News Flash

सा ‘विद्या’ या विमुक्तये..

महिलांवरच्या विनोदांपासून त्यांना दुय्यम लेखण्यापर्यंतच त्या आणि आसपासच्या पिढय़ांचे पौरुष सांडत गेले

एरवी स्त्रीमुक्ती हा पन्नास वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रात तसा टिंगलीचाच विषय. त्या काळात या चळवळीस काहीएक आकार आला तो विद्याताईंसारख्यांच्या बंडखोरीमुळेच..

ज्या प्रांतात देशातील स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, तेथेच सत्तरच्या दशकात झालेली स्त्रीमुक्ती चळवळीची अवहेलना शुद्ध लाजिरवाणी ठरते. पन्नास वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राने दोन प्रकारे या चळवळीचे नुकसान केले. एक म्हणजे लेखक आदींनी या चळवळीचे मनोरंजनीकरण केले. उदाहरणार्थ ‘पोटिमा’ वगैरे शब्दप्रयोग तयार करून या चळवळीतील महिलांच्या वेशभूषेवर अकारण भाष्य झाले. आणि दुसऱ्या बाजूने साध्या वेशातील सनातन्यांनी या चळवळीतील महिलांना ‘घरफोडय़ा’ ठरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या महिलांच्या विचारसरणीमुळे संसार दुभंगतात, असे त्यांचे म्हणणे. महाराष्ट्राचा विरोधाभास असा की, अत्यंत पुरोगामी आणि कमालीच्या सनातनी अशा दोन्ही विचारधारा या भूमीत गुण्यागोविंदाने नांदल्या. आणि वाढल्याही. स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे फुले दाम्पत्य या महाराष्ट्रातले आणि स्त्रीभ्रूण हत्या सर्रास करणारे पालकही याच मातीतील. अशा वातावरणात काही एका विचाराने चळवळ चालवणे अवघड जाते. कारण समोरून येणारे वारे सुधारणावादी विचारांस प्रतिरोध करतात. विद्या बाळ स्त्रीमुक्तीच्या लढय़ात उतरल्या त्या या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या कार्याचे मूल्यमापनही व्हायला हवे ते या पार्श्वभूमीवर.

विद्याताईंचे वेगळेपण म्हणजे ज्या विचारधारेसाठी त्या ओळखल्या जातात, त्याच्या बरोब्बर विरोधी टोकाने त्यांचा सामाजिक चळवळीत प्रवेश झाला. आज अनेकांना विद्याताईंनी जनसंघातर्फे पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती हे खरेही वाटणार नाही. पण ते सत्य आहे. त्या या पक्षातर्फे निवडणुकीच्या फंदात पडल्या, कारण रामभाऊ म्हाळगी यांच्यासारख्या आदर्श लोकप्रतिनिधी म्हणता येईल अशा राजकारण्याने घातलेली गळ. आणि दुसरे म्हणजे घरातील हिंदुत्ववादी वातावरण. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे त्यांचे आजोबा. बाळ गंगाधर टिळकांच्या प्रभावळीत असूनही आपले तेज राखू शकलेले जे काही महत्त्वाचे नेते होते, त्यातील ते एक. टिळकांच्या निधनानंतर ही प्रभावळ दुभंगली. काहींनी नव्याशी जुळवून घेतले, तर गांधीविचारास विरोध असणारे हिंदुत्वाकडे वळले. तात्यासाहेब दुसऱ्या गटातील. त्यात ज्येष्ठ बंधू आणि नंतर पती हेदेखील रा. स्व. संघाचे कट्टर अनुयायी. तेव्हा त्या प्रभावामुळे त्या थेट जनसंघीय नाही, तरी त्या संघटनेच्या जवळ गेल्या. म्हणून ही निवडणूक. पण ती त्या हरल्या. ते बरेच झाले म्हणायचे. अन्यथा, विद्याताईंच्याच शब्दात सांगायचे तर- आज त्या ‘भाजप या पक्षात मोठे काही’ कमावून बसत्या. पण तसे काही झाले नाही. त्याहीबाबत त्यांची नंतरची प्रतिक्रिया म्हणजे- ‘‘मी मरता मरता वाचले.’’ त्यांचा प्रवास हा असा इतका उजवीकडून डावीकडे होण्यामागचे कारण म्हणजे त्या जन्माने ‘मध्यमवर्गीय ब्राह्मणी, पुणेकर’ कुटुंबातील. देशाचे स्वातंत्र्य किमान दशकभर दूर असताना अशा वातावरणात जन्मास येणे अल्पसंतुष्टी असते. विद्याताईंचेही ते तसेच होते. अशा ‘मध्यमवर्गीय’ महिलेस वयाच्या पस्तिशीपर्यंत ‘पारंपरिक, अल्पसंतुष्ट’ होण्यासाठी जे हवे असते ते सर्व मिळाले.

असे सुखकारक आयुष्य असतानाही वाचनाच्या गोडीमुळे असेल, पण आगरकर, सावित्रीबाई-जोतीराव फुले आदींच्या तेज:पुंज विचारांशी त्यांचा संबंध आला आणि पुन्हा त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे तर- ‘‘मी दुसऱ्यांदा वयात आले.’’ हे दुसरे वयात येणे हे विचारांच्या पातळीवरचे. ती पहाट एकदा का उगवली, की व्यक्ती आपली ओळख शोधू लागते. ती स्वत:ची ओळख निर्माण करण्याची सुरुवात असते. विद्याताईंसाठी ती पुणे आकाशवाणी केंद्रातील चाकरीत झाली. त्या वेळी पुणे आकाशवाणी हे सांस्कृतिक चळवळींचे रसरशीत केंद्र होते. त्यामुळे तेथे विद्याताईंना आपला मार्ग सापडला त्यात नवल नाही. पण तेथेच हा मार्ग बंद होत असल्याचेही त्यांना जाणवले. त्या वेळी एका महत्त्वाच्या पदासाठी त्यांच्याऐवजी ज्योत्स्ना देवधर निवडल्या गेल्या. त्यांच्या अयोग्यतेचा मुद्दा नव्हता. पण त्यामुळे विद्याताईंच्या मनात स्वत:च्या योग्यतेबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यांनी ती चाकरी सोडली.

पुढची मिळाली ती किर्लोस्कर समूहाच्या ‘स्त्री’ मासिकात. या समूहाची तीन नियतकालिके त्या वेळी लोकप्रिय होती. ‘किर्लोस्कर’ हे कलासाहित्य आदींस वाहिलेले, दुसरे ‘स्त्री’ हे महिलाकेंद्री आणि तिसरे ‘मनोहर’ हे त्यातल्या त्यात चटपटीत चित्रपटीय मनोरंजनी. गंभीर, वैचारिक वाचू लागण्याच्या आधीच्या टप्प्यावर मराठी वाचक बराच काळ या तिनांतील एका तरी टप्प्यावर रेंगाळला. त्यातील बरेचसे पुढे गेलेच नाहीत. ते स्वांतसुखाय असे लेखन ही त्या काळाची गरज होती. पण विद्याताईंचे वैशिष्टय़ म्हणजे त्या काळातही त्यातील ‘स्त्री’ मासिकास त्यांनी महिला सबलीकरणाच्या दिशेने पुढे नेले. अर्थात त्यांना तसे करू देणे हा मुकुंदराव-शांताबाई किर्लोस्कर यांच्या मोकळेपणाचा भाग होता, हे खरे. पण तसा मोकळेपणा मिळाला तरी ती संधी साधण्याची क्षमता किती जणांत असते, हादेखील मुद्दा आहेच.

ती विद्याताईंच्या ठायी होती. १९६४ ते १९८६ इतका प्रदीर्घ काळ त्यांनी या मासिकात व्यतीत केला. यातील संपादकपदाची वर्षे विद्याताईंमधील कार्यकर्तीची ओळख महाराष्ट्रास करून देणारी. या काळात त्यांनी या नियतकालिकात आणि त्या अनुषंगाने सामाजिक पातळीवरही अनेक प्रयोग केले. १९७५ साली जाहीर झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ने त्या सगळ्यास आपोआप एक उंची आणि अप्रत्यक्ष का असेना पण राजमान्यता मिळाली. एरवी स्त्रीमुक्ती हा त्या काळच्या महाराष्ट्रात तसा टिंगलीचाच विषय. महिलांवरच्या विनोदांपासून त्यांना दुय्यम लेखण्यापर्यंतच त्या आणि आसपासच्या पिढय़ांचे पौरुष सांडत गेले. त्या काळात या चळवळीस काहीएक आकार आला तो विद्याताईंसारख्यांच्या बंडखोरीमुळे. पण अशा जनप्रिय मध्यममार्गी नियतकालिकास विद्याताईंचा असा चळवळी बाणा किती सहन होणार, हाही प्रश्न होता. त्यात बाजारपेठीय.. आणि मुख्य म्हणजे किर्लोस्कर समूहाची.. अर्थस्थिती बदलत गेली. तेव्हा या मासिकांची मालकीच विकली गेली. अशी मासिके तगवायची म्हणजे अनेकरंगी कसरत करावी लागते. धर्म, परंपरा, मेंदूची कमीत कमी गरज लावणारे मनोरंजन आणि तोंडी लावण्यापुरते पुरोगामित्व वगैरे. अशांना एकारलेले असून चालत नाही. बाजारेपेठेचा विचार करावा लागतो. तो आता विद्याताईंना करायचा नव्हता. चळवळीचे काम एका टप्प्यावर आले होते आणि त्या वेळी ‘स्त्री’ हाताशी असणार नव्हते. नव्या व्यवस्थेत काम करण्याचे नाकारून त्यांनी या ‘स्त्री’शी काडीमोड घेतला.

त्यानंतर किमान तीन वर्षे त्यांच्या हातास काम नव्हते, पण चळवळीतील सक्रियतेने त्यांनी ते स्वत:स लावून घेतले. त्यातूनच ‘नारी समता मंच’ आणि ‘मिळून साऱ्याजणी’ या नियतकालिकाची निर्मिती झाली. कोणताही रूढ भांडवलदार मागे नसताना केवळ महिला चळवळीच्या रूपाने त्यांनी हे मासिक निर्मिले. ते आजतागायत सुरू आहे. स्वत:ची काही गुंतवणूक झाली, की व्यक्ती कितीही साम्यवादी असली तरी भांडवलाची काळजी करू लागते. विद्याताईंनाही ती करावी लागली. स्त्रीस उपभोग्य वस्तू मानणाऱ्या वृत्तीस विरोध हा चळवळीचा भाग. पण त्याच चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘मिळून..’ची चूल पेटती राहावी म्हणून स्वीकारायच्या जाहिराती स्त्रीच्या लैंगिकत्वाचे बाजारपेठीय शोषण करणाऱ्या. ही घुसमट असते. पण व्यापक हिताचा विचार करून ती सहन करावी लागते.

विद्याताईंनी ती सहन केली. इतकेच काय, पण वैयक्तिक पातळीवरही आपण कुटुंबासाठी नुसते ‘सेवा पुरवठा’दार होत आहोत असे लक्षात आल्यावर त्यांनी ते बंध तोडले. शेवटपर्यंत त्या कार्यकर्त्यां राहिल्या. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही त्यांचा सर्वत्र संचार असे. समाधानीही होत्या त्या. फक्त दोन गोष्टींची त्यांना खंत होती. ‘लोकसत्ता’शी असलेल्या ऋणानुबंधातून त्या ती मोकळेपणाने व्यक्त करीत. अलीकडच्या सुशिक्षित तरुण-तरुणींतील वाढते प्रतिगामित्व आणि दुसरे म्हणजे भारतीयांना नसलेला स्वेच्छामरणाचा अधिकार. त्यासाठीही त्यांचे प्रयत्न होते आणि परावलंबित्व न येता मरण यावे अशी त्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. एक कृतार्थ आयुष्य संपले. आंधळ्या परंपरेतून, मागास विचारांतून विद्या मुक्त करते, असे म्हणतात. ही ‘विद्या’ त्या सगळ्यांतून स्वत:च मुक्त झाली. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना, त्यांच्या कार्यास आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:32 am

Web Title: loksatta editorial paying tribute to social activist and feminist writer vidya bal zws 70
Next Stories
1 वराहानंदाची आसक्ती!
2 ‘महाराजा’ची मालकी!
3 इस नगरी के दस दरवाजे..