03 March 2021

News Flash

जो तेलावरी विसंबला..

व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची माती करण्याचा शुभारंभ चावेझ यांनीच केला.

व्हेनेझुएला राष्ट्राध्यक्ष मादुरो

व्हेनेझुएलातील यादवीचे रूपांतर एका अर्थाने अमेरिका विरुद्ध रशिया, चीन अशा व्यापक संघर्षांत झाले आहे..

नैसर्गिक साधनसंपत्ती असेल तर जोरात प्रगती होते हा विश्वास खोडून काढणाऱ्यांतील एक देश म्हणजे व्हेनेझुएला. दक्षिण अमेरिका खंडातील या देशात मुबलक तेलसाठे आहेत. त्या अर्थाने तो जगातील काही नशीबवान देशांतील एक. परंतु सद्य:स्थितीत त्याची गणना जगातील भिकारी देशांत सहज होऊ शकेल. चलनवाढीचा दर १३ हजार टक्क्यांपर्यंत वाढलेला, तो यंदाच्या वर्षांत साधारण १० लाख टक्के होण्याची भीती, स्थानिक चलन बोलिव्हारची घसरण इतकी की एका अमेरिकी डॉलरच्या बदल्यात ६३७ बोलिव्हार येतात आणि या साऱ्यामुळे दर पंधरवडय़ास दुप्पट होणारे जीवनावश्यक घटकांचे भाव यामुळे व्हेनेझुएला या देशाचा कपाळमोक्ष झाला असून गेल्या वर्षभरात सुमारे तीस लाख व्हेनेझुएलन नागरिकांनी देशत्यागाचा मार्ग पत्करला आहे. कारण सुधारणांची शक्यता दूरवरदेखील नाही. या अशा देशाची एरवी दखल घ्यावी असे नाही. तथापि हे असे तेलसंपन्न देश राज्यकर्त्यांमुळे संकटात सापडतात त्या वेळी ते जागतिक पातळीवरील दबावगटांच्या हातातील खेळणे बनण्याचा धोका असतो. व्हेनेझुएलाबाबत तो ढळढळीतपणे समोर दिसतो. त्यामुळे त्या देशातील स्थिती समजून घेणे आवश्यक ठरते.

गेली जवळपास तीन दशके तो देश अशाच गत्रेत सापडलेला आहे. आधी चक्रमादित्य ह्युगो चावेझ यांनी त्यावर राज्य केले. खरे तर हा देश टीचभर. पण अमेरिकेविरोधात युद्धाची ललकारी देण्यापर्यंत चावेझ यांची मजल गेली. यातून ते चक्रमपणाच्या कोणत्या स्तरावर होते ते लक्षात यावे. त्या वेळी ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कच्छपि लागले आणि अमेरिकेस त्यांना धडा शिकवायचा होता. पुतिन यांच्या साह्याने त्यांना अमेरिकेच्या डॉलर या चलनासही आव्हान द्यायचे होते. चावेझ स्वतस समाजवादी म्हणवून घेत. गरिबी दूर करणे म्हणजे श्रीमंतांच्या कमाईवर डल्ला इतकी बालिश त्यांची समज. त्यामुळे त्यांनी संपत्तीनिर्मितीस जराही उत्तेजन दिले नाही. वर गरिबांना परवडावे म्हणून आपल्या देशात खनिज तेलाचे दर त्यांनी इतके कमी केले की भारतात शंभरभर रुपये मोजून जेवढे पेट्रोल मिळे त्याच वेळी सामान्य व्हेनेझुएली नागरिकास तेवढेच पेट्रोल अवघ्या दोन रुपयांएवढय़ा स्वस्तात उपलब्ध होत असे. वस्तूंच्या किमती सरकारी दट्टय़ाने कमी करणे इतकाच त्यांचा समाजवादी विचार. त्याचा परिणाम असा झाला की कोणताही कारखानदार त्या देशात गुंतवणूक करेना. कारण किंमत वसुलीची हमीच राहिली नाही. त्यांच्या या धोरणांवर बीबीसीच्या टिम सेबेस्टियन यांनी चावेझ यांना एका मुलाखतीत इतके घेरले की व्हेनेझुएलाचा हा अध्यक्ष थेट प्रक्षेपित होत असलेल्या मुलाखतीतून उठून निघून गेला. सेबेस्टियन त्या वेळी जराही विचलित झाले नाहीत. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष रागावून निघून गेले, इतकेच म्हणत बीबीसीने तो कार्यक्रम तसाच सुरू ठेवला. (आपल्याकडील तिळगुळाच्या गोड गोड मुलाखतींना सरावलेल्यांनी ती मुलाखत जरूर पाहावी.) तेव्हा व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची माती करण्याचा शुभारंभ चावेझ यांनीच केला.

हे अचाटबाहू चावेझ २०१३ साली अचानक काळाच्या पडद्याआड गेले. त्या वेळी झालेल्या निवडणुकीत त्यांचा चेला निकोलस मादुरो हा सत्तेवर आला. व्हेनेझुएलात अध्यक्षीय मुदत सहा वर्षांची. त्यामुळे ते २०१९ पर्यंत अध्यक्ष राहिले असते. पण राजकीय वारे प्रतिकूल आहेत याचा अंदाज आल्यावर त्यांनी गेल्या वर्षीच निवडणुका घेतल्या. विरोधकांना खिंडीत पकडून पराभूत करणे हा त्यामागचा विचार. त्यासाठी त्यांनी विरोधकांची मुस्कटदाबी केली, अनेकांची धरपकड केली आणि निवडणुकीत आपणच विजयी होऊ याची व्यवस्था केली. त्यामुळे विरोधकांनी या निवडणुकांवर बहिष्कारच घातला. अर्थातच पाश्चात्त्य जगाने या निवडणुकांना मान्यता दिली नाही. पण म्हणून मादुरो सत्ता सोडण्याची शक्यता नव्हतीच. त्यांनी उलट आपला खुंटा अधिकच बळकट करून घेतला. त्या निवडणुकीत तेच विजयी झाले. पण तरी त्यांनी शपथ घेतली नाही. नियमाप्रमाणे त्यांची अध्यक्षीय मुदत संपली असती जानेवारी २०१९ मध्ये. तेव्हा त्यांचे म्हणणे तेव्हापासूनच मी अध्यक्षपदाची सूत्रे घेणार. म्हणजे या महिन्यापासून पुढे सहा वर्षे त्यांना विनासायास अध्यक्ष राहता येणार. याला अर्थातच विरोधकांचा आक्षेप आहे. विरोधी आघाडीचे अवघ्या ३५ वर्षांचे युआन ग्वाईदो हे त्यांचे आव्हानवीर. सत्तेवर आता त्यांनी दावा सादर केला असून मादुरो हे अध्यक्ष नाहीतच, असे त्यांचे म्हणणे.

त्यास दुजोरा आहे तो अमेरिकेचा. त्याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे आपल्या आसपास साम्यवादी, समाजवादी विचारांची सरकारे त्या देशास आवडत नाहीत. अमेरिका रोकडा भांडवलशाही देश. परिसरात समाजवादी वा साम्यवादी कोणी आले की त्या देशाची डोकेदुखी वाढते. मग तो बोलिव्हिया असो वा व्हेनेझुएला वा क्यूबा. या देशांतील समाजवादविरोधी राजवटींना अमेरिकेने नेहमीच खतपाणी घातले. कारण त्यांच्याकडून अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांना बाधा पोहोचते. मादुरो हे चावेझ यांच्याच पावलावर पाऊल टाकून जाणारे असल्याने साहजिकच अमेरिकेस ते नकोसे आहेत. अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेस व्हेनेझुएलातील समाजवादी राजवट अधिकच खुपते. याचे कारण तो देश तेलसंपन्न आहे आणि तेलाच्या व्यापारावर नियंत्रण असलेल्या तेल निर्यातदार संघटनेचा क्रियाशील सदस्य आहे. या नात्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हेनेझुएला सातत्याने अमेरिकेस कोलवतो. तेव्हा त्यामुळे आधी ओबामा यांना चावेझ आणि आता ट्रम्प यांना मादुरो नकोसे झाले असतील तर आश्चर्य नाही. त्यामुळे अर्थातच ग्वाईदो यांना अमेरिकेची फूस आहे. साहजिकच रशियाचे पुतिन, चीनचे क्षी जिनपिंग आदी दांडग्या देशांचे प्रमुख मादुरो यांच्या पाठीशी आहेत. म्हणजे व्हेनेझुएलातील यादवीचे रूपांतर एका अर्थाने अमेरिका विरुद्ध रशिया, चीन अशा व्यापक संघर्षांत झाले असून मादुरो वा ग्वाईदो हे बडय़ांच्या हातातील खेळणेच ठरण्याची भीती आहे.

या साटमारीत नराश्य पदरी पडते ते सामान्य व्हेनेझुएली नागरिकांच्या. अशा लाखो नागरिकांनी गेल्या काही दिवसांत देशत्याग केला असून शेजारील कोलंबिया, ब्राझील, पेरू, चिली वा थेट युरोपातील स्पेन अशा देशांच्या आश्रयास हे व्हेनेझुएलन नागरिक जाऊ लागले आहेत. अमेरिका खंडातील अनेक देश एके काळी युरोपीय महासत्तांच्या वसाहती होत्या. त्यामुळे या नागरिकांना स्पेन आदी देशांचा आधार वाटतो. परंतु यामुळे एक मानवी समस्या तयार झाली असून या इतक्यांचे करायचे काय, असा प्रश्न शेजारील देशांना पडला असल्यास नवल नाही. यावर उताऱ्याचे सामर्थ्य आहे एकाच घटकात.

ते म्हणजे व्हेनेझुएलाचे लष्कर. अशा टिनपाट देशांतील सत्तास्थर्यात लष्कराचा मोठा वाटा असतो. सध्या तो मादुरो यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांचे पारडे तुलनेत जड भासते. पण लष्कराच्या पाठिंब्याची हमी देता येत नाही. कारण देशप्रेम, राष्ट्रहित आदींच्या नावाखाली वाटेल ते करण्याची मुभा लष्करास नेहमीच असते. त्यात मादुरो यांनी लष्करावर सवलतींचा वर्षांव केलेला असल्याने सध्या तरी ते त्यांच्या मागे आहेत. पण दुसऱ्याने त्यापेक्षा अधिक काही दिले तर लष्कर त्यामागे जाणार नाही, असे अर्थातच नाही.

‘‘तेल म्हणजे दैत्याची विष्ठा. त्याचा भरवसा धरू नका. अन्यथा बुडाल,’’ असे १९६० च्या दशकात ओपेकच्या स्थापनेत लक्षणीय भूमिका बजावणारे व्हेनेझुएलाचे द्रष्टे नेते युआन पाब्लो पेरेझ अल्फान्सो सांगत. त्यांच्याच उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सिद्ध करून दाखवले. व्हेनेझुएलाचे हे संकट अन्य देशांसमोरील आर्थिक आव्हान अधिकच गडद करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:16 am

Web Title: loksatta editorial on political crisis in venezuela
Next Stories
1 संकल्पाचा अर्थ
2 विराट कोहलीचा महिमा
3 सारे कसे शांत शांत..!
Just Now!
X