राजकारणाऐवजी सत्ताकारणाचाच विचार करण्याची सवय लागल्याने काँग्रेस पक्ष आज दिशाहीन झाला आहे..

घर फिरले की घराचे वासेही फिरतात. काँग्रेसला या उक्तीचा आता प्रत्यय येत असेल. ज्या गतीने त्या पक्षाच्या नेत्यांना एकापाठोपाठ आत्मचिंतनाची उबळ येत आहे त्यातून हे फिरलेले वासेच दिसतात. काँग्रेसचे मध्य प्रदेशातील नेते, भाजपच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांचे नातू, माधवराव शिंदे यांचे चिरंजीव असे बरेच काही असलेल्या ज्योतिरादित्य यांनी ही पक्षाच्या आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली. असेच सर्व काही आयते मिळालेले मुंबईचे नेते मिलिंद देवरा यांनाही तसेच वाटले होते. याच मुंबईतील देवरा यांचे प्रतिस्पर्धी संजय निरुपम यांनीही अलीकडे असा त्रागा केला. पक्षाने आपली दखल घेतली नाही तर किती काळ असे राहावयाचे याचा विचार करावा लागेल, असे निरुपम म्हणतात. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी सध्याच्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार न करण्याचे ठरवले आहे. त्यांची ही आगळीक झाकली जाईल. कारण त्यांनी प्रचार केला असता तरी फारसा काही फरक पडला नसता. या दोघांच्या आग्रहास बळी पडून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनीही पराभवानंतर पक्षाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारण हे कारण त्यांनी या संदर्भात दिले. पण देवरा वा निरुपम यांच्यापेक्षा सध्याच्या वातावरणात उर्मिला मातोंडकर अधिक प्रामाणिक ठरतात. कारण त्यांनी देशाचे हित वगैरे शब्दबुडबुडे हवेत सोडत भाजपची वाट धरली नाही. शिंदे, देवरा वा निरुपम यांच्याबाबत ही खात्री अजिबात देता येणार नाही. ‘तिकडून’ इशारा व्हायचा अवकाश, हे आणि असे अनेक नेते नेसत्या वस्त्रानिशी भाजपच्या दिशेने धावत निघतील. हे सर्व काय दर्शवते?

राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण असेच मानण्याची रूढ झालेली प्रथा. याचा दुसरा अर्थ असा की जो सत्तापदी आहे तोच राजकीय पक्ष आणि सत्ता मिळवून देईल तोच नेता म्हणवून घेण्याच्या लायकीचा. हा सत्ता मिळवून देणारा नेता वगळता अन्यांची कोणी पत्रास बाळगण्याचे कारण नाही. वास्तविक अलीकडेपर्यंत या देशात सत्ताकारण म्हणजे राजकारण असे मानले जात नव्हते. राम मनोहर लोहिया, मधु लिमये, जॉर्ज फर्नाडिस, रामभाऊ  म्हाळगी, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी अशी किती नावे सांगावीत. या सर्वानी आयुष्यभर जनतेचे राजकारण केले. त्यातील अडवाणी, वाजपेयी वा जॉर्ज हे काही प्रमाणात नशीबवान. त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर का असेना पण सत्ता  अनुभवता आली.  अन्यांना तेही नाही. लोहिया वा लिमये यांचे आयुष्य तर प्रवाहाच्या विरोधात पोहण्यातच गेले. यापैकी अनेक मंडळी एके काळी काँग्रेसशी संबंधित होती.

आणि तरीही आज काँग्रेसजनांना दिशाहीन वाटत असेल तर त्यातून फक्त रक्तातून होणारा मूल्यक्षय तेवढा दिसून येतो. खरे तर काँग्रेसजनांसाठी परिस्थिती हेवा वाटावा अशी आहे. दणदणीत बहुमतावर आपल्याच हाताने पाणी ओतणारा आणि सत्ता असूनही वाट चुकलेल्या अवस्थेत भिरभिरणारा सत्ताधारी. स्वहस्ते एकापाठोपाठ एक दगड आपल्याच पायावर मारून घेण्यात तो मग्न. त्यात अर्थव्यवस्था दिशाहीन. अशा वेळी खरे तर काँग्रेसने आपल्या पडलेल्या शिडांत वारे भरून घ्यायला हवेत. ते राहिले दूर. उलट हा पक्ष किंकर्तव्यमूढावस्थेत रममाण. समोर पंचपक्वान्नांची थाळी असतानाही कोठून सुरुवात करावी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात गढल्याने उपाशीच राहणाऱ्या भिकाऱ्यासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे.

हे असे झाले याचे कारण जनतेचे राजकारण करण्यापेक्षा सत्ताकारण करण्यास महत्त्व दिले म्हणून. गांधी घराण्यास महत्त्व आणि त्यांच्याविषयी ममत्व का? तर ते सत्ता मिळवून देतात म्हणून. पण त्या क्षमतेच्या अतिउपशामुळे गांधी घराणे कोरडवाहू जमिनीसारखे होते की काय अशी अवस्था झाली. परिणामी काँग्रेसजन हवालदिल. ही वेळ खरे तर अंग झटकून कामाला लागण्याची. पण सत्ता मिळणार नसेल तर काम तरी काय करायचे हा काँग्रेसजनांचा गोंधळ. त्यापेक्षा जो सत्तेच्या पदराखाली घेईल त्याकडे गेलेले बरे, असा त्यांचा साधा हिशेब. मानवाचा शेपूट हा अवयव वापरला न गेल्यामुळे तो झडला, असे उत्क्रांतिशास्त्र सांगते. काँग्रेसचे हे असे झाले आहे. कायम सत्ताकारणाचाच विचार केल्यामुळे तो पक्ष राजकारणाचा आपला अवयव गमावून बसला असावा, असे दिसते. त्यास पुन्हा पालवी फुटावी असे त्या पक्षीयांस वाटत असेल तर त्यासाठी साधा उपाय आहे.

नरसिंह राव यांच्यासारख्या प्रभावळीबाहेरच्या नेत्याचे स्मरण हा तो उपाय. प्रभावी, जनकेंद्री राजकारण करण्यासाठी घराणे लागत नाही, प्रभावी राजबिंडे असे व्यक्तिमत्त्व लागत नाही आणि अगदी वक्तृत्व हीदेखील नेतृत्वासाठीची गरज नाही. हवेत फक्त मुद्दे. ते घेण्याची, त्यावर जनमन जागे करण्याची क्षमता असेल तर राजकारण करता येते हे आपले सगळेच राजकीय पक्ष आता विसरले आहेत. नेतृत्व म्हणजे झगमगाट, डोळे आणि बुद्धी दिपवणारे नेपथ्य/ प्रकाशयोजना आणि कंठाळी संगीत असे मानण्याची प्रथा रूढ झाल्याने हे नसल्यास आपले काय होणार असे या मंडळींना वाटू लागले आहे. या सगळ्याची काहीही गरज नसते हे लक्षात घेण्यासाठी खरे तर एक उदाहरण पुरे. मोहनदास करमचंद गांधी या माणसाकडे यातील काहीही नव्हते. तरीही हा सद्गृहस्थ सलग तीन दशके देशाचे नेतृत्व करू शकला. त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट होती.

मुद्दे. खरे तर सत्ताधारी भाजप अत्यंत उत्साहाने इतक्या मोठय़ा प्रमाणावर हे मुद्दे नियमितपणे देतो आहे की विरोधकांची अवस्था ‘देता किती घेशील दो कराने..’ अशी असायला हवी. त्यामुळे काँग्रेसजनांना हिरमोड करून घ्यायचे काहीच कारण नाही. परिस्थिती अशी की हे आत्मचिंतन खरे तर सत्ताधारी भाजपने करायला हवे. इतक्या प्रचंड बहुमताची आपण माती करीत आहोत का? अर्थव्यवस्थेचा गाडा हाकणे आपल्याला का जमत नाही? आणि मुख्य म्हणजे आपल्या पक्षात येण्यासाठी इतके सारे नेते रांगेत का? आज आपल्यात आलेले हे गणंग उद्या सत्ता गेल्यावरही आपल्यात राहतील का? छोटय़ामोठय़ा आमिषासाठी हे आपापली निवासस्थाने सोडत असतील तर उद्या काही देण्याची आपली क्षमता संपली तर हे काय करतील? या आयारामांनाच जर आपण कुरवाळत बसलो तर इतकी वर्षे आपल्याशी निष्ठावान राहिलेल्यांच्या पदरी काय घालणार? अशा एक ना अनेक मुद्दय़ांवर भाजपने आत्मचिंतन करावे अशी परिस्थिती आहे. त्याची त्यांना फिकीर नाही. भाजपने जे करायला हवे ते करण्याची गरज काँग्रेसला वाटावी, हे या दोन्ही पक्षांच्या चुकलेल्या प्राधान्यक्रमाचे निदर्शक ठरते.

कारण आत्मचिंतन ही भरल्या पोटानंतर करावयाची क्रिया आहे. पोट भरल्यानंतर जे मांद्य येते ती अवस्था आत्मचिंतनासाठी आदर्श. म्हणून उपास झडत असलेल्याने आत्मचिंतनाच्या फंदात पडू नये. त्याने हातपाय हलवावेत आणि कामास लागावे. कार्यकाळात आत्मचिंतन केल्यास उलट प्रकृती खालावते. सबब प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष मिळू शकणाऱ्या सत्ताचतकोरीच्या आशेने जे जाऊ  इच्छितात त्यांना काँग्रेसने आनंदाने भाजपत जाऊ द्यावे. उरलेल्यांनी गांधी घराण्यातील कोणी आहे की नाही याचा विचार न करता कामास लागावे. काम करायच्या वेळेस आत्मचिंतन कसले करता..?