मानवी शरीरात अवयवरोपणाच्या अंतिम हेतूने विचित्रोतकी किंवा कायमेराचे प्रयोग चीन व जपानमध्ये सुरूही झाले; पण या विज्ञानाची नैतिक बाजू पाहायला हवी..

मानव आणि प्राणी यांचा संकरित भ्रूण विकसित करायचा. हा मानवी मूलपेशी रोपण केलेला भ्रूण यजमान प्राण्यामध्ये वाढवायचा. त्या प्राण्यातील अंतर्गत अवयव पुढे गरजू रुग्णाच्या शरीरात अभिरोपित करायचा! – ही तीन वाक्ये म्हणजे निव्वळ स्वप्न नव्हेत. अत्यंत क्लिष्ट असे हे संशोधन सध्या सुरू आहे. चीन आणि जपान या दोन पूर्णपणे भिन्न कार्य आणि नैतिक संस्कृती असलेल्या देशांमध्ये, या एकाच विषयावर दोन समांतर संशोधन प्रकल्प सध्या सुरू आहेत. अवयवांच्या भीषण तुटवडय़ावर तोडगा काढण्याची आशा या संशोधनाशी संबंधित संशोधकांना वाटते. हा प्रयोग शास्त्रीय खराच, पण त्यास नैतिक बाजूही आहे. तेव्हा या दोन्ही मुद्दय़ांचा ऊहापोह व्हायला हवा.

यापैकी चीनमध्ये सुरू असलेला प्रयोग स्पॅनिश संशोधक हाताळत आहेत. जपानमध्ये मात्र जपानी संशोधकच प्रकल्पप्रमुख असून, विशेष म्हणजे या संशोधनाच्या पुढील टप्प्याला तेथील सरकारची सशर्त संमतीही अलीकडेच मिळालेली आहे. रूढार्थाने हा संकर किंवा हायब्रिडचा प्रकार नव्हे. दोन प्राणिमात्रांच्या मूलपेशींच्या संकरातून तिसराच (संकरित) जीव निर्मिण्याच्या थोडाफार मधला असा हा कायमेरा किंवा विचित्रोतकीचा (विचित्र + ऊतक) प्रयोग. संकरित पिके आणि संकरित दुभत्या, पाळीव जनावरांचा विषय आपल्यासाठी नवा अजिबातच नाही. बहुतेकदा व्यापारी फायद्यांसाठी अशा प्रकारचे संकर यापूर्वी अनेकदा घडवून आणले गेले आहेत आणि असे प्रयोग कमालीचे यशस्वीही ठरलेले आहेत. परंतु मानव आणि प्राणी यांच्या संकराचे किंवा विचित्रोतकीचे प्रयोग अलीकडचे आहेत. २००३ मध्ये प्रथम चीनमधील प्रयोगशाळांत मानवी पेशींचे सशाच्या बीजांडात यशस्वी फलन करण्यात आले. त्यातून निर्माण झालेले भ्रूण हे पहिले यशस्वी मानव-प्राणी कायमेरा ठरले. चीनपाठोपाठ इतर काही देशांमध्ये असे प्रयोग सुरू झाले. अमेरिकेत उंदरामध्ये मानवी रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी याच प्रयोगाच्या आधारे पेटंटची विचारणा झाली, जिला तेथील पेटंट कार्यालयाने मान्यता दिल्यामुळे खळबळ उडाली होती. दोन वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये अमेरिकेतच पहिल्या यशस्वी मानव-प्राणी कायमेरा भ्रूणाची निर्मिती करण्यात आली. या प्रयोगात मुख्यत्वे डुकराच्या पेशी आणि काही मानवी पेशींचा वापर करण्यात आला होता. या असल्या अचाट प्रयोगांचे कारण काय?

ते विस्ताराने जाणून घ्यावे लागेल. मानवी शरीरातील अवयव निकामी झाल्यास त्याच्या जागी नवीन अवयवाचे फेरआरोपण करून संबंधित रुग्णाचे आयुष्य वाढवता येऊ शकते. यात अनंत अडचणी असतात. सर्वात मोठी समस्या सुयोग्य अवयवदाता मिळणे ही आहे. असा योग्य दाता मिळणे ही दुर्मीळ बाब असते. यापूर्वी चिम्पान्झी आणि बबून माकडांच्या अवयवांचे (उदा. फुप्फुस) मानवी शरीरात आरोपण करण्याचे प्रयोग १९६०च्या दशकात झाले. पण त्यांना जवळपास शून्य यश मिळाले. कारण संबंधित रुग्ण फार काळ जगू शकले नव्हते. बबून माकडांमध्ये डुकराचे फुप्फुस बसवण्याचे प्रयोग अगदी अलीकडचे. यात प्रमुख अडचण म्हणजे, यजमान शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा ‘पाहुण्या’ अवयवावर सर्व शक्तिनिशी तुटून पडते आणि संपूर्ण प्रयोगच त्यामुळे फसतो. डुकराच्या पाहुण्या अवयवातील विशिष्ट एन्झाइम किंवा विकर बबूनच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचे प्रामुख्याने लक्ष्य ठरायचे. तेव्हा जनुकीय तंत्रज्ञानाच्या आधारे हे विकर, मूळ फुप्फुसाच्या कार्यक्षमतेला बाधा न पोहोचवता नष्ट करण्याचे प्रयोग सुरू झाले. ते अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. या दोन मळलेल्या वाटांना फाटा देऊन मानव-प्राणी कायमेराची तिसरी, नवीन वाट संशोधकांनी धरलेली आहे. जपानमध्ये या प्रयोगाला प्राथमिक परवानगी मिळाली आहे. चीनमध्ये अशा प्रयोगांना परवानगी वगैरे देण्याची वा मागण्याची परंपरा नसल्यामुळे उंदराच्या भ्रूणात मानवी पेशींचे यशस्वी आरोपण तेथे करूनही झाले आहे. या प्रयोगाची अंतिम फलनिष्पत्ती काय, तर कायमेराच्या शरीरातील अवयवांमध्ये मानवाच्या पेशीही उपस्थित असतील. अशा अवयवांचे पुन्हा मानवी शरीरात आरोपण केल्यास, रोगप्रतिकारक यंत्रणेकडून होणारा विरोध टाळता येऊ शकेल. कारण या यंत्रणेला संबंधित नवा अवयव ‘परका’ वाटणारच नाही. तसेच, एरवी डुक्कर किंवा चिम्पान्झीच्या अवयवातील घातक विषाणू किंवा जिवाणू मानवी शरीराला घातक ठरतात. तो धोकाही कायमेराच्या बाबतीत टाळता येईल असा संशोधकांचा कयास आहे. जपान, अमेरिकेने निव्वळ नैतिकतेच्या चष्म्यातून या प्रयोगांकडे न पाहता, व्यवहार्यतेचाही विचार सुरू केला आहे. योग्य अवयवाअभावी आज जगभर लाखो रुग्ण तिष्ठत आणि हालात मरण पावतात. त्यांच्यासाठी असे प्रयोग यशस्वी होणे गरजेचे आहे, अशी सरकारी भूमिका आहे. मात्र या विषयावर अद्याप निश्चित धोरण कोणत्याही देशात अस्तित्वात येऊ शकलेले नाही. कारण कायमेरा म्हणजे संकर नव्हे, ही पहिली अडचण आहे. पण ही झाली तांत्रिक बाब. नैतिकतेचे काय?

आज कोणत्याही हॉलीवूड किंवा बॉलीवूड चित्रपटाच्या सुरुवातीला स्क्रीनवर एक हमीवचन नेहमी झळकते – ‘या चित्रपटात कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचवलेली नाही’. जगभर एकीकडे मानवी विकासाच्या रेटय़ापायी वन्यजीव प्रजाती लुप्त होत आहेत. तर दुसरीकडे प्राणिज पदार्थासाठी पाळीव प्राण्यांची घाऊक पदास करण्याचे नवनवीन उच्चांक मोडले जात आहेत. आरोग्य क्षेत्रातील मानवोपयोगी प्रयोगासाठी बेडूक, उंदीर, माकडे यांच्यावर प्रयोगही अनेक वर्षे सुरू आहेत. यासंबंधी जाणिवा आणि नेणिवा समृद्ध झाल्यानंतरही असे प्रयोग थांबलेले नाहीत, कारण दीर्घायुषी राहणे हा मानवाला स्वत:चा अबाधित, अपरिमित हक्क वाटू लागला आहे. हा हक्क निसर्गदत्त आहे की देवदत्त, याच्याविषयीच्या चच्रेतही न पडता, कोणत्याही मार्गाने मानवी आरोग्यावरील समस्यांची उकल झालीच पाहिजे या भावनेने त्याला पछाडले आहे. त्यातूनच मग कायमेरासारखा प्रयोग जन्माला आला. संकरित जनावराला असते, तितकीही ओळख आणि स्वातंत्र्य भविष्यात कायमेराला मिळेल का, हा प्रश्न आहे. पुन्हा असे प्रयोग अण्वस्त्रांसारखे नीतिशून्य माथेफिरूंच्या हातात गेल्यास काय करणार? अवयव आरोपणासारख्या शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना परवडणाऱ्या कधी होणार का? तसे होणार नसल्यास, कायमेरा ही श्रीमंतांची आणि अभिजनांचीच मक्तेदारीच राहणार का? आयुर्वज्ञिान क्षेत्रात गेल्या दोन शतकांमध्ये थक्क करणारी प्रगती झाली, तरी साथीच्या रोगांमध्ये माणसे दगावण्याचे प्रमाण कितीसे कमी झाले? ही दगावणारी मंडळी प्रामुख्याने गरीबच असतात, मग त्यांच्यापर्यंत मानवाची ही तथाकथित प्रगती का नाही पोहोचली? तशी ती पोहोचत नसल्यास, अवयव आरोपणाच्या संभाव्य यशस्वी प्रयोगातून मानवाची प्रगती झाली हे कसे मानायचे? आणि त्या प्राण्यांचे काय? माणसासाठी पिकांची शेती असते, प्राण्यांचे कळप असतात, तशा कायमेराच्या प्रजाती उभ्या राहणार? त्या जीवाच्या शरीरातील अवयवावर हक्क कोणाचा? कोंबडीचे अंडे किंवा गाई-म्हशीचे दूध इतका हा सोपा प्रकार नक्कीच नसणार.