उद्योग मरतो. पण उद्योगपतींचे बाळसे तसूभरही कमी होत नाही.. उद्योग बँकांच्या गळ्यात मारला जातो. हेच ‘जेट’चे झाले..

हवाई वाहतूक जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आपल्या देशात मृत पावणाऱ्या विमान कंपन्यांचाही वेग सर्वाधिक असावा यास काय म्हणावे? औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने नीचांक गाठलेला, बँकांच्या कर्जाचे डोंगर हाताबाहेर गेलेले, अनेक कंपन्यांचे प्रवर्तक दिवाळखोरीच्या मार्गावर आणि तरीही भांडवली बाजाराचा निर्देशांक चढाच, हे कसे? या अशा विसंवादाने भरलेल्या आणि या विषयी पूर्णपणे अनभिज्ञता दाखवणाऱ्या आपल्या देशात त्यामुळे जेट ही दुसऱ्या क्रमांकाची हवाई वाहतूक कंपनी अखेर बंद पडली याचे आश्चर्य वाटून घ्यावे काय? ही बंदावस्था तात्पुरती आहे असे कंपनीतर्फे सांगितले गेले. पण आपल्या देशाच्या इतिहासात तात्पुरती बंद पडलेली विमान कंपनी पुन्हा जिवंत झाल्याचा एकही दाखला नाही. या इतिहासास आपण अपवाद आहोत असे जेटने सिद्ध केल्यास ते कौतुकास्पद ठरेल. पण त्या कंपनीच्या आर्थिक अवस्थेकडे नजर जरी टाकली तरी असे होणे किती अवघड आहे, हे जाणवेल. आता या सगळ्याचे शवविच्छेदन सुरू होईल पण या कंपनीत चाकरी करणाऱ्या साडेसोळा हजार जणांच्या कुटुंबांचे काय याविषयी चकार शब्ददेखील कोणी काढणार नाही. परंतु कर्मचाऱ्यांना आणि धनकोंना होरपळून टाकणाऱ्या या उन्हाळ्यात या जेट नाटय़ाचे सूत्रधार, कंपनीचे प्रवर्तक नरेश गोयल आणि कुटुंबीय हे किंग फिशरचा प्रवर्तक विजय मल्या याच्याप्रमाणे लंडनमधल्या सुखद वातावरणात निवांत असतील. कारण ते ब्रिटिश नागरिक आहेत आणि आता जेट ही त्यांची डोकेदुखी नाही. ती त्यांनी कधीच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गळ्यात मारली आहे.

हे जेटचे झेंगट स्टेट बँकेला आपल्या गळ्यात घ्यावे लागले कारण या बँकेचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज या कंपनीत अडकले आहेत. म्हणजे आता ते सोडवणे ही बँकेची जबाबदारी. कंपनीचे अध्यक्ष गोयल काखा वर करून निवांत आहेत. हे पैसे सोडवायचे तर जेटसाठी नवा कोणी तारणहार लागणार. तो शोधण्याचा प्रयत्न खरे तर गोयल यांनी करायला हवा. पण त्यांचे म्हणणे मी हा प्रयत्न करायचा तर विमान कंपनी चालू ठेवा. ती ठेवायची तर आणखी १५०० कोटी रुपये द्या. ते द्यायला आपल्या बँका तयार नाहीत. ते योग्यच. कारण असा पसा देणे म्हणजे संचित तोटा वाढवत नेणे. जेटचा गेल्या काही महिन्यांतील दिवसाचा तोटा २१ कोटी रुपये इतका आहे. यावरून ती किती अव्यावसायिक पद्धतीने चालवली जात होती ते लक्षात येईल. ती आणखी चालवू दिली असती तर तोटाच तेवढा वाढला असता. बँकांनी अधिक निधीस नकार दिल्याने ते टळेल. पण त्यामुळे या उद्योगपती म्हणवणाऱ्या व्यापारी इसमाने आपली ही २५ वर्षांची कंपनी सरळ बंद केली. जेट हे माझे लाडके अपत्य असे गोयल म्हणतात. लाडक्याबाबत त्यांचे हे असे वर्तन. आता गोयल यांचे हे मृतवत अपत्य वाचवणे वा न वाचल्यास त्याचे पुढे काही करणे ही सर्व डोकेदुखी स्टेट बँकेची. बँकेने त्या दिशेने काहीही केले नाही तर या इतक्या प्रचंड कर्जावर पाणी सोडावे लागणार आणि काही करायला जावे तर या कंपनीसाठी नवा गुंतवणूकदार शोधावा लागणार. तो मिळाला तरी बँकेला विचारणार : इतक्या कर्जासकट मी ही कंपनी का घ्यावी? म्हणजे मग बँकेला कर्जाचा काही वाटा सोडून द्यावा लागणार. आर्थिक परिभाषेत यास हेअरकट असे म्हणतात. म्हणजे काहीही झाले तरी हजामत होणार ती बँकांचीच. विजय मल्या यांची किंगफिशर एअरलाइन बुडाली तेव्हाही बँकांनाच स्वतचे कर्ज असेच तासून घ्यावे लागले. हे झाले विमान कंपन्यांचे. त्याखेरीज असे असंख्य उद्योग दाखवून देता येतील की त्यांनी राम म्हटला आणि बँकांना घोर लागला.

कुडमुडी भांडवलशाही म्हणतात ती हीच. याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे उद्योग मरतो. पण उद्योगपतींचे बाळसे तसूभरही कमी होत नाही. यातील संतापजनक बाब म्हणजे इतक्या प्रकरणांत हात पोळून घेतल्यानंतरही आपल्याकडच्या परिस्थितीत एका पचीही सुधारणा नाही. या निर्लज्जावस्थेचे जेट हे ताजे प्रतीक. गेल्या वर्षांपासून या कंपनीची परिस्थिती तोळामासा आहे, याची जाणीव अनेक वित्तसंस्थांना होती आणि तशी ती करूनही दिली जात होती. तरीही या कंपनीने चांगली वर्षांवर्षांची आगाऊ तिकीट विक्री केली. या तिकीट विक्रीतून तब्बल ३,५०० कोटी रुपये जेटने गोळा केले. ते जमा होत असताना आपले दुकान उद्या सुरू राहणार आहे की नाही याची चिंता कंपनीला भेडसावत होती. तरीही आगाऊ तिकीट विक्री केली गेली. परिणामी ज्यांनी ज्यांनी जेटवर भरवसा ठेवून आपल्या सुट्टय़ा आदी प्रवासांची नोंदणी केली ते सगळे आता लटकले. याचा साधा अर्थ असा की डोक्यावर असलेल्या प्रचंड कर्जाव्यतिरिक्त जेटला आपल्या ग्राहकांचे हे आगाऊ घेतलेले ३,५०० कोटी रुपये परत करावे लागणार आहेत. याच्या जोडीला सहा महिन्यांहून अधिक काळ थकलेले कर्मचाऱ्यांचे वेतन-भत्ते लक्षात घेतले तर जेटसमोरील संकटांचा डोंगर किती अवाढव्य आहे, हे कळेल.

तो तसा वाढत असताना गोयल आणि कंपूने काहीही केले नाही ही यातील संतापाची बाब. हे गोयल मूळचे एका विमान वाहतूक कंपनीत कारकून. तेथपासून स्वतची कंपनी काढेपर्यंत त्यांचा झालेला प्रवास निर्वविाद कौतुकास्पद. पण हे कौतुक तेथेच संपायला हवे. गोयल यांना त्याचे भान राहिले नाही आणि ते देणाऱ्या व्यवस्था खिशात असल्याने त्यांना ते कोणी आणूनही दिले नाही. वास्तविक ही नोंदणीकृत कंपनी. म्हणजे गोयल यांच्या या कंपनीत लाखो गुंतवणूकदार आहेत. म्हणजे त्यांवर त्यांचाही तितकाच हक्क. पण आपल्याकडे तो केवळ कागदोपत्रीच राहतो. कारण आपण स्थापन केलेली आहे म्हणजे ही कंपनी आपलीच जहागिरी आहे, असाच दृष्टिकोन आपल्याकडे उद्योगपती म्हणवून घेणाऱ्यांचा असतो. नवसाने झालेला आहे म्हणून गद्धेपंचविशीतील पोरास काही कोणी मांडीवर घेऊन बसत नाही. गोयल यांना हे कधीही लक्षात आले नाही. ‘माझी कंपनी, माझी कंपनी’ म्हणून ते ज्यात त्यात लुडबुड करीत राहिले. अशा वेळी बाजारपेठ नियंत्रक, गुंतवणूकदार आदींनी त्यांना सरळ करावयास हवे होते. त्यासाठी आवश्यक ती पाश्चात्त्य अर्थशिस्त आपल्याकडे नाही. एतिहाद या कंपनीने गुंतवणूक केलेली असतानाही अमेरिकी डेल्टा कंपनीशी हे गोयल जेटच्या मालकीसाठी बोलणी करीत होते. जेटचा समभाग दीडशे रुपयांच्या आसपास असतानाही ३०० रुपये दराने तो घेण्याची डेल्टाची तयारी होती. पण गोयल यांना ४०० रुपये प्रतिसमभाग हवे होते. ते देण्यास डेल्टाने नकार दिला. परिणामी तो व्यवहार फिसकटला आणि अंतिमत: जेटमध्ये डेल्टाने गुंतवणूक केलीच नाही. पण ज्यांनी केली होती त्या एतिहादसारख्यांनीही ती काढून घेतली. टाटाही पुन्हा जेटकडे फिरकले नाहीत. कारण गोयल यांचा दुराग्रह.

असे झाल्यावर यात बुडतात ते गुंतवणूकदार, ग्राहक आणि अशा उद्योगांतील कर्मचारी. त्यांची फिकीर कोण करतो? स्वतचा प-पचा खर्च कंपनीकडून वसूल करणारे गोयल यांच्यासारखे अनेक आपल्याकडे विनासायास फोफावतात. कारण उद्योग हा काही एक शिस्तीने, सचोटीने करावयाचा व्यवहार नसून सरकारी खर्चाने चालणारी समाराधना आहे, असेच आपल्याकडे मानले जाते. त्यामुळे उद्योग मरतात. पण उद्योगपती अमरच. गेल्या काही वर्षांत असे ३५ वा अधिक उद्योगपती आपल्या मृत उद्योगांचे मढे बँकांकडे सोडून परदेशात गेले. यावरून परिस्थितीत किती आणि काय सुधारणा झाली ते कळेल. समाराधना सुरूच आहे.