स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा अंगी बाणवलेले वाडेकर अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक ठरले.. ही सुसंस्कृततेची मूल्ये त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली..

इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघासाठी सध्या पळता भुई थोडी झालेली आहे. मुळात अजूनही इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फारशा कसोटी मालिका जिंकता येत नाहीत. अशा चाचपडलेल्या स्थितीत आपला संघ असताना, इंग्लिश भूमीवर भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अजित वाडेकर यांचे जाणे मन अधिकच खंतावणारे ठरते. वाडेकर यांचे जाणे हा इतरही अर्थानी युगान्त ठरतो. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे विधान हास्यास्पदच ठरविणारी सध्याची स्थिती. ‘स्वॅगर’च्या नावाखाली भावनांचे उघडेवागडे प्रदर्शन मांडणे हे फॅशन स्टेटमेंट वगैरे बनले आहे. पण वाडेकर यांनी मात्र अंगभूत सभ्यता, शालीनता क्रिकेटमध्येही रुजवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर; क्रिकेटपटू, कर्णधार, व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध रूपांमध्ये वावरत असताना आणि अगदी अखेपर्यंत तसेच राहिले. त्यांनी क्रिकेटला सामावून घेतले. अनेक जबाबदाऱ्या यथार्थ पार पाडल्या. पण क्रिकेटमुळे ते झाकोळले गेले नाहीत. क्रिकेट हेच सुख-दुख होऊन बसते आणि क्रिकेटला सोडू शकत नाहीत असे अनेक लहान-महान क्रिकेटपटू आपल्या आजूबाजूला वावरत असताना, वाडेकर यांनी मात्र एक सन्मान्य अलिप्तपणा जपला.

यशाची चव चाखल्यानंतर असा अलिप्तपणा सोपा नसतो. १९६०च्या दशकात अजित वाडेकर एक क्रिकेटपटू आणि नंतर कर्णधार म्हणून उदयाला आले. १९६७च्या न्यूझीलंड दौऱ्यात मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी पहिला विजय मिळवला, त्या वेळी त्या सामन्यात वाडेकरांनी शतक झळकावले. ते त्यांचे एकमेव शतक. म्हणजे परदेशी भूमीवरील पहिल्या विजयामध्ये वाडेकर यांचेही योगदान होतेच. पण ती त्यांची सर्वपरिचित ओळख नाही. ते घराघरांमध्ये पोहोचले ते भारतीय संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवल्यानंतर. हे दोन्ही संघ त्या वेळी बलाढय़ होते आणि मायदेशी खेळत होते. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू हौशे-नवशेच गणले जात. बरेचसे सधन कुटुंबांची पाश्र्वभूमी असलेले देखणे क्रिकेटपटू, सामन्यातले काही तास (पण पूर्ण सामना नव्हे) मनोरंजन करीत आणि खुल्या दिलाने पराभवाला सामोरे जात, अशी भारतीय क्रिकेटपटूंची गोंडस प्रतिमा होती. तिला तडे देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेटपटूंची होती आणि पतौडीच्या संघाने ते थोडय़ाफार प्रमाणात करूनही दाखवले होते. पण न्यूझीलंडचा संघ म्हणजे इंग्लंड-वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलियाचा संघ नव्हता. त्यामुळे वाडेकरांच्या भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज जिंकल्यानंतरच भारतीय क्रिकेटला जगात गांभीर्याने घेतले जाऊ लागले.

वाडेकर यांची भारतीय संघाचे कर्णधार म्हणून ज्या वेळी तत्कालीन निवड समितीप्रमुख विजय र्मचट यांनी निवड केली, तेव्हा ते उत्तम फलंदाज होते. पण सर्वोत्कृष्ट नव्हते. मुंबईचे नेतृत्व उत्तम प्रकारे करायचे. मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक चांगले नेतृत्वगुण दाखवलेले कर्णधार (उदा. पतौडी) भारतीय क्रिकेटमध्ये खेळतच होते. शिवाय खुद्द र्मचट यांच्याच मते (याविषयी त्यांनी नंतर सांगितले) वाडेकर धावा जमवण्याच्या बाबतीत पुरेसे महत्त्वाकांक्षी नव्हते. र्मचट यांना भावला वाडेकर यांचा स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा. वाडेकर यांनी मैदानावर कधीच भावनांचे प्रदर्शन केले नाही. यशापयशाला ते सारख्याच स्थितप्रज्ञपणे सामोरे जायचे. कोणत्याही परिस्थितीत विचलित व्हायचे नाहीत. पतौडी यांच्याभोवती वलय होते. त्या वेळच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंवर त्यांचा पगडा होता. पतौडी यांनी न्यूझीलंड दौऱ्यात विजय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवाबी वर्चस्ववादाची जोड मिळाली होती. त्यामुळे वाडेकर यांच्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नव्हते. वाडेकर यांनी सुसंस्कृतपणा दाखवत पतौडी यांच्याशी तरीही दोस्ती जमवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यामुळे निष्कारण उदास न होता वाडेकर यांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दौऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघात त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर गटबाजी होती. अनेक चांगले खेळाडू होते. तरी एक संघ म्हणून कुणीही एकत्रपणे चांगले खेळून दाखवत नव्हते. वाडेकर यांनी पतौडींचे खास मित्र एम. एल. जयसिंहा यांना उपकर्णधार बनवले. दिलीप सरदेसाई यांना र्मचट यांचा विरोध डावलून आग्रहाने दोन्ही दौऱ्यांवर नेले. सुनील गावस्करांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. वाडेकर यांच्या नावावर नशीबवान कर्णधार असा शिक्का मारला जातो. मात्र त्यांनी केलेली संघनिवड कल्पक आणि वेगळी होती. वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा त्यांची पसंती उपयुक्ततेला होती. यातूनच त्यांनी इरापल्ली प्रसन्ना यांच्याऐवजी त्यांनी भागवत चंद्रशेखर यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. इंग्लंडमधील ओव्हल कसोटीतील निर्णायक विजयात चंद्रशेखर यांचे मोलाचे योगदान राहिले. सलीम दुर्राणी, अब्बास अली बेग, फारुख इंजिनीयर यांना त्यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्यांचे बहुतेक निर्णय यशस्वी ठरले. ‘नशीबवान कर्णधारा’ची ही लक्षणे नव्हेत! एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली! फार थोडय़ा भारतीय कर्णधारांनी अशा प्रकारचा खमकेपणा त्यापूर्वी दाखवला होता. एक फलंदाज म्हणून वाडेकर डावखुरे होते आणि शैलीदार, आक्रमक खेळायचे. त्यांची आकडेवारी चांगली असली, तरी असामान्य नाही. कसोटीमध्ये एकापेक्षा अधिक शतके झळकवण्याची त्यांची योग्यता होती. कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा धावांचा ओघ आटला असे सांगितले जाते. पण सभ्य, सुसंस्कृत, शालीन असले, तरी वाडेकर एक चिवट, कणखर फलंदाज होते. वेस्ली हॉल, जॉन स्नो, चार्ली ग्रिफिथ यांच्यासमोर उभे राहून, अनेकदा उसळत्या चेंडूचा मारा सहन करत त्यांनी प्रतिहल्ले चढवलेले आहेत.

पण वाडेकरांचे विश्लेषण क्रिकेटच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. वाडेकर हे मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी ‘आयकॉन’ होते. शाळेत कधी क्रिकेट खेळले नाहीत. कारण चांगले शिकून कारकीर्द बनवण्याच्या मानसिकतेचा पगडा त्यांच्या घरावरही होता. एका परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून वाडेकरांच्या हातात पहिल्यांदा बॅट दिली गेली. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडण्यास सुरुवात झाल्यानंतरही बँकिंगसारखी सुरक्षित नोकरी त्यांनी पत्करली. मूल्यांवर विश्वास होता, त्यातून आत्मविश्वासाला बळ मिळाले. त्यामुळेच पूर्वीचे अनेक बडे बडे कर्णधार करू शकले नाहीत, अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली. महत्त्वाकांक्षेच्या राक्षसाने कधी त्यांच्यावर गारूड केले नाही. याच मूल्याधिष्ठित आणि अभिमानी मानसिकतेतून सुनील गावस्कर उदयाला आले. सचिन तेंडुलकर जन्माला आला. मुंबई क्रिकेटला ‘खडूस’ म्हणून हिणवणाऱ्यांना हे गुण कळलेच नाहीत. प्राप्त परिस्थितीत हे गुण यशस्वितेची शाश्वती देऊ शकत नाहीत, असे कॉर्पोरेटीकरणाची झिंग चढलेले विद्वान छातीठोकपणे सांगतात. वाडेकर यांनी कधी त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही. सुनील गावस्कर आघाडीवीर म्हणून फलंदाजीस जाताना ‘सी यू स्किपर’ या शब्दांत वाडेकरांचा निरोप घेत. ‘नॉट फॉर अ लाँग टाइम’ असे त्यावर वाडेकर बजावत. आपल्या हाताखालील खेळाडूंनी काय करावे, याचा हा खास वाडेकरी शैलीतला सल्ला. नेमका आणि अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक! नेमके हेच गुण गाण्यात असलेल्या हिराबाई बडोदेकरांनी जसा महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय महिलेला रंगमंच मिळवून दिला, तसे वाडेकरांनी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी तरुणांना अव्वल क्रिकेटचे मैदान मिळवून दिले. वाडेकरांचा हा वारसा नाकारता येणारा नाही.