पर्यावरणवादाचा भारतीय आत्मा स्वातंत्र्योत्तर काळात सुंदरलाल बहुगुणा यांनी दाखवून दिलाच, तसेच अनेक चळवळींना त्यांनी दिलेल्या पािठब्यातून त्यांचे वैश्विक भानही दिसत राहिले..

झाडाला मिठी मारणे. ही साधी क्रिया चळवळीचे हत्यार म्हणून पहिल्यांदा केली ती उत्तराखंडच्या गोपेश्वर भागातील गौरादेवी या महिलेने. गौरादेवीसारख्या असंख्य महिला ज्या ‘चिपको चळवळी’त उतरल्या त्यांना संघटनात्मक पाठिंबा दिला तो चंडीप्रसाद भट यांनी स्थापलेल्या ‘दशोली ग्राम स्वराज्य संघ’ या संस्थेने. तरीही या चिपको चळवळीचे जनक म्हणून सुंदरलाल बहुगुणा यांचे नाव घेतले जाते ते का, याचे कारण या चळवळीच्या घटनाक्रमात जरी मिळाले नाही तरी पुढल्या सुमारे पन्नास वर्षांमध्ये नक्कीच मिळालेले आहे. ते असे की, बहुगुणा हे केवळ ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा चळवळीचे अग्रणी नव्हते, तर ते पर्यावरणाचे तत्त्वचिंतकही होते. चिपको या कृतीमधली वैश्विकता त्यांनी ओळखली होती आणि पुढे त्यांच्या अनेक व्याख्यानांमधून आणि त्याहूनही अधिक चळवळींना त्यांनी दिलेल्या पाठिंब्यातून बहुगुणांचे हे वैश्विक भान सातत्याने दिसत राहिले. त्या अर्थाने, ‘दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची वाहतो’ हे वर्णन त्यांना लागू पडते. त्यांच्या जाण्याचा शोक व्यक्त करताना विश्वाची ही चिंता कशी होती, या चिंतेशी केवळ पर्यावरणवादी म्हणवणाऱ्यांनीच नाते का जोडले आणि बाकीचे सगळे कोरडेच कसे काय राहिले, याचीही चर्चा होणे रास्त.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Tejashwi Prasad Yadav eating fish
नवरात्रीच्या काळात मासे खाल्ल्यामुळे तेजस्वी यादव ट्रोल; भाजपा नेते म्हणतात, “हंगामी सनातनी…”
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

पर्यावरणवादाचा भारतीय आत्मा स्वातंत्र्योत्तर काळात बहुगुणा यांनीच दाखवून दिला, हे निर्विवाद. राखीव वनांची किंवा अभयारण्यांची कल्पना आपल्याकडे सम्राट अशोकाच्या काळापर्यंत मागे जाते आणि वेद जरी निसर्गाचे दैवीपण ओळखणारे असले तरी वृक्षवल्लींना सोयरे मानणाऱ्या आणि क्षुद्र कारणांसाठी स्वाहाकार नाकारणाऱ्या मध्ययुगीन संतांचे काम हे पर्यावरणीय जाणिवेला आध्यात्मिक बैठक देणारे ठरले. बहुगुणा वारसा सांगत तो या संतांचा. विशेषत: वृक्षरक्षक बिष्णोई पंथाचा आणि कबीराचा. गांधीवाद आणि आजचा पर्यावरणवाद यांमध्ये मूलत: फरक नाही, १९०९ साली गांधीजींनी लिहिलेले ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक ही पर्यावरणवादाची गाथाच होय, असे आग्रही प्रतिपादन बहुगुणा अनेकदा करीत. त्यांची व्याख्याने ऐकणे हा एक प्रसन्न अनुभव असे. काहीशा पहाडी लकबीने, श आणि स या अक्षरांचा थारेपालट करणाऱ्या बोलीत, वाढत्या वयानुसार घ्यावे लागतील तेवढेच विराम घेत त्यांचा ओघ सुरू राही. त्यात टागोरांचे उदाहरण आले की हमखास जगदीशचंद्र बोस यांचेही नाव येई आणि या भारतीय शास्त्रज्ञाने झाडांना जीव असतो हे सिद्धच केलेले आहे, ती कविकल्पना नाही, यावर बहुगुणा भर देत. पण त्यांचा रोख असे तो भोगवादी जीवनशैलीवर. हे सारे अवडंबर नाकारूनही सुखसमाधान मिळवता येतेच, असे त्यांचे म्हणणे. गांधीजींची साधी राहणी स्वत: अंगीकारलेले बहुगुणा जे बोलताहेत त्यात एक सच्चेपणा आहे, अशी श्रोत्यांची भावना अगदी शहरांमधल्या, मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेने युक्त अशा सभागृहात बहुगुणांचे भाषण ऐकतानाही होई. अशा अनुभवामुळे, चिपको चळवळीच्या यशानंतर चाळिशीतल्या बहुगुणांनी ४,७००हून अधिक किलोमीटर पायी फिरून, उत्तराखंडच्या गावोगावी जाऊन केलेली जागृती ग्रामीण, जानपद रहिवाशांना कशी भिडली असेल, हे नेमके समजून घेता येई. प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, याचे बहुगुणा हे साक्षात उदाहरण होते. नर्मदा बचाओ आंदोलनाला त्यांचा आधार होताच, पण अन्य अनेक पर्यावरणवादी चळवळींना बहुगुणांमुळे माहीत झालेल्या चिपकोचा आदर्श बळ देई. हा धागा अगदी हल्ली मुंबईत झालेल्या आरे आंदोलनापर्यंत जोडता येतो. या मुंबईकर तरुणांना ‘हिंद स्वराज’मध्ये अपेक्षित असलेली जीवनशैली किंवा बहुगुणांची साधी राहणी आचरणात आणता येणार नाही हे निश्चित. शहरीकरणाची सर्वच्या सर्व फळे खाऊ शकणाऱ्या पिढीतले, व्यक्तिकेंद्री वातावरणामुळेच बंडखोरीची सहजप्रेरणा निसर्गप्रेमाच्या मार्गास लावणारे हे तरुण. तरीदेखील, दूरच्या दिव्यासारखे बहुगुणांचे असणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे. या दिव्याचा मिणमिणता प्रकाश, पर्यावरणवादी चळवळींना यश मिळवता येते, याची ग्वाही देणारा.

चिपको चळवळीला यश मिळाले, यामागे अनेक कारणे आहेत. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही पर्यावरण रक्षणाचा संस्कार शांतिनिकेतनात आणि अन्यत्र कसा झाला होता, याविषयी काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी वेगळे पुस्तकच अलीकडे लिहिले आहे. तेव्हा उत्तराखंडातील या चळवळीनंतर लगोलग हिमालयातील केवळ अमुक उंचीच्या भूभागातील झाडेच कापता येतील आणि त्यावरच्या भूभागातील झाडे संरक्षित राहतील, हा नियम झाला यात नवल नाही. पण याच इंदिरा गांधींनी बहुगुणा आदींच्या पुढल्या मागण्यांना दाद दिली नाही, कारण तशी ती देणे अशक्यच होते. मोठय़ा धरणाऐवजी लहान धरणे बांधा अशी मागणी नर्मदा बचाओ आंदोलनाची होती, पण प्रशासकीयदृष्टय़ा मोठय़ा धरणाची तयारी इतकी पुढे गेली असताना ही मागणी ऐकणे अशक्यच ठरणार होते. बहुगुणा ज्यास थेट विरोध करीत होते त्या टिहरी धरणाला तर असा काही पर्यायदेखील नव्हता. ते धरण झालेच. भूकंप होणारच होते, तेही झाले. धरण बांधले जात असताना १९९१ मध्ये झालेल्या भूकंपाएवढी हानी मात्र नंतरच्या कोणत्याही भूकंपाने झाली नाही, हे प्रशासनाचेही यश. गंगा व तिच्या उपनद्यांच्या आरोग्यासाठी बहुगुणांनी दोन मोठी उपोषणे केली. त्यांना पंतप्रधान पातळीवरून सकारात्मक प्रतिसाद वगैरे जरूर मिळाला, पण जमिनीवरील परिस्थिती काही बदलली नाही, म्हणजेच प्रशासनाने यश मिळू दिले नाही. थोडक्यात, टिहरीविरोधी चळवळ आणि त्यानंतर, बहुगुणा यांची एकही मागणी थेट यशस्वी झालेली दिसत नाही. मुळात यश मिळवणे, जिंकणे ही स्पर्धात्मक प्रेरणा आदिम असली तरी भांडवलवादाने, औद्योगिकीकरण वा त्यानंतरच्या जीवनगतीने ती इतकी चोखपणे आत्मसात केली, की तिचा तात्त्विक प्रतिवाद करणाऱ्यांची पंचाईतच व्हावी. या आदिम प्रेरणेला पाशवी ठरवले तर मग आपण मांडलेल्या संकल्पनांसाठी झगडायचे किती, यावर मर्यादा येतात. मग पर्यावरणवादी चळवळींना या मर्यादा मान्य कराव्या लागतात आणि नव्या परिस्थितीत काय करायचे याचे भान असावे लागते. म्हणजे असे की, कोणीही हटणार नाही आणि धरण होऊच नये, असे निर्धाराने म्हणणाऱ्यांना जीवनशाळा चालवाव्या लागतात. त्याहीपुढे मग, शिक्षणातून येणाऱ्या नवजाणिवा आणि आदिवासी जीवननिष्ठा यांच्या झगडय़ाचे काय करायचे याचा प्रश्न व्यापक होणार असतो. हे असे आतून, आपल्याशीच लढणेदेखील प्रत्येक पर्यावरणनिष्ठाला करावेच लागते. समतोल साधावाच लागतो. तो समतोल न साधणे ही वैचारिक चैनच ठरू शकते. हा वैचारिक चैनीचा उंबरा खरोखरच ओलांडणारे फार थोडे. बहुगुणा किंवा मेधा पाटकर यांच्यावर अशा वैचारिक चैनीपणाचा आरोप कुणीही करू शकणार नाही आणि करूही नये, कारण पर्यावरणवादी चळवळीच्या या नेत्यांनी हेकटपणा एका मर्यादेपर्यंतच केला आणि समतोल साधून लोककेंद्री काम करण्यासही प्राधान्य दिले.

फुटबॉल किंवा हॉकीसारख्या खेळांमध्ये काहीसा कमकुवत असूनही तुल्यबळ ठरणारी लढत देणाऱ्या संघाचे जे दिलखुलास कौतुक आपण तो संघ हरल्यावरही करतो, तशी आत्मीय जाणीव पर्यावरणनिष्ठ चळवळींविषयी नेहमीच असायला हवी- विशेषत: त्या लढय़ाच्या प्रेरणा कोत्या नाहीत, स्वार्थी नाहीत, याची खातरजमा झाल्यावर तर अशा चळवळींविषयी आदरच असायला हवा. तसा आदर बहुगुणा यांच्या वाटय़ाला नेहमीच आला. त्यांचे आवाहन व्यवहारात यशस्वी झाले नाही, कारण ते भावनिक होते. पण आजकालची ग्रेटा थनबर्गसुद्धा भावनिक आवाहनामुळेच भिडत नाही काय? अशा भावनिक आवाहनास आपापली यशापयशे असणारच. बहुगुणांना अनपेक्षित आणि खरे तर त्यांच्याशी थेट संबंध नसलेले असे एक अपयश म्हणजे, उत्तराखंडच्या अस्मितेचे जे राजकारण चिपको चळवळ आणि बहुगुणांची पदयात्रा यांतून आपसूक पुढे आले, ते नंतरच्या काळात, विशेषत: राज्यनिर्मितीनंतर प्रांतीय न उरता धर्मवादी झाले आणि त्याला कटू फळे आली. इतकी की, चारधाम महामार्ग पर्यावरणदृष्टय़ा महागातच पडेल, हे सांगण्याची ऊर्मीही आज तेथील कुणात उरलेली नाही. गांधीजींचे पुढले सारे राजकारण न पटणाऱ्यांनीही ‘हिंद स्वराज’ जसे वाचायलाच हवे, तशी बहुगुणांनी लिहिलेली ‘धरती की पुकार’ आणि ‘भूप्रयोग में बुनियादी परिवर्तन की ओर’ ही पुस्तकेही पुढल्या पिढय़ांना वाचण्यासाठी विविध भाषांत उपलब्ध असायला हवीत. भूप्रयोग म्हणजे जमिनीचा सजग वापर. त्याविषयीची आध्यात्मिक भावना बहुगुणा चेतवतात. भूप्रयोगाच्या या भावयात्रीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.