13 August 2020

News Flash

तो उत्सव कशाचा?

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी. चांगले काय आणि वाईट काय, हे ठरवण्यात समाजाच्या धारणांचाही वाटा असतो.

सामाजिक संतापाला भावनेची जोड असतेच, पण त्यास राजकीय आणि देशभक्तीची धार देणारे तर्काधार पोलिसांच्या हिंसक कृतींविषयी अनेकदा मांडले गेले आहेत..

भीती, घृणा, संताप या नैसर्गिक मानवी भावना असल्या तरी त्या भावनांना प्रतिसाद कसा द्यावा यातून आपल्या माणूसपणाची गुणवत्ता ठरते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी. चांगले काय आणि वाईट काय, हे ठरवण्यात समाजाच्या धारणांचाही वाटा असतो. कोणत्या सामाजिक धारणांना मान्यता मिळते आहे, हे तपासण्याचे काम त्या-त्या समाजातील धुरिणांनाच नव्हे तर विवेक शाबूत असणाऱ्या सर्वानाच नित्यनेमाने करावे लागते. भावनिक प्रतिसादाने सामाजिक स्वरूप धारण केल्याच्या खुणा अधूनमधून प्रकर्षांने दिसतात. त्या-त्या वेळी हे स्वरूप तपासून पाहावे लागणारच. दिल्लीतील डिसेंबर २०१६ मधील निर्घृण बलात्कार आणि छळाची घटना, त्यानंतर पीडित मुलीविषयी समाजाला वाटलेली सहानुभूतीपूर्ण काळजी, अशी घटना मुळात घडतेच कशी याविषयीचा संताप यांनी धारण केलेले देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप यापूर्वी दिसले होते. अशाच घटना नंतरही घडल्या. हैदराबादजवळ एका तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आल्याची घटना गेल्या आठवडय़ातील, तर उत्तर प्रदेशातील उन्नाव येथेही अशीच घटना घडल्याचे वृत्त परवाचे. ते वाचकांहाती पडते न पडते तोच शुक्रवारी भल्या सकाळी आलेली बातमी, हैदराबादच्या घटनेतील चारही आरोपींना पोलिसांनी ठार केल्याची. हे आरोपी चकमकीत मारले गेले, असे म्हणवत नाही कारण चकमक दुहेरी असते. पोलिसांवर उगारण्यासाठी या आरोपींच्या हाती शस्त्रे होती काय? असल्यास ती आली कोठून? पळून जाणाऱ्या चौघांनाही गोळ्या झाडून ठारच करावे लागले, याचा अर्थ या पळणाऱ्यांना पकडण्याइतपतदेखील मनुष्यबळ पोलिसांकडे नव्हते काय? हे प्रश्न नियमानुसार त्या पोलिसांची चौकशी जेव्हा केव्हा होईल तेव्हाही उपस्थित होतील. तात्कालिक म्हणून त्यांची बोळवण करणे अयोग्यच. तूर्तास तात्कालिक प्रश्न आहे तो या पोलिसी हिंसेला देशभरातून मिळालेल्या प्रतिसादाचा. हा प्रतिसाद तूर्तास निव्वळ भावनिक स्वरूपाचा असल्याने तो कधी तरी थंडावेल. ऊहापोह व्हायला हवा तो पोलिसांच्या कृतीविषयी.

ही कृती नाइलाजाने केली, म्हणजे एकाअर्थी ती अत्यावश्यक होती, असा बचाव नेहमी होतो. यापूर्वीही अनेकदा तसा बचाव केला गेला आणि त्यापैकी काही वेळा न्याययंत्रणांनी तो अमान्यही केला, याची उदाहरणे आहेत. जनमताचा रेटा पोलिसांच्या बाजूने असल्याचे केवळ हैदराबादमध्ये आणि केवळ आताच दिसले, असेही नाही. मुंबईतील टोळीयुद्ध संपवण्यासाठी टोळीतील गुंडांना चकमकीत ठार करण्याची मोहीम मुंबई पोलिसांतील काहींनी उघडली होती, त्या ‘चकमकफेम’ अधिकाऱ्यांचे झालेले कौतुक महाराष्ट्राने पाहिले आहे. मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई नगरातील आंदोलकांवर गोळ्या चालवण्यासाठी ‘ते मोठी जाळपोळ करणार होते’ हा बचाव अपुरा ठरल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलेले, परंतु वरिष्ठ न्यायालयाकडून जामीन मिळालेले पोलीस अधिकारीही महाराष्ट्राने पाहिले आहेत. अलीकडल्या काळात गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांनी पुढले पाऊल टाकले. पोलिसांनी केलेली हिंसा ही चकमकच होती आणि ती देशासाठी अत्यावश्यक होती, असा बचाव तेथील राज्य सरकारांनी केवळ न्याययंत्रणांपुढे ठामपणे मांडला इतकेच नव्हे, तर राज्यातील सामान्यजनांनाही हाच बचाव मान्य होईल, अशी पावले उचलली. ‘समाजाला लागलेली कीड जर संपवली नाही, तर देश धोक्यात येईल’ अशा प्रकारचे, सामाजिक संतापाला राजकीय आणि देशभक्तीची धार देणारे तर्काधार पोलिसांच्या हिंसक कृतींविषयी अनेकदा मांडले गेले आहेत आणि समाजास ते मान्यही झाले, असे चित्र दिसले आहे.

तसे चित्र दिसले, म्हणजे समाजातील सर्वानी ते तर्क खरोखर मान्य केले होते का? हे अशक्यच. समाजात माणसे असतात. मुंग्या नव्हे. परंतु माणसांवरही बहुमताचा रेटा असतो. बहुमत एकाच बाजूला असताना आपण न बोलणे किंवा कमी आवाजात बोलणे बरे, असे अनेक माणसे ठरवतात. बहुमताची बाजू घेणारे लोक मग विरोधातील आवाजांचा क्षीणपणा नेमका जोखून त्या विरोधालाच दुर्बल ठरवितात. म्हणजे मग सबल कोण, हे निराळे कशाला सांगावे? बहुमताची बाजू तीच बलवान. विरोध कोणत्याही कारणाने केला, तरी तो दुर्बळच. आणि दुर्बळांना- त्यांच्या म्हणण्याला, त्यामागच्या विचारांना – महत्त्व न देता बलवानांना कार्यभाग साधता येतो.

बलात्काराची संधी वाढते, त्याचेही कारण हेच. शारीरिक दुर्बलतेचा किंवा भीती, चटकन काय करावे हे न सुचणे आदी अडचणींमुळे आलेल्या तात्पुरत्या मानसिक दुर्बलतेचा निर्घृण गैरफायदा स्वत:ला बलवान समजणारे जेव्हा घेऊ पाहतात, तेव्हा बलात्कार होतात. बलात्काराची काहीएक कायदेशीर व्याख्या आहे, त्या व्याख्येचाही गैरफायदा या तथाकथित बलवानांची वकीलमंडळी घेतअसत. या व्याख्येनुसारच तुझ्यावर अत्याचार झाले का, असे पीडित महिलांना भर न्यायालयात विचारण्याची युक्ती काही वकील वापरत. हे बंद झाले, कारण वकिलांना जरी उलटतपासणीचा पूर्ण अधिकार असला, तरी तो किती वापरावा हे ठरविणारी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आणि ती पाळण्याचे नैतिक बंधन वकीलवृंदावर आले.

मार्गदर्शक तत्त्वे, नैतिक बंधन हे शब्द दूरचे वाटावेत, असा आजचा काळ आहे हे अगदी मान्य. तरीही कोणी तरी त्यांचे पालन करीत असेल, तर त्याचे कौतुक करायला हवे. अशी तत्त्वे पोलिसांसाठीही असतात. आरोपींना जेरबंद करणे आणि न्यायपालिकेने आरोपीस गुन्हेगार ठरविल्यानंतर त्या गुन्हेगारास मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी होईल असे पाहणे, हे पोलिसांचे नियतकार्य. सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसी बळाचा वापर काही अंशी मान्य केला जातो, परंतु कायद्याने गुन्हा घडला असेल तर तेथे पोलीस यंत्रणेचे काम हे आरोपीला न्यायासनापुढे हजर करण्याचे आणि तपास चोख करून त्यास न्यायालयामार्फत योग्य शिक्षा होईल असे पाहण्याचेच असते.

मारलेली माणसे देशभरातील सर्व संवेदनशील माणसांच्या मते वाईटच असली, तरी पोलिसांनी स्वत:च या चार वाईट माणसांना मारून टाकणे समर्थनीय ठरत नाही, ते पोलिसांचे नियतकार्य निराळे असल्यामुळे. हैदराबादच्या घटनेत पुरावे भक्कम हवेत, म्हणूनच पोलीस या चार आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते आणि तेथे या आरोपींना, गुन्हा कसा घडला हे सांगून दाखवण्यास पोलिसांनी फर्मावले होते. हे काम तडीस गेले असते, तर पुरावे सज्जडच झाले असते. या चारही आरोपींना जलदगती न्यायालयापुढे हजर करण्याचा निर्णय तेलंगण राज्य सरकारने आधीच घेतल्यामुळे, भक्कम पुराव्यांनिशी उभा राहिलेला हा खटला विनाविलंब निकाली निघू शकला असता. परंतु झाले भलतेच. आरोपी पळू लागले, पोलीस त्यांना पकडण्यास असमर्थ ठरले आणि गोळीबार करावा लागला.

आजघडीला या घटनेची जी माहिती हाती आहे, ती एवढीच. तरीही पोलिसांनी ठरवूनच त्यांना मारले असावे, अशा समजातून जोरदार आनंदाची लाट देशभरात उसळते तेव्हा कुणाला तरी मारून टाकून आपणच झटपट न्यायदान करण्यामागील पुरुषी, आक्रमक प्रवृत्तीच आपण साजरी करत राहणार आहोत का, असा प्रश्न पडतो.

तेव्हा हैदराबादच्या चकमकीचे उत्सवी स्वागत नैसर्गिकपणे थंडावल्यानंतर तरी जरा शांतपणे, तो उत्सव नेमका कशाचा होता, याचा विचार संबंधितांनी जरूर करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 4:13 am

Web Title: loksatta editorial on hyderabad police encounter hyderabad encounter zws 70
Next Stories
1 ‘दास’बोध!
2 ‘कर’ता आणि कर्म!
3 दलालांची मालकी
Just Now!
X