नौदल प्रमुखपद आणि तो अधिकार व्हाइस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांना नसेल मिळाला..पण समुद्रावर प्रेम करण्याचा त्यांचा अधिकार अबाधित होता..

यवतमाळजवळ अवनी नावाच्या मूर्तिमंत लावण्य असलेल्या वाघिणीस माणूसपणाचा राग यावा अशा पद्धतीने ठार केले जात असताना तिकडे साताऱ्याजवळ विंचुर्णीत मनोहर आवटी या वाघासारख्या पुरुषाने प्राण सोडला यात एक विचित्र आणि दुर्दैवी योगायोग आहे. निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य आवटी यांनी वाघ आणि सिंहाच्या संरक्षणार्थ घालवले. हे दोन प्राणी आवटी यांच्या विशेष प्रेमाचे. ते वाचवणे हे आवटी यांचे ध्येय होते. त्यांच्या संवर्धनासंदर्भात त्यांनी काही महत्त्वाची पुस्तकेदेखील लिहिली. आवटी यांना वाघ-सिंहाचे असलेले प्रेम तसे नैसर्गिकच म्हणायचे. स्वयमेव मृगेंद्रता हे या दोन राजिबडय़ा प्राण्यांचे वैशिष्टय़. म्हणजे आपली शिकार आपणच करणे आणि इतरांच्या उष्टय़ाखरकटय़ास तोंड न लावणे. या गुणामुळे खरे तर मानवाने कायमच वाघ/सिंहांचा दुस्वास केला. आपणास आव्हान देऊ शकेल अशा कोणत्याही सजीवाविषयी माणसाला एकूणच नफरत. कोणाच्याही- आणि विशेषत: आपल्या- मदतीशिवाय कोणी जगूच कसे शकतो, हे त्यास सहन होत नाही. माणसे आक्रमण करणार या प्राण्यांच्या जगण्यावर आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून या प्राण्यांनी हल्ला केला माणसांवर की त्यास नरभक्षक म्हणणार आणि स्वत: सर्व सुरक्षित राहून त्यास नामर्दपणे गोळ्या घालणार. आवटी यांनी असे कधी केले नाही. शत्रुराष्ट्राने पेरलेल्या अनेक जिवंत पाणसुरुंगांत त्यांनी आपली नौका अनेकदा लोटली आणि जिवावर उदार होत युद्धाचा खेळ ते खेळले. सर्व संरक्षित शिकाऱ्यांत म्हणूनच त्यांची गणना कधी झाली नाही. या प्राणिसंवर्धन मोहिमेत आवटी हे त्यांच्यासारख्याच एका मनस्वीचे साथीदार होते हे अनेकांना ठावकी नसेल. आवटी यांना हिंस्र वाघसिंहाचा लळा तर ही असामी आकाशात विहरणाऱ्या पक्ष्यांच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणारी. डॉ. सलीम अली हे त्यांचे नाव. समुद्राच्या फेसाशी स्पर्धा करणारी पांढरी दाढी हा या दोहोंतील आणखी एक समान धागा. ‘पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी’, असे ग्रेसच्या शब्दांतून डॉ. सलीम अली विचारीत तर वाघसिंहांच्या आयुष्यावर उठणारी भ्याड माणसे पाहून आवटी अस्वस्थ होत. स्वत:स शिकारी म्हणवणाऱ्यांच्या भित्र्या समाजात राहण्यापेक्षा प्रस्थान ठेवलेलेच बरे असे आवटी यांनाही वाटले असल्यास नवल ते काय!

या माणसाने आयुष्यभर दर्यावर प्रेम केले. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, असे विंदा करंदीकरांनी सांगण्याआधीच मनोहर आवटी यांनी अथांग सागराचे ते पिसाळलेपण अंगी बाणवले. खरे तर दुष्काळी फलटण तालुक्यातल्या विंचुर्णीच्या या मनोहरास सागराने का खुणावावे? किनाऱ्यांच्या कडेकडेने वावरणाऱ्या प्रांतातील ते नव्हेत. तरीही ते समुद्राच्या प्रेमात पडले. या अशा योगायोगांना काहीही उत्तर नसते आणि हे असे योगायोगच अनपेक्षितता वाढवीत असतात. आवटी नौदलात दाखल झाले ते दुसरे महायुद्ध संपता संपता. भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते आणि नौदलास रॉयल इंडियन नेव्ही अशा नावाने संबोधले जात असे त्या काळी- ४५ साली- आवटींची या सेवेसाठी निवड झाली. लंडनजवळच्या ग्रीनीच येथील शाही नौदल प्रशिक्षण केंद्रातून ते तयार झाले आणि नंतर ब्रिटिशांच्या नौदलातही त्यांना काम करता आले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असा एक लोभस ब्रिटिशनेस कायम होता. त्याचे मूळ त्यांच्या या साहेबाघरी झालेल्या तालमीत असावे. ते उंचीने फार नव्हते; पण तरीही व्यक्तिमत्त्व असे की समोरच्यास जरब वाटावी. कोरीव दाढी, उत्तरायुष्यात पांढरी झाल्यावर तर ती अधिकच आकर्षक भासू लागली, करकरीत नजर, बोलण्यात एक साहेबी सालस सज्जनता आणि कोणताही मर्यादाभंग न करणारे शरीर यामुळे आवटींचे व्यक्तिमत्त्व कमालीचे भारदस्त दिसे. मुळात नौदलाच्या बांधेसूद गणवेशाचे म्हणून एक आकर्षण असते. साधा नौसैनिकदेखील त्यामुळे डौलदार दिसतो. त्यात आवटी हे तर आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेले आणि परत मानवी मिजाशीची परिसीमा असलेल्या ब्रिटिश शाही नौदलात प्रशिक्षित. त्यामुळे ते कमालीचे आकर्षक दिसत. आवटी भारतात आले ते ५० साली. सिग्नल कम्युनिकेशन्स ही त्यांची खासियत. आपल्यासारख्या प्राधान्याने जमिनीवर वावरणाऱ्यांना त्याचे महत्त्व तितके लक्षात येणार नाही. परंतु चारी बाजूंनी क्षितिजापर्यंत समुद्रच दिसत असताना दिशेची जाणीव नाहीशी होते आणि त्या वेळी अन्य दळणवळण साधने महत्त्वाची ठरतात. आवटी त्यात निष्णात होते. त्याचमुळे अनेक भारतीय युद्धनौकांची कमान त्यांनी कौशल्याने सांभाळली.

त्यांच्या ऐतिहासिक शौर्याची नोंद झाली ती १९७१ च्या बांगलादेश मुक्तियुद्धात. त्या वेळी आयएनएस कोमार्ता या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर या नात्याने ते ऐन युद्धात नौदलाच्या पूर्व विभागातर्फे लढत होते. त्या वेळी अनेक पाणसुरुंगांनी भरलेल्या शत्रुराष्ट्राच्या सागरी हद्दीत त्यांनी नौकानयनाचे जे कौशल्य दाखवले ते ऐतिहासिक मानले जाते. त्या वेळी तशाही वातावरणात त्यांनी ढाक्यापर्यंत मुसंडी मारली आणि शत्रुराष्ट्राचे नुकसान केले. त्या तप्त युद्धवातावरणातही त्यांनी पाकिस्तानी जहाजे जेरबंद केली. हे त्यांचे युद्धनेतृत्व कायमच कौतुकाचा विषय राहिलेले आहे. त्यामुळेही असेल पण पुढे त्यांना नौदलाच्या पश्चिमी शाखेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. वेस्टर्न नेव्हल कमांडचे नेतृत्व करणे ही अत्यंत प्रतिष्ठित बाब. याचे कारण भारतीय नौदलात ही तुकडी तिच्या आक्रमक लढाऊ कौशल्यासाठी ओळखली जाते. नौदलात ती स्वोर्ड आर्म या नावाने ओळखली जाते. म्हणजे खड्गहस्त. नौदलाची तलवार. ती बराच काळ आवटी यांच्या हाती होती. त्यानंतर खरे तर ते नौदलप्रमुखच व्हायचे. तशी वदंताही होती त्या काळी. पण तसे झाले नाही. आवटी नौदलप्रमुख होणार होणार असे घाटत असतानाच ऐन वेळी चक्रे फिरली आाणि त्या पदाने त्यांना हुलकावणी दिली.

पण तो कडवटपणा आवटी यांच्यात कधीही दिसला नाही. पद मिळाले नाही म्हणून सर्व व्यवस्थेच्या नावानेच बोटे मोडत कण्हणाऱ्यांपैकी ते कधीच नव्हते. नौदल प्रमुखपद आणि तो अधिकार त्यांना नसेल मिळाला. पण समुद्रावर प्रेम करण्याचा त्यांचा अधिकार अबाधित होता. तो त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. भारतीय बनावटीच्या होडीतून भारतीयाने विश्वप्रदक्षिणेचा विक्रम नोंदवायला हवा, ही त्यांचीच कल्पना. त्यासाठी नौकाबांधणीस योग्य ती साधनसामग्री शोधण्यापासून ती नौका तयार करण्यापर्यंत सारे काही आवटी यांनी केले. हा विश्वविक्रम भले दिलीप दोंदे यांच्या नावावर नोंदला गेला असेल. पण त्याची प्रेरणा ही आवटी यांची. अगदी अलीकडे त्याहूनही धाडसी पद्धतीने या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाजवळ समुद्रात अडकलेल्या अभिलाष टॉमी याची प्रेरणाही आवटी हेच होते.

ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जादू असावी. मोराच्या सहवासात आलेल्या प्रत्येकालाच जसा त्याच्या मयूरत्वाचा स्पर्श होतो, तसे आवटी यांच्या सहवासात होत असे. ते सर्वार्थाने नौदलाच्या दराऱ्याचे प्रतीक होते. वास्तविक जयंत नाडकर्णी ही दुसरी मराठी व्यक्ती अ‍ॅडमिरल या नौदलप्रमुख पदापर्यंत पोहोचली. ते पद आवटी यांना मिळाले नाही. पण आवटी यांच्या तुलनेत नाडकर्णी हे साधे भासत. नाडकर्णी हे जागतिक दर्जाचे नॅव्हिगेटर. मोठा माणूस. पण नौदलाच्या दृश्य प्रतीकपदाचा मान मात्र आवटी यांनाच मिळाला.

महाराष्ट्रास एक शाप आहे. येथेच राहणाऱ्यांचा मोठेपणा समजून न घेण्याचा. तो अ‍ॅडमिरल नाडकर्णी, व्हाइस अ‍ॅडमिरल आवटी यांनाही भोवला. या मराठमोळ्या सरदारास ‘लोकसत्ता’ परिवाराचा मानाचा मुजरा.