18 February 2020

News Flash

साखळीचा सुगावा..

जेफला न भूतो न भविष्यति अशी नुकसानभरपाई द्यावी लागली आणि त्याचा आणि मॅकेन्झी हिचा विवाह संपुष्टात आला.

जेफ बेझॉसच्या घटस्फोटास जे कारण ठरले, त्या खासगी आयुष्याचा छायाचित्रांसह सुगावा लागण्यामागे एक साखळी होती..

साधारण एका वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ‘नॅशनल एन्क्वायरर’मध्ये एक सनसनाटी बातमी छापून आली. अनेकांनी ती मिटक्या मारत वाचली. कारण ती होती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या जेफ बेझॉस या उद्योगपतीच्या विवाहबाह्य़ संबंधांची. जेफ बेझॉस आणि लारा सांचेझ यांचे हे प्रकरण. जेफ बेझॉस मुळातच छंदीफंदी. आणि लारा ही अमेरिकी मनोरंजन विश्वातील विख्यात मदनिका. एका वृत्तवाहिनीची निवेदक आणि नंतर एमी पुरस्कारापर्यंत धडकणारी एक कलाकार. बेझॉस त्यात जगातील अशाच एका मोठय़ा संकल्पनेचा मालक. अ‍ॅमेझॉन ही संकल्पना त्याची. अमेरिकेतल्या सिएटल या शहरात एका गॅरेजमध्ये जन्माला आलेल्या या कंपनीने आज जग व्यापले आहे. जगातल्या पहिल्या पाच बलाढय़ांत तिचा समावेश होतो. तर अशा या कंपनीचा मालक नको (?) ते करताना पकडला गेल्याची बातमी ‘नॅशनल एन्क्वायरर’ने अगदी सजवून छापली होती.

त्या वेळी अनेकांना वाटले माध्यमांचा हा नेहमीचाच उद्योग. प्रसिद्ध व्यक्तींच्या शयनगृहापर्यंत घुसायचे आणि मिळेल ते छापायचे. पण भासले तितके ते सोपे आणि सरळसाधे नव्हते. पुढे प्रकरण चांगलेच तापले. बेझॉस याच्या घरात ताणतणाव निर्माण झाला. देवापाद्रय़ांच्या साक्षीने त्याची पत्नी बनलेल्या मॅकेन्झी बेझॉस हिने या उद्योगांस आक्षेप घेतला. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. दोघांचा काडीमोड झाला. जगातील सगळ्यात खर्चीक घटस्फोट ठरला तो. जेफला न भूतो न भविष्यति अशी नुकसानभरपाई द्यावी लागली आणि त्याचा आणि मॅकेन्झी हिचा विवाह संपुष्टात आला.

यानंतर काही महिन्यांनी, म्हणजे गतसालच्या ऑक्टोबरात जमाल खशोगी नामक एक पत्रकार तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमधल्या सौदी दूतावासात मारला गेला. जमाल जन्माने सौदी. पण नंतर अमेरिकी नागरिक. अमेरिकेत राहून पत्रकारिता करायचा. साहजिकच अभ्यासाचा विषय सौदी अरेबिया. मायदेश. तर आपल्या मायदेशाच्या भेटीच्या निमित्ताने काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तो सौदी दूतावासात गेला होता. पण तिथे तो मारला गेला. शब्दश: खांडोळी केली गेली त्याची त्या दूतावासातील अतिमहत्त्वाच्या खोल्यांत. आणि खाटीक जसा मारलेल्या बोकडांचे उरलेसुरले देहभाग पोत्यात घालून बाहेर काढतो, तसे जमालच्या देहाचे झाले.

प्रकरण बरेच गाजले. अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. पण लगेच तो देश शांत झाला. कारण जमालला मारण्यामागे सौदी अरेबियाचा आगामी राजा महंमद बिन सलमान (एमबीएस) याचाच हात असल्याचे उघड होते. एमबीएसची माणसे जमालवर पाळत ठेवून होती आणि दूतावासात आल्यावर त्याला संपवून टाकायचा कट एमबीएसच्या मदतीने आणि संमतीनेच आखला गेला होता. या हत्येमागे एमबीएस आहे असे दिसल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बोलती बंद झाली. आधी ते बरेच इशारे वगैरे देत होते. पण एमबीएसचे नाव पुढे आल्यावर ट्रम्प मागे गेले. तेही साहजिकच. कारण ट्रम्प यांचा जावई जेराल्ड कुशनेर आणि एमबीएस यांचा दोस्ताना. परत एमबीएसने ट्रम्प यांच्या इस्रायली धोरणात त्यांना पाठिंबा दिलेला. त्यामुळे एमबीएस त्यांच्यासाठी कामाचा माणूस. आणि माणूस असा कामाचा असला की मानवाधिकार वगैरे मुद्दे अगदीच गौण ठरतात. आताही तेच झाले.

आणि ट्रम्प यांनी दुर्लक्ष करण्याचे कारण म्हणजे जमाल हा वॉशिंग्टन पोस्ट या मातबर दैनिकाचा लेखक. आणि या दैनिकाने तर ट्रम्प यांच्या अब्रूची चाळण केलेली. खरे तर या वर्तमानपत्राचा मालक जेफ बेझॉस हा ट्रम्प यांचा परिचित. पण आपल्या देशात मालक ओळखीचा आहे म्हणून त्याच्या वर्तमानपत्राला शांत करता येत नाही हे ट्रम्प यांना माहीत होते. त्यामुळे त्यांना या वर्तमानपत्राचा रागही यायचा. तेव्हा त्या वर्तमानपत्राच्या पत्रकाराची हत्या झाल्यावर गप्प बसणे ट्रम्प यांनी पसंत केले. तसे करणे सोयीचे होते.

या खशोगीचा राग एमबीएसला यायचे आणखी एक कारण. हा जेव्हा सत्तेवर येण्याची प्रक्रिया सुरू होती, त्या वेळी त्यास काही अन्य राजपुत्रांचा विरोध होता. सौदी सत्तांतर हे नेहमीच अवघड. अनेक राजे आणि त्यांची अनेकानेक मुले. त्यामुळे सम्राटपदापर्यंत पोहोचणे हा मोठाच पल्ला. तो गाठत असताना एमबीएसला अन्य दावेदार राजपुत्र आडवे येत होते. त्यात एक विशेष होता. ओमर अब्दुल अझीझ असे त्याचे नाव. या ओमर आणि एमबीएस यांचे चांगले खटके उडत. पण वडिलांच्या पाठिंब्याने एमबीएसने त्याचा पुरता बंदोबस्त केला. इतका की अखेर त्यास परागंदा होऊन कॅनडात आश्रय घ्यावा लागला.

तर याचे आणि जमाल खशोगी याचे घनिष्ठ संबंध होते. किंबहुना आपला भाऊ  ओमर हाच खशोगीला बातम्या देणारा सौदीतील ‘सूत्र’ आहे असा एमबीएसचा वहीम होता. त्याचा पुरावा मिळावा यासाठी एमबीएसने काय केले असावे?

तेच जे त्याने जेफ बेझॉस याच्याबाबत केले. त्याचाही फोन हॅक केला. बेझॉस याच्या फोनवर एक दिवस गेल्या वर्षी एमबीएसकडून एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. त्यात एका व्हिडीओची लिंक होती. माहीत असलेल्या व्यक्तीकडून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आल्याने त्याबाबत संशय यायचे काही कारण नव्हते. आणि परत हा संदेश पाठवणारी व्यक्ती काही कोणी साधीसुधी नव्हती. सौदी राजपुत्र होता तो. त्यामुळे जेफ बेझॉस यांनी त्या लिंकला क्लिक करून ती उघडली. तसे काही विशेष त्यात नव्हते.

विशेष होते ते त्या  लिंकच्या बरोबर घुसवल्या गेलेल्या सॉफ्टवेअरमध्ये. ते जेफ बेझॉस याच्या नकळत त्याच्या मोबाइल फोनमध्ये स्थिरावले आणि त्याच्या फोनमधील सर्व माहिती एमबीएसला सहज मिळू लागली. जेफ बेझॉस याच्या फोनमध्ये ही घुसखोरी झाली आणि अवघ्या काही दिवसांनी ‘नॅशनल एन्क्वायरर’ने त्याच्या विवाहबाह्य़ संबंधांची रसाळ बातमी दिली. अगदी त्याच्या नव्या प्रेयसीच्या छायाचित्रांसह. हीच छायाचित्रे जेफ बेझॉस याच्या मोबाइल फोनमध्ये होती आणि तोच फोन एमबीएसने हॅक केला होता. ते ठीक; पण ही छायाचित्रे ‘नॅशनल एन्क्वायरर’च्या हाती पडली तरी कशी?

या नियतकालिकाची मालकी आहे ‘अमेरिकन मीडिया एलएलसी’ या कंपनीकडे आणि या कंपनीतला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार आहे एमबीएस. त्यामुळे सौदीचा पुढचा राजा एमबीएस असेल हे जेव्हा स्पष्ट झाले त्या वेळी या नियतकालिकाने त्याची आरती ओवाळणारा गौरवांक प्रकाशित केला होता.

हा सगळा गुंता उलगडला की एक साखळी स्वच्छपणे दिसू लागते. अ‍ॅमेझॉनचा मालक जेफ बेझॉस याचे प्रकरण बाहेर येणे- त्याच्याकडे वॉशिंग्टन पोस्टची मालकी असणे आणि मालकास पटवल्यानंतरही त्या दैनिकात आपल्याविरोधात छापून येत असल्याचे पाहून सौदी राजपुत्राचा संताप होणे, जमाल खशोगी याच वर्तमानपत्रासाठी लिहीत असणे आणि परत त्याचे आणि एमबीएसचे वैर असणे.

हे येथेच संपत नाही. साखळी आहे हे नक्की, पण ती कशी याचा सुगावा घेतला तर काय दिसते?

इस्रायल. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून फोन हॅक करणारे पेगॅसस नावाचे सॉफ्टवेअर विकसित करणारी एनएसओ नावाची कंपनी आठवते? तीच ती. आपल्याकडे जिचा बभ्रा झाला होती ती. देशांतर्गत हेरगिरीसाठी या कंपनीचे सॉफ्टवेअर आपल्या सरकारने घेतल्याचे प्रकरण गाजले आपल्याकडे गेल्या वर्षी.

आता महाराष्ट्र सरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत  हे  पेगॅसस घुसखोरी आपल्या आसपासही झाली का हे शोधण्याचे. अमेरिकेने ती शोधली. आपले काय?

First Published on January 25, 2020 1:10 am

Web Title: loksatta editorial on conspiracy behind amazon ceo jeff bezos bezos phone hack zws 70
Next Stories
1 आजार कोणता?.. उपाय काय?
2 रसेलला खोटे ठरवा!
3 पुतिन प्रहर
Just Now!
X