भारतीय व्यवस्थेत क्रिकेट आणि राजकारण हे परस्परांपासून विलग करता येत नाहीत हे खरेच; पण समाधान आहे ते सौरव गांगुलीच्या निवडीचे..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय या जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड बिनविरोध झाली ही बाब खचितच आनंददायक. ही निवड बिनविरोध असली, तरी ती बरीचशी अनपेक्षित आणि धक्कादायक होती. देशभरातील असंख्य क्रिकेट चाहत्यांना सौरवच बीसीसीआयचा अध्यक्ष व्हावा असे वाटत असले, तरी या मंडळातील जुन्या धनदांडग्यांच्या कंपूतील सर्वानाच तसे वाटत नव्हते! म्हणजे सौरव हा अगदी शनिवारी रात्रीपर्यंत या धनदांडग्यांच्या खिजगणतीतही नव्हता. या पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत कोणीच निर्णायकरीत्या जिंकले नाहीत. त्यामुळे सौरवच्या नावावर अखेरीस तडजोड करावी लागली. यातील विरोधाभास म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने न्या. आर. एम. लोढा समितीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटच्या ‘साफसफाई’चे काम ज्या जुनाट धेंडांच्या कारभाराला विटून हाती घेतले, ती मंडळीच बीसीसीआयचा तीन वर्षांतील पहिला अध्यक्ष ठरवती झाली! हा एका अर्थी लोढा समिती सुधारणांचा सर्वार्थाने पराभवच. त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटवेडय़ांचे नशीब बलवत्तर म्हणून सौरवची तरी या पदावर नियुक्ती झाली. नपेक्षा ही मंडळी आपल्यातील कोणाकडे या मंडळांचा ताबा देती. जे झाले त्यातून खरोखरच भारतीय क्रिकेटमध्ये प्रशासकीय सुधारणा झाल्या का, दुहेरी हितसंबंधांची पदे न स्वीकारण्याबाबत जागरूकता झाली का, नात्यागोत्यातील मंडळींचीच वर्णी लावण्याची प्रवृत्ती ओसरली का आणि राजकीय वरदहस्ताच्या नावाखाली राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला का, या सगळ्या प्रश्नांचे एकाच खणखणीत शब्दात उत्तर द्यायचे झाल्यास ‘नाही!’ असेच म्हणावे लागेल.

ते का हे स्पष्ट करण्याआधी सुरुवातीला काही सकारात्मक गोष्टींची दखल घेणे यथोचित ठरेल. एक कर्णधार आणि क्रिकेटपटू म्हणून सौरवचे भारतीय क्रिकेटमधील स्थान वादातीत आहे. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेटमध्ये अनेक चांगले खेळाडू होते. पण नेतृत्व नव्हते. सामनेनिश्चितीच्या वादळातून भारतीय क्रिकेट नुकतेच कुठे बाहेर येऊ लागले होते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंदर सेहवाग, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ या सगळ्यांबरोबर खेळताना, त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेणे ही मोठी जबाबदारी होती. सौरवने ती यथास्थित पार पाडली. त्या वेळी संघात सौरवपेक्षा चांगले फलंदाज होते. त्याच्यापेक्षा चपळ क्षेत्ररक्षक होते. त्याच्यापेक्षा उत्तम गोलंदाजही होते. पण सौरवने त्यांना नेतृत्व पुरवले. दिशा दिली. संघ म्हणून एक ओळख दिली. सौरवचे पूर्वसुरी होते मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर. पैकी पहिल्याची कारकीर्द सामनेनिश्चितीच्या आरोपांनी डागाळली. तर सचिनवर फलंदाज म्हणून असलेली प्रचंड जबाबदारी, त्याच्या नेतृत्वामध्ये अडसर ठरू लागली होती. सौरव कर्णधार झाल्यानंतर या दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या त्या काळी पेरल्या गेल्याच. पण दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाची परिपक्वता दाखवून संघहितालाच प्रथम आणि एकमेव प्राधान्य दिले. परिणामी भारतीय संघ देशातच नव्हे, तर परदेशी मदानांवरही अधिक सातत्याने जिंकू लागला. इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील कसोटी विजय, पाकिस्तानातील अभूतपूर्व मालिका विजय हे सौरवच्याच नेतृत्वाखाली साकारले गेले. हे सगळे घडत असताना काही वेळा मदानामध्येच इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी, कर्णधारांशी डोळ्यात डोळे घालून वाद घालण्याचा खमकेपणाही सौरवने दाखवला. त्या काळाचे वर्णन विख्यात समालोचक हर्ष भोगले यांनी परवा ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात भारतीय क्रिकेटचे सुवर्णयुग असे केले. कारण सर्वच क्रिकेटपटूंनी मदानावर आणि मदानाबाहेर उच्च अभिरुचीचे दर्शन नेहमी घडवले. त्या संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता सौरव पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या केंद्रस्थानी नवीन जबाबदारी घेऊन आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद माजी कसोटीवीराला मिळाल्याची उदाहरणे इतिहासात फार नाहीत. अंगभूत विनातडजोड खमकेपणाचा आणि रत्नपारखी वृत्तीचा वापर करण्याची संधी सौरवला कितपत मिळू शकेल हे आताच सांगणे अवघड आहे. न्या. लोढा समितीच्या नियमावलीनुसार, एखाद्या संघटनेत सलग सहा वर्षे व्यतीत केल्यास अशी व्यक्ती किमान तीन वर्षे बीसीसीआयची पदाधिकारी राहू शकत नाही. त्यामुळे पुढील दहा महिने सौरवने त्याच्या स्वभावानुरूप काम केल्यास बीसीसीआयमधील प्रस्थापितांसाठी तो अडचणीचा ठरू शकतो. अर्थात याच्या उलटही होऊ शकते! ते का, हे सौरवच्या सहकारी पदाधिकाऱ्यांवर नजर टाकल्यास लक्षात येऊ शकते.

सौरवच्या बरोबरीने आयपीएल प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू ब्रिजेश पटेल यांची निवड बिनविरोधच झाली. त्यांना क्रिकेट प्रशिक्षण आणि प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल फार वाद होण्याचे कारण नाही. पण.. जय शहा? हे गुजरात क्रिकेट संघटनेचे सहसचिव. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव ही यांची अधिक निर्णायक ओळख. ते आता बीसीसीआयच्या सचिवपदावर राहतील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना अर्थ मंत्रालयाइतकाच रस बीसीसीआयमध्येही असावा. दुहेरी हितसंबंधांच्या नियमामुळे ते सध्या बीसीसीआयमध्ये शिरू शकत नाहीत. पण तरीही खजिनदार पदावर त्यांनी आपले विश्वासू अरुणकुमार धुमल यांना नेमले आहेच. कागदोपत्री बीसीसीआयच्या निवडणुका २३ ऑक्टोबर रोजी असल्या, तरी प्रत्येक पदासाठी एकच उमेदवार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब ही औपचारिकताच राहिली आहे. गमतीचा भाग म्हणजे, न्या. लोढा समितीच्या शिफारशींनी भारतीय क्रिकेटमधील अघोषित घराणेशाहीला कोणतीच आडकाठी केलेली नाही. त्यामुळेच निरंजन शहा यांचे चिरंजीव, अमित शहा यांचे चिरंजीव, एन. श्रीनिवासन यांच्या कन्या, जगमोहन दालमिया यांचे चिरंजीव, अनुराग ठाकूर यांचे बंधू आज वेगवेगळ्या राज्य क्रिकेट संघटनांचा कारभार सांभाळतच आहेत. त्यातल्या त्यात जरा समाधानाची बाब म्हणजे, भारतीय क्रिकेटचा कारभार येथून पुढे एका सर्वोच्च मंडळ किंवा अ‍ॅपेक्स कौन्सिलमार्फत चालवला जाणार असून, यात बीसीसीआयप्रमाणेच पुरुष व महिला क्रिकेटपटूंना आणि किमान एका सनदी लेखापालालाही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

मात्र परवाच्या नाटय़ातून एक गंभीर बाब समोर आली. ती म्हणजे, विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि सत्तारूढ भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यात पडद्यामागील सूत्रधार होते. कारण श्रीनिवासन आणि सौरव गांगुली (त्याला अनुराग ठाकूर गटाचा पािठबा होता) या दोघांनीही गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस अमित शहा यांची भेट घेतली होती. भारतीय व्यवस्थेत क्रिकेट आणि राजकारण हे परस्परांपासून विलग करता येत नाहीत हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले. दुहेरी हितसंबंधांच्या प्रवृत्तीला आळा घालणे, क्रिकेटपटूंना क्रिकेट प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व देणे या मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाच्या उपायांना यश आले असे म्हणावे, तर या खेळातील राजकारणी आणि धनदांडग्यांच्या हस्तक्षेपाला आणि घुसखोरीला रोखण्यात सर्वोच्च न्यायालय सपशेल अपयशी ठरले, असेच दिसते. हे सगळे होत असताना मदानावर भारतीय संघाची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे आणि आता काही काळासाठी का होईना, सौरवसारखा बीसीसीआयप्रमुख लाभला आहे, या समाधानाच्या बाबी आहेत. परंतु गेली तीन वर्षे क्रिकेट कारभाराची सूत्रे लोढा समिती किंवा प्रशासकीय समितीकडे राहूनही मूलभूत सुधारणा घडून येऊ शकलेल्या नाहीत हे वास्तव आहे. सौरव गांगुलीने या कळीच्या मुद्दय़ाला हात घातला आणि काही तरी सकारात्मक घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर तमाम क्रिकेटप्रेमी त्याला दुवाच देतील! हे होण्याची आशा बाळगताना क्रिकेट मंडळात एक सौरव आला असला तरी उर्वरित अन्य रौरवच आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.