आपण असेच वागत राहिलो तर त्या वागण्याचा फायदा शिवसेनेलाच होणार आहे हे एकेकाळचे सेनानेते या नात्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कळायला हवे.. 

नारायण राणे यांची विवेकशून्य वचवच ऐकून शिवसेनेस हायसे वाटेल आणि भाजप हाय खाईल. राणे यांच्या या बडबडीमुळे आपल्याला हवा असलेला, आपल्या जातकुळीतील एक प्रतिस्पर्धी मिळाला म्हणून सेनेस हायसे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगतो की असा, या ‘दर्जा’चा प्रतिस्पर्धी जेव्हा जेव्हा उभा ठाकतो तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेचे भले होते. त्यामुळे आताही शिवसैनिकांनी आपल्या माजी नेत्याचे आभार मानायला हवेत. त्यांच्या या अद्वातद्वा वक्तव्यामुळे राज्यभरात शिवसैनिक कसे पेटून उठलेले दिसतात. एरवी करोना, त्याच्या वाढत्या टाळेबंद्या आणि सारख्या तिसऱ्या लाटेचे इशारे यामुळे गेले दीड वर्षभर सेनेचा श्रावणच जणू सुरू होता. राणे यांच्या या बेताल वक्तव्यामुळे सैनिकांच्या जिभेवरील शेवाळे दूर होण्यास मदतच होईल. तशी ती झाली असेल. पण राणे यांनी दिलेल्या या इतक्या ‘सुसंधी’नंतरही राज्य सरकारचा त्यांना अटक करण्याचा निर्णय अनाकलनीय आणि असमर्थनीयही म्हणावा लागेल. राणे यांना मोकळे (की मोकाट) सोडणे हे शिवसेनेच्या पथ्यावर पडले असते. पण अटक झाल्याने जनतेचा सहानुभूतीचा लंबक त्यांच्या दिशेला जाण्याचा धोका आहे.

lawrence bishnoi
अधोविश्व : पंजाब ते कॅनडा… बिष्णोई टोळीची दहशत
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”

खरे तर राणे यांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या चिंतन शिबिरास जास्त हादरा बसला असणार. श्रावणी सोमवारचा पवित्र उपवास सोडायच्या आशेने ताटावर बसावे तर यजमानाने पातेल्यातून एकदम नळीच वाढावी असे भाजपवासीयांस झाले असेल. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही वर्षांत अनेक गणंगांच्या खांद्यावर भगवी वस्त्रे चढवली. पारंपरिक, पापभीरू भाजप कार्यकर्ते आणि मतदार आपले नियत सतरंज्या काढण्याघालण्याचे आणि विनाअट पाठिंब्याचे काम करीत असताना अंथरलेल्या स्वच्छ सतरंज्यांवर हे असे चिखलाचे पाय घेऊन वहाणांसह बसणारे एकामागोमाग येताना पाहून त्यांना काय वाटेल याची कल्पनाच केलेली बरी. पण नारायणराव राणे देत असलेल्या वेदना त्यापेक्षाही अधिक. भळभळत्या जखमेवर लाल तिखटाची पूडच जणू. आयुष्यभर वाटेल त्या आरोपांस सामोरे गेलेल्या नेत्यांस एकतर आपले म्हणायचे, त्यासाठी इतरांच्या मागे जाणाऱ्या ईडी, सीबीआय आदी यंत्रणांस मनगटे चावताना पाहायचे, वर त्यांची केंद्रात थेट मंत्रिपदी पदोन्नती आणि नंतर ‘जनआशीर्वाद’ यात्रेच्या नावे या अशा नेत्याचा पाहुणचार करायचा!! एखाद्याच्या वेदनेस अंत नसावा म्हणजे किती हे समजून घ्यायचे असेल तर भाजप आणि नारायणराव राणे हे संबंध हे उत्तम उदाहरण ठरेल.

एकदा नव्हे दोन वेळा साधा आपला विधानसभा मतदारसंघही राखता न आलेल्या, चिरंजीवांचाही दारुण लोकसभा पराभव पाहणाऱ्या, काँग्रेसलाही जो नकोसा झाला होता त्या नेत्यास असे डोक्यावर घ्यावे लागणे ही आजच्या भाजपची खरी शोकांतिका! राणे यांचे राजकीय कर्तृत्व श्रीशांत नामे कथित जलद गोलंदाजाप्रमाणे. नुसतीच शैली आक्रमक. बळी काही नाहीत. ती आक्रमकता पाहून असे वाटावे काय गोलंदाज आहे हा! पण त्या आक्रमकतेने फेकलेल्या चेंडूवर साध्या किरकोळ फलंदाजानेही षटकार, चौकार ठोकलेला असायचा. नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द अशी आहे. नुसतेच आक्रमण. त्यातून फलनिष्पत्ती शून्य. खरे तर भाजपत आले नसते तर नारायण राणे हे किरीट सोमैया यांच्यासारख्या ‘आप’च्या दमानिया यांस आयुष्यभराचा आरोप-कार्यक्रम देते. पण हा बदलता भाजप इतक्या वर्षांनंतरही युवानेतेच राहिलेल्या सोमैया यांच्यापेक्षा राणे यांना अधिक समजला. भाजप प्रवेशासाठी जी काही पुण्याई लागते ती ‘खर्च’ करून राणे यांनी भाजपत प्रवेशही मिळवला आणि वर केंद्रीय मंत्रिपदही पटकावले. बिच्चाऱ्या सोमैया यांना उमेदवारीही ‘मिळवता’ आली नाही. असो. किरीट सोमैया हा काही या संपादकीयाचा विषय नाही. तो आहे नारायण राणे हा.

राजकारणात उपयुक्तता वा उपद्रवक्षमता हे दोन्ही समान प्रमाणात असावे लागते. नुसतीच उपयुक्तता असेल तर अनेक जुन्या भाजप नेत्यांप्रमाणे आयुष्यभर इतरांच्या पालख्यांस खांदा द्यावा लागतो. नुसतीच उपद्रवक्षमता असूनही चालत नाही. या दोन्हींचे प्रमाण समसमान हवे. राणे यांच्या पदोन्नतीच्या निमित्ताने हे आता तपासले जाईल. आगामी मुंबई महापालिका निवडणुका ही राणे यांची उपयुक्तता आणि तीच त्यांची उपद्रवक्षमताही. राज्य भाजपत ज्यांचा शब्द अजूनही चालतो ते नेते या निवडणुकांची जबाबदारी आशीष शेलार यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्या हाती देऊ इच्छित नाहीत. न जाणो भाजपस शेलार यांनी विजय मिळवून दिल्यास काय घ्या, ही चिंता! त्यांचे वजन पक्षात अधिकच वाढणार. मुंबई भाजपत शेलार हा नेता वगळता बाकीचे सर्व परोपजीवी पत्रकबहाद्दर. अशा वेळी एखाद्या मंत्रिपदाच्या बदल्यात सेनेवर सोडावा असा अन्य नेता म्हणजे नारायण राणेच. बरे केंद्रात मंत्रिपद दिलेले असल्याने मुंबई समजा जिंकलीच तर राणे यांना त्यापेक्षा अधिक काही द्यायची गरज नाही आणि मुंबईत समजा पराभव झालाच तर त्या पराभवाचे खापर फोडण्यास राणे आहेतच. अशा तऱ्हेने राणे हे भाजपसाठी असे उपयुक्ततावादी ठरतात.

पण याचा विसर खुद्द राणे यांनाच पडलेला असावा असे त्यांच्या वर्तनावरून दिसते. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली याचा अर्थ आपण खरोखरच कर्तृत्ववान वगैरे असणार असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतो. पण त्यांचे कथित कर्तृत्व हाच जर निकष असता तर राणे यांना भाजपत येऊनही प्रदीर्घ काळ आपल्या ताटात काही पडावे यासाठी इतके तिष्ठत बसावे लागले नसते. म्हणजेच मुंबई महापालिकेच्या निवडणुका नसत्या तर राणे अजूनही तसेच हातावर हात घेऊन वाट बघत राहते. या वास्तवाचे भान सुटल्यामुळे राणे यांच्यातील उपयुक्ततावादाची जागा उपद्रवमूल्याने घेतली. पण त्यांची ही उपद्रवक्षमता अशीच पाझरत राहिली तर ती प्रतिस्पर्धी शिवसेनेसाठी कमालीची उपयुक्त ठरणार ही काळ्या दगडावरची रेघ. भारतीय मतदारांत एक लोकोत्तर कौशल्य आहे. स्वत:च्या गंडापोटी कोणास धडा शिकवण्याची भाषा करत रणमैदानात फुशारक्या मारणाऱ्या कित्येक नेत्यांवर नंतर टाचा घासत बसायची वेळ आली आहे, हे राजकीय इतिहासाकडे वरवर पाहणाऱ्यासही कळेल. येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.

पण आपणास शिकण्यासारखे काही आहे असे राणे यांस वाटतच नाही, हीच तर खरी त्यांच्या प्रगतीतील अडचण. हा इतका गंड त्यांना कशाच्या जोरावर आहे हे कळणे अवघड आहे. राणे हे महाराष्ट्राचे सोडा, पण कोकण प्रांताचेही नेते होऊ शकले नाहीत. तरीही त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखाच. पण मानसशास्त्र सांगते की व्यक्ती जितकी असुरक्षित तितकी ती आक्रमक. तेव्हा आपली आक्रमकता ही अशी आहे काय याचा विचार राणे यांनी करावा. तसेच आपल्या कुडाळ मतदारसंघाप्रमाणे मुंबई महापालिकेतही अपयशच पदरी पडले तर आपली अवस्था काय होईल याचेही भान त्यांच्या ठायी हवे. तसे झाल्यास नव्या भाजपत त्यांची उपयुक्तताही नसेल आणि म्हणजे उपद्रवशक्तीही गेली असे होईल. हे असे होणे फारच केविलवाणे असेल.

तेव्हा झाली तेवढी शोभा पुरे. आपण असेच वागत राहिलो तर त्या वागण्याचा फायदा शिवसेनेलाच होणार आहे हे एकेकाळचे सेनानेते या नात्याने त्यांना कळायला हवे. हे किती ताणायचे याचा विचार सेनेसही आवश्यक. बऱ्याच गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण असते. संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे, ‘आधी होता वाघ्या। मग (दैवयोगे) झाला पाग्या। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।’ हे उभयतांनी लक्षात घ्यावे.