24 March 2019

News Flash

करुणानिधींचे कर्तृत्व

पेरियार रामस्वामी आणि नंतर पुढे अण्णा दुराई यांच्याकडून ते करुणानिधी यांनी आत्मसात केले.

करुणानिधी

प्रादेशिक अस्मिता हा करुणानिधी यांच्या राजकारणाचा प्राण होता.. या अस्मितावादाचा अतिरेकही झाला, पण राजकीय महत्त्व वाढले..

प्रभू राम हा काय बांधकाम अभियंता होता का, असा प्रश्न जाहीरपणे विचारण्याची हिंमत असलेला किंवा वयपरत्वे आलेल्या व्याधींनी दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहावे लागले असता कपाळावर लावलेला अंगारा अर्धग्लानी अवस्थेतही पुसून टाकण्याएवढी बुद्धिनिष्ठा दाखवणारा आणि तरीही यशस्वी नेता भारतीय राजकारणात तसा अवघडच. नास्तिक म्हणता येतील असे नेते आपल्याकडे आहेत आणि राजकारणात यशस्वी तर खूपच आहेत. परंतु या दोन्हींचे संधान बांधणारा आणि ही बुद्धिवादी भूमिका आयुष्यभर पाळणारा नेता म्हणून मुथुवेल करुणानिधी महत्त्वाचे ठरतात. ते आता निवर्तले. ज्या राज्यात धार्मिक कर्मकांडाचे कमालीचे अवडंबर माजवले जाते आणि शास्त्रीय संगीतासारख्या अलौकिक कलेसही धर्मकांडाशी जोडले जाते त्या प्रदेशात करुणानिधी प्रचंड लोकप्रिय नेते होते ही बाब चांगलीच कौतुकास्पद ठरते. त्या नेत्यासाठी आणि त्या प्रदेशासाठीही. हा पेरियार रामस्वामी यांनी द्रविड चळवळीस दिलेला वसा. तो करुणानिधी यांनी शेवटपर्यंत जोपासला. परंतु ते उतले नाहीत अथवा मातले नाहीत, असे मात्र म्हणता येणार नाही.

आयुष्यभर राज्यस्तरीय राहूनसुद्धा, प्रादेशिक स्तरावरच काम करूनसुद्धा राष्ट्रीय नेते म्हणून गणता येते हे आपल्या देशात काही मोजक्याच नेत्यांनी दाखवून दिले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू आणि द्रविड मुन्नेत्र कळहमचे करुणानिधी. बसू यांचा पक्ष निदान कागदोपत्री का असेना पण राष्ट्रीय होता. करुणानिधी यांचे तसेही नाही. ते सर्वार्थाने तमिळनाडू प्रांतापुरतेच मर्यादित होते. पण तरीही करुणानिधी कोणत्या दिशेला आहेत हे पाहणे राष्ट्रीय म्हणवून घेणारे पक्ष अणि त्यांच्या उत्तरभारतकेंद्री नेत्यांसाठी आवश्यक असे. ही बाब आपल्या देशात अत्यंत महत्त्वाची. त्यामागील आणखी एक कारण म्हणजे करुणानिधी यांनी दाखवलेले राजकीय कर्तृत्व.. आणि नंतर त्यांचे सहकारी आणि पुढे स्पर्धक एम जी रामचंद्रन यांचे त्यास वेगळ्या अर्थी मिळालेले सहकार्य. ते असे की हयात असेपर्यंत करुणानिधी यांनी आपल्या राज्यात राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या पक्षांना पाय रोवू दिला नाही. या वास्तवाच्या गुणावगुणांची चर्चा होऊ शकेल. परंतु ती नाकारता मात्र कोणालाही येणार नाही. या वास्तवामुळे प्रभू रामचंद्रास आराध्य दैवत मानणाऱ्या भारतीय जनता पक्षास करुणानिधी यांचे लांगूलचालन करावे लागले आणि सर्वानाच तोंडदेखले मानणाऱ्या काँग्रेसवरही करुणानिधी यांच्यापुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. एकदा नव्हे अनेकदा. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहिष्णू, उदारमतवादी काळातही करुणानिधी आपल्या बाजूला हवेत असे भाजपला वाटले आणि आताच्या धर्माधिष्ठित आणि आमचे आम्ही मानणाऱ्या भाजपलाही करुणानिधींना जिंकावेसे वाटते. म्हणूनच ज्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आपण रान उठवले, ज्यांचा भ्रष्टाचार हा आपल्या राजकारणाचा पाया होता त्या दूरसंचारी ए राजा यांना निर्दोष सोडल्यानंतर करुणानिधी यांचे अभिनंदन करावयास पहिले गेले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. ही करुणानिधी यांच्या राजकारणाची ताकद. ती करुणानिधी पूर्ण ओळखून होते. म्हणूनच एकाच वेळी काँग्रेस आणि नंतर लगेच भाजप किंवा उलटही, अशी स्वप्रदेशकेंद्रित समीकरणे करुणानिधी हवी तशी बांधू शकले. २००४ साली वाजपेयी सरकारचा नि:पात होण्यामागच्या दोन प्रमुख कारणांतील एक होते द्रमुकने त्या निवडणुकीत भाजपशी घेतलेला काडीमोड. ती नौबत न ओढवता भाजपने संसार टिकवला असता तर २००४ साली काँग्रेस विजयी होती ना. २००४ पर्यंत भाजपबरोबर सत्तेत असलेल्या करुणानिधी यांनी त्या निवडणुकीनंतर कूस बदलली आणि काँग्रेसशी सत्तासोबत करून ए राजा, दयानिधी मारन यांना केंद्रात मनमोहन सिंग सरकारात मंत्रिपद देववले.

ही प्रादेशिक अस्मिता हा करुणानिधी यांच्या राजकारणाचा प्राण होता. अस्मितेचा अतिरेक -मग ती भाषेची असो की धर्माची- हा विवेकाच्या मुळावर उठतो. करुणानिधी यांच्याबाबतही असे झाले. केवळ तमिळ प्रेम वा असोशी यामुळे त्यांनी भारतीय भूमीत आकारात येत असलेल्या तमिळ वाघांच्या भस्मासुराकडे काणाडोळा केला. किंबहुना श्रीलंकेतील या फुटीरतावाद्यांना केवळ भाषक अस्मितेपोटी करुणानिधी यांनी पोसले. त्यातून पुढे काय झाले हा इतिहास ताजा आहे. तो उगाळण्याचे हे स्थळ आणि प्रसंगही नव्हे. भारतासारख्या खंडप्राय आणि अगडबंब देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना या प्रादेशिक अस्मितांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा धडा करुणानिधी यांच्या राजकारणात आहे. तो समजून घ्यायला हवा. नपेक्षा प्रत्येक राज्यात जाऊन तेथील प्रादेशिक पक्षांच्या जिवावर उठलेल्या भाजप वा अमित शहा यांना तमिळनाडूत द्रमुकमुक्त तमिळनाडू अशी हाक देण्याची हिंमत का झाली नाही, हे कळणार नाही. अमित शहा बंगालात जाऊन तृणमूलमुक्त बंगाल करायला हवे, असे म्हणू शकले. पण तमिळनाडूत ते शक्य झाले नाही. हे करुणानिधी यांच्या राजकारणाचे मोठेपण.

पेरियार रामस्वामी आणि नंतर पुढे अण्णा दुराई यांच्याकडून ते करुणानिधी यांनी आत्मसात केले. भाषेवर कमालीची हुकूमत, खरे तर तमिळ भाषेचा अभिजात आविष्कारी, उत्तम लेखक, अद्भुत म्हणावी अशी स्मरणशक्ती, हजरजबाबी आणि वाक्पटू आणि प्रसंगी निष्ठुर म्हणता येईल इतके टोकाचे राजकारण करण्याची क्षमता ही करुणानिधी यांची वैशिष्टय़े. ती पहिल्यांदा पेरियार रामस्वामी यांनी ओळखली त्या वेळी करुणानिधी विशीतदेखील नव्हते. तरीही पेरियार यांनी या तरुणास जवळ केले. पुढे त्यांच्यानंतर तेच द्रमुकचे उत्तराधिकारी बनले आणि नंतर पक्षप्रमुखही झाले. १९६९ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पाच वेळा त्यांनी हे पद भूषवले. ही मुख्यमंत्रिपदाची त्यांची कारकीर्द साधारण दोन दशकांची आहे. तमिळनाडू राज्यास उद्योग आणि व्यापारस्नेही बनवण्याचे श्रेय निर्विवाद त्यांचे. पुढे पक्षातून फुटल्यानंर एम जी रामचंद्रन आणि नंतर त्यांच्या उत्तराधिकारी जयललिता यांनी जी धोरणे राबवली त्यांचा प्रारंभ हा करुणानिधी यांच्या काळात झालेला आहे. तमिळनाडू त्याचमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत श्रीमंत राहिले. करुणानिधी आधी कूदन्कुलमच्या अणुकेंद्राविरोधात होते. तशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली. परंतु हे केंद्र तमिळनाडूत उभे राहिल्यास दहाएक हजार तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मिटेल असे ज्या क्षणास त्यांना कळले त्या वेळी त्यांनी लगेच या केंद्राचा पाठपुरावा सुरू केला. आपल्याच भूमिकेचे वजन त्यांनी कधी स्वत:वर येऊ दिले नाही. चेन्नईजवळ वाहन उद्योगाचे केंद्र सुरू झाले ते करुणानिधी यांच्या धोरणीपणामुळेच.

हा धोरणीपणा हे त्यांचे महत्त्वाचे राजकीय वैशिष्टय़. त्यामुळे कोणत्याही आरोपांना त्यांनी कधीही भीक घातली नाही. घराणेशाही, नातेवाईकशाही यांचे ते प्रच्छन्न प्रतीक होते. सर्व सत्ता आपल्या वा आपल्या आप्तेष्टांच्या हातीच कशी केंद्रित राहील हे त्यांनी सातत्याने पाहिले. पण त्यात एक विचित्र वाटेल असा विसंवाद होता. तो नेते तयार करण्याच्या त्यांच्या वृत्तीत. द्रमुकचे जिल्हय़ाजिल्हय़ांत नेतृत्व तयार होईल असा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. अमर्याद सत्ता आली की भ्रष्टाचार संधीही अमर्याद येतात. करुणानिधी यांनी त्या साधल्या नाहीत, असे म्हणता येणार नाही. भारतीय राजकारणातील सर्व पारंपरिक गुणदोषांनी त्यांची राजकीय कारकीर्द परिपूर्ण अशीच होती. परंतु त्यांचे मूल्यमापन होईल ते त्यांनी मागे काय ठेवले आहे, यावर.

देशात सर्व सत्ता केंद्राकडेच असावी आणि केंद्रातही सत्ताकेंद्र एकच असावे असा विचार आणि कृती बळावत असल्याच्या काळात करुणानिधी यांचा वारसा महत्त्वाचा ठरतो. तो प्रजासत्ताकवादी आणि संघराज्यवादी आहे. धार्मिक, संघकेंद्रित राजकारणाचा प्रभाव वाढत असताना निधर्मी, संघराज्यवादी करुणानिधी आणि त्यांचे राजकारण म्हणूनच महत्त्वाचे, दखलपात्र आणि काही अंशी अनुकरणीय ठरते.

First Published on August 9, 2018 1:13 am

Web Title: loksatta editorial on tamilnadu popular leader m karunanidhi