२००७ मधील टी-२० जगज्जेतेपद असो वा २०११ मधील पारंपरिक जगज्जेतेपद असो, आविर्भाव आणि अभिनिवेश यांना थारा न देता महेंद्रसिंह धोनी स्थितप्रज्ञपणे वावरला..

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी, आता औपचारिकताच उरली असे करोनापूर्व काळात तरी कोणी म्हणत नव्हते. पण करोना साथीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट काही महिने पुढे सरकले आणि नजीकच्या भविष्यातही ते पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही. एरवी मैदानावर अपवादानेच स्वत:च्या भावना व्यक्त करणारा धोनी याही काळात- त्याच्या निवृत्तीवर कर्कश चर्चा सुरू असताना- गप्प राहिला होता. मैदानात त्याच्या मनाचा थांग क्वचितच लावता येत असे. परंतु अखेरचा निर्णय हा त्याचा असे आणि बहुतेकदा तो परिणामकारकही ठरत असे. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीचा निर्णयही त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता, टीकाटिप्पणीच्या मोहात न पडता जाहीर केला. तो जितका नेमका, तितकाच देदीप्यमान कारकीर्दीचीही क्षणभंगुरता दाखवणारा. त्याहीपलीकडे जाऊन तो महेंद्रसिंह धोनी या अलौकिक क्रिकेटपटूचा, भारतीय समाजसंस्कृतीत आज दुर्मीळ असा स्थितप्रज्ञ अलिप्तपणा दाखवणारा. निर्थक झगमगाटाचा सोस सर्रास दिसणाऱ्या आजच्या जगात हा गुण दुर्मीळच.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

धोनीच्या कारकीर्दीचा, नेतृत्वगुणांचा धांडोळा त्याच्या राजस अलिप्ततेची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विजयाचा उन्माद नाही नि पराभवाचा विषाद नाही. सामन्यातील परिस्थिती कितीही हाताबाहेर जात असली, तरी धोनीच्या चेहऱ्यावर दडपण कधी उमटले नाही. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे वाक्य उच्चारायचे नि मैदानावर जाऊन शिवीगाळ करायची किंवा प्रतिस्पध्र्याकडे पाहून थुंकायचे असल्या खुनशी दांभिकपणाच्या जवळपासही जाण्याची गरज त्याला भासली नाही. त्याची कारकीर्द सुरू झाली, त्या वेळच्या भारतीय क्रिकेटपटूंच्या सहवासाचा हा परिणाम असावा असे सुरुवातीला मानले जायचे. पण राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, सचिन तेंडुलकर असे एकाहून एक मातब्बर, तरीही सरळमार्गी क्रिकेटपटू एकामागोमाग निवृत्त होत गेले, तरी धोनीचा मैदानावरील वावर किंवा स्वभाव बदलला नाही. ‘ते गेले, विसरा त्यांना. आता माझे राज्य’ अशा मस्तीत धोनी कधी वावरला नाही. या प्रमुख क्रिकेटपटूंच्या गैरहजेरीत, अनेक युवा क्रिकेटपटूंना घेऊन तो दक्षिण आफ्रिकेत गेला आणि पहिला ‘टी-२०’ विश्वचषक भारतात घेऊन आला. त्या स्पर्धेदरम्यान किंवा त्यानंतरही धोनीच्या मैदानावरील वा मैदानाबाहेरील वागणुकीत काहीच फरक पडला नाही. कारण क्रिकेट हा फक्त एक खेळ आहे. ते जीवन नव्हे आणि धर्म तर अजिबातच नव्हे, हे पथ्य धोनीने सदैव पाळले. तरीही तो दिग्विजयी ठरत गेला यात त्याचे खरे मोठेपण.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून धोनीचे दिवस सरले याची चर्र करणारी चाहूल गतवर्षीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अखेरीस होऊ लागली होती. ५० षटकांमध्ये तो संपला, आता ‘टी-२०’ प्रकारातच तो हुनर दाखवू शकेल असा त्याच्या चाहत्यांचा अंदाज होता. यासाठी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धा, जी यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात व्हायची होती, धोनीसाठी सर्वाधिक कळीची मानली जात होती. पण करोना साथीनंतर ही सगळी समीकरणेच विस्कटून गेली. ‘टी-२०’ विश्वचषक आणखी वर्षभर पुढे सरकला. तोपर्यंत धोनी चाळिशीच्या उंबरठय़ावर असेल. तोवर लोंबकळत राहण्यापेक्षा निवृत्त होणेच योग्य, असा शहाणा निर्णय त्याने घेतला. तो कौतुकास्पद. समारोपाचे कौतुक सगळ्यांकडून व्हावे या मोहात आपल्याकडील भलेभले अडकलेले दिसतात. अमक्या दिवशी आपला शेवटचा सामना असेल, असे सांगून त्या सामन्याला सामन्यापेक्षा स्वत:च्या निरोप सोहळ्याचेच रूप देण्यात कित्येकांनी आत्मकेंद्री धन्यता मानली. पण खेळ, देश आणि संघापेक्षा स्वत:ला मोठे मानण्याचा धोनीचा पिंड कधीच नव्हता. कसोटी क्रिकेटची कारकीर्द त्याने २०१४ मध्ये तडकाफडकी संपवून टाकली. त्या वेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. मालिकेच्या ऐन मध्यावर धोनी निवृत्त होत असल्याची घोषणा त्या वेळी क्रिकेट महामंडळाच्या वतीने करण्यात आली. एक क्रिकेटपटू म्हणून तो अतिशय गुणवान होता. त्याच्या नेतृत्वाची नेहमीच चर्चा होत राहिली. परंतु कर्णधार हा स्वत: संघातील एक उत्तमच नव्हे, तर अविभाज्य घटक असावा लागतो. इंग्लंडचा माइक ब्रेअर्ली किंवा काही काळ आपला सौरव गांगुली हे निव्वळ नेतृत्वगुणांमुळे संघात तरले. धोनीचे तसे नव्हते. २००४ मध्ये त्याने पदार्पण केले नि पाचव्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणम येथे झंझावाती शतक ठोकले.

नवीन सहस्रकातील ते पहिले दशक भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथ करणारे. उत्तर भारतातील अनेक तरुण आत्मविश्वासाने मैदानावर दिसू लागले. धोनी झारखंडचा. पण त्याने याबाबतीत सौरवऐवजी सचिन, राहुल आणि कुंबळे या महान क्रिकेटपटूंचा आदर्श अंगीकारला. प्रचंड गुणवत्तेला गृहीत न धरता सातत्याने मेहनत करणे आणि आपल्याविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना मैदानात खेळातूनच प्रत्युत्तर देणे हा तो आदर्श. त्याव्यतिरिक्त धोनीने कधीच जाहीरपणे कोणी आदर्श मानला नाही वा गुरू केला नाही. पण त्याची अबोल सजगता सचिन-राहुल-अनिलच्या सद्गुणांप्रति संवेदनशील होती. २००७ मधील टी-२० जगज्जेतेपद असो वा २०११ मधील पारंपरिक जगज्जेतेपद असो, धोनीच्या देहबोलीत फरक पडला नाही. आविर्भाव आणि अभिनिवेशाची त्याला गरज भासली नाही. भारताचा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक, भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार, तीन-तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आणि आयपीएलमध्येही एक यशस्वी कर्णधार अशी धोनीची बहुपैलू ओळख. त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या सामन्यांची, मालिकांची आणि स्पर्धाची भरपूर चिकित्सा झालेली असल्यामुळे पुनरावृत्तीची गरज नाही.

पण यानिमित्ताने भारतीय क्रिकेटमधील दोन ठळक प्रवाहांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. उद्योगक्षेत्रात जे मोठेपण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे, ते क्रीडाक्षेत्रात धोनीचे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने उद्योगाचे लोकशाहीकरण केले आणि काही निवडक कुटुंबीयांच्या हातून सोडवून ते सर्वासाठी मोकळे केले. मुंबई, दिल्ली, बेंगळूरु वा चेन्नई अशा चार राजमान्य शहरांतील मध्यमवर्गीयांत तोपर्यंत अडकलेले क्रिकेट धोनीने दुर्लक्षित झारखंडापर्यंत नेले. प्रस्थापित मध्यमवर्गातून आलेल्या आणि चमकलेल्या क्रिकेटपटूंची परंपरा या देशात मोठी. परंतु त्याचबरोबर घरची परिस्थिती बेतासबात असलेल्या निमशहरी भागातील एका मोठय़ा वर्गातूनही उत्तम क्रिकेटपटू निपजू शकतात हे धोनीने दाखवून दिले. त्याआधी या चार शहरांपल्याडच्या आकाशातून कपिलदेव निखंजसारखा एक तारा निपजला होता. पण त्यास पंजाब, हरयाणा या प्रांतांच्या खेळ परंपरेचा आधार होता. त्या तुलनेत बिहार-झारखंडसारख्या प्रदेशातील धोनीचा संघर्ष अधिक रोमांचकारी. प्रस्थापित वर्गातील मंडळी नेमून दिलेल्या चौकटीत असामान्य कामगिरी करून जातात. पण या चौकटी भेदून समोरच्याला आपली नोंद घ्यायला भाग पाडणारे धोनीसारखे मोजकेच. १९८३ पासून क्रिकेटजगताचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच स्वरूपाचा बदल २००७ मध्ये घडून आला. या दोन्ही पर्वाचे नायक नि:संशय कपिल आणि धोनीच ठरतात यावरही दुमत असू नये. झारखंडसारख्या राज्यातून आलेला महेंद्रसिंह धोनी क्रिकेटवेडय़ा देशात असामान्य यश मिळवूनही स्वत: वेडाही झाला नाही किंवा भक्तही बनला नाही. यापुढील काळात आपली पुण्याई राखण्यासाठी धोनीने एकच करावे.

धोनीच्या पुण्याईवर डोळा ठेवून असलेले राजकीय पक्ष त्याला जाळ्यात घेण्याच्या प्रयत्नास एव्हाना लागलेही असतील. त्याच्या ‘भारतरत्न’साठीही मागण्या सुरू होतील. निवडणुकीसाठी तो सुदैवाने बधला नाही, तर निदान प्रचारासाठी त्याला मिरवण्याचे प्रयत्न होतील. सुपाऱ्या घेऊन तसे करणाऱ्या तारेतारका, क्रीडापटूंची आपल्याकडे उणीव नाही. पण धोनीने याहीबाबत सौरव गांगुली वा तत्समांच्या रांगेत बसू नये. तसे त्याने केल्यास त्याची अलिप्तता अधिक झळाळेल आणि अधिक आदरणीय ठरेल. अन्यथा इतिहास त्याची नोंद केवळ अन्य अनेकांप्रमाणे केवळ यशस्वी खेळाडू अशी करेल. तेदेखील योग्यच. पण धोनीकडून त्याहून अधिक योग्यतेची अपेक्षा.