचे. किती दाखले द्यावेत. वंगभूमीत डाव्यांच्या तावडीत इतकी वर्षे राहिलेले, ममता दीदींच्या तृणमुलात नांदलेले असे अनेक मान्यवरही हल्ली या नव्या पाणवठय़ावर जमा होऊ लागलेत. शेजारच्या ओदिशातील जय पांडा आणि अन्य बिजू जनता दलीय हेदेखील आपापल्या पक्षांतील भोजन झाल्यानंतर मुखप्रक्षालनासाठी भाजपच्या या पाणवठय़ावर सुखेनव नांदताना दिसू लागले आहेत. हे पाणवठय़ाचे महत्त्व. बिहार म्हणू नका, उत्तर प्रदेश तर म्हणूच नका, गुजरात, महाराष्ट्र अशा अनेक प्रांतांतील अनेक घसे कोरडे झालेले क्षुधा आणि तहान शांतीसाठी भाजपच्या या पाणवठय़ावर जमा झालेले दिसतात.

एकटय़ा महाराष्ट्राचाच विचार करावयाचा झाल्यास किती ग्रामसिंह या पाणवठय़ावर पाळीव श्वापदाप्रमाणे आपल्या पाणी चाखण्याचा क्रम कधी त्याची प्रतीक्षा करीत आहेत. मोठे आनंददायी दृश्य हे. उदाहरणार्थ नगर जिल्ह्य़ातील विखे पाटील. या घराण्याची तिसरी पाती डॉ. सुजय यांना या पाणवठय़ावर जागा मिळाली आहे. हे मज्जासंस्थेचे शल्यक असल्याची वदंता आहे. मज्जासंस्थेत पाठीचा कणा महत्त्वाची भूमिका बजावतो. पण त्यास बाजूस सारून मज्जासंस्थेवर या डॉ. सुजय विखे यांनी नियंत्रण मिळविले, असे म्हणतात. या राज्यातील दुसरे असे तगडे स्थानिकसिंहांचे घराणे मोहिते पाटील यांचे. एकेकाळी त्यांचेच राज्यातील पाणवठय़ावर नियंत्रण असे. परिसरातील सगळेच पाणवठे त्यांच्या मालकीचे. या घराण्याचा मूळपुरुष समाजवादी विचारांचा होता, असे म्हणतात. याच समाजवादी विचारांच्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या चिरंजीवाच्या विवाहातील लक्षभोजनभाऊंना शीतल पाणी पाजता यावे म्हणून समग्र पाणवठाच बर्फाच्छादित करून टाकला होता. पण काळाच्या ओघात ते पाणवठे कोरडे झाले. सत्ताकेंद्रातून काही झिरपाच होईना. सगळेच झरे आटले. मोठा बिकट काळ. तेव्हा नव्या पाणवठय़ाच्या शोधात पुढच्या पिढीस घराबाहेर पडावे लागले असेल तर त्यात नवल ते काय? एकेकाळच्या आपल्या ग्राम-सिंहत्वाची आयाळ तरी अजून झडलेली नाही हे दाखवून देण्यासाठी हे स्थानिकसिंह अजूनही आपल्या नावांत सिंह ही उपाधी लावतात. जसे की विजयसिंह, प्रतापसिंह, रणजितसिंह इत्यादी. तथापि तूर्त हे सर्व कथित सिंह भाजपच्या पाणवठय़ावर शेळीप्रमाणे स्वत:स बांधून घेण्यात आनंद मानू लागले आहेत.

या पाणवठय़ाचे भाजपचे सहराखणदार असलेल्या शिवसेनेचेही असेच. या पक्षास स्वत:चे स्वयंभू झरे नाहीत. कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या तळ्यातील दोनपाच बादल्या पाणी कोरडय़ा तळ्यात टाकून आपलेही तळे टिळंटिळं भरले असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न. खरे तर तळ्यात पाणी असेल तर चाखणारे आपोआप जमतात. या उपपाणवठय़ाकडे ते तसे जमेनात. म्हणून मग पाण्याप्रमाणे पाणी पिणारेही उसने घेण्याची क्लृप्ती या उपतळ्याच्या व्यवस्थापकांनी केली. उदाहरणार्थ पालघर. तेथे त्यांनी भाजपचा विद्यमान खासदारच आयात केला आणि त्यास आपला उमेदवार म्हणून जाहीर केले.

तथापि जगण्यासाठी बाहेर पडण्याची वेळ हिंस्र म्हणवून आव आणणाऱ्या प्राण्यांवरच येते असे नाही. ती लांडोर, मना अशा पक्ष्यांवरही येते. उदाहरणार्थ जयाप्रदा. वीस वर्षांत पाच नवनवी तळी शोधण्याचा त्यांचा अनुभव. मूळच्या दक्षिणदेशीय तळ्याकाठच्या. एन टी रामाराव हे त्या तळ्याचे मुख्य राखणदार. त्यांच्या निधनानंतर त्या तळ्याची मालकी जामात चंद्राबाबू यांच्याकडे आल्यावर त्या तळ्याकाठी काही त्यांचा जीव रमेना. तेव्हा त्यांनी नव्या पाणवठय़ाच्या शोधात उत्तरेकडे प्रयाण केले. तेथे त्यांची गाठ अनेक पाणवठय़ांच्याकडे जाणाऱ्या चोरटय़ा वाटा माहीत असलेल्या अमरसिंग या नरपुंगवाशी पडली. त्याआधी मुलायमसिंग यांनी आपल्या समाजवादी पाणवठय़ावरून त्यांची हकालपट्टी केली होती. त्या वेळी उदार अंत:करणाने अमरसिंग यांनी त्यांना आसरा दिला. अलीकडच्या काळात अमरसिंग हेच मुळात भाजपच्या संस्कारी पाणवठय़ाकडे आकृष्ट झाले आहेत. मध्यंतरी त्यांच्यावर मूत्रिपड आरोपणाची शस्त्रक्रिया झाली. ती करताना चुकून त्यांचे हृदयपरिवर्तनही झाले असे म्हणतात. त्यामुळे एकेकाळचा जातीय, धार्मिक वगैरे प्रतिगामी भाजप त्यांना सर्वसमावेशक, उदार वाटू लागला असून या हृदय आणि दृष्टीबदलाचे प्रतीक म्हणून त्यांनी अलीकडेच आपली भलीथोरली जमीन रा. स्व. संघास जलसंवर्धनासाठी देऊ केली. अमरसिंगांचेच मतपरिवर्तन झालेले असल्याने त्या तळ्याचे पाणी पिऊन आपली तहान भागवणाऱ्या जयाप्रदा यांचेही ते होणारच.

त्याचमुळे त्याही आता भाजपच्या या पाणवठय़ाकडे आकृष्ट झाल्या असून त्यांनाही तेथे मानाचे स्थान देण्याचे औदार्य भाजपने दाखवले आहे. या जयाप्रदाबाई नृत्यकलानिपुण. या राजकीय दुष्काळाच्या काळात आपल्याला भाजपच्या तिठय़ावर वसती करण्यास मिळाली याचा आनंद आपल्या कलेतून त्या व्यक्त करीत असून त्याचमुळे त्या तळ्याच्या परिसरातून दिल्लीच्या दिशेने सर्व नव्या सदस्यांच्या वतीने प्रातिनिधिक असे म नाचँू, तू नचा.. या अवीट, अजरामर गाण्याचे सूर ऐकू येतात. या रखरखाटात आपण पामरांनी त्या स्वरांचा आनंद घ्यावा, हे बरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 12:12 am

Web Title: loksabha election 2019 prominent leaders from several political parties joining bjp
Next Stories
1 गरिबी आवडे सर्वाना..
2 सांख्यिकी सत्य
3 जेट जाउ द्या मरणालागुनि..
Just Now!
X