मृणाल सेन यांनी जे बनवले, दिले ते कालातीत होते, हेच आजच्या काळातही दिसून येते!

मनोरंजनाचा, सरकारी अनुदानाचा लसावि काढून लोकप्रियतेच्या हिशेबाने चित्रपट बेतणे आणि लोकप्रियतेची फिकीर न करता इष्ट तेच मांडेन अशा दुर्दम्य निर्धाराने कलाकृती सादर करणे यात सरकारधार्जिणे तृतीयपर्णी आणि व्रतस्थ समाजसुधारक यांच्यात असतो तितकाच फरक आहे. तो बाजारातील कुमार वा खान आणि सत्यजित रे, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन यांच्यात होता. यातील सेन यांच्या निधनाने भारतीय चित्रपटविश्वात समांतर नवचित्रपटास पहिल्यांदा ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे एक युग संपले. सत्यजित रे आणि ऋत्विक घटक या इतर दोन दिग्दर्शकांच्या त्रिमूर्तीमध्ये मृणाल सेन अखेरचे. रे आणि घटक गेल्या शतकात अंतर्धान पावले. या तिघांची ओळख किंवा प्रतिभा बंगाली सिनेमापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांच्या चित्रपटाचा आवाका आणि संवेदना वैश्विक होत्या. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात इतर कोणत्याही भारतीय दिग्दर्शकापेक्षा या तिघांचे चित्रपट भारताबाहेर अधिक पाहिले आणि आस्वादले गेले. त्या काळात जगभरातील चित्रपट महोत्सव समुदायात अभिजात भारतीय म्हणजे बंगाली चित्रपट असा जो समज निर्माण झाला होता, तो पूर्णत: अनाठायी नव्हता. मृणाल सेन यांना रे आणि घटक यांच्या जरा नंतर प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळाली, पण मार्क्‍सवादी विचारसरणीचा प्रभाव आणि तिरसट बंगाली स्वभाव यामुळे पसा जुळवण्याची फिकीर त्यांनी कधीही केली नाही. त्यांचे जवळपास सर्व चित्रपट तिकीटबारीवर फ्लॉप ठरले. आयुष्याच्या अखेपर्यंत ते ठरवून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगले. सामान्यांचे जगणे चित्रपटातून सांगता आले पाहिजे, असे ते मानत. चित्रपटाचे तेच काम आणि तीच भाषा या तत्त्वाशी ते आजीवन एकनिष्ठ राहिले.

जाड भिंगांचा काळ्या फ्रेमचा चष्मा, बोटांमध्ये किंवा ओठांमध्ये अडकलेली सिगारेट आणि पांढरा सदरा-लेंगा ही त्यांची चलचित्रांतून किंवा स्थिरचित्रांतून दुनियेसमोर आलेली छबी. त्या छबीत चित्रपट बनवण्याची उत्कटता होती, प्रस्थापित सिनेसंकल्पनांना केराच्या टोपलीत भिरकावून देणारी तुच्छता होती आणि हे करण्यासाठी आवश्यक असा प्रचंड आत्मविश्वास, आत्मसन्मान होता. ‘माझा चित्रपट मी असाच बनवणार, तो किती लोकांना आवडतो, नावडतो वा समजतो हा मुद्दाच नाही. मला दिसणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या माणसांची, त्यांच्या रोजच्या जगण्याची ही कथा आहे. आवडली तर स्वीकारा नाही तर नाकारा’ असे त्यांनी मागे दिल्लीत एका चित्रपट महोत्सवात सांगितले होते. तिकीटबारीवर ‘चालणे’ किंवा ‘हिट’ होणे याविषयी मृणाल सेन यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी फारशी फिकीर केली नाही, हे आपले भाग्यच. चित्रपट हा दोन घटका मनोरंजनासाठी असतो. त्यास गांभीर्याने घ्यायचे नाही हा विचार आपल्याकडे पूर्वीपासून वारंवार ऐकवला जातो. परंतु चांगला चित्रपट हा संस्कृती आणि समाज या दोहोंचे प्रतिबिंब असते. त्यातून राजकीय आणि सामाजिक संदेश पोहोचवता आल्यास गैर नाही. दिग्दर्शकाचे विचार आणि विचारसरणी सिनेमात प्रकट झाली पाहिजे. समाज-संस्कृतीवर भाष्य करता येत नसेल, तर अशी अभिव्यक्ती काय कामाची? असे हे भाष्य करताना ते चार लोकांना आवडते, की चार हजार लोकांना आवडते यावर त्याची निर्मिती का आणि कशासाठी अवलंबून असावी? चित्रकार, शिल्पकार, कवी किंवा लेखक त्याला मिळालेल्या कॅनव्हासवर व्यक्त होतो, तसाच चित्रपटकार त्याला मिळालेल्या अवकाशात किंवा पडद्यावर ‘व्यक्त’ झाला पाहिजे. यासाठी विषय, कथानक लोकप्रिय किंवा लोकानुनयी असण्याची आवश्यकता किंवा तशी चर्चाही फिजूल ठरते. या विचारसरणीतूनच फ्रेंच नवसिनेमा, इटालियन नव अभिजात सिनेमा जन्माला आले. मृणाल सेन यांच्यावर सत्यजित रे यांच्याप्रमाणेच त्या काळातील काही उत्कट जागतिक चित्रप्रवाहांचा प्रभाव होता. जवळपास असाच प्रभाव त्या काळातील अनेक हंगेरियन, पोलिश दिग्दर्शकांवरही होता. त्या देशांमध्ये किंवा नंतर बंगालमध्ये साम्यवादी सरकारे होती. यातून मृणाल सेनसारख्या दिग्दर्शकांना विषयही मिळत गेले. साम्यवादोत्तर किंवा साम्यवादेतर राजकीय व्यवस्थांनी चित्रपट उद्योगाला सरकारी पाठबळ देण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. म्हणूनच धंद्याचे गणित सांभाळत जनमानसाच्या पसंतीचा मसावि काढण्याचा खटाटोप आणि अभिनिवेश दाखवत तथाकथित मुख्य प्रवाहातील सिनेमा बनवणाऱ्यांची अघोषित मक्तेदारी मृणाल सेन किंवा सत्यजित रे यांना काही अंशी तरी झुगारून देता आली.

हिंदी चित्रपट पटलावर समांतर चित्रपटाची चळवळ सेन यांच्या ‘भुवन शोम’पासून रुजली असे मानले जाते. त्या सिनेमाचा बाज हिंदी चित्रपटसंस्कृतीसाठी रूढ प्रवाहातला नव्हता म्हणूनच तो समांतर प्रवाहातला म्हणवला गेला. पण बंगाली सिनेमांमध्ये असे दोन प्रवाह ठळकपणे स्वतंत्र नव्हतेच. १९५५ मधील ‘रातभोरे’, मग ‘नीलआकाशेर नीचे’, ‘बाइशे श्राबन’ असे चित्रपट त्यांनी बनवले, जे रूढार्थाने लोकप्रिय नव्हते. त्यामुळे हिंदीसाठी ‘भुवन शोम’ हा पहिला समांतर चित्रपट ठरला, तरी बंगालीत रे-घटक-सेन त्रयींमुळे असे चित्रपट बनतच होते. बंगाली चित्रपट हा हिंदीपेक्षा अधिक प्रगल्भ आणि परिपक्व असल्याचेच ते लक्षण होते. ‘भुवन शोम’ हा दिग्दर्शक म्हणून सेन यांचा आणि अभिनेते म्हणून उत्पल दत्त यांचा पहिलाच हिंदी सिनेमा. त्यात पडद्यामागील निवेदक किंवा कथनकार म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड झाली. या सिनेमात सेन यांनी विविध प्रयोग केले. पण गती ही या सिनेमाची एक प्रमुख संकल्पना होती. ही गती रेल्वेगाडीतून डोळ्यांसमोरून झरझर सरकणाऱ्या रुळांवर काही मिनिटे कॅमेरा स्थिरावून प्रेक्षकांपर्यंत आणली जाते. काही वेळा घोडागाडीच्या घोडय़ाच्या डोक्याजवळ कॅमेरा लावून जणू आपण टांगेवाल्याच्या शेजारी बसलो आहोत अशी अनुभूती प्रेक्षकाला करून देते. कधी बलगाडीबाबत हा प्रयोग केला जातो. हिंदी चित्रपटाचा प्रेक्षक असल्यामुळे मुख्य पात्र असलेल्या सरकारी बाबू भुवन शोमचे बंगालीपण विविध बिरुदांद्वारे सामोरे येते : महान बंगाल, शोनार किंवा सुंदर बंगाल, विचित्र किंवा तिरसट बंगाल. भुवन शोमचा मूल्यनिष्ठ तऱ्हेवाईकपणा गावातल्या एका निरागस छोकरीसमोर विरघळून जातो, पण ही भेट त्याच्यासाठी नामुष्की न ठरता उलट त्याच्या जाणिवा रुंदावणारी ठरून जाते. भुवन शोम बनवल्यानंतर सेन पुन्हा एकदा बंगाली सिनेमाकडे वळले. धूमकेतूसारखे ते विशिष्ट काळाने हिंदी सिनेमात येऊन लुप्त होऊ लागले. ‘खंडहर’, ‘एक अधुरी कहानी’सारखे मोजके हिंदी सिनेमे त्यांनी बनवले. पण त्यांच्यामुळे शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शहा अशा अनेक कलाकारांची आणि श्याम बेनेगेल, गोिवद निहलानी अशा दिग्दर्शकांची समांतर सिनेमाची वाटचाल सुरू झाली. अनेकदा या समांतर चळवळीकडे तुच्छतेने पाहिले गेले, काही वेळा तिची खिल्ली उडवली गेली. ‘महोत्सवी चित्रपट’ असे त्यांना संबोधले जाई. तरीही ते कलाकार आणि त्या संकल्पना जिवंत राहिल्या. तसे चित्रपट बनणे मध्यंतरी बंद झाले होते. त्यांना आज डिजिटल माध्यमातून पुनरुज्जीवन मिळाले आहे. नेटफ्लिक्स, यूटय़ूबसारख्या माध्यमांतून अनेक दिग्दर्शक त्यांच्या आवडीच्या विषयांवर चित्रपट बनवत आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. गेली पाचेक वर्षे हिंदी चित्रपटातील मुख्य प्रवाहातही वेगळ्या विषयांवरचे, सामान्यांची कहाणी सांगणारे, काही तरी राजकीय किंवा सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनू लागले आणि लोकांना आवडूही लागले. याउलट धंदेवाईक तिकीटबारीस्नेही चित्रपट अलीकडे कमी संख्येने बनतात आणि त्यांना तुलनेने फार उठावही नसतो. ही चळवळ मृणाल सेनसारख्या मनस्वी दिग्दर्शकांमुळे सुरू झाली. त्यांनी जे बनवले, दिले ते कालातीत होते, हेच यातून दिसून येते! पडद्यावरच्या अशा मृणालपहाटेच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठी प्रेक्षकांतर्फे मृणाल सेन यांना ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.