लौकिकार्थाने पॉल व्होल्कर हे साधे बँकर; पण कमालीच्या कर्तव्यकठोरतेने व्होल्कर यांनी जे केले, त्याने ते लक्षात राहिले, आदरणीय ठरले आणि हयातीतच दंतकथा बनले..

व्यवस्थाबाह्य़ उद्योगांचा व्होल्कर यांना कमालीचा तिटकारा होता. सरकारी उच्चपदस्थांनी या चौकटीचा अनादर करता नये, असा त्यांचा आग्रह असे..

जनमताची तमा न बाळगणारी कठोर कर्तव्यनिष्ठा संबंधित व्यक्तिविरोधात क्षोभकारक ठरते. आजचेदेखील नीट न पाहू शकणाऱ्या जगात उद्याचे आणि त्या पलीकडचे दाखवणारा अगोचर ठरतो खरा; पण तात्पुरता. अंतिमत: काळच अशा व्यक्तीची थोरवी अधोरेखित करतो आणि अशा व्यक्तीचे मोठेपण सर्वानाच शिरोधार्य मानावे लागते. पॉल व्होल्कर हे अशा व्यक्तीचे उत्तम उदाहरण. तसे पाहू गेल्यास लौकिकार्थाने व्होल्कर हे साधे बँकर. प्रत्येक देशाचा असा एक बँकर असतो. पण कमालीच्या कर्तव्यकठोरतेने व्होल्कर जे काही करू शकले, त्याच्या दशांशदेखील कर्तृत्व जगातील अनेक देशांच्या बँकर्सना साऱ्या हयातीत जमत नाही. म्हणूनच व्होल्कर लक्षात राहतात, आदरणीय ठरतात आणि हयातीतच दंतकथा बनतात. रिचर्ड निक्सन ते बराक ओबामा अशा जवळपास पाच दशकांच्या प्रदीर्घ काळात आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने देशोदेशींच्या मध्यवर्ती बँकर्सचा दीपस्तंभ ठरलेले व्होल्कर रविवारी (८ डिसेंबर) निवर्तले. कोणत्याही देशाचा मध्यवर्ती बँकर असावा तर असा, अशी त्यांची प्रतिमा. किंबहुना मध्यवर्ती बँकर या पदाची दृश्यमानता निर्माणच झाली ती व्होल्कर यांच्यामुळे. या संदर्भात आपल्यास जवळचे असे उदाहरण द्यावयाचे तर टी. एन. शेषन यांचे देता येईल. शेषन यांच्या आधीही निवडणूक आयुक्त होते. पण त्या पदास प्रतिष्ठा आणि आब मिळाला तो शेषन यांच्यामुळे. आपल्या निवडणूक व्यवस्थेत जे स्थान शेषन यांचे, तेच स्थान जागतिक बँकिंग क्षेत्रात व्होल्कर यांचे.

व्होल्कर हे प्रत्यक्षात होतेदेखील तसेच. अगडबंब म्हणता येईल, सात फुटाशी स्पर्धा करेल अशी उंची, तितकीच रुंदी, तोंडात सिगार आणि या पहाडी व्यक्तिमत्त्वास सततच्या धूम्रपानामुळे जड झालेल्या आवाजाची जोड. या सगळ्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा सहजच होत असे. त्यास तडा जाईल असे वर्तन व्होल्कर यांच्या हातून कधी घडले नाही. प्रिन्स्टन, हार्वर्ड अशा विद्यापीठांतून पन्नासच्या दशकात शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकी वित्त विभागात उपसचिवपदी रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात झालेली ब्रेटन वूड्स परिषद, त्यातून जन्माला आलेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्था यामुळे सारे अर्थविश्वच ढवळून गेलेले. अनेक देशांसाठी हा काळ मोठा कसोटीचा होता. अमेरिकेसाठी तो अधिकच. कारण नकळतपणे जगाचे अर्थइंजिन बनलेल्या त्या देशासमोरील आव्हाने इतरांपेक्षा वेगळी होती. एकेकाळची दोस्त राष्ट्रे मोडून पडलेली आणि जगास शीत युद्धाच्या तप्त झळा बसू लागलेल्या. त्यातूनच सुवेझ संकट आणि पाठोपाठ पश्चिम आशिया युद्धग्रस्त झाला आणि त्यानंतर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला आले तेलसंकट. सौदी अरेबियाचे तेलमंत्री शेख अहमद झाकी यामानी यांच्या नेतृत्वाखाली तेलसंपन्न देशांनी अमेरिकेवर तेल बहिष्कार घातला. त्या देशात महागाईचा आगडोंब उसळला.

जागतिक आर्थिक रंगभूमीवर व्होल्कर यांचा प्रवेश झाला तो या पार्श्वभूमीवर . त्या वेळेस ते निक्सन प्रशासनात वित्त खात्याचे सचिव होते. सोने हे त्या वेळेस देशोदेशींच्या चलनमूल्याचा मापदंड होते. म्हणजे चलनाचे मूल्य त्या-त्या देशातील सरकारी तिजोरीतील सुवर्णसाठय़ाशी निगडित असे. निक्सन यांनी तो प्रघात मोडला. त्याच्या निर्णयाची जबाबदारी व्होल्कर यांच्यावर येऊन पडली. हा सगळा काळ आर्थिक अस्थर्याचा. त्याच काळात अध्यक्ष जिमी कार्टर यांनी व्होल्कर यांच्याकडे अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची, म्हणजे अमेरिकेच्या रिझव्‍‌र्ह बँकेची, जबाबदारी दिली. व्होल्कर पहिल्यांदा फेडचे प्रमुख झाले. ही १९७९ सालातील घटना. या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या महिन्याभरात व्होल्कर यांनी पहिल्यांदा व्याज दर वाढवले. या पदाची मुख्य जबाबदारी आहे चलनवाढ रोखणे ही. त्यासाठी काय वाटेल ते उपाय करावे लागले तरी मी ते करीन, असे व्होल्कर म्हणत.

तसे ते वागले, हे त्यांचे मोठेपण. म्हणजे चलनवाढ रोखण्यासाठी ते कोणत्या टोकाला गेले? तर, ती रोखावी यासाठी त्यांनी पतपुरवठा इतका महाग केला, की प्रसंगी व्याजाचे दर २० टक्क्यांपर्यंत गेले. त्या वेळेस व्होल्कर हे अमेरिकेतील सर्वात तिरस्कृत व्यक्ती होते. त्यांच्या या उपायांमुळे अर्थव्यवस्था इतकी मंदावली, की अनेकांच्या पोटावर पाय आला. अमेरिकी फेड हा सर्व समाजघटकांच्या रागाचा विषय बनला. त्या वेळी शेतकऱ्यांनी फेडच्या इमारतीस ट्रॅक्टरसकट वेढा घातला आणि बांधकाम मजुरांनीही आंदोलन सुरू केले. ‘‘तुम्ही व्याज दर कमी करणार तरी कधी,’’ असे संतापून त्यांना विचारले गेले. त्यावर व्होल्कर यांचे उत्तर होते : ‘‘व्याज दर मी ठरवत नाही. बाजारपेठ ठरवते. मी त्यास केवळ अनुमोदन देतो.’’

हाच काळ इराण क्रांतीचा, इराण-इराक युद्धाचा आणि अमेरिकेच्या इराणातील नाचक्कीचा. त्यात घरच्या आघाडीवर व्होल्कर यांच्यासारखा आग्यावेताळ फेडचा प्रमुख. त्यामुळे कार्टर यांना जीव नकोसा झाला असणार. पण या काळात त्यांनी कधी ना व्होल्कर यांच्या अधिकारांवर अतिक्रमण आणले, ना कधी त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखले. वातावरणातील कोणत्याही प्रक्षोभाची कोणतीही तमा न बाळगता व्होल्कर एकाग्रपणे चलनवाढीविरोधात आपला लढा लढतच राहिले. त्याचा योग्य तो परिणाम झाला आणि चलनवाढ आटोक्यात आली. व्होल्कर यांचाच मार्ग योग्य होता हे सिद्ध झाले. आज त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ९५ वर्षीय जिमी कार्टर यांनी व्होल्कर यांच्या निर्धाराचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘‘व्होल्कर यांचा ताठा त्यांच्या उंचीइतकाच होता. त्यांचे अनेक निर्णय राजकीयदृष्टय़ा घातक होते; पण आता मागे वळून पाहताना कळते, की ते आर्थिकदृष्टय़ा योग्य होते,’’ हे कार्टर यांचे विधान व्होल्कर यांचे मोठेपण सांगून जाते. कार्टर यांच्या काळात व्होल्कर यांनी हाती घेतलेल्या चलनवाढीविरोधातल्या लढाईची फळे रोनाल्ड रेगन यांना मिळाली. त्यामुळेही असेल; पक्षबदल, सत्ताबदल झाला तरी अमेरिकेत फेडचे प्रमुखपद व्होल्कर यांच्याकडेच राहिले. पण त्या काळात अर्थव्यवस्था व्याजभाराने मंदावली. पहिल्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा मंदीकाल अमेरिकेने अनुभवला. पण त्या काळातही व्होल्कर गडबडले नाहीत. आपल्या निर्णयांविषयी ते ठाम होते आणि त्यामुळे योग्य ते परिणाम दिसतील याची त्यांना खात्री होती.

तसे ते दिसू लागले. अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर आली. त्यामुळे व्होल्कर हे त्यानंतरच्या प्रत्येक अमेरिकी प्रशासनाचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे मार्गदर्शक राहिले. अगदी अलीकडे अध्यक्षपदी निवड झाल्यावर बराक ओबामा यांनी व्होल्कर यांची विशेष सल्लागारपदी नेमणूक केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ते जागतिक बँक संबंधित विविध विषयांवर व्होल्कर हे ओबामा यांचे मुख्य सल्लागार राहिले. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांनी इराक निर्बंधकाळात झालेल्या गरव्यवहारांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे प्रमुखपदही व्होल्कर यांच्याकडेच दिले. या चौकशीत त्यांनी भारतातील ‘दुनिया मुठ्ठी में’ घेऊ पाहणाऱ्या उद्योगपतीचे उद्योग जसे उजेडात आणले, तसेच खुद्द अन्नान यांच्या चिरंजीवांवरही ठपका ठेवला. व्यवस्थाबाह्य़ उद्योगांचा त्यांना कमालीचा तिटकारा होता. सरकारी उच्चपदस्थांनी या चौकटीचा अनादर करता नये, असा त्यांचा आग्रह असे. ‘‘लोकहिताचा निर्णय घेण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही,’’ असे व्होल्कर म्हणत. जागतिक अर्थकारण आणि त्या अर्थकारणामागचे राजकारण यांत रस असणाऱ्यांत त्यांचे ‘कीपिंग अ‍ॅट इट’ हे आत्मचरित्र चांगलेच लोकप्रिय आहे. एखाद्या बँकरचे आत्मचरित्र इतके रोमहर्षक असू शकते हा एक अनुभवच. व्होल्कर यांनी तयार केलेला मार्ग पुढे अ‍ॅलन ग्रीनस्पॅन आदींनी चांगलाच रुंदावला.

आपल्या एका सहकाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात सहभागी व्हावे असा व्होल्कर यांचा आग्रह होता. ‘‘मी काही ट्रम्प यांचा चाहता नाही. पण जग मातब्बरशाहीकडे जात असताना जनकल्याणाच्या हेतूने तरी आपण तेथे असायला हवे,’’ असे व्होल्कर यांचे मत होते. अलीकडेच ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ते व्यक्त केले. त्यांच्या निधनाने एक खरा महा(काय)बँकर काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या कामाचे महत्त्व समजून घेणे हीच त्यांना आदरांजली.