महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी ही तिन्ही पक्षांची अपरिहार्यता असताना उगाच स्वबळाचे हाकारे घालून काँग्रेस व त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, न्यूनगंडाचेच दर्शन घडवीत आहेत..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना अलीकडे वारंवार येऊ लागलेली स्वबळाची उबळ ऐकून कोणास ‘सामना’ चित्रपटातील ‘‘मास्तर तुमचा पगार किती, तुम्ही बोलता काय’’ या प्रश्नाचे स्मरण होण्याचा धोका संभवतो. आपल्या पक्षाचा जीव किती, संघटनेची अवस्था काय आणि त्यापेक्षा मुख्य म्हणजे आपला नेता कोण अशा कोणत्याही मूलभूत प्रश्नाचे उत्तर नसताना स्वबळाची भाषा करणे अंगी कमालीचे शौर्य असण्याखेरीज शक्य नाही. तथापि यशासाठी शौर्यास शहाणपणाची साथ लागते. ती याप्रकरणी आहे किंवा काय, हे तपासणे आवश्यक ठरते.

सत्ता, संघटना आणि सरकार या मुद्दय़ांवर काँग्रेसमधील विसंवाद सातत्याने दिसून येतो. अगदी मनमोहन सिंग यांचे सरकार असतानाही पक्ष संघटनेतील अनेकांचे वर्तन खरे सत्ताधीश आपणच असे होते. त्यातूनच राहुल गांधी यांचा स्वपक्षाच्याच सरकारने मांडलेला ठराव मसुदा चारचौघांत फाडून फेकण्याचा हास्यास्पद प्रकार घडून आला. या सर्वात ‘सरकारात भले तुम्ही असाल, पण खरी सत्ता आमच्या हाती आहे,’ असे दाखवण्याचा गंड आणि अट्टहास दिसून येतो. महाराष्ट्रात सध्या याचेच दर्शन घडते. म्हणूनच सत्तेचा भाग असलेले विधानसभाध्यक्षपद सोडून चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नानांचे घोडे फारच फुरफुरू लागले. अर्थात बराच काळ निश्चेष्ट पडलेल्या त्या पक्षात प्राण फुंकण्याच्या दृष्टीने नाना करीत असलेली धावपळ आणि बडबड योग्यच. पण ती तितकीच पुरेशी नाही. त्याच्या जोडीला वास्तवाचे काहीएक भान लागते आणि ते असेल तर एका दिशेने संबंधित सर्वाचे ठोस प्रयत्न आवश्यक असतात. काँग्रेस पक्षात सद्य:स्थितीत नेमकी त्याचीच बोंब. परिस्थिती इतकी केविलवाणी की पक्षाची सूत्रे नक्की कोणाच्या हाती याचा अंदाज खुद्द काँग्रेसजनांसही असेल की नाही, असा प्रश्न. राहुल गांधी मैदानात आहेत म्हणावे तर ते युद्धभूमीकडे पाठ फिरवून डोक्यात राख घालून बसलेले. भगिनी प्रियंका वढेरा यांच्याकडे नेतृत्वासाठी पाहावे तर त्यांचे अस्तित्व ट्विटरपुरते; नाही तर बंधुप्रचारापुरते. या उभयतांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या हातीच अजूनही सर्व सूत्रे आहेत असे मानावे तर तसेही काही दिसत नाही. या अशा परिस्थितीत त्या पक्षाची नेते मंडळी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहात, एकमेकांना खाणाखुणा करीत दिवस ढकलताना दिसतात. अशा सुतकी वातावरणात नाना पटोले यांचा स्वबळ उत्साह खरोखरच वाखाणण्यासारखा. या उत्साहात त्यांना येथे साथ कोणाची? तर पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांची. या दोघांचेही दात पक्षाने दिलेल्या आंबट द्राक्षांमुळे आंबलेले. मुख्यमंत्रिपदी असताना शिंदे यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. पण पक्षाने मुख्यमंत्री केले विलासराव देशमुख यांना. म्हणून ते आंबट. आणि सर्व काही गुणवत्ता असूनही पक्ष महत्त्वाची भूमिकाच देत नाही, त्यातून ते पक्षातील अलीकडचे ‘बंडखोर’ पत्रलेखक. त्यामुळेही नेतृत्वाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष. म्हणून पृथ्वीराजही आंबून गेलेले. शिवाय सध्याचे महाराष्ट्र सरकार समजा कोसळलेच तर गमावण्यासारखे यांच्याकडे काहीच नाही. आणि कमावण्यासारखे नानांकडे काही नाही. म्हणून मग स्वबळाच्या भाषेचा उत्साह. या उत्साहास दीर्घधोरण आणि शहाणपण यांची साथ असावी लागते.

काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर त्याचाच तर नेमका अभाव आहे. तेव्हा नव्या अध्यक्षपदाच्या नवलाई उत्साहाने थबथबलेल्या नानांसारख्या काँग्रेसजनांनी खरे तर पक्षाची घडी मुळात नीट कशी बसेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. ईशान्य भारताच्या सातपैकी चार राज्यांचे भाजप मुख्यमंत्री हे एके काळचे काँग्रेसी आहेत. स्वबळावर काँग्रेसला सत्ता जेथे मिळाली त्या पंजाबात सरकार आणि संघटना यांच्या वादात ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाद सुरू झाले आहेत. राजस्थानातही सरकारची डगमगच. ताज्या विधानसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल आणि राहुल गांधींचा केरळ या राज्यांनी काँग्रेसजनांना बहुसंख्येने घरी बसवले. आसामात रूपीज्योती कुर्मीसारखा जुना निष्ठावान आणि चहा कामगार पट्टय़ातील महत्त्वाचा नेता एके काळचा काँग्रेसचा पण आता भाजपवासी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांच्या गळाला लागला. आणखीही काही काँग्रेस आमदार भाजपवासी होण्याच्या मार्गावर आहेत. जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेसची कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. तेव्हा नानांना अभिप्रेत असलेले ‘स्वबळ’ मुदलात आहे कोठे? आणि कोणाकडे?

स्वार्थ साधण्यासाठी प्रसंगी प्रतिस्पध्र्याचीही मदत घेण्यात युद्धनेतृत्वाचे चातुर्य आणि मुत्सद्दीपणा असतो. एके काळी काँग्रेसकडे तो होता. सध्या त्याचा पूर्ण अभाव असल्याने नानांना तो अनुभवता आला नसल्यास त्यासाठी त्यांनी भाजपकडून काही गोष्टी शिकाव्यात. ज्या राज्यात आपणास स्थान नाही तेथे आघाडीच्या शिडीवरून सत्तास्वर्ग गाठायचा आणि नंतर शिडी ढकलून द्यायची हे एके काळच्या काँग्रेसी प्रारूपाचे अनुकरण आजच्या भाजपकडून उत्तमपणे होते. धर्म हा मुद्दा सोडला तर आज भाजप हा पक्ष म्हणून काँग्रेसपेक्षाही अधिक काँग्रेसी बनलेला आहे हे वास्तव प्रामाणिक भाजपवासी आणि काँग्रेसी दोघेही नाकारणार नाहीत. अशा वेळी अन्य कोणा साथीदारांच्या मदतीने मिळालेला सत्तेतला चतकोर का असेना वाटा उपभोगायचा आणि शांतपणे स्वबळासाठी प्रयत्न करायचे की मुळात बळाचाच अभाव असताना उगाचच वचावचा करीत स्वबळाचे हाकारे घालायचे याची निवड काँग्रेसला करावी लागणार आहे. राजकारणातील सोयरीक ही नेहमीच सत्तेसाठी असते आणि प्रत्येकाचा प्रयत्न नेहमीच ती आपल्या एकटय़ास मिळावी यासाठी असतो. त्यात वावगे काहीच नाही. आताही काँग्रेसच काय पण राष्ट्रवादी वा शिवसेना हेदेखील सत्तेत वाटेकरी आहेत कारण त्यांना एकेकटय़ास सत्ता मिळालेली नाही, म्हणून. तेव्हा असे असताना आणि आघाडी ही अपरिहार्यता असताना उगाच स्वबळाचे हाकारे घालून काँग्रेस, त्यातही नाना पटोले, आपल्यातील न्यूनगंडाचेच दर्शन घडवीत आहेत.

आज परिस्थिती अशी की नानांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने अनेक मतदारसंघांतून उमेदवारी देऊ केली तरी कोणी त्या पक्षाच्या तिकिटावर लढण्यास तयार होणार नाही. एके काळी २८८ सदस्यांच्या विधानसभेत २००हून अधिक आमदार बाळगणाऱ्या काँग्रेसची अवस्था आज जेमतेम ४० आमदारांवर आली आहे. तेव्हा मुळात या पक्षाने आधी प्रयत्न करायला हवेत ती आपली परिस्थिती कशी सुधारेल यासाठी. इतक्या काडीपैलवानी अवस्थेतून काँग्रेस स्वबळाचे शड्ड ठोकत बसला तर त्यातून केवळ विनोदनिर्मिती होईल. पैलवानांची स्वबळ भाषा गांभीर्याने घेतली जाते. पण काडीपैलवानही त्याच भाषेत बोलू लागले तर ते हास्यास्पद ठरते.

काँग्रेस पक्ष म्हणून आता असा हास्यास्पद ठरू लागला आहे. आहेत ते आमदार, खासदार काँग्रेस पक्षात राहतील की नाही अशी परिस्थिती असताना नव्याने या ओसाड गावच्या पाटिलकीत रस घेणार कोण? स्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असे केले जाते, असा एक युक्तिवाद यावर केला जातो. पण ते मनोबल वाढवायचे असेल तर मुळात काँग्रेसने आपल्या नेतृत्वाचा प्रश्न आधी मिटवायला हवा. त्याबाबत काहीही हालचाल नाही. म्हणजे जे करायला हवे ते करायचे नाही आणि ज्याची गरज नाही, त्यात लक्ष घालायचे यात काय अर्थ? त्याने काहीही साध्य होणार नाही. तेव्हा नाना पटोले आणि तत्समांनी तोंडाची वाफ जरा कमी दवडावी आणि त्या वाचलेल्या ऊर्जेतून पक्षबांधणीकडे लक्ष द्यावे. आणि दुसरे असे की आघाडी की स्वबळ हा निर्णय घेताना नाना वा तत्समांना विचारतो कोण? शिवसेना-राष्ट्रवादीबरोबर मोट बांधताना ते विचारले गेले नाही आणि उद्या राष्ट्रीय पातळीवरही अशा आघाडीची वेळ आल्यास काँग्रेस श्रेष्ठी राज्यातील या बोलघेवडय़ांना विचारणाऱ्या नाहीत. तेव्हा बळे बळे ही स्वबळाची भाषा करण्यात काय शहाणपणा?