कॉमिक्ससाठी तरुणपणी लिखाण करण्याचीही लाज वाटणारे स्टॅन ली पुढे याच जादूई दुनियेचे महानायक झाले, ते कसे?

स्टॅनले मार्टिन लीबरला लिहिण्याची कला थोडीफार अवगत होती आणि अमेरिकेत किमान त्या काळात तरी इतर अनेक होतकरू लेखकांप्रमाणे त्यालाही एखादी ‘उत्तुंग कादंबरी’ लिहूनच स्वत:ची हौस जिरवायची होती. पण त्यापूर्वी चरितार्थासाठी ‘टाइम्ली कॉमिक्स’साठी फुटकळ लिखाण आणि फुटकळ कामे करावी लागत, याची त्याला प्रचंड लाज वाटे. त्यामुळेच मूळ नावाऐवजी ‘स्टॅन ली’ हे टोपणनाव त्याने धारण केले. कॉमिक्ससाठी लिखाण करणाऱ्या या धडपडय़ा महत्त्वाकांक्षी तरुणाने एकाहून एक मोठय़ा, आभासी पण प्रचंड लोकप्रिय महानायकांची जादूई दुनिया निर्माण केली. जगभरच्या चाहत्यांना वेड लावून नुकतेच आयुष्याला पूर्णविराम मिळालेले स्टॅन ली यांचा हा प्रवास त्यांच्या कंपनीच्या नावाप्रमाणेच एक ‘माव्‍‌र्हल’ ठरला. हे आश्चर्य नेमके कशाने घडले?

महामंदीच्या उत्तरार्धात अमेरिकेत उद्यमी तरुणांमध्ये काळाच्या प्रवाहाच्या विरोधात काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी होती. स्टॅन ली त्यांतलेच एक. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी स्टॅन ली कॉमिक्ससाठी गोष्टी लिहू लागले आणि लगेचच म्हणजे एकोणिसाव्या वर्षी संपादकही बनले. अमेरिकन संस्कृती उद्यमशील, कष्टाळू असली तरी युरोपीय, आशियाई संस्कृतींप्रमाणे ती जडजंबाळ नाही. एकीकडे चंगळवादाचे स्वागत करतानाच तिला नेहमीच खुसखुशीत विरंगुळ्याची गरज भासत आली. असा विरंगुळा सुरुवातीला कार्टून पात्रांमधून, मग कॉमिक्समधून आणि नंतर सिनेमांमधून शोधला गेला. अजूनही अमेरिकी समाजासाठी या घटकांची गरज संपुष्टात आलेली नाही. उलट वाढत जाऊन तिने अमेरिकेबाहेरील जगालाही वेड लावले. त्यामुळेच डिस्नेचे डोनाल्ड डक आणि मिकी माऊस असोत की ‘डीसी कॉमिक्स’चे सुपरमॅन, बॅटमॅन किंवा स्टॅन ली यांच्या ‘माव्‍‌र्हल’चे स्पायडरमॅन, एक्स-मेन.. कॉमिक्स पात्रांभोवतीचे वलय कायम आहे. इतर कोणत्याही कलासक्त देशात किंवा चोखंदळ संस्कृतीमध्ये वॉल्ट डिस्ने किंवा स्टॅन ली यांचे वर्णन ‘फुटकळ’, ‘गल्लाभरू’ किंवा ‘लोकानुनयी’ यांच्यापलीकडे केले गेले नसते. अमेरिकेत ही मंडळी उत्तुंग आणि अजरामर बनली.

स्टॅन ली यांनी ज्या प्रकारे कॉमिक्सच्या अडगळीतल्या दुनियेला लाखो डॉलरच्या झगमगत्या सिनेजगतात परिवर्तित केले, ते थक्क करणारे होते. स्पायडरमॅन, एक्स-मेन, दि हल्क, दि अ‍ॅव्हेंजर्स, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर अशा अनेक कॉमिक्स पात्रांवर आधारित कोटय़वधी डॉलरच्या उलाढालीचे सिनेमे बनले आणि अजूनही घडवले जात आहेत. कॉमिक्स पुस्तकांचे संपादन करून, चाळिशीतच ली कंटाळले. तेव्हा पत्नीने पाठपुरावा केल्यामुळे ली यांनी स्वत:च पात्रांची निर्मिती सुरू केली. ‘फँटॅस्टिक फोर’ ही चौकडी यातूनच जन्माला आली. चार अंतराळवीर अवकाशात जातात आणि अवकाशातील किरणांमुळे त्यांना दैवी शक्ती प्राप्त होते. कथा अजिबातच अभिजात वगैरे नाही. पण अद्भुत कथांच्या दुनियेत कालातीत ठरावी अशी. ‘टाइम्ली कॉमिक्स’साठी काम करत असताना त्यांचे त्या वेळचे बॉस मार्टिन गुडमन यांनी दोन उद्योगमंत्र दिले : एखादी गोष्ट विकली गेली, तर बाजारात तिचा अतिरेक होईपर्यंत विकत राहायची, हा पहिला मंत्र. चाहत्यांना दर्जामध्ये रस नसतो, हा दुसरा मंत्र! हे मंत्र आणि पत्नीकडून मिळालेले प्रोत्साहन यांच्या जोरावर ली यांनी एकामागोमाग एक महानायक किंवा सुपरहिरोंना जन्माला घातले. ते महानायक होते, पण त्यांच्या कथा सर्वसामान्यांना आवडेल अशाच होत्या. म्हणजे स्पायडरमॅन हा ‘स्पायडरमॅन’ नसतो, तेव्हा तो एखाद्या ऑफिसात बॉसच्या कटकटीला कावलेला सामान्य कर्मचारीच असतो. पण एका सिनेमात तो शक्तिशाली बनतो, त्या वेळी ‘ताकदीबरोबर जबाबदारीही कळली पाहिजे’ असे ऐकवतो. तो काळ जॉर्ज बुश धाकटे यांच्या युद्धखोरीचा होता हा योगायोग नव्हे! ‘दि हल्क’मधील मुख्य पात्राच्या संतापाचा विस्फोट होतो, तेव्हाच त्याचे अमानवी ताकदीच्या भेसूर राक्षसात रूपांतर होते, हेही प्रतीकात्मक. काहीसे आपल्याकडील ‘अँटिहिरो’च्या किंवा ‘अँग्री यंग मॅन’च्या मार्गाने जाणारे. स्टॅन ली यांनी या पात्रांमध्ये ‘बिझनेस’ आणि ‘मर्कन्डायझिंग’ शोधले. हा तसा दुर्लक्षित, पण महत्त्वाचा गुण. स्टॅन ली यांची ‘माव्‍‌र्हल’ दुनिया केवळ मुलांची राहिली नाही. लहान मुले म्हणून ‘माव्‍‌र्हल’च्या कॉमिक्सचा फडशा पाडलेल्या एका पिढीने मोठे झाल्यानंतर त्याच सुपरहिरोंना सिनेमाच्या पडद्यावरही पाहिले, आस्वादले आणि कवटाळले. ही चक्राकार जादू स्टॅन ली यांनी जवळपास अर्धा दशक करून दाखवली. ‘एक्स-मेन’ आणि ‘ब्लॅक पँथर’ भेदाभेद केंद्रस्थानी ठेवून येतात. भांडवलशाही आणि शस्त्रास्त्रे यांच्या परस्परसंबंधांवर ‘आयर्न मॅन’ प्रकाश टाकतो. ‘कॅप्टन अमेरिका’ काही प्रमाणात अमेरिकेच्या अतिरेकी राष्ट्रप्रेमाचे (जिंगोइझम) दर्शन घडवतो. स्टॅन ली यांची कथानके आणि पात्रे असे काही ना काही सांगत असतात. त्याविषयी स्टॅन ली संवेदनशील कितपत होते याचे स्पष्ट पुरावे आढळत नसल्यामुळे निव्वळ पोरखेळ असेच या कॉमिक्सच्या दुनियेकडे आणि सिनेमा मांदियाळीकडे पाहिले गेले. पण हा ‘पोरखेळ’ खचितच नव्हता!

अमेरिकी समाजात विशेषत: ६० आणि ७०च्या दशकांमध्ये समानता, भेदाभेद, आर्थिक विषमता हे मुद्दे ठळक होतेच. स्टॅन ली आणि त्यांचे महानायक याच काळात सामान्यांतून नायक आणि नायकांचे महानायक बनले. कॉमिक्स संस्कृतीतून उद्भवणारे हे महानायक कदाचित अमेरिकी संस्कृतीची गरज होते. त्यांची दखल गंभीर साहित्यकृती किंवा अभिजात सिनेकृती म्हणून घेतली गेली नाही हे स्वाभाविक होते. पण गंभीर साहित्यकृती, अभिजात सिनेकृतींमुळे सहसा घडून येणारे अभिसरण स्टॅन ली यांच्या निर्मितीमधूनही होतच नव्हते असे ठामपणे म्हणता येत नाही. स्टॅन लीची पात्रे महानायक होण्यापूर्वी सर्वसामान्य असतात. त्यांच्या समस्या रोजच्या असतात. त्यांचे वाद होत असतात, कधी पालकांशी तर कधी एकमेकांशी. त्यांच्यात आत्मविश्वास नसतो. अद्भुत शक्ती त्यांना बऱ्याचदा ‘गवसते’. तिचे अस्तित्व त्यांना ठाऊक नसते. पीटर पार्करचा स्पायडरमॅन होण्यापूर्वी त्याला एका य:कश्चित कोळ्याने चावा घ्यावा लागतो! हल्क, आयर्न मॅनमधील महानायकांना अमली पदार्थ, धर्माधता अशा अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या सगळ्याचा अर्थ काहींनी ‘समस्या समाजातच असतात, पण त्यांचे निराकरण करणारे महानायकही समाजातच निर्माण होतात’ असा काढल्यास त्यात आश्चर्यकारक काहीच नव्हते. स्टॅन ली निर्माते होते पण त्याहीपलीकडे जाऊन ते स्वत: एका विशाल चमूचे नायक होते. सर्वाना बरोबर घेऊन जाणारे आणि सामूहिक विश्वास निर्माण करणारे होते. त्यामुळेच महानायक चितारणारे जॅक कर्बी, फ्रँक मिलर, जॉन रोमिटा यांनाही त्यांनी प्रसिद्धी दिली आणि त्यांचे स्वतंत्र महानायक बनले! १९९१ मध्ये त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून माव्‍‌र्हलच्या कथानकांना डिजिटल स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, तो मात्र सपशेल फसला. तरीही निराश न होता स्टॅन ली नवनवीन प्रयोग करत राहिले. नशीब हा सर्वात मोठा महानायक, असे त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले. त्यांच्या अनेक कॉमिक्समध्ये आणि सिनेमांमध्ये स्टॅन ली प्रत्यक्ष दिसायचे. आलेल्या प्रत्येक पत्राला बरीच वर्षे स्वत:हून उत्तर लिहायचे. हा मोकळेपणा आणि जिव्हाळा त्यांनी जपला. त्यामुळेच ‘माव्‍‌र्हल’ एक कॉमिक्स कथा किंवा केवळ यशोगाथाच न राहता, तो एक जनसमुदाय बनला! या समुदायात महानायक जन्माला आले, तरी त्यांचा जनक सर्वसामान्यच होता, हा दिलासा त्या महानायकांची लोकप्रियता विस्तारत गेला.