X

बुद्धी दे गणनायका..

वैद्यकीय शल्यक आपल्या अंगी उत्तम कौशल्य बाणावे यासाठी धन्वंतरीची पूजा करतात.

समाजाचे सुरू असलेले थिल्लरीकरण देवतांपर्यंत कधी जाऊन पोहोचले ते आपल्याला कळलेही नाही..

भक्ती म्हणजे काय? जे आपल्याकडे नाही ते प्राप्त व्हावे यासाठी आपापल्या इष्टदेवतेची आराधना करणे म्हणजे भक्ती. बलदंड होऊ इच्छिणारे दंड-बठका काढण्याआधी हनुमंताची आराधना करतात. काही उत्साही त्यास शनिवारी तेलाने न्हाऊ घालतात. वैद्यकीय शल्यक आपल्या अंगी उत्तम कौशल्य बाणावे यासाठी धन्वंतरीची पूजा करतात. लक्ष्मीच्या शोधात निघालेले विविध मार्गानी तिला आळवण्याचा प्रयत्न करतात. स्वरांची आणि स्वरांनी पूजा बांधणारे सरस्वतीचे आशीर्वाद मिळावेत यासाठी झटतात. असे अनेक दाखले देता येतील. माणसास असे करावे असे वाटते, कारण संकल्प आणि सिद्धी यात नियती असते (हे गोळीबंद वाक्य खांडेकरांचे.. वि.स.) याची त्यास जाणीव असते म्हणून. हे असे प्रत्येक संस्कृतीत होत आले आहे. आधुनिकतेचा उगम असलेल्या ग्रीक संस्कृतीतही उद्दिष्टाभिमुख देवता आहेत. नाइकी ही देणगी ग्रीकांचीच. नाइकी हा ब्रँड म्हणून अलीकडे अनेकांना माहीत असला तरी ग्रीक संस्कृतीत नाइकी ही खेळांतील विजयाची देवता आहे. या नाइकीचे रोमन स्वरूप म्हणजे व्हिक्टोरिया. तेव्हा याचा अर्थ इतकाच की प्रत्येक संस्कृतीत मानवाच्या आशाआकांक्षापूर्तीसाठी विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. महत्त्व आहे ते कालानुरूप या देवतांकडे मर्ढेकर (बा. सी.) म्हणतात त्याप्रमाणे ‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढुनी चष्मा डोळ्यावरचा’ असे पाहण्याइतके शहाणपण त्या त्या संस्कृतीत दाखवले जाते का? विजयाची देवता म्हणून हजारो वर्षांपूर्वी ग्रीक संस्कृतीत भले नाइकीचा जन्म झाला असेल. पण आज कोणत्याही खेळात ग्रीस नाही. कारण हे कालानुरूप शहाणपण ग्रीकांना साधले नाही. याचा अर्थ केवळ देवता आहे म्हणून तिची साधना करणाऱ्यांना इष्ट कौशल्य प्राप्त होतेच असे नाही. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या चच्रेचा हा पूर्वरंग.

गणेश ही बुद्धीची देवता. बुद्धी म्हणजे काय? तर विचार करण्याची क्षमता. या विचारसवयीची पाच अपत्ये का, केव्हा, कसे, कारण आणि कशासाठी ही. बुद्धीचे दैवत मानल्या जाणाऱ्या गणेशाच्या उगमापासूनच या विचारप्रक्रियेचे महत्त्व लक्षात येते. या गणेशाचे उगम हा अन्य देवदेवतांप्रमाणे नाही. इतकेच काय त्याचा देहदेखील अन्य शारीर देवांप्रमाणे नाही. तो कसा जन्मास आला याच्या आख्यायिकादेखील अजबच. मानवी वा दैवी संस्कृतीची पारंपरिक वाट या गणेशाने कधीच मळली नाही. शिवाय अन्य देवदेवतांप्रमाणे त्याचे अवडंबरही नाही की सोवळ्याओवळ्याचे कवतिक नाही. तो राजघराण्यांच्या शिष्टसंमत राजमहालात जसा विसावला तसा कष्टकऱ्याच्या अशिष्ट वातावरणातही तो आनंदाने रमला. जन आणि अभिजन अशा दोघांनाही तो तितकाच जवळचा. तो कोपिष्ट नाही की शापउ:शापाच्या ‘दैवी’ पिंजऱ्यातही कधी अडकला नाही. मोदक भले त्यास प्रिय असतील. पण ते नाहीत म्हणून कधी राख डोक्यात घालून तो निघून गेलाय असेही झाल्याचा दाखला नाही. भक्ताने प्रसाद खाल्ला नाही म्हणून त्याचे जहाज बुडवण्याचा सत्यनारायणी मानवी व्यवहारदेखील कधी गणपतीने केल्याचे दिसत नाही. त्याचे हे गुण लक्षात घेऊनच तेलातांबोळ्यांचे पुढारी असलेल्या बळवंतरावांनी (पक्षी : टिळक) त्यास देवघरातून चांगल्या अर्थाने रस्त्यावर आणले असणार. बळवंतरावांना ते शोभलेही.

कारण मुळात प्रखर बुद्धीचे अधिष्ठान त्यांच्याकडे होते. गणित ते खगोलशास्त्र ते गीता असा प्रवास करणारी प्रकांड प्रज्ञा त्यांच्या ठायी होती. परंतु ज्याप्रमाणे अनेकांनी त्यांचा कित्ता न घेता केवळ अडकित्ताच घेतला त्याचप्रमाणे अनेकांनी बळवंतरावांकडचा उत्सव घेतला. बुद्धी तेथेच राहून गेली. खरे तर भारतीय धर्मसंस्कृतीतील मळलेली वाट सोडून जाणारा गणपती हा पहिला देव. पुढे गौतम बुद्धानेही असाच आपला वेगळा मार्ग निवडला. परंतु गणपती उत्सव मात्र परंपरेच्या मळलेल्या वाटाच तुडवत राहिला. काळानुरूप अधिकाधिक बटबटीत होत राहिला. तसा तो करणारे या उत्सवात बुद्धीचा अंशदेखील सापडणार नाही, याची अधिकाधिक खबरदारी घेत राहिले. जी बुद्धी परंपरेच्या गंजलेल्या बेडय़ा तोडण्याचे सामर्थ्य देते तिचाच अभाव असल्यामुळे या गंजलेल्या परंपरांचे ओझे वागवणे आलेच. हे ओझे वाहणाऱ्यांची संख्या फारच मोठी असल्यामुळे या काळात त्यांच्या गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागतात. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करू तोच सुमुहूर्त असा संदेश देणाऱ्या गणेशाच्या स्थापनेचा मुहूर्त गाठण्यासाठीच मग सगळे पळू लागले. मग अपघात होणे आलेच. म्हणजे जे करायलाच हवे असे नाही असे ज्याने सांगितले त्याच्याच स्थापनेचे अवडंबर माजवले गेले. जिवाला त्रास करून कोणत्याही उपचारांचे पालन करण्याची आवश्यकता नाही, असे ज्याचे वर्तन होते त्याच्याच सणासाठी परंपरांचे अवडंबर माजवले गेले. इतके की सामान्यांचे जगणेही त्यामुळे असह्य़ होत गेले. थोडक्यात बुद्धीचा भावनेने केलेला पराभव बुद्धीच्या दैवतालाही पाहावा लागला.

हा पराभव आता जागोजागी, गल्लोगल्ली डोळे दिपवून अंधारी आणणाऱ्या दिव्यांच्या साक्षीने, बहिरेपणाकडे नेणाऱ्या बोंबल्यांच्या कल्लोळात दिसून येतो. हे होत असताना समाजाचे सुरू असलेले थिल्लरीकरण देवतांपर्यंत कधी जाऊन पोहोचले ते आपल्याला कळलेही नाही. एके काळी अनेकांघरी श्री गणरायाचे किंवा गणेशाचे आगमन होत असे. आता घरोघरी बाप्पा येतो. भक्तगण आमच्या बाप्पाच्या दर्शनाला या, आमच्याकडे बाप्पा येणार आहे.. अशा लडिवाळ भाषेत बोलतात. हे येथे थांबलेले नाही. अतिपरिचयाने होणाऱ्या अवज्ञेमुळे या मंडळींनी या विद्यादेवतेस थेट नाचायलाच लावले आहे. एके काळी शांताबाई (पक्षी : शेळके) लिहून गेल्या गणराज रंगी नाचतो.. गौरीसंगे स्वयें सदाशिव शिशुकौतुक पाहतो. पण त्याचा भलताच अर्थ या मंडळींनी काढला आणि हा सुखकर्ता केवळ नर्तकच आहे की काय असे वाटावे असे ‘गणपती आला नि नाचून गेलाऽ’ असे काव्य तद्दन थिल्लर ठेक्यावर वाजवले गेले.

हे सर्व पाहिल्यावर बुद्धीच्या देवतेशी तिचे भक्त म्हणवून घेणाऱ्यांचा काय आणि कसा संबंध उरला आहे, असा प्रश्न पडतो. बुद्धीच्या विकासासाठी काही नियमनांचे अधिष्ठान असणारी व्यवस्था असावी लागते. आपण ना ती उभी करू शकलो ना बुद्धिवानांच्या विचारप्रक्रियेस उत्तेजन देऊ शकलो. ज्या देशात हजारो वर्षे बुद्धिदेवता गणेशाचे पूजन होते त्या देशातून लाखो बुद्धिवंतांना बुद्धीच्याच साधनेसाठी परदेशात जावे लागते, हे कशाचे लक्षण? ज्या देशातील संस्कृतीने निसर्गाच्या नियमांचे इतके सुलभ स्पष्टीकरण हजारो वर्षांपूर्वी केले त्याच देशातील या संस्कृतिभक्तांना जगण्याच्या सामान्य नियमांचेदेखील का पालन करता येऊ नये? भक्ती ही बुद्धीची करायची असते आणि प्रेम भावनेवर. आपण नेमके उलट करीत आहोत. बुद्धीवर आपले नुसतेच प्रेम. निष्क्रिय असे आणि भावनेची मात्र भक्ती. तीदेखील क्रियाशील अशी. बुद्धीच्या दैवताचा असा ११-११ दिवसांचा सोहळा जगात अन्यत्र कोठेही नसेल. अन्य कोणत्याही संस्कृतीत बुद्धिदैवताचे इतके कोडकौतुक नसेल. एका बाजूला हे असे बुद्धिदैवतास घेऊन मिरवणे आणि त्याच वेळी माजलेली बुद्धिदुष्टता, ही सांगड कशी घालायची? अशा प्रश्नांना भिडणेदेखील अलीकडच्या काळात धर्मविरोधी मानले जाते.

शक्ती नाही, युक्ती नाही, विद्या नाही विवंचिता।  नेणता भक्त मी तुझा, बुद्धि दे रघुनायका.. असे करुणाष्टक समर्थ रामदास लिहून गेले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्या बुद्धी-दैवतास बुद्धी दे गणनायका.. यापरते योग्य मागणे काय असणार?

  • Tags: गणेशोत्सव २०१८,