07 December 2019

News Flash

हा चंद्र ना स्वयंभू..

चंद्रावर उतरलेले अमेरिकी अंतराळवीर १९ देशांतील शहरांना भेटी देऊन १९६९ च्या ऑक्टोबरात मुंबईतही आले

पन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, तेव्हा आधुनिकतेचा विजय तो हाच, असे मानले जाऊ लागले..

दुष्प्राप्य असे काही आपल्या आवाक्यात आले, की जगच पालटून गेल्यासारखे वाटते. तसे पन्नास वर्षांपूर्वी, २० जुलै १९६९ या दिवशी घडले. ‘नासा’ या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘अपोलो ११’ मोहिमेला त्या दिवशी यश मिळाले आणि माणूस चंद्रावर उतरला. त्याआधी आठ वेळा चंद्रावर मानव उतरविण्याचे अयशस्वी प्रयत्न ‘नासा’ने केले होते, पण जुलै १९६९ मधील मोहीम फत्ते झाली. जगभर ही बातमी पसरल्यानंतर काही वर्षांत आपल्याकडील एखाद्या मराठी चित्रपटातून ‘आबाऽ, माणूस चंद्रावर गेलाय आता..’ यासारखे वाक्य ऐकू येऊ लागले. ‘अंतराळवीर’ हा १९६१ साली पहिल्यांदा वापरला गेलेला शब्द मराठी भाषेत स्थिरावला. ‘चंद्रावर स्वारी’ किंवा ‘चांद्रविजय’ यासारखे शब्दही मराठीत कित्येकदा वापरले गेले आणि आपल्या भाषेचा लढाऊ बाणा आधुनिक काळात जणू वैज्ञानिक प्रगतीचे पोवाडे गाऊ लागला. आधुनिकतेचा विजय तो हाच, असे मानले जाऊ लागले. विज्ञान एकटे असत नाही. त्याभोवती समाज असतो. कधीकाळी गॅलिलिओने ग्रहताऱ्यांकडे पाहण्यासाठी दुर्बीण बनवली आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे सांगितले म्हणून त्याला धर्मद्रोही ठरवणाराही समाज, आणि गॅलिलिओच्या जन्मानंतर ४०५ वर्षांनी केवळ अमेरिकेत नव्हे, मुंबईच्या रस्त्यांवरही ‘अंतराळवीरां’चे स्वागत करणाराही समाजच. चंद्र हा जगभरच्या समाजाला बांधणारा दुवा. त्यावरील पहिले मानवी पाऊल हे जगभरच्या समाजाला आनंदाचे भरते यावे असेच ठरले.

याला तत्कालीन सोव्हिएत रशियाचा आणि त्या साम्यवादी राजवटीच्या पंखाखालील तत्कालीन डाव्या देशांचा अपवाद असेलही. अखेर अमेरिकेने कैक अब्ज डॉलरचा खर्च पहिल्या आठ मोहिमांपायी केला, तो १९६१ साली सोव्हिएत संघराज्याने युरी गागारिन हा पहिला ‘अंतराळवीर’ पृथ्वीवर सुखरूप परत आणल्यानंतरच. या दोन तत्कालीन महासत्तांमध्ये स्पर्धा इतकी की, आपली ती प्रगती आणि दुसऱ्याचा तो आटापिटा, असे त्या वेळी एकमेकांस वाटत असे. स्पर्धेतून नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तसेच चंद्राबाबत घडले. ‘नासा’ने पहिल्या मानवी पावलानंतरच्या ४१ महिन्यांत एकदा नव्हे, पाचदा चांद्रमोहिमा काढल्या आणि १९७२ सालच्या डिसेंबपर्यंत डझनभर अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर उतरवले. त्यानंतर मात्र अमेरिकेने चंद्रावरील मनुष्यस्वाऱ्या एकतर्फीच थांबविल्या.  त्यानंतर दोन वर्षांनी, जून १९७४ मध्ये सोव्हिएत रशियानेही चंद्रावर माणूस पाठविण्याचा नाद सोडून दिला. शीतयुद्ध काळातील या दोन महासत्तांच्या स्पर्धेपायीच अवघ्या ११ ते १२ वर्षांत किमान १०० अब्ज डॉलर ‘अपोलो’ याने १३ वेळा पाठविण्यावर खर्च झाले, असा यापैकी एक अंदाज आहे. महासत्तांची ही अंतराळ स्पर्धा कशी वाढली आणि तिला कोणती वळणे मिळाली, याचा शोध पुढल्या काळात अनेक जिज्ञासूंनी घेतला. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनीही विज्ञानाचा वापर अमेरिकेने जागतिक सत्ताकांक्षेपायीच कसा केला, हे उघड केले. चंद्रावरही डाग असतात, हे रूपकच या अभ्यासांतून जणू सिद्ध झाले. याचे कारण त्या अभ्यासांचा सूर असा की अमेरिका जेव्हा व्हिएतनाममध्ये फौजा घुसवत होती, दक्षिण अमेरिकी देशांमध्ये राजकीय उत्पात घडवीत होती, त्याच काळात चांद्रमोहिमांचा जोर अधिक होता. रिचर्ड निक्सनसारख्या अहंमन्य राष्ट्राध्यक्षांनी चांद्रमोहिमेचा पुरेपूर राजकीय वापर करून घेतला. चंद्रावर उतरलेले अमेरिकी अंतराळवीर १९ देशांतील शहरांना भेटी देऊन १९६९ च्या ऑक्टोबरात मुंबईतही आले, त्यामागे अमेरिकेचा प्रचारकी हेतूच होता. हेच रशियानेही त्याआधी, युरी गागारिन या अंतराळवीराची तत्कालीन भारतीय पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट घडवण्यातून साधले होते.

भारतीयांनी तेव्हा रशियनांचे आणि नंतर अमेरिकनांचे स्वागत केले, ते आधुनिकता आणि विज्ञान यांचा विजय झाला म्हणून! हेच थोडय़ाफार फरकाने, त्या वेळी जगातील अन्य देशांतही झाले. पण यापैकी कैक देशांमध्ये तोवर अंतराळ संशोधन सुरू झालेले नव्हते. भारतात मात्र, चंद्रावरील पहिल्या पावलाचा उत्सव जगाने साजरा केल्यानंतर एका महिन्याच्या आत, १९६९ सालच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’ची स्थापना झाली होती आणि त्याहीआधी, २० नोव्हेंबर १९६७ रोजीच भारतीय अंतराळ-शास्त्रज्ञांनी थुंबा येथील तळावरून पूर्णत: भारतीय बनावटीचे ‘आरएच-७५’ हे रॉकेट अंतराळात सोडले होते. भारतीयांचा तेव्हाचा उत्साह पोकळ किंवा अनाठायी नव्हता. त्याला भारतीय भूमीवर भारतीयांनी दाखविलेल्या हुशारीचे आणि कष्टांचे वलय होते. जगात आपण मागे राहू नये, एवढेच या दोन्ही महासत्तांपासून सारखेच अंतर ठेवू पाहणाऱ्या- ‘अलिप्ततावादी’- भारतीय भूमिकेचे सार होते. त्याच अलिप्ततावादातून १९७२ पासून संयुक्त राष्ट्रांमध्ये एका मागणीला जोर आला. ‘चंद्र अथवा अन्य कोणतेही ग्रहतारे हे सर्व पृथ्वीवासी मानवांचा ठेवा आहेत. त्या ठेव्याचा व्यापारी अथवा लष्करी हेतूने कुणीही वापर करू नये’ अशा अर्थाचा ‘चंद्र करार’ याच मागणीतून १९७९ साली आकारास आला. त्या कराराला ना अमेरिकेने धूप घातली, ना सोव्हिएत रशियाने. फ्रान्सचा अपवाद वगळता, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य कुणाही कायम सदस्य देशाने या करारावर स्वाक्षरी केलीच नाही. उदात्त आशयाचा हा करार पार गळपटलेल्या अवस्थेत आज आहे.

चंद्रावर माणूस पाठवण्याची स्पर्धा मात्र आता पुन्हा जोर धरणार, अशी चिन्हे आहेत. चीनने पुढल्या वर्षभरात मानवी अंतराळयानाचा कार्यक्रम सुरू करणार आणि सन २०३५ पर्यंत चंद्रावर माणूस पाठविणार, असे जाहीर केले आहे. अमेरिकादेखील पुन्हा चंद्रावर पाऊलखुणा उमटवू इच्छिते. अमेरिकेच्या पुढल्या मोहिमेचे नाव ‘अपोलो’शी मिळतेजुळते- त्या ग्रीक देवाची बहीण ‘आर्टेमिस’ हिचे असणार, हेही ठरले आहे आणि २०२८ पर्यंत पुन्हा चंद्रावर अमेरिकी पाऊल ठेवण्याची आकांक्षा, हे उघड गुपित असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी, अमेरिकी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी आम्ही २०२४ पर्यंत पुन्हा चंद्रावर जाऊ, असे जाहीरही केले आहे. अमेरिकेचे त्यापुढील काळातील इरादे निराळेच असतील, जमल्यास युरोपीय संघातील देशांसह चंद्रावरच संशोधन-स्थानक उभारण्याचे प्रयत्न होतील, अशा अटकळी चंद्रावरील पहिल्या पावलाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना बांधल्या जात आहेत . त्यास रॉबर्ट झुब्रिन यांच्यासारखे अंतराळ अभियंते दुजोराही देत आहेत.

भारताचे मानवरहित ‘चांद्रयान-२’ चंद्रावर उतरू पाहते आहे, ते या पुन्हा सुरू झालेल्या स्पर्धेच्या आधी. वैज्ञानिकांना कोणत्याही सत्तास्पर्धेत न उतरवता काम करू देणे, देशासाठी अंतराळशास्त्रीय प्रगतीचा वापर करायचा तर तो आधी उपग्रहांसाठी करणे, हा भारतीय अंतराळ कार्यक्रमाने आजवर धरलेला सन्मार्ग आहे. तो सोडून आपणही स्पर्धेतच उतरावे, असे प्रसंग यापुढील दोन दशकांत अन्य देशांच्या उचापतींमुळे येणारच आहेत. अशा वेळी आपली वैज्ञानिक, अंतराळशास्त्रीय प्रगती ही निकोपच असेल, तिला स्पर्धेचा रोग झालेला नसेल, हे पाहणे ही आपल्या अंतराळ क्षेत्रातील धोरणांची यापुढल्या काळातील कसोटी ठरेल.

‘हा चंद्र ना स्वयंभू’ ही  सुधीर मोघे यांची कविकल्पना विज्ञानाधारित खरीच, पण त्यापुढील ओळींमध्ये असलेला  ‘अभिशाप’ हा ग्रहणातल्या सावल्यांपुरताच राहावा. अब्जावधींचा चुराडा करणाऱ्या स्पर्धेचा अभिशाप चंद्राला पुन्हा भोगावा लागू नये, अशी अपेक्षा करणे रास्त.

First Published on July 20, 2019 2:36 am

Web Title: loksatta editorial on 50th anniversary of the moon landing zws 70
Just Now!
X