आपल्या सर्व समस्या या चांगल्या-वाईटाच्या द्वंद्वात गोंधळल्यामुळे निर्माण झाल्या आहेत, हे महत्त्वाचे कारण मुंबई पुन्हा तुंबण्यासही लागू पडते..

गुंतागुंतीच्या समस्यांना सोपी उत्तरे शोधायची सवय रक्तात उतरून शरीरधर्माचाच भाग झाली की जे होते, ते आपल्या मुंबई आणि अन्य शहरांचे झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई शहर शरपंजरी पडण्याची ही चवथी / पाचवी वेळ. अशी मरणासन्नता आता या शहराच्या अंगवळणी पडली असावी. तरीही अशा अवस्थेत पोटापाण्यासाठी धावत राहण्याची अपरिहार्यता मुंबईकराच्या नशिबी आहे. या असहायतेचे उगाचच उदात्तीकरण करून तीस ‘मुंबई स्पिरीट’ वगैरे म्हणण्याची प्रथा पडली आहे खरी. पण तीत अर्थ नाही. नाकातोंडात पाणी जाऊन प्राण कंठाशी आलेल्याने नंतर ‘यामुळे प्राणायामाची सवय होते’ असे मिरवण्याइतके ते हास्यास्पद आहे. तेव्हा मुंबईची चर्चा या पोकळतेच्या पुढे जाऊन करायला हवी. मुंबईकरांनी या पावसाळ्यात जे काही अनुभवले त्यानंतर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया या गरजेची जाणीव करून देतात. त्यातून गुंतागुंतीच्या समस्यांच्या सुलभीकरणाची आपली सामाजिक सवयच दिसून येते. कसे, ते समजून घ्यायला हवे.

पहिला मुद्दा मुंबईच्या विकृत वाढीचा. मुंबईच्या समस्यांची सोडवणूक या वास्तवाकडे दुर्लक्ष करून होऊच शकत नाही. या वास्तवाकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करीत आलो आहोत. ज्यांचे त्याकडे लक्ष गेले त्यांनी सुचवलेले उपायही याच सुलभीकरणाचे द्योतक ठरतात. या समस्येवर मुळापासून उत्तर शोधायचे तर माणसे मुळात आपले घरदार सोडून या शहराकडे धाव का घेतात, या प्रश्नाशी दोन हात करायला हवेत. ते आपण केले नाही. त्यामुळे मुंबई फक्त मुंबईकरांची, स्थलांतरितांना हाकला वगैरे घोषणा केल्या गेल्या. त्यात त्या करणाऱ्यांचेच तेवढे भले झाले. त्यातून ना मुंबईस काही मिळाले, ना जेथून हे स्थलांतरित मुंबईत आले त्या प्रदेशाच्या हाती काही लागले. परिणामी हा स्थलांतरितांचा प्रदेश आणि या स्थलांतरितांना सामावून घेणारी मुंबई या दोन्हींची वाताहत होत गेली. ती तशी होण्यात मोठा वाटा हा या शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा.

सुमारे दीडशेहून अधिक वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजांनी मुंबईत सार्वजनिक वाहतुकीची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेने शंभरहून अधिक वर्षे या शहरास हात दिला. इंग्रजांच्या काळात उभारले गेलेले व्हिक्टोरिया टर्मिनस आजही अपुरे पडत नाही, या एकाच उदाहरणावरून साहेबाच्या द्रष्टेपणाचा आवाका लक्षात यावा. त्यांनतरच्या स्वातंत्र्योत्तर काळात आपण पुढच्या शंभर वर्षांची तजवीज करणे अपेक्षित होते. ते राहिले बाजूला. आपण मुंबईत होत्या त्या ट्राम उखडून टाकल्या. परिणामी अशा महानगराची केंद्रीय रक्तवाहिनी ठरू शकेल अशी वाहतूक यंत्रणाच आपण निर्माण करू शकलो नाही. फक्त होती ती लोकल वाहतूक आपण जमेल तितकी ओरबाडत राहिलो. या लोकलगाडय़ांतून आज दरदिवशी ६० ते ६५ लाख अभागी नागरिक घर ते कार्यालय आणि परत अशा प्रवासयातना सहन करतात. हे अमानुष आहे. या लोकल हेच जर प्रवासाचे मुख्य साधन असेल, तर निदान त्याचे अधिक मार्ग टाकण्याचा तरी विचार आपण करायला हवा होता. ते होऊ  शकले नाही. इतिहासपूर्व काळात नद्यांच्या काठाने संस्कृती रुजली. आधुनिक काळात हे काम रेल्वे मार्गाने केले. पण मुंबईत ही संस्कृती इतकी रुजली, की ती मागे हटवून रेल्वे मार्ग वाढवणे आपणास शक्य झाले नाही. म्हणजे त्या समस्येकडेही आपण दुर्लक्ष केले. आज हे रेल्वेमार्ग तुंबलेले आढळतात ते यामुळे. याचा दुसरा परिणाम काय?

तो म्हणजे या शहरात वाहतुकीची नवी जातव्यवस्था तयार झाली. छळछावण्या असलेल्या लोकल, बसगाडय़ा जनसामान्यांसाठी आणि धनवानांसाठी चारचाकी मोटारी. ही नवी जातव्यवस्था तयार होत असताना या मोटारी उभ्या करण्यासाठी जागा कुठे, या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे होते. ते आपण अजूनही शोधलेले नाही. त्याचा परिणाम असा की, सार्वजनिक मालकीचे रस्ते हे या खासगी मोटारींचे आश्रयस्थान बनले. पुढे तेही कमी पडू लागल्यावर या समस्येस भिडण्याची चांगली संधी होती. तीही आपण वाया घालवली. ‘वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारीच नाही,’ अशी खणखणीत भूमिका आपल्या सरकारांनी घेतली नाही. कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करणे हे पालिकेचे काम, हे आपण स्पष्ट केले नाही. त्याही बाबतीत आपण लोकानुनयाचा मार्ग निवडला. परिणामी रेल्वेप्रमाणे आपले रस्तेही तुंबत गेले. वाहने सामावून घ्यायची रस्त्यांची मर्यादा संपली. या पावसाळ्यात अनेकदा रस्त्यांवर काळ्यापिवळ्या टॅक्सींच्या बरोबरीने आलिशान मोटारींची कलेवरेही तरंगताना दिसली ती यामुळे. आता या अवस्थेत पर्याय काय?

तो म्हणजे मेट्रो. त्याचे काम धूमधडाक्यात सुरू झाले. त्यामुळे होणाऱ्या गैरसुविधाही नागरिकांनी सकारात्मक अपरिहार्यता म्हणून स्वीकारल्या. आता ते काम मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण होताना उभे ठाकले ते आरे वसाहतीतील झाडांचे संकट. या मेट्रोच्या केंद्रासाठी आरेची जागाच सर्वात सोयीस्कर, असे संबंधितांचे म्हणणे; तर या जागेसाठी सुमारे २७०० झाडांचा बळी जाणार म्हणून त्यास संबंधितांचा विरोध. यातही सुलभीकरणास चटावलेली आपली मानसिकता दिसून येते. थेट कराचे पाच रुपये जरी वाढले तरी आपल्याकडे आंदोलनाची भाषा केली जाते, पण अप्रत्यक्ष करातून सरकारने पाचशे रुपये जरी आपल्याकडून काढून घेतले तर आपणास काही वाटत नाही. कारण ते कळतच नाही. मेट्रोच्या निमित्ताने हेच सत्य समोर येते. ही २७०० झाडे तोडण्यास शिवसेना, लता मंगेशकर वा तत्सम विरोध करतात. पण याच शहरात वर्षांला सरासरी १५,००० इतकी झाडे तोडली जातात हे सत्य या मंडळींच्या गावीही नाही वा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षाचा संभावितपणा ते करतात. या पंधरा हजार वृक्षतोडीतील निम्म्याहूनही अधिक प्रकरणे खासगी मालकीच्या जमिनीवरील असतात. त्याबाबत चकार शब्द काढण्याची हिंमत आपल्या समाजमनाच्या ठायी नाही. आपले पर्यावरणवादीही विरोधासाठी प्रकल्प निवडतात तो लहानसहान उद्योगपतीचा बोरिवली परिसरात उभा राहणारा, पण त्याच वेळी त्याहूनही विनाशकारी महामुंबईच्या कुशीतील प्रकल्पाकडे मात्र काणाडोळा केला जातो. आरेतील वृक्षतोडीच्या मुद्दय़ावर शिवसेनेस जागतिक तापमानवाढीचे आव्हान आठवते. पण दोन दशकांच्या मुंबईतील राजवटीत बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाचे बिल्डर रेटय़ाने होणारे आकसणे सेनेस दिसत नाही. याच पक्षाचा एक नेता नवी मुंबईतील डोंगर भुईसपाट करीत होता, त्या वेळी शिवसेनेस पर्यावरण रक्षणाचे महत्त्व कधी जाणवले नाही. लता मंगेशकर वा आशा भोसले यांच्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्याची वेळ येण्याची शक्यता नाही. त्यामुळे या भगिनींनी पूल उभारणीस विरोध करणे वा त्यांना आरेतील वृक्षांसाठी कळवळा येणे साहजिक. पण त्यांच्या वसतिस्थानानजीक असलेल्या मलबार हिल परिसरातील धनदांडग्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व कधी त्यांनी समजावून सांगितल्याचे ऐकीवात नाही.

याचा अर्थ सरसकट वृक्षतोड आदी होऊ द्यावी असा अजिबातच नाही. पण अशा मुद्दय़ांवर आंदोलनाच्या जनप्रिय सुरात सूर मिसळण्याआधी फायद्यातोटय़ाचा हिशेब, व्यापकहिताचा विचार आपल्या समाजाने करायला हवा. आपल्या सर्व समस्या या चांगल्या-वाईटाच्या द्वंद्वात गोंधळल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. वरकरणी काळे नाही ते सर्व पांढरे आणि पांढरेपण न मिरवणारे सर्व ते काळेच ही आपली बालिश विभागणीची सवय. ती सोडायची वेळ आता येऊन ठेपली आहे. चांगल्यातही बरेच काही वाईट असू शकते आणि वाईट भासणारे सर्व काही वाईट असतेच असे नाही. चांगल्यातील वाईटास विरोध आणि वाईटातील चांगल्यास उत्तेजन म्हणजे प्रौढपण. ते मिळवण्याआधी काळ्यापांढऱ्याच्या मर्यादा आपण ओळखायला हव्यात.