लोकशाहीच्या कडबोळ्यापेक्षा एकटाच कोणी खमका बरा, ही भावना किती धोकादायक आहे हे थायलंडसारख्या देशात सध्या जे सुरू आहे त्यातून समजून घेता येईल..

अमेरिकेतील निवडणुका, युरोपातील करोना-साथ आदी महत्त्वाच्या घटनांच्या भाऊगर्दीत आपल्या कोपऱ्यावरील थायलंड देशातील अनागोंदी काहीशी दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. पलीकडच्या हाँगकाँगमधील घटनांच्या निमित्ताने चीनचा वेध घेता येतो. खुद्द चीन हाच मोठा बातम्यांचा विषय राहिलेला आहे. म्यानमारसारख्या देशात रोहिंग्या मुसलमान आणि आँग सान स्यु की यांचे लबाड राजकारण हे विषय वृत्तवेधी राहिलेले आहेत. बांगलादेश, श्रीलंका या देशांचे त्यांचे त्यांचे काही भूराजकीय, सामरिक असे महत्त्व आहे. त्या मानाने थायलंड हा देश तसा वृत्तदृष्टय़ा दुर्लक्षितच. पर्यटन आणि मौजमजा यांच्याशीच थायलंड जोडला गेलेला असल्यानेही असेल, पण त्या देशातील इतक्या महत्त्वाच्या घटनांकडे आपल्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, हे खरे. सध्या त्या देशात जे काही सुरू आहे ते पारंपरिक समाजात आधुनिक लोकशाही मूल्ये रुजवणे ही किती प्रदीर्घ प्रक्रिया आहे याचे निदर्शक असल्याने समजून घेणे आवश्यक ठरते.

या देशात राजा आहे. तो असूनही लोकशाही आहे. राजाच्या आशीर्वादाने काम करू पाहणारा पंतप्रधान आहे आणि त्या आशीर्वादाच्या बदल्यात राजाच्या कृष्णकृत्यांकडे दुर्लक्ष करण्याची त्याची तयारी आहे. आणि ही कृष्णकृत्ये तरी काय? तर पैशाची प्रचंड अफरातफर आणि त्याच्या आधारे सततचा सुरू असलेला लैंगिक विकृतोत्सव. त्यातही हास्यास्पद भाग म्हणजे, विद्यमान राजा महा वजीरालोंगकोर्न हा आपल्या प्रजेबरोबर राहायला तयार नाही. तो राहतो जर्मनीत. आपल्या लग्नाच्या बायका आणि २० ललनांचा रंगमहाल यांच्यासमवेत. त्यांच्या तेथे राहण्याची आणि जीवनशैलीची खरे तर जर्मनीसही लाज वाटते. ‘मोटारसायकली उडवणे, खाणे आणि संग करणे या तीन गोष्टींतच थायलंडच्या महाराजांना रस आहे,’ असे जर्मन अधिकाऱ्याचे अलीकडचे वक्तव्य. या महाराजा महा वजीरालोंगकोर्न यांच्या चार पत्नी होऊन गेल्या. त्यांपासून झालेल्या आपल्या अपत्यांनाच हे महाराज ओळख नाकारतात. अलीकडेच एका महिला विमान कर्मचारीस या महाराजाने अधिकृत अंगवस्त्रचा दर्जा देऊन सर्वानाच ओशाळे केले. आपल्या जन्मदिनी आपल्या एका पत्नीकडून नग्नावस्थेत रांगत जन्मदिनाचा केक कापून घेणारा आणि त्याची अशी चित्रफीत काढण्याइतका हा महाराज विकृत आहे. आणि इतके करून त्यांनी या ‘राणी’स हाकलूनच दिले, ही बाब अलाहिदा. खरे तर यांचे वडील भूमीबोन अदुल्यादेज हे त्या देशातील त्यातल्या त्यात आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्मदिन थायलंडमध्ये पितृदिन म्हणून ओळखला जातो. ते हयात होते तोपर्यंत त्या देशातील नागरिकांना राजेशाही कधीही तापदायक वाटली नाही. वास्तविक हे भूमीबोन हे सौदी राजघराण्यापेक्षाही अधिक ऐश्वर्यसंपन्न होते. पण त्याचे विकृत प्रदर्शन त्यांनी केले नाही. त्यांचे चिरंजीव वजीरालोंगकोर्न हे गादीवर आले आणि सर्वच धरबंध सुटले. थायलंडवासीयांच्या अपेक्षाभंगास सुरुवात झाली. वास्तविक विद्यमान राजे हे पाश्चात्त्य विद्याविभूषित. तीर्थरूपांनी जगातील उत्तमोत्तम विद्यापीठांतून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर ते युद्धकलेतही पारंगत. ऑस्ट्रेलिया, युरोपातील उच्च दर्जाच्या लष्करी विद्यापीठांतूनही त्यांनी शिक्षण घेतले. त्याचमुळे हे महाराज एकाच वेळी एअर चीफ मार्शल, जनरल आणि अ‍ॅडमिरल म्हणजे हवाई दल, भूदल आणि नौदल अशा तीनही सेनांचे प्रमुख आहेत. त्या देशाची सैन्यदले ही पंतप्रधानापेक्षा राजघराण्याशी अधिक निष्ठावान असतात. त्यामुळे कागदोपत्री लोकशाही असली तरी राजा, लष्कर आणि सत्ता हे त्रराशिक त्या देशात नेहमीच दोलायमान राहिलेले आहे.

जोपर्यंत भूमीबोन गादीवर होते आणि पंतप्रधानपदी थकसिन सिनावात यांच्यासारखी जनाधार असलेली व्यक्ती होती तोपर्यंत सारे काही सुरळीत होते. जी काही नाराजी निर्माण होत असे तीस सनदशीर मार्गानी वाट करून दिली जात असे. पण २०१६ साली भूमीबोन यांच्यानंतर हे विद्यमान राजे गादीवर आले आणि सारेच चित्र बदलले. पुढच्याच वर्षी त्यांनी सर्व सरकारी संपत्तीवर ताबा मिळवला. त्या देशात अनेक खासगी उद्योगांतही सरकारी मालकी आहे.. सरकारी म्हणजे राजाच्या वतीने झालेली.. त्याचा पुरेपूर फायदा या जर्मन-स्थित थायी महाराजांनी घेतला. त्यामुळे आता सरकारी महसुलाचा मोठा वाटा त्यांच्या मौजमजेवर खर्च होतो. त्यातूनच लिबियाच्या कर्नल मुअम्मर गडाफीप्रमाणे ते स्वत:साठी फक्त महिला शरीररक्षकांची तुकडी तैनात करू शकतात. त्यात परत थायी घटनेनुसार सरकारी महसुलाचा काही ठरावीक वाटा हा राजाच्या चरणी वाहावा लागतो. आधीच आर्थिक संकट अनुभवणारी थायी जनता राजाच्या या मौजमजेवर संतापली असेल तर त्यात काही गैर नाही. गेली दोन वर्षे हा राजा अधिकाधिक अधिकार आपल्या हाती घेऊ लागला आणि पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा हे त्याच्या हातचे बाहुले बनत गेले.

ही परस्पर सोयीची व्यवस्था. निकम्म्या पंतप्रधानास बदमाश राजसत्तेचा आधार. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया ही या दोघांपुरतीच कल्याणकारी. वास्तविक हे पंतप्रधान प्रयुथ हे एके काळचे लष्करी अधिकारी. त्यांनी काही वर्षांपूर्वीच राजसत्तेविरोधात बंड छेडले. त्या वेळी अनेकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. त्यानंतर त्यांनी राजसत्ता हस्तगत केली. क्रांतीमार्गे सत्ता हस्तगत करणारे अंतत: ज्याच्याविरोधात क्रांती केली त्याच्यासारखेच वागू लागतात. हा जगाचा इतिहास आहे. त्याचीच पुनरावृत्ती थायलंडमध्ये घडत गेली आणि या विकृत सोयीच्या राजकारणातून लोकशाहीचा संकोच होत गेला. गेल्या जुलै महिन्यापासून याबाबत अस्वस्थता होती. पण करोनाच्या निमित्ताने राजसत्तेने तीस वाचा फुटू दिली नाही. पण त्या विषाणूचे भय कमी झाल्यावर जनता पुन्हा संघटित होऊ लागली आणि बँकॉक आदी शहरांत तिचा उद्रेक होऊ लागला. तसे तो होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे राजेशाहीविरोधात नाराजीदेखील व्यक्त करण्यास सरकारने घातलेली मनाई. राजसत्तेची साधी टिंगल जरी केली तरी तो देशद्रोहाचा गुन्हा मानला जाईल असा फतवा सरकारने काढला. इतकेच नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली. परिणामी राजाचा निषेध करणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांस जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे तरुणाईचा उद्रेक अधिकच तीव्र झाला नसता तर नवल. आर्थिक आघाडीवर पूर्ण अपयश, त्यामुळे आटलेल्या रोजगार संधी, बेरोजगारांचे वाढते तांडे, या अवस्थेतही छानछोकीत राहणारे सत्ताधीश आणि या सगळ्यावर मुस्कटदाबी. इतके स्फोटक रसायन मिळाल्यावर जनतेचा उद्रेक होणारच. तसाच तो सध्या थायलंडमध्ये पाहायला मिळतो. वर त्या देशाची अडचण म्हणजे पंतप्रधानाकडे कोणताही राजकीय अधिकार नाही आणि ज्याच्या नावे तो राज्य करतो त्या राजास नैतिकता म्हणजे काय हेच माहीत नाही. अशा परिस्थितीत त्या देशातील आगडोंब शांत करणार कोण आणि कसा हा प्रश्न आहे.

हे सर्व बरेच काही शिकवणारे आहे. आशिया खंडातील, तिसऱ्या जगातील अनेक देशांत अद्यापही राजेशाहीविषयी वा एकचालकानुवर्तित्वाविषयी सुप्त आकर्षण आहे. लोकशाहीच्या कडबोळ्यापेक्षा एकटाच कोणी खमका बरा, अशी बालिश भावना अनेकांच्या मनी अजूनही दिसते. ती किती धोकादायक आहे हे थायलंडसारख्या कोवळ्या लोकशाही देशातून समजून घेता येईल. अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स म्हणाले होते त्याप्रमाणे, राजेशाहीच्या तुलनेत लोकशाहीची लवकर दमछाक होते आणि तीस आत्मघाताचा धोका असतो. हे खरेच. तो टाळण्याचे महत्त्व थायलंडमधील तरुणाईने जाणले ही बाब कौतुकास्पद.