चीनने त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांबाबत घेतलेले निर्णय आंतरराष्ट्रीय करार-मदारांची बूज न राखणारे असले, तरी निर्णय आणि अंमलबजावणी यांचा धडाका लक्षणीयच..

भारतीय मनास सार्वत्रिक आकर्षणाचे विषय किमान दोन. गंगा नदी आणि हिमालय. उत्तर आणि ईशान्य भारतातील पर्यटनात या दोहोंच्या वा त्यापैकी एकाच्या दर्शनाने मोहरून न जाणारा भारतीय विरळाच. पं. जवाहरलाल नेहरू, राम मनोहर लोहिया, इंदिरा गांधी ते अटलबिहारी वाजपेयी अशा अनेक नेत्यांनी गंगेविषयीचा आपला आदरभाव व्यक्त केलेला आहे. तेव्हा वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना गंगेविषयी प्रेम वाटणे नैसर्गिकच. वाराणसीत गंगादर्शनाने श्रद्धाळूंचे पारणे फिटते. पंतप्रधानांच्या उपस्थितीत वाराणसीत झालेला त्रिपुरी पौर्णिमेचा सोहळा असा होता. श्रद्धाळूंच्या मनात तो पाहून धर्मभावना जागृत झाली असेल तर अश्रद्धांना त्याच्या शीतल प्रकाशसौंदर्याने सुखावले असेल. आकाशात आपल्या पूर्णप्रभेने फुललेला कार्तिक पौर्णिमेचा चंद्र आणि गंगाकिनारी घाटावर आकाशातल्या चांदण्यांचा अंश अंगी बाणवू पाहणारे लक्षदिवे हे दृश्य मोठे नेत्रसुखद होते. त्याआधी पंतप्रधानांनी गंगेच्या पात्रातून सफर केली. ते पाहताना गंगेच्या विशाल पात्राचे झालेले दर्शन तिची भव्यता प्रदर्शित करत होते. परंतु वाराणसीत पंतप्रधानांच्या मुखातून गंगा आणि काशीगुणगान सुरू असताना पलीकडील चीनमधून आलेले वृत्त नद्यांबाबत देशाची धोरणे कशी असावीत हे शिकवणारे होते. गंगास्नानाने पापहरण होते असे आस्तिक मानतात. त्याची खातरजमा करण्याची सोय नाही. पण नदीच्या योग्य उपयोगाने सामरिक आणि धोरणात्मक आघाडी घेता येते हे चीनच्या कृतीतून दिसून येते. म्हणून तो देश काय करू पाहतो हे समजून घ्यायला हवे.

आपल्याकडे गंगारती सुरू असतानाच चीनच्या तिबेटमधील निर्णयाचा तपशील समोर आला. त्यानुसार आपला हा बलाढय़ शेजारी देश तिबेटच्या दक्षिणेला, भारताबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ यरलग झांग्बो नदीवर जगातील सर्वात मोठे ठरेल असे धरण बांधू पाहतो. अलीकडल्या काळात मध्यवर्ती चीनमधील ‘थ्री गॉर्जेस’ धरण हा जगात अचंबित चर्चेचा विषय होता. त्यावर आधारित तितकाच भव्य असा जलविद्युत प्रकल्प हादेखील डोळे विस्फारणारा आहे. तो खरे तर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. परंतु तिबेटमधील प्रस्तावित धरण आणि आगामी जलविद्युत प्रकल्प हा जगातील सध्याच्या सर्वात मोठय़ा अशा या प्रकल्पाच्या तिप्पट असेल. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना यावी. ‘‘इतका भव्य प्रकल्प जगाच्या पाठीवर नजीकच्या भविष्यात तरी अन्यत्र कोठेही होणार नाही,’’ अशा अर्थाचा दावा चीनच्या संबंधित वीज कंपनीने केला आहे. संपूर्ण आकारास आल्यावर या प्रकल्पातून तीस हजार कोटी किलोवॅट इतकी महाप्रचंड वीजनिर्मिती होईल, अशी माहिती त्या देशातील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हे सर्वार्थाने अभूतपूर्व असेल. तरीही वीजनिर्मिती हे या धरणाचे प्रमुख उद्दिष्ट नाही. देशाची सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध या धरणाच्या उभारणीमागे आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत. अशा भव्य प्रकल्पांबाबत चीनचा इतिहास ‘आधी केले मग सांगितले’ असा आहे. राक्षसी वाटावेत असे पूर्णत्वास गेलेले अनेक प्रकल्प चीनचा हा इतिहास अधोरेखित करतात. मग हे प्रकल्प अणुऊर्जेशी संबंधित असोत किंवा सौरऊर्जा, लष्करी साधनसामग्री निर्मिती, महामार्ग उभारणी वा शहरे वसवणे असो. चीन ते वेळेआधीच पूर्ण करतो. आताही या प्रकल्पासंदर्भात चीनने पूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून १६ ऑक्टोबरला या संदर्भातील कराराचे वगैरे उपचार पूर्ण झाले आहेत. तथापि या सगळ्याचा आपल्याकडील नद्यांशी काय संबंध असा प्रश्न अनेकांना हे वाचून पडेल.

तो असा की ही यरलग झांग्बो नदीनंतर चीनचा डोळा असलेल्या पण आपल्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशात सियांग नदी बनून येते आणि तेथून आसामचे माप ओलांडताना विख्यात ब्रह्मपुत्रा होते. आपल्या पूर्व प्रांतातील आर्थिक विकास आणि स्थैर्य यासाठी ही ब्रह्मपुत्रा फार मोलाची. पुढे ती बांगलादेशात शिरून त्या देशालाही सुजलाम करते. याचा सरळ अर्थ असा की आपल्यासाठी तसेच बांगलादेशासाठी जीवनदायिनी असणाऱ्या या नदीवर प्रस्तावित धरणामुळे चीनचे संपूर्ण नियंत्रण निर्माण होईल. हे धरण तिबेटच्या अशा प्रांतात उभारले जाणार आहे की तेथून भारत-चीन प्रत्यक्ष सीमारेषा फार दूर नसेल. सध्याच चीनने या प्रांतात यरलग झांग्बो नदीवर अनेक छोटे बंधारे बांधून या नदीचा प्रवाह नियंत्रित केलेला आहे. त्यात आता हे अवाढव्य धरण. त्यामुळे आपली ब्रह्मपुत्रा रोडावण्याची भीती आहे. वास्तविक ब्रह्मपुत्रा ही पाहून छातीत धडकी भरेल इतकी अक्राळविक्राळ नदी. आसामात तिला ब्रह्मपुत्र नद म्हणतात आणि अनेक ठिकाणी तिचा समोरचा तट सहजी दिसत नाही, इतके तिचे पात्र रुंद असते. पण चीनच्या या संभाव्य धरणाने या नदीची रया जाण्याचा धोका असून त्याचा या परिसराच्या सिंचनावरही परिणाम होईल, हे उघड आहे.

पण प्रश्न आणि समस्या एकटय़ा ब्रह्मपुत्रेपुरतेच नाहीत. हिच्या जोडीला चीनने दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असलेल्या सात बलाढय़ नद्यांना आपल्याच प्रांतात वेसण घातली आहे. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, इरावडी, सल्वीन, यांग्झी आणि मेकाँग या नद्यांवर चीनने आपला अधिकार प्रस्थापित केला आहे. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड आदी देशांसाठी या नद्या महत्त्वाच्या आहेत. याचा अर्थ आपल्या प्रांतात या नद्यांना आवर घालून चीनने एका प्रकारे इतक्या साऱ्या देशांचीच कोंडी केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या एका अहवालानुसार चीनने आपल्या प्रांतात लहानमोठी मिळून तब्बल ८७ हजार धरणे बांधली. एकटय़ा यांग्झी या आशियातील सर्वात मोठय़ा नदीवरच त्यातील १०० धरणे आहेत. मेकाँग ही या प्रदेशातील आणखी एक महत्त्वाची नदी.  जगातील सर्वात लांब नद्यांत गणल्या जाणाऱ्या या नदीवर चीनने ११ धरणे बांधून म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम यांची पुरती अडचण केली आहे. दक्षिण आशियातल्या या प्रांतातल्या साडेसहा कोटी जनतेसाठी ही नदी जीवनदायिनी मानली जाते. आता तिच्यावर चीनचे नियंत्रण असेल. चीन हे करू शकतो याचे कारण जवळपास १८ देशांना पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे उगम त्या देशात होतात, हे तर खरेच. पण या मार्गाने आपण अनेक देशांची कोंडी करू शकतो हे ध्यानात घेऊन चीनने आखलेली धोरणे. नद्यांच्या भौगोलिक वास्तवाविषयी कोणीच काही करू शकत नाही. पण हे वास्तव लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली धोरणे आखणे आणि त्यांची कालबद्ध अंमलबजावणी हे त्या देशाचे खरे वैशिष्टय़. या धोरणांच्या आड त्या देशप्रमुखांचे शेजारील देशांतील नेत्यांशी असलेले संबंध, दोस्तीच्या घेतल्या जाणाऱ्या आणाभाका, या देशांशी असलेले वा होणारे करार-मदार वगैरे काहीही येत नाहीत. तिबेटमधील आगामी धरण हा त्याचाच पुढचा भाग.

हिंदू संस्कृतीत स्नान करताना पुण्यप्राप्तीसाठी ‘गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन संनिधिम् कुरु॥’ असा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. हेतू हा की स्नानाचे पाणी कोठूनही आले असले तरी त्यातून गंगा वा या अन्य नद्यांच्या स्नानाचे पुण्य मिळावे. पण या नद्यांचे आपण काय करून टाकले आहे हे लक्षात घ्यावयाचे नसले तरी आशियातील निम्म्या नद्यांवर चीनने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे, या वास्तवाकडे दुर्लक्ष करणे अयोग्य. गंगारतीच्या नेत्रदीपक सोहळ्यानंतर तरी ते आपण लक्षात घ्यायला हवे.