बेभरवशी विद्यमान पंतप्रधान आणि बेजबाबदार विरोधी पक्षनेते यांपैकीच एकाची निवड करणे भाग पडावे, अशी वेळ ब्रिटिश मतदारांवर आज आली आहे..

गेल्या चार वर्षांतील तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ६५० खासदारांना निवडण्यासाठी ब्रिटनचे ४.६ कोटी मतदार गुरुवारी, मतदानास बाहेर पडतील, तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असेल? अत्यंत अलोकप्रिय पंतप्रधान आणि त्याहूनही लोकविन्मुख विरोधी पक्षनेता यात नक्की कमी वाईट कोण या एकाच प्रश्नाने मतदारांना ग्रासलेले आणि अर्थातच त्रासलेले असेल. दुसऱ्या महायुद्धाने सर्व धुपून नेईपर्यंत महासत्ता असलेला हा देश. पण तीन वर्षांपूर्वी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना अवदसा आठवली. सुखाने सरकार सुरू असताना त्यांनी २०१६ सालच्या जून महिन्यात ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर जनमत घेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक जनता सरकार निवडून देते ते आपल्या वतीने त्यांनी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत यासाठी. त्यामुळे निवडून दिल्यावर पुन्हा जनतेकडे मी ‘हे’ करू की ‘ते’? असे विचारावयास जाणे हा शुद्ध मूर्खपणा. पण तो कॅमेरून यांनी केला. त्या चुकीचे भूत ब्रिटनच्या डोक्यावरून अद्यापही उतरावयास तयार नाही. त्या चुकीनंतर कॅमेरून यांना पायउतार व्हावे लागले. त्यांची जागा थेरेसा मे यांनी घेतली. याच वर्षी त्याही गेल्या आणि पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बोरिस जॉन्सन बसले. पण इतके झाले तरी ब्रेग्झिटचे हाडूक काही ब्रिटनच्या गळ्यातून निघण्यास तयार नाही. ते ना खाली जाते ना बाहेर येते. परिणामी अशा प्राण कंठाशी आलेल्या अवस्थेत ब्रिटिश नागरिकांवर तिसऱ्यांदा मतदानाची वेळ आली आहे.

त्यात मतदारांचे दुर्दैव असे की त्यांना निवडण्यासाठी चांगला की वाईट असा पर्याय नाही. त्यांना निवड करायची आहे ती अत्यंत खोटारडा म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या बेभरवशी बोरिस जॉन्सन आणि अत्यंत बेजबाबदार, अनागोंदीवादी जेरेमी कॉर्बनि यांच्यातील एकाची. ब्रिटनचा आतापर्यंतचा सर्वाधिक अलोकप्रिय पंतप्रधान असा जॉन्सन यांचा लौकिक तर त्यांना आव्हान देऊ पाहणारे कॉर्बनि हेदेखील तितकेच अलोकप्रिय. जॉन्सन हे हुजूर पक्षाचे तर कॉर्बनि हे मजूर पक्षीय. आपण कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०२० पर्यंत ब्रेग्झिट घडवून आणूच आणू असा जॉन्सन यांचा दावा तर आपण या मुद्दय़ावर पुन्हा जनमत घेऊ असे कॉर्बनि यांचे आश्वासन. जॉन्सन हे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सुहृद मानले जातात तर ट्रम्प हे कॉर्बनि यांचे कडवे टीकाकार. इतके की कॉर्बनि यांच्याविरोधात जाहीरपणे विधान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. असे करणे म्हणजे खरे तर दुसऱ्या देशाच्या राजकारणात हस्तक्षेप. पण इतका विवेक असला तर ते ट्रम्प कसले? पण म्हणून जॉन्सन यांना अधिक जबाबदार म्हणावे असेही काही नाही. या गृहस्थाने आपल्याच पक्षाच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंजूर करत आणलेला ब्रेग्झिट करार उधळून लावला. त्यामुळे मे यांची चांगलीच पंचाईत झाली. तीन तीन वेळा त्यांना पार्लमेंटमध्ये पराभव सहन करावा लागला. अखेर बाई पायउतार झाल्या. आणि हे जॉन्सन पंतप्रधान झाले. ३१ ऑक्टोबपर्यंत आपण ब्रेग्झिट करवून दाखवू असा त्यांचा दावा होता. तो त्यांच्या अन्य अनेक विधानांप्रमाणे पोकळ निघाला. त्यामुळे अखेर त्यांनाही निवडणुकांना सामोरे जाण्यात वेळ आली.

ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात केविलवाणी निवडणूक असे तिचे वर्णन करावे लागेल. गंभीर मुद्दय़ांवर या निवडणुकीत चर्चाही झाली नाही. बीबीसीसारख्या वृत्तवाहिनीस तर पंतप्रधान जॉन्सन यांनी मुलाखत देणे आजतागायत टाळले. का? तर जॉन्सन यांना भीती होती की त्यांच्या अपत्यांविषयी प्रश्न विचारला जाईल. ‘‘तुम्हाला नक्की किती अपत्ये आहेत,’’ हा प्रश्न या निवडणुकीच्या प्रचारात जॉन्सन यांना वारंवार विचारला गेला आणि तो विचारला गेल्यावर ओशाळे होऊन जॉन्सन यांना काढता पाय घ्यावा लागला. या एका उदाहरणावरून प्रचाराचा दर्जा आणि निवडणुकीचे गांभीर्य दिसून येते. जॉन्सन यांच्या खोटेपणाचे इतके नमुने या प्रचारात दिले गेले की तोदेखील एक विक्रमच असेल. पण मतदारांची पंचाईत अशी की म्हणून जॉन्सन विरोधकांवर विश्वास ठेवावा अशीही परिस्थिती नाही. कारण कॉर्बनि यांच्या राजकीय कार्यक्रमांनादेखील काही दिशा नाही. पाश्चात्त्य देशांच्या.. त्यातही विशेषत: अमेरिकेच्या.. नावे कडाकडा बोटे मोडणे किंवा इराण आदी नेत्यांतील अप्रत्यक्ष हुकूमशाही वा धर्मशाहीचे कौतुक करणे इतकाच काय तो त्यांचा अभ्यास. गेल्या आठवडय़ात तर त्यांनी कहर केला. इंग्लंडमधील सॅलिस्बरी येथे एका माजी रशियन हेरावर पुतिन यांच्या वतीने विषप्रयोग झाल्याची बातमी होती. ‘‘त्यातील विषाचे नमुने पुतिन यांच्याकडे पाठवायला हवेत, म्हणजे ते आपले आहेत की नाही हे ते सांगू शकतील,’’ इतके बालिश विधान ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर नजर असणाऱ्याने केले.

या अशा वातावरणात सामान्य ब्रिटिश नागरिकास राजकारणाचा उबग आला असल्यास नवल नाही. त्यामुळे मतदारांत उत्साहाचा पूर्ण अभाव आहे. ‘हे ब्रेग्झिटचे गुऱ्हाळ एकदाचे काय ते संपवा,’ असे ब्रिटिश नागरिकांचे मत. पंचाईत ही की राजकीय पक्षांनाही ते मान्य आहे. पण हे प्रकरण संपवायचे म्हणजे काय, हे मात्र कोणालाच माहीत नाही. यात हुजूर आणि मजूर हे दोन्ही पक्ष आपापल्या पारंपरिक विचारधारेपासून इतके भरकटले गेले आहेत की यात कोणाचे मत नक्की काय हे कळणे अवघड होऊन बसले आहे. कोणत्याही मुद्दय़ावर जमेल तितकी टोकाची भूमिका घेणे इतकेच काय ते या दोन्ही राजकीय नेत्यांचे सध्याचे काम. हे असे झाले की पहिला बळी सत्याचा जातो. ब्रिटनमध्ये तो गेला आहे. ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर फेसबुक आदी माध्यमांतून जे उद्योग झाले त्याचीही काळी सावली या मतदानावर आहे. तंत्रज्ञान पडद्यामागून आणखी काय काय उद्योग करेल याबाबतची भीती यामागे आहे. परिणामी ब्रिटनमधील राजकीय पस कमालीचा कर्कश झाला असून परिस्थिती पूर्वपदावर येईल किंवा नाही, याचीच काळजी त्या देशातील विवेकी व्यक्त करतात.

त्या देशात जनमताची मोठी परंपरा आहे. वास्तविक ब्रेग्झिटने या साऱ्या संकल्पना धुळीस मिळवल्या. तरीही या निवडणुकांत जनमताचा कल ओळखण्याचा प्रयत्न अनेक मार्गानी सुरू आहे. या सर्व जनमत चाचण्यांत इतके दिवस जॉन्सन यांना मोठी आघाडी होती. पण मतदानाचा दिवस जसजसा जवळ आला तसतशी ही आघाडी लक्षणीयरीत्या कमी होत गेली. आणि मतदानाच्या आदल्या दिवशी तर ती अगदीच पातळ झाल्याचे दिसते. जॉन्सन हे कॉर्बनि यांच्या तुलनेत पुढे दिसतात हे खरे. पण या दोघांतील अंतर इतके कमी आहे की मतदानाच्या दिवशी काहीही होऊ शकते यावर तज्ज्ञांचे एकमत दिसते. हे सर्व जण सत्ता स्थापण्याची अधिक संधी जॉन्सन यांनाच आहे, हे मान्य करतात. पण तरीही ब्रिटनचे पार्लमेंट त्रिशंकूच असेल असे भाकीत वर्तवतात. तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसण्याचा फायदा जॉन्सन यांना होईल, असा त्यांचा होरा.

याचा अर्थ शुक्रवारची पहाट ब्रिटिश नागरिकांच्या दु:स्वप्नाची असेल. या दोहोंतील आपले अधिक वाईट कोणाहाती होईल हे त्यांना त्या दिवशी कळेल. वास्तविक हा नाताळपूर्व उत्साहाचा काळ. त्याचा पूर्ण अभाव ब्रिटनमध्ये दिसतो. या काळात चर्चबेलचे नाद बर्फाळलेल्या वातावरणात सुमधुर भासतात. पण यंदाची ही ब्रेग्झिट निवडणूक मात्र ब्रिटिशांसाठी नाताळाच्या नकारघंटांचा नकोसा नाद घेऊन आल्याचे दिसते. निवडणुकांनंतर तरी तो थांबणार का इतकाच काय तो प्रश्न.