मानवी सहिष्णुतेची जपणूक करणारे देशप्रेम आणि ‘मी, माझे, माझ्यापुरते..’ पाहणारा राष्ट्रवाद यांतील फरक स्पष्ट होण्याची गरज आज तर अधिकच..

पहिल्या महायुद्धास तोंड फुटले तेव्हा अन्रेस्ट हेिमग्वे अवघा १८ वर्षांचा होता. अ फेअरवेल टु आम्र्स, फॉर हूम द बेल टोल्स, ओल्ड मॅन अँड द सी आदी अमर पुस्तके आणि अर्थातच साहित्याचे नोबेल पारितोषिक हे काही दशके दूर होते. त्या वेळी रेडक्रॉसच्या हाकेस प्रतिसाद देत तरुण हेिमग्वेने महायुद्धात स्वत:स स्वयंसेवक म्हणून नोंदले आणि युरोपातील युद्धभूमीत रुग्णवाहिका चालविण्याचे काम केले. त्या वेळी त्याने जे हिंसेचे रौद्र रूप पाहिले त्याचा खोल परिणाम त्याच्या जगण्यावर झाला आणि त्याचेच प्रतििबब कोणत्या ना कोणत्या रूपात पुढे त्याच्या लेखनात पडत राहिले. ‘‘कितीही समर्थन केले, कितीही न्याय्य ठरवले तरी युद्ध हा गुन्हा नाही असे म्हणताच येणार नाही,’’ हे हेिमग्वे यांचे विख्यात उद्गार गाजले त्याची ही पाश्र्वभूमी. हा प्रतिभावंत लेखक ज्यास गुन्हा ठरवतो त्या पहिल्या महायुद्धाची शताब्दी रविवारी पॅरिस येथे मोठय़ा धीरगंभीर वातावरणात पार पडली. जगातील सर्वच महत्त्वाच्या देशांचे प्रमुख वा महत्त्वाचे नेते या समारंभास हजर होते. या समारंभात यजमान या नात्याने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भाषण आवर्जून दखल घ्यायला हवे इतके उद्बोधक ठरले. जर्मनीच्या अँगेला मर्केल यांच्या खांद्यास खांदा लावून एकसंध युरोपसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मॅक्रॉन यांनी पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीनिमित्त जे विचार मांडले त्याचे महत्त्व ते मांडण्याच्या त्यांच्या धर्यातही आहे.

‘राष्ट्रवाद हा देशप्रेमाच्या बरोबर विरोधार्थी आहे. देशप्रेम या संकल्पनेचा अपमान म्हणजे राष्ट्रवाद’ हे सणसणीत विधान मॅक्रॉन यांच्या या वेळच्या भाषणाचा केंद्रिबदू. हे विधान त्यांनी जेव्हा केले तेव्हा जगास नवराष्ट्रवादाची दीक्षा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्या रांगेत होते आणि आपला चेहरा निर्विकार ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते. ज्यांनी कोणी हा समारंभ दूरचित्रवाणीवर पाहिला त्यांना मॅक्रॉन यांच्या विधानातील राजनैतिक आवेग लक्षात येईल. ‘‘अलीकडच्या काळात देशादेशांत मी आणि माझे असे म्हणणाऱ्या नेत्यांची चलती आहे. त्यांना लोकप्रियताही मिळते. पण यामुळे हे देश सर्वात महत्त्वाच्या आणि मंगल भावनेस मुकतात. ती भावना म्हणजे सहिष्णुता. या युद्धात हजारो फ्रेंच सनिकांनी प्राणार्पण केले ते या भावनेच्या रक्षणासाठी. तेव्हा महायुद्धाच्या या शताब्दीप्रसंगी सहिष्णुता या मूल्याकडे आपली डोळेझाक होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी’’, ही मॅक्रॉन यांनी व्यक्त केलेली इच्छा अत्यंत समयोचित ठरते. मॅक्रॉन इतकेच बोलून थांबले नाहीत. तर या गंभीर प्रसंगी जुने (राष्ट्रवादाचे) दैत्य आपले डोके पुन्हा वर काढू पाहताहेत असा इशारा त्यांनी दिला. हे सारे कोणास लक्षून होते याची उपस्थितांना फोड करून सांगावी लागली नाही. मॅक्रॉन यांचे हे भाषण योग्य ठिकाणी पोहोचल्याची पावती लगेच मिळाली. त्यानंतर या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले : समारंभ देखणा झाला.

मॅक्रॉन यांच्या या वेळच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे युरोपीय संघाची स्वतंत्र सेना उभारण्याचा. अमेरिका आणि चीन यांच्या वाढत्या विस्तारवादी धोरणास अटकाव करण्यासाठी युरोपीय देशांची स्वतंत्र सुरक्षा सेना असायला हवी, असे मॅक्रॉन यांनी सूचित केले. ते जितके नावीन्यपूर्ण तितकेच धक्कादायक म्हणावे लागेल. याचे कारण या सूचनेच्या निमित्ताने युरोपीय संघ त्यांच्या पारंपरिक भागीदार असलेल्या अमेरिकेपासून घटस्फोट घेऊ इच्छितो किंवा काय अशी शक्यता व्यक्त झाली. त्यावर ट्रम्प यांची प्रतिक्रिया अपेक्षित म्हणता येईल. युरोपीय संघाने आपल्या विश्वासू भागीदार अमेरिकेविरोधात असा अविश्वास दाखवण्याची गरज नव्हती, असे ट्रम्प म्हणाले. तर त्याच वेळी रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी मात्र स्वतंत्र युरोपीय सुरक्षा सेना स्थापण्याच्या कल्पनेचे स्वागत केले. यावर लगोलग ठोस प्रतिक्रिया व्यक्त करण्यात कदाचित घाई होईल. परंतु तरीही त्यावरून अमेरिका आणि युरोप यांतील वाढत्या दुभंगाची कल्पना करणे गैर ठरणार नाही. ट्रम्प यांच्या आगमनाने ही दरी वाढत चालली असून ती बुजवण्याची गरजच ट्रम्प यांना वाटत नाही. ही यातील धक्कादायक बाब. मग तो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन – नाटो-  या संघटनेशी झालेला करार असो वा इराण अण्वस्त्र करार असो. अमेरिका आणि युरोपीय देश यांतील मतभेद चांगलेच वाढताना दिसतात. या पापाचे पालकत्व निर्विवादपणे अमेरिकेचे. मी, माझे, माझ्यापुरते ही ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिकेची विचारधारा. ती त्या देशाच्या आतापर्यंतच्या जागतिकीकरण भूमिकेच्या संपूर्ण विरोधी ठरते. हे सर्व पहिल्या महायुद्ध समाप्ती शताब्दीनिमित्ताने दिसून आले हे उल्लेखनीय.

‘हे महायुद्ध जगातील सर्व युद्धांचा अंत करणारे असेल’ असे व्रुडो विल्सन यांचे विधान होते. विल्सन अमेरिकेचे अध्यक्ष. १९१३ ते १९२१ या काळात त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले. म्हणजे महायुद्धास तोंड फुटण्याआधीपासून आणि ते शांत झाल्यानंतर तीन वर्षे इतका प्रदीर्घ काळ त्यांना मिळाला. आपल्या या विधानाची मर्यादा त्यांना याच काळात जाणवली असणार. याचे कारण पहिल्या महायुद्धाचा ज्या प्रकारे शेवट झाला त्यातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली, हे स्पष्ट झाले. जर्मनी आणि त्या वेळचा ग्रेट ब्रिटन यांच्यातील सत्तासंघर्षांस पहिल्या महायुद्धाने तोंड फोडले. या काळात या दोन्ही देशांत अनेक रासायनिक कंपन्या उदयाला येत होत्या आणि माणसे मारण्याचे नवनवे प्रकार शोधून काढत होत्या. आयसीआय, बायर आदी अनेक कंपन्या नंतरच्या काळात आदरणीय ठरल्या. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काळात अत्यंत अमानुष अशा रासायनिक अस्त्रांच्या निर्मितीत आपापल्या देशांच्या वतीने हिरिरीने सहभाग घेतला होता, याकडे दुर्लक्ष करता येणारे नाही. जीव न घेता माणसांना होरपळून काढणारी, विविध रोगांचा फैलाव करणारी, झाडे/ पिके/ वनस्पती जाळणारी, डोळ्यांत शेकडो सुया एकाच वेळी टोचल्यावर जितक्या वेदना होतील तितक्या यातना देणारी आदी अनेक अस्त्रे पहिल्या महायुद्धाने जन्मास घातली. त्यांचा अनिर्बंध वापर या युद्धात झाला आणि कोटभर जणांनी प्राण गमावले. जे गेले ते सुटले असे म्हणावे असे हे युद्ध होते. ग्रेट ब्रिटनने ते जिंकण्यासाठी वापरलेल्या रसायनास्त्राने एका जर्मन तरुणास अंधत्व येऊन इतक्या यातना सहन कराव्या लागल्या की त्याचा सूड घेण्याची ईर्षां त्याच्या मनात तयार झाली.

या युद्धात तात्पुरते पण कमालीचे वेदनादायी अंधत्व सहन करावे लागलेला जर्मन तरुण म्हणजे अ‍ॅडॉल्फ हिटलर. त्याची राष्ट्रभक्ती जगास कोठे घेऊन गेली हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तेव्हा इतिहासातील या चुका टाळणे हे आणि हेच त्यांच्या स्मरणयोगाचे उद्दिष्ट असायला हवे. पॅरिस येथे रविवारी झालेला समारंभ यासाठी महत्त्वाचा. त्यात देण्यात आलेल्या राष्ट्रवादाच्या धोक्यासंदर्भातील इशारा पचवून घेण्याची बौद्धिक क्षमता आजच्या समाजात कदाचित आढळणार नाही. परंतु म्हणून तिचे महत्त्व कमी होत नाही. उलट ते वाढते. इतरांचा द्वेष म्हणजेच राष्ट्रवाद असे मानले जाण्याच्या आजच्या काळात राष्ट्रवादाचा पॅरिस संमेलनाने दाखवून दिलेला अर्थ स्वागतार्ह ठरतो.