महानगरवासींच्या ललाटावर धोक्याच्या रेषा कोणी ओढल्या आणि त्या कशामुळे कायम राहिल्या, याचे गूढ आता उकलू लागले आहे..

चिकित्सक आणि अभ्यासू वृत्तीमुळे माणसाने अन्य प्राणिमात्रांच्या तुलनेत स्वतची अशी काही प्रगती केली आहे, की ज्ञान-विज्ञानाचे कोणतेही क्षेत्र आता त्याच्या आकलनापलीकडे राहिलेले नाही असे आपण मानतो. तरीही एक गोष्ट मात्र माणसाला अद्यापही उमगलेली नाही. माणूस किंवा अन्य कोणताही सजीव जन्माला येतो तेव्हा त्याच्या ललाटावर नियती काही तरी लिहून त्याला भूतलावर पाठवते अशी परंपरागत समजूत असते. अर्थात या समजुतीला वैज्ञानिक आधार नाही. पण ज्या गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही किंवा ज्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाहीत तरीही आकलनापलीकडच्या असतात, त्याला गूढ मानले जाते. ललाटरेषांवरील लेखनाची लिपी ही समजूतही त्यामुळेच कायमचे गूढ होऊन राहिलेली असते. जगाच्या पाठीवर अशी एकही लिपी आणि एकही भाषा नाही, जी माणसाने आत्मसात केलेली नाही. तरीही ललाटीच्या रेषांवरील लिपी आणि ती भाषा मात्र माणसास कधीच समजलेली नाही. त्यामुळेच, अशी काही भाषा अथवा अशी काही लिपी नसतेच, किंवा असतेच, यावर कोणतेच छातीठोक मत व्यक्त करता येत नसल्यामुळे, ही निव्वळ एक समजूत असली तरी ती काळापलीकडे टिकून राहिलेली आहे. अज्ञात भविष्याचे ओझे प्रत्येकाच्या खांद्यावर देऊनच रोजचा दिवस पुढे सरकत असतो. भविष्याच्या पुढच्या क्षणासाठी त्या ललाटरेषेवर काय लिहिले आहे, याची कुणाला जाणीव नसते. एका अर्थाने ते बरेच असते. कारण तशी जाणीव होऊ लागली, तर वर्तमानातील समाधानापेक्षा भविष्यातील भय आणि संकटांचे सावट माणसाचे जगणेच निरस करून टाकेल. उलट ही जाणीव नसल्यामुळे पुढचा क्षण जगण्याची उमेद जिवंत राहते आणि तो क्षण आपल्यासाठी काय घेऊन सामोरा येणार याची काळजीही राहत नाही. कदाचित त्यामुळेच, ललाटीच्या रेषांच्या भाषेचे ज्ञान मिळविण्यासाठी माणसाकडून फारसा अट्टहास केला जात नसावा. ती भाषा अज्ञात आहे, तेच बरे आहे, असे वाटण्यासारखे अनेक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. ते येऊन गेले, त्यांचा भूतकाळ झाला, की त्या भाषेची अगम्यता पटू लागते. तरीही त्या गूढाचा अर्थ मात्र कधीच उमगत नाही.

नागरीकरणाच्या रेटय़ामुळे आपल्या जीवनशैलीला मनासारखा आकार देण्याचे बरेचसे उपाय आता माणसाच्या हातात राहिलेले नाहीत, हे तर जवळपास सिद्धच झाले आहे. मुंबईसारख्या महानगरात- किंवा कोठेही- वावरताना पुढच्या क्षणासाठी भविष्याने आपल्याकरिता काय वाढून ठेवले आहे हे कळत नसले, तरी तो क्षण पूर्ण भरवशाचा असेलच असे नाही, एवढे मात्र आता माणसास कळून चुकले आहे. म्हणूनच, हाती आलेला प्रत्येक क्षण ‘जगण्याचाच क्षण’ ठरावा याची शक्यतो अधिकाधिक काळजी माणसे घेत असतात. तरीही काही वेळा जगण्याच्या त्या क्षणालाच, एखादे भविष्य कायमचे पुसले जाते. त्याच्या ललाटीच्या रेषांवर तसेच लिहिलेले असले तरी ते वाचता येत नसल्याने तो क्षण चुकविणे हाती राहत नाहीच. असे क्षण शहरांमध्ये क्षणोक्षणी समोर येत असतात.. कुणी तरी निव्वळ सुदैवाने त्यातून बचावतो, आणि त्या क्षणाच्या खुणा त्याच्या उरावर कायमच्या गोंदलेल्या राहतात. त्या क्षणाची आठवण त्याच्या भविष्यभराची साठवण होऊन राहते, आणि भविष्यातीलच एखाद्या क्षणी त्या आठवणीच्या जखमा ओल्या होऊन भळभळू लागतात.. त्या सोसणे एवढेच त्याच्या हाती राहते. त्या जखमांना इलाज नाही. उलट, कमीअधिक प्रमाणात त्या कायमच ओल्या राहिलेल्या असतात..

अशाच जखमा गेल्या १४ वर्षांपासून मुंबईकरांच्या उरात जिवंत आहेत. खरे तर, दर पावसाळ्यात कधी कधी मुसळधार पाऊस पडतोच, वाहतूक मंदावते, रेल्वे सेवा विस्कळीत होते, रस्ते आणि नाले यांच्यातील फरक पुसला जातो, शहराला श्वास पुरवणारी झाडेही जीवघेणी होतात आणि पुढचे पाऊल चुकले तर कोणत्याही क्षणी एखादी भूमिगत जलवाहिनी आपल्या उघडय़ा तोंडातून एखाद्या जीवाचा घास घेईल या भयासोबत वावरावे लागते. असे काही झाले, तरी इथल्या जगण्याची उमेद कधीच संपत नसते. जेव्हा कधी असे प्रसंग येतात, तेव्हा माणूस आपल्या दैनंदिन व्यवहाराचे वेळापत्रक त्यानुसार बदलतो, आणि ठरलेल्या वेळी ठरलेली कामे होतील याची काटेकोर काळजी घेतो. असेही अनेकदा घडते. पाऊस हा एरवी आनंदाचा ठेवा असला, तरी मुंबईकरांना बऱ्याचदा संकटासमानच वाटतो, हे त्याचे खरे कारण. कधी तरी जेव्हा तो बेभानपणे कोसळू लागतो, तेव्हाही त्याला आपले वेळापत्रक पार पाडावेच लागते. त्यामुळे त्याला सामोरे जाण्याची त्याची तयारीही असते. मात्र एखाद्या वेळी त्याला वेळ, काळ आठवते. असा पाऊस कोसळू लागला आणि त्याला ती तारीख आठवली, की भयाची एक शिरशिरी आजही त्याच्या देहावरून नखशिखान्त सरसरून जाते. त्या घटनेला १४ वर्षे उलटली. २६ जुलै ही तारीख मात्र मुंबईकरांच्या मनाला ओल्या जखमेसारखी चिकटूनच राहिली आहे. या तारखेची जाणीव झाली की कोसळणारा पाऊस, जलमय रस्ते, मंदावलेली वाहतूक आणि पुरते विस्कळीत झालेले जनजीवन या सवयीच्या बाबींचेही भय वाटू लागते. २६ जुलै २००५ या तारखेची ही जखम आजही ओली आहे. त्या दिवशीच्या प्रलयकारी पावसाने एकटय़ा मुंबईत एका दिवसाच्या काही तासांत जीवघेणा हाहाकार माजविला. जवळपास अकराशे बळी घेतले. कोटय़वधींच्या मालमत्तेचे होत्याचे नव्हते करून टाकले, आणि माणसाच्या भरवशावर आश्वस्त असलेल्या हजारो जीवांचे भविष्य एका फटकाऱ्यात कायमचे पुसून टाकले. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी, या दिवशी, मुंबई परिसरातील शेकडो मनांच्या ओल्या जखमांची खपली निघते. हजारो डोळ्यांना अश्रू अनावर होतात, आणि हरपलेल्या आप्तांच्या आठवणींनी हजारो जीव कासावीस होतात. त्या वर्षांची २६ जुलै ही तारीख अशा जीवघेण्या क्षणांचे भलेमोठे गाठोडे सोबत घेऊनच रस्त्यावर उतरली, आणि असंख्य निष्पापांचे घास घेऊन भूतकाळात गडपही झाली. तिने उमटविलेल्या ओरखडय़ांचे व्रण अजूनही ओले आहेत.

अशा जखमा भरून निघत नसतात, हे खरे आहे. पण त्यामुळे त्यावर उपचार करण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे नसतात. किमान नियमित मलमपट्टी केली तरी त्याच्या वेदना सुसह्य़ होऊ शकतात. गेल्या १४ वर्षांत अशी मलमपट्टी तरी प्रामाणिकपणे झाली का, हे तपासण्याची वेळ आली आहे. यंदाही २६ जुलैच्या दिवशी ज्या असंख्य जखमा पुन्हा एकदा भूतकाळाच्या आठवणींनी भळभळून गेल्या, त्यांच्या वेदनांचा तोच तर आक्रोश होता. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, बदलापूर, कल्याण-डोंबिवली, टिटवाळा.. वसई-विरार अशा चहूबाजूंनी सुजत गेलेल्या महानगरीने ज्या संकटाला थारा दिल्यामुळे ‘नियतीने ललाटावर लिहिलेल्या रेषांच्या अनाकलनीय आणि गूढ अशा भाषेचा’ अर्थ नंतर काहीसा उकलत गेला, त्याच रेषा आणि त्याच भाषेचे भय कदाचित आजही कायम असू शकते, हे यंदाच्या पावसाळ्यातील काही दिवसांनी दाखवूनही दिले. म्हणून, पाऊस हे संकट वाटण्यासारखी परिस्थिती बदलण्याची गरज आहे. पावसाळा हा एक आनंदसोहळा असतो, आणि त्याचा समाधानाने उपभोग घ्यायचा असतो. ती संधी इतरांप्रमाणेच मुंबईकरांनाही मिळाली पाहिजे. कारण तो त्यांचाही हक्कच आहे.