गोवा, मेघालय, मणिपूर वा अरुणाचल प्रदेशात जे जमले त्यावर आधारित महाराष्ट्रात कृती करणे भाजपच्या अंगलट आले..

ज्या विरोधात रान उठवून आपल्या पक्षाने जम बसवला त्यालाच हाताशी घेण्याचे निर्लज्ज धाडस भाजप कसा दाखवू शकला? सेनेचे राजकारण बालिश खरेच; पण म्हणून भाजपनेही मुत्सद्देगिरी दाखवू नये? विनोद तावडे वा चंद्रकांत बावनकुळे यांच्यासारख्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची गरज भाजपस वाटू नये? हे सर्व काय दर्शवते?

सत्तेचा मद, सलगच्या विजयांमुळे आपणास अडवतो कोण ही घमेंड आणि सहकारी पक्षांविषयी ‘जाऊन जाऊन जाणार कोठे,’ ही भावना या तीन दुर्गुणांचा समुच्चय झाला की काय होते याचे उत्तर म्हणजे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात झालेली अवस्था. ‘विजयातून पराजय खेचून आणणारा संघ’ असे वर्णन अगदी अलीकडेपर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे केले जात असे. ते आता भाजपस लागू पडेल. अगदी काही महिन्यांपर्यंत अजेय भासणारा हा पक्ष बघता बघता केविलवाणा झाला आणि मदानाकडे पाठ करून माघार घेण्याची वेळ त्याच्यावर आली. जे काही झाले त्यासाठी अन्य कोणाकडेही बोट दाखवण्याची मुभा त्या पक्षास नाही. हे सर्वच्या सर्व स्वनिर्मित होते. आता ते का झाले याचे विश्लेषण होईलच पण महाराष्ट्रातील घडामोडी या माघारी जाऊ लागलेल्या लाटेच्या निदर्शक तर नाहीत, याचाही विचार भाजपस करावा लागेल. हा विचार त्या पक्षाच्या नेतृत्वाने करावाच. नपेक्षा भक्तांच्या नादी लागून गरसमज होण्याची शक्यता अधिक.

प्रथम भाजपविषयी. केंद्र असो वा राज्य. भाजप हा एकखांबी तंबू आहे. काँग्रेस पक्षावर कुटुंबशाहीचा आरोप करता करता भाजप नकळतपणे कधी फक्त दुकलीचा पक्ष बनला हे त्या पक्षासही कळले नाही. तथापि काँग्रेस आणि भाजप या पक्षांतील या दोन अवस्थांत एक मूलभूत फरक आहे. तो असा की काँग्रेसमध्ये मध्यवर्ती सत्ता जरी एकाच कुटुंबाकडे राहिली असली तरी ती वगळता अन्य महत्त्वाच्या पदांवर त्या पक्षाने नेहमीच बुद्धिवानांना प्राधान्य दिले. भाजपकडे आज त्यांची पूर्ण वानवा आहे. त्यामुळे प्रश्न आर्थिक असो, परराष्ट्रविषयक असो वा राजनैतिक. या पक्षाकडे सर्व प्रश्नांवर एकच उत्तर. पूर्वीच्या अप्रगत काळी सर्व आजारांवर चूर्णाची पुडी देणारा एखादा वैद्य प्रत्येक गावात असे. भाजपचे हे असे झाले आहे. यामुळे विविध विषयांची जी काही वाताहत होत असेल ती होतेच. पण पक्षाचेही नुकसान होते. ते आता महाराष्ट्रात झाले आहे.

काँग्रेसवर भाजपचा दुसरा आरोप होतो तो दिल्लीतून देश हाकण्याचा. म्हणजे राज्यस्तरीय नेत्यांना पुरेशी संधी न देता, त्यांच्याशी मसलत न करता तो पक्ष थेट ‘वरून’ निर्णय लादतो असे बोलले जात असे. निदान तसे बोलणाऱ्यांत भाजप आघाडीवर असे. ते खरे होतेच. पण मग भाजपने महाराष्ट्रात जे काही केले ते मग काय होते? जमिनीवरील वास्तवाचे आकलन नाही, आपल्या कृतीच्या परिणामांची तमा नाही आणि स्थानिक नेत्यांची ऐकण्याची गरज नाही; यातून भाजपच्या हातून महाराष्ट्रात घडू नये ते घडले. ज्या विरोधात रान उठवून आपल्या पक्षाने जम बसवला त्यालाच हाताशी घेऊन सत्ताकारण करण्याचे निर्लज्ज धाडस भाजप दाखवू शकला हे काय होते? ज्यांच्याशी केवळ शत्रुत्वच केले त्या अजित पवार यांच्याशी भाजप जुळवून घेण्याची तयारी दाखवू शकला, पण ज्याच्याबरोबर तीन दशकांहून अधिक काळ संसार केला त्या पक्षाकडे ढुंकूनही पाहण्याची गरज भाजपस वाटू नये? उभयतातील संबंध बिघडण्यात सेनेचे बालिश राजकारण आहे हे खरेच. पण म्हणून भाजपनेही मुत्सद्देगिरी दाखवू नये? निवडणुकांत मुख्यमंत्री कार्यालयातील कोणा भालदारास उमेदवारी मिळू शकते, पण ती विनोद तावडे वा चंद्रकांत बावनकुळे यांच्यासारख्या आपल्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना देण्याची गरज भाजपस वाटू नये? हे सर्व काय दर्शवते?

केंद्रीय नेत्यांचा स्वत:च्या ताकदीवरील विश्वास आणि त्यामुळे त्याबाबतची मिजास. अजित पवार यांना फोडण्याचे संपूर्ण कटकारस्थान हे दिल्लीतून आखले गेले. ‘तुम्हाला सत्ता स्थापन करता आली नाही, आता शांत बसा. जे काही करायचे ते आम्ही करू,’ असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे स्थानिकांना सांगणे. अशा परिस्थितीत आपण काय करायचे असते हे त्यांना गोवा, अरुणाचल प्रदेश वा मेघालयसारख्या राज्यांनी शिकवले होतेच. ते त्यांनी अंतिम मानले. कारण एक राज्य चालवता येणे म्हणजे देशही चालवता येतो असे मानणे असल्याने त्या राज्यातील अनुभवाच्या आधारे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्याचा साहसवाद त्या पक्षाने दाखवला. आधार असलेली सायकल चालवता यायला लागल्यावर आपल्याला आता मोठय़ांची दुचाकीही चालवता येईल असे लहानपणी प्रत्येकालाच वाटलेले असते, तसेच हे. पण त्याच अनुभवावर मोठी दुचाकी चालवायला घेतल्यास तोंड फुटण्याचा धोका असतो. भाजपने तो महाराष्ट्रात अनुभवला. गोवा, मेघालय वा अरुणाचल प्रदेशात जे जमले त्यावर आधारित महाराष्ट्रात कृती करणे भाजपच्या अंगलट आले. तसे ते येणारच होते. याचे कारण महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतील फरक केवळ आकार हाच नाही. तर महाराष्ट्रात असलेले सर्वपक्षीय तगडे नेते आणि काही एक संसदीय राजकारणाची परंपरा हा मूलभूत फरक. बिहार वा हरियाणातील ‘लाल’ काळात जे दिवाभीतीचे राजकारण होते, ते महाराष्ट्रात चालू शकत नाही, हे या दिल्लीस्थित भाजप धुरीणांना शेवटपर्यंत समजले नाही. त्यामुळे राज्यपालांना हाताशी धरून लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचे पाप हा पक्ष करू पाहात होता.

तो सर्वोच्च न्यायालयामुळे टळला. ही बाब महत्त्वाची. याचे कारण नैतिकतेच्या नावाने कायम छाती बडवून घेणाऱ्या पक्षाने स्वहस्तेच या नैतिकतेस मूठमाती दिली आणि या कृतीचे पाप मात्र इतरांच्याच माथी मारण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस हेच करीत आला. पण आपण त्याचीच री अधिक वाईट पद्धतीने ओढत आहोत याची जाणीवही भाजपस होऊ नये हे त्या पक्षाने स्वत:स किती कोंडून घेतले त्याचे निदर्शक ठरते. यातही या पक्षाचा अहं सर्वोच्च न्यायालयामुळे फुटला ही बाब लक्षणीय. या न्यायालयात आज हा निर्णय झाला नसता तर आणखी काही पक्षातील फुटीरांना आपल्याकडे ओढण्याचा निलाजरा खेळ भाजप खेळतच राहिला असता. हे सर्व करून पुन्हा राष्ट्रउभारणी, चारित्र्य वगरे आहेच. बारा पक्षांनी ओवाळून टाकलेल्या गणंगांना घेऊन कसली आली आहे डोंबलाची राष्ट्रउभारणी? पशाच्या डबोल्यावर खरोखर झोपणाऱ्या सुखरामापासून ते गंभीर आरोप असणाऱ्या छत्रपतीवंशीय उदयनापर्यंत वाटेल त्या भुक्कडांशी भाजपने सत्तेसाठी चुंबाचुंबी केली. आणि तरीही हा पक्ष चारित्र्य, नैतिकता याबाबतची दांभिकता मिरवत राहिला. तो नैतिक शहाणपणा भाजपच्या ठायी काही प्रमाणात जरी असता तरी त्या पक्षाने शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार येऊ दिले असते. याचे कारण हे सरकार आपल्याच अंतर्वरिोधी वजनाने पडले असते आणि नंतर झालेल्या निवडणुकांत भाजपस मोठा विजय मिळू शकला असता. पण त्यासाठी काही महिने विरोधी पक्षात काढावे लागले असते. पण काँग्रेसवर सत्तापिपासूपणाचा आरोप करणाऱ्या भाजपस काही महिन्यांच्या सत्ताविरहाची कल्पनादेखील सहन झाली नाही आणि अत्यंत हास्यास्पद उतावीळपणा त्या पक्षाने दाखवला.

तोच त्याच्या मुळाशी आला.आपण इतरांच्या तुलनेत अधिक नैतिक आहोत असे वाटू लागले की अशांची घसरगुंडी सुरू होते. भाजपसाठी हा धोक्याचा इशारा आहे. ज्या प्रमाणात आणि ज्या गतीने भाजप आपल्या मित्र वा सहयोगी पक्षांचे रूपांतर शत्रू वा प्रतिस्पध्र्यात करू लागला आहे त्यातून हाच इशारा मिळतो. हेदेखील काँग्रेसप्रमाणेच म्हणायचे. त्या पक्षाने ज्या ज्या चुका केल्या त्या त्या चुका अधिक व्यापक प्रमाणात भाजप करताना दिसतो. मनमोहन सिंगांसारख्या नेत्यांचे महत्त्व कमी करून काँग्रेसने जे केले तेच भाजप देवेंद्र फडणवीस, रमण सिंग, शिवराज सिंग चौहान आदींचे करत आहे. ही आत्ममग्न पक्षाची लक्षणे. अशा आत्ममग्नतेत रममाण झालेल्यांचे काय होते, हा इतिहास आहेच. त्याची पुनरावृत्ती होणारच नाही, असे नाही.