22 April 2018

News Flash

संचिताचे ‘समाजमाध्यम’..

डॉ. आंबेडकरांचा पुतळा भगव्या रंगात रंगविण्यात आल्यानंतरची ही पहिलीवहिली जयंती.

संग्रहित छायाचित्र

आंबेडकरी चळवळीच्या गाण्यांच्या परंपरेचा आज ‘इव्हेन्ट’ होत असताना, चळवळही या गाण्यांचे संचित विसरलेली आहे..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा निराळी आहे. अगदी आगळीवेगळी आहे. ज्यांना आदल्या वर्षीपर्यंत या ‘भिमजयंती’चे अस्तित्व केवळ सुट्टीपुरतेच जाणवत असे, त्यांनाही सरकारच्या अनेक कार्यक्रमांतून या दिवसाचे महत्त्व यंदा पटणार आहे. आणखीही कारणे आहेत. डॉ. आंबेडकरांचा पुतळा भगव्या रंगात रंगविण्यात आल्यानंतरची ही पहिलीवहिली जयंती. महात्मा गांधी यांना प्रिय असलेला ‘ग्रामस्वराज्य’ हा कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे नव्या जोमाने निवडक तालुक्यांत सुरू होणार आहे, त्या अर्थाने गांधी-आंबेडकरांचे अपूर्व ऐक्य साधणारी ही पहिलीच जयंती. दलितांच्या सक्षमीकरणावर भर देणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार असली, तरी सर्व केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती देशभरात कुठे ना कुठे, या उपक्रमाच्या प्रारंभदिनी असणारच आहे. शिवाय, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचीही प्रक्रिया सर्वसामान्य फौजदारी कायद्याप्रमाणे असली पाहिजे हा जो दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला, त्यास न्यायालयातच कसून विरोध असल्याचा पवित्रा यंदाच्या आंबेडकर जयंतीस ७२ तास उरले असताना सरकारने घेतलेला आहे. याबद्दल सरकारचे अभिनंदन करावे किंवा कसे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु एक गोष्ट नक्की. मोदी सरकारने यंदा प्रथमच काही पावले टाकलेली आहेत. ती सकारात्मक नसतीलही. पण चळवळीपुढील पेच वाढणार आहे. चळवळ टिकवणार कशी, हा तो पेच. दलित चळवळ टिकवायची म्हणजे नेमके काय आणि कसे टिकवायचे याचा विचार आजवर चुकत गेल्याचीच उदाहरणे अधिक. तेव्हा या वैचारिक पठडीपेक्षा आणि ती पठडी बांधणाऱ्यांच्या राजकारणापेक्षा निराळ्या दिशेला पाहणे आता क्रमप्राप्त आहे. ती निराळी दिशा म्हणजे दलित चळवळ ही सांस्कृतिक चळवळही आहे हे मान्य करणे. या चळवळीतल्या गाण्यांकडे पुन्हा नव्याने पाहणे.

‘काठी न् घोंगडं घेऊद्या की रं, मलाबी जत्रंला येऊद्या की रं’ हे आज अनेकांना समरसतावादी वाटणारे गाणे, किंवा ‘बाई मी धरण बांधते’ ही आज स्त्री-चळवळीत अधिक गायली जाणारी कविता, ही दलित चळवळीच्या गीतवैभवाची लोकांना अधिक माहीत असलेली उदाहरणे. त्यापलीकडे दलित चळवळीच्या गाण्यांना मोठी परंपरा आहे. डॉ. आंबेडकरांचा लोकसंपर्क वाढत गेला तेव्हापासून ती आहे. बाबासाहेबांच्या भाषणाआधी लोकशाहिरांची गाणी, हा प्रघात १९४०च्या दशकातही होता. ‘एक गीत माझ्या दहा भाषणांपेक्षा अधिक परिणामकारक’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले, ते वामनदादा कर्डकांच्या गाण्यानंतर. हे वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप अशा थेट आंबेडकरी चळवळीतील कवी-शाहिरांनी ही परंपरा सशक्त केली. आसपास शाहीर अमर शेख, के. के. साळवी, गोविंद म्हशीलकर अशा अनेकांनी वंचितांचे वास्तव गाण्यांतून मांडले. दलित साहित्य १९७०च्या दशकातले. त्याआधीच, विशेषत: १९५७ पासून दिवंगत बाबासाहेबांची थोरवी सांगणारी, त्यांचा ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश देणारी गाणी ‘आंबेडकरी गीत’ हा नवा काव्यप्रकारच मराठीत रूढ करू लागली होती. त्याकडे आपले समीक्षक पाहात नाहीत. पण ६ डिसेंबर, धम्मचक्र प्रवर्तन दिन, २० मार्चचा चवदार तळे सत्याग्रह दिन आणि १४ एप्रिल या दिवशी आंबेडकरी जनतेपुढे ही गाणी सादर होत असतात. या ‘भिमगीतां’बद्दल एक अस्फुट नाराजीही आंबेडकरी कार्यकर्त्यांकडूनच वारंवार व्यक्त होत असते.

ती अशी की, ही अखेर भक्तिगीते आहेत! हे बऱ्याच प्रमाणात खरे. पण ‘तुमचा धनाचा साठा न आमचा वाटा कुटं हाय रं?’ असा आर्थिक विषमतेचा मुद्दा गाण्यातून मांडणाऱ्या वामनदादांनी सुद्धा ‘भीमराया घे तुला या लेकरांची वंदना’सारखी गाणी लिहिलीच. भक्तिगीतात विचार, वैचारिक गाण्यांत भावना, ही सरमिसळ इथे लोकपरंपरेचा भाग म्हणून येणारच. तिला साहित्यशास्त्रीय निकष लावले, तर ‘भिमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, सुखाचे दार आहे, शीलाचे भांडार आहे’ हे गाणे ऐकताना ‘पिंपळाचा पार’ बोधगयेतला, हे एकवेळ कळेलही; पण ‘भि’ दीर्घ नसून ऱ्हस्व आहे किंवा या गाण्याची चाल सुपरिचित फिल्मी कव्वालीसारखी आहे, हे पचणार नाही. असे होऊ नये, यासाठी वेगळे निकष हवे, त्यांच्या शोधासाठी अनुभवाची सच्चाई हवी. ‘कव्वाल्या’ आणि ‘जलसा’ यांची आंबेडकरी परंपरा त्याशिवाय महत्त्वाची वाटणार नाही. गाणी अनेक प्रकारची आहेत, गेल्या सुमारे ४० वर्षांत- नामांतर आंदोलनापासून तर संघर्षांची गाणी अधिक आहेत, हे ऋ ण दलित पँथरचे. ‘जळतोय मराठवाडा’ किंवा ‘ज्यानं मंजूर केलं ते सरकार लागलं भ्यायला, नाव आंबेडकरांचं विद्यापीठाला द्यायला’ या गाण्यांतून अत्याचारांची गाथा मांडतानाच संघर्षांची हाक दिली गेली. अहिंसकपणा इतिहासजमा करणारी ही चळवळ वाढत असतानाच रिपब्लिकन पक्षाची शकले वाढत होती. पण गाण्यांवर या फाटाफुटीचा काही परिणाम दिसत नाही. उलट गेल्या ३० ते ४० वर्षांतील गाणी अधिक धारदार, टोकदार आहेत. आपले ते ‘प्रेरक’, दुसऱ्याचे ते ‘प्रचारकी’, या न्यायाने लोकशाहिरांवर हिंसक चिथावणी देण्याचे आरोपही झालेले आहेत. पण अभिव्यक्तीच्या मार्गावर ही गाणी निराळी ठरली, ती या समकालीन शाहिरांनी महाराष्ट्रीय संतपरंपरेला आंबेडकरी विद्रोहाशी जोडल्यामुळे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतरच्या ‘रोहित गेला..’ या शीतल साठे-सचिन माळी यांच्या गाण्यात चोखामेळ्याचा संदर्भ येतो. पण ‘हे आमचे नाहीत’ असे म्हणत विलास घोगरे, भगत, साठे-माळी यांना आंबेडकरी विचारांच्या बाहेरचे ठरवणारा एक वर्ग दलित समाजातच आहे. वसंत बापटांचे चवदार तळ्याबद्दलचे गीत असेच ‘बाहेरचे’ मानले जाते. ‘भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात मंद केला बाई’ या संभाजी भगत यांच्या गाण्यातून आत्मपरीक्षणाची हाकही दिली जाते. ती किती जणांना ऐकू जाते?

त्याहीपेक्षा, वामनदादांपासून संभाजी भगत यांच्यापर्यंतच्या शाहिरांची गाणीच आज किती जणांना ऐकू जातात? आर्थिक भार पेलू शकणाऱ्या अनेक वस्त्यांतून आता डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मोठय़ा ‘प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा’चे कार्यक्रम होतात. मनोरंजन हवेच, पण त्यासाठी जयंतीचा दिवसच का हवा? तोही, वैचारिकतेला भावनेचा ओलावा देणारी, त्यातून वैचारिक प्रेरणा देणारी गाणी ही आंबेडकरी परंपरेचा भाग असताना का हवा, हे प्रश्न मागे पडून आज आंबेडकरी गीते गाणाऱ्यांनाही ‘तुमच्याकडे किती आधुनिक वाद्ये आहेत? ध्वनिव्यवस्था कशी आहे?’ वगैरे प्रश्न विचारले जातात. गाण्यांचाही ‘इव्हेन्ट’ होतो.

चळवळ हिंसक होत गेली, हे अलीकडे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मिळालेल्या वळणांतून दिसले. त्याहीनंतरच्या ‘भारत बंद’दरम्यान तर गोरक्षक पट्टय़ात तुंबळ हिंसा झाली. या साऱ्या हिंसकांना आंबेडकरी चळवळीच्या गाण्यांची परंपरा मान्य होती का? ती माहीत असती आणि मान्य असती, तर कदाचित चळवळ निव्वळ प्रतिकारापुरती उरली नसती. गाण्यांच्या सांस्कृतिक संचितातून ही चळवळ एका समाजापुरती न राहता, सर्वच वंचितांपर्यंत पोहोचली असती. तसे झाले नाही. गाणी हे आपले खरे ‘समाजमाध्यम’ आहे, हे चळवळीने ओळखलेच नाही.

First Published on April 14, 2018 2:24 am

Web Title: loksatta editorial on dr babasaheb ambedkar on occasion of birth anniversary
 1. prabuddha ganvir
  Apr 21, 2018 at 4:41 pm
  संचिताचे ‘समाजमाध्यम’.. हा १४ एप्रिल २०१८ चा अग्रलेख वाचला. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२७ वि जयंती मोठ्या थाटात पूर्णजगभरात साजरी होत आहे. यंतीची चाहूल अनेक महिन्यापासून सुरु होते, ती पुढील ३ महिने सुरु राहते. जगात डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे एक असे व्यक्तिमत्व आहेत कि त्यांची जयंती ३ महिने साजरी केली जाते. वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक घटना घडताना आपण बघितले त्यात २०१८ च्या पहिल्याच दिवशी भीमा कोरेगाव येथील घटना, ऍट्रॉसिटी कायदा, महाराष्ट्र सरकाची भूमिका, भारत बंद त्यानंतर उत्तर प्रदेश सरकार ने बाबासाहेंबाच्या पुतळ्याला भगवा रंग देऊन समाजमन भगवा करण्याचा प्रयत्न केला ते कितपत चांगले कि वाईट हे त्यांच्याच बुद्धीला माहिती. एप्रिल महिन्यात 'ग्रामस्वराज्य' योजना. गाण्याचा विषय पुढे येत आहे ते खरे कि १० भाषण पेक्षा १ गाणं तितकेच प्रभावशाली आज अनेक जलसाकार आहेत त्यापैकीच एक गीतकार आहेत नागपूरचे मिलिंद जाधव यांनी बाबासाहेबांची गाणी सुफी अंगाने लिहली आणि त्यांचा कन्या विनया विजया ह्या दोघी सुफी अंगाने गातात हा भारतातील पहिलाच प्रयोग मनाला जातो.जलसाकारांच्या कार्याला सलाम #प्रबुद्ध
  Reply
  1. sanjay meshram
   Apr 17, 2018 at 1:12 pm
   waiting for clearification from respected editor.
   Reply
   1. Nitin Anna
    Apr 16, 2018 at 11:07 am
    भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना हे गीत वामनदादा कर्डक यांनी लीहेलेले नसून सुरेश भट यांचे आहे. आणि या गीतामध्ये वंदन करताना जो भाव आहे तो भक्तीचा नसून मानवंदनेचा आहे.
    Reply
    1. sanjay meshram
     Apr 15, 2018 at 6:18 pm
     माननीय संपादक, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.... हे अजरामर गीत वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले नसून कविवर्य सुरेश भट (आज १५ एप्रिल त्यांचा जन्मदिवस ) यांनी लिहिलेले आहे. रवींद्र साठे यांनी ते लिहिलेले आहे. कृपया नोंद घ्यावी व खुलासा करावा. - संजय मेश्राम, पुणे. (मो. ९९२२ ४४४९९६ )
     Reply