07 December 2019

News Flash

विद्रोहाचे व्याकरण

प्राध्यापिका होते आणि लेखिका होऊन पुढे नोबेल पारितोषिकाची ‘पहिली कृष्णवर्णीय महिला मानकरी’ ठरते.

शहाणिवेपर्यंतचा प्रवास एकेकटय़ानेच करायचा, हे सांगणाऱ्या टोनी मॉरिसन यांच्या गोष्टी अख्ख्या समाजाच्या झाल्या..

वयाच्या बाराव्या वर्षी, आठवडय़ाला दोन डॉलर पगारावर घरकामगार म्हणून राबणारी एक मुलगी मोठी झाल्यावर पदव्युत्तर पदवीपर्यंत शिकते, प्राध्यापिका होते आणि लेखिका होऊन पुढे नोबेल पारितोषिकाची ‘पहिली कृष्णवर्णीय महिला मानकरी’ ठरते. टोनी मॉरिसन यांच्या जीवनकार्याचे हे अगदी थोडक्यात वर्णन. टोनी मॉरिसन यांचे कार्य आणखीही मोठे आहे. पण त्या कोण, हे चटकन समजण्यासाठी थोडक्यात वर्णन करावे लागते. शिवाय, वर्णन थोडक्यातच असावे यासाठी नेमका कशाकशाचा उल्लेख करायचा, याची निवड करावी लागते. अशा निवडकपणामुळे काही जण नाराजही होतील, परंतु निवडकपणामागचा हेतू वाईट नसतो. उदाहरणार्थ, ‘नोबेल पारितोषिकाची पहिली कृष्णवर्णीय महिला मानकरी’ या उल्लेखाऐवजी ‘१९९३ चे साहित्य-नोबेल मिळवणाऱ्या’ असे म्हणून ‘कृष्णवर्णीय’, ‘महिला’ वगैरे उल्लेख टाळता आले नसते का, असे नाराजांपैकी काहींना वाटत असेल. त्यांचेही चूक नाही. पण वर्णविद्वेषाला लेखणीने खजील करणाऱ्या या लेखिकेविषयी सांगताना कशावर भर द्यायचा, हे ठरवावे लागणारच असते. ते तसे ठरवले जाण्यामागे अनेक घटक कार्यरत असतात. टोनी मॉरिसन यांची मृत्युवार्ता मंगळवारी आली, तेव्हा त्यांच्या ११ कादंबऱ्या, मुलांसाठी लिहिलेली पुस्तके, दोन नाटके, साहित्यिक चिंतनाचे एक पुस्तक यांपैकी काही थोडीच नावे त्यांचे साहित्य वाचलेल्यांना आठवली असणार. मात्र मॉरिसन यांचे साहित्य वाचलेलेच नसले, तरीही त्यांचे काही पैलू समजून घ्यावेत इतके उत्तुंग त्यांचे कर्तृत्व होते. वाचनसंस्कृतीच्या बहराचा- १९६०/७० या दशकांचा काळ ते ओहोटीचा आजचा काळ, या सर्व काळात त्यांचे वाचक वाढत राहिले. कुठेसे त्यांचे भाषण ऐकून, कुठलीशी त्यांची मुलाखत पाहून अथवा वाचून लोक त्यांचे वाचक झाले. आपल्या देशात टोनी मॉरिसन यांचे वाचक कमी असतील; पण मॉरिसन यांच्या वाटय़ाला जे आयुष्य आले, आसपास आणि अमेरिकाभर वंचितांचे जे जिणे त्यांनी पाहिले, तितकेच अनुभव आपल्या देशात असू शकतात. त्यातूनच तर आपले दलित साहित्य निर्माण झाले. मराठीतला हा प्रवाह दाक्षिणात्य राज्यांत सशक्त झाला आणि हिंदीत, बंगालीतही फोफावला. मग उदाहरणार्थ मराठी दलित साहित्यात असे काय नाही, की जे टोनी मॉरिसन यांच्याकडून घेतले पाहिजे? उत्तर प्रामाणिकपणे शोधायचे तर पुन्हा निवडीचा प्रश्न येईल.. ती करूच. त्याआधी टोनी मॉरिसन या साहित्यिक म्हणून कशा होत्या, याविषयी.

पुस्तक प्रकाशन व्यवसायातील एका बडय़ा संस्थेत संपादिकेची नोकरी टोनी मॉरिसन करीत. त्याआधी विद्यापीठात शिकवण्याचाही अनुभव त्यांना होता. भाषेचा पैस माहीत होता, भाषेवर प्रभुत्व होते आणि शब्दांची जाणही होती. एवढय़ा भांडवलावर, लेखिका न होतासुद्धा त्या बरी कमाई करू शकल्या असत्याच. तरीही वयाच्या तिशीत रात्री जागून, पहाटे लवकर उठून त्यांनी ‘द ब्लूएस्ट आय’ ही पहिली कादंबरी पूर्ण केली. का? तर, ‘मला जी गोष्ट वाचायची होती, ती कुणीच लिहीत नव्हते,’ म्हणून! ही गोष्ट कृष्णवर्णीय तरुण मुलीला केंद्रस्थानी मानणारी होती. पहिल्या कादंबरीत, वर्णाचा आणि त्यामुळे आलेल्या वंचिततेचा न्यूनगंड अखेर फेकून देणारी नायिका त्यांनी रंगवली. नंतरच्या कादंबऱ्यांत अमेरिकी गुलामगिरीच्या काळातील कृष्णवर्णीय जाणिवांचा, आजही भेदभावाच्या चटक्यांनी पोळणाऱ्या पुरुषांचा आणि सामाजिक व कौटुंबिक असा दुहेरी अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांचा वेध त्या घेत राहिल्या. यातून ‘बिलव्हेड’सारखी अजरामर कलाकृती निर्माण झाली. नायिका गुलाम आहे. मुलीचा जन्म झाल्यावर, ‘आपल्यासारखे आयुष्य तिला नको.. ती ‘दुसऱ्या जगा’त सुखी राहील..’ म्हणून तिचा गळा घोटणारी ही आई. पण गुलामांना त्या काळच्या अमेरिकेने मुलांवर हक्कच दिला नव्हता, म्हणून अपत्य-हत्येचे कलम न लावता ‘मालमत्तेचे नुकसान’ केल्याच्या आरोपावरून तिला तुरुंगात ठेवले आहे. तिची ती मुलगी, ‘त्या जगा’तून परत येऊन जाणून घेते, तू मला का मारलेस? त्यातून त्या अमानुष, क्रूर काळाच्या ‘समाजमान्यतां’ची लक्तरे उघडी पडतात. ती गोष्ट मानल्यास दोन कृष्णवर्णीय स्त्रीपात्रांची. त्यापेक्षा, गौरवर्णीय अमेरिकी लोक या दोघींसारख्या कित्येक जणींवर कसा अन्याय करीत होते, याची. ती सांगताना गौरवर्णीय पात्रांना ‘खलनायका’च्या भूमिकेत मॉरिसन यांनी कधीही आणले नाही. त्यांच्या कुठल्याही कादंबरीत खलनायिका, खलनायक नाहीतच. त्यांचे नायक वा नायिका मात्र गोंधळलेले, भांबावलेले, तरीही पुढे जाण्याची आस असलेले. असे पुढे जाण्यासाठी- किंवा का नाही जाता आले हे तरी समजण्यासाठी- आपणहून शहाणे होणे आवश्यक. तशा शहाणिवेपर्यंतचा प्रवास मॉरिसन यांच्या प्रत्येक कादंबरीत दिसतो. हा प्रवास एकेकटय़ा व्यक्तीचाच असतो. ज्याचा त्याने, जिचा तिने करायचा असतो. तरीही मॉरिसन सांगतात ती गोष्ट अख्ख्या समाजाची कशी काय होते?

या प्रश्नाच्या उत्तरातच मॉरिसन यांच्या विद्रोहाचे वेगळेपण दडलेले आहे. मॉरिसन यांच्या आधीचे अमेरिकी कृष्णवर्णीय लेखक प्रामुख्याने आत्मकथने लिहीत. जगभर आजही नवनवे विद्रोही लेखक आत्मकथनपर लिखाण करतात. ‘व्यक्तिगत तेही राजकीयच’ ही संकल्पना रुंदावणारे आणि साहित्य क्षेत्राला लोकशाहीच्या मार्गावर ठेवणारे परिणाम त्यातून साधतात आणि मुख्य म्हणजे, अन्याय वारंवार कसा होतच असतो हेही समोर येते. हेच ११ कादंबऱ्यांतून मॉरिसन यांनीही साधले. पण थेट आत्मकथन केले नाही. त्याऐवजी, जे आत्मकथा लिहिणारच नाहीत, अशांची तगमग कादंबरीत उतरवली. हे त्यांनी इंग्रजी साहित्याचे सारे संकेत पाळूनच केले. गोष्ट सांगण्यातली शक्ती त्यांनी ओळखली आणि आपले म्हणणे वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी सहजसोपेपणा हवा, पात्रे ठळक हवीत, कथानक हवे, प्रसंगी कलाटणी हवी या साऱ्या ‘साहित्याच्या प्रस्थापित गरजा’ त्यांनी पूर्ण केल्या. या गरजा केवळ ‘प्रस्थापित साहित्याच्या’ किंवा ‘प्रस्थापितांच्या साहित्यापुरत्या’ नसून वाचकांना साहित्याकडून काहीएक किमान गरजा असतात आणि त्यापैकी काही गरजा घट्ट या अर्थाने प्रस्थापित झालेल्या आहेत, हे त्यांनी ओळखले. हीच गोष्ट भाषेबद्दल.. पण ती ‘दर बारा कोसांवर बोली बदलते’ याचा अभिमान साहित्यप्रांतातही बाळगणाऱ्यांना रुचणार नाही. ती अशी की, टोनी यांनी वाक्य आणि परिच्छेदरचनेत कितीही नावीन्य आणले, तरी प्रमाणभाषेचा वापर सोडला नाही.

एवढय़ावरून घायकुतेपणाने आरोप करणे सोपे असते. बहुतेकदा हे आरोप, ‘तुम्ही प्रस्थापितच आहात.. तुम्हाला नाही कळणार’ असे म्हणत संवादच तोडण्याकडे झेपावतात. टोनी मॉरिसन यांच्यावर ते फार कमी झाले, कारण त्या इंग्रजीत लिहीत होत्या. आज सूरज येंगडेसारखे महाराष्ट्रात जन्मलेले आणि मराठीशी नाते असलेले तरुण इंग्रजीत लिहिताहेत, तेही इंग्रजीच्या प्रमाणभाषेतच. अशा वेळी, मायबोलीत लिहिले नाही म्हणून सूरज येंगडेचा विद्रोह खोटाच ठरवणे जर चुकीचे, तर तोच न्याय ‘प्रमाणभाषा’ म्हणून व्यवहारात असणाऱ्या मराठीलाही का लागत नाही?

विद्रोह आणि व्याकरण यांची ही फारकत कोणी का मान्य करावी? ‘विद्रोहाचे व्याकरण’ ही संकल्पना फार मोठी आहे. महात्मा फुले यांच्या निवडक लिखाणाचे जे संकलन सदानंद मोरे यांनी केले, त्या पुस्तकाचे नावही तेच, यातून या संकल्पनेचे मोठेपण स्पष्ट व्हावे. पण टोनी मॉरिसनकडून आजच्या साहित्यिकांनी तातडीने शिकण्याचा धडा असा की, व्याकरण पाळूनही विद्रोहाची धग टिकवता येतेच.

First Published on August 10, 2019 2:53 am

Web Title: loksatta editorial on nobel prize winning author toni morrison zws 70
Just Now!
X