काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी नामक संकल्पनेची निष्क्रियता आता दिवसेंदिवस वाढू लागली असून त्यामुळे तिच्या अस्तित्वाबाबतच प्रश्न निर्माण व्हायला हवेत..

शरीर आणि मन यांच्यातील संघर्षांत शरीराचा विजय होतो, हे वि स खांडेकर यांच्या कादंबरीतील एक वाक्य. विद्यमान काँग्रेसींना, अगदी महाराष्ट्रातील गणले तरीही, हे खांडेकर कोण हे माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही. पण तरीही खांडेकरांचे हे वचन सिद्ध करण्यासाठी सर्वात सकारात्मक प्रयत्न कोणाचे होत असतील तर ते काँग्रेसजनांचे. या सर्व काँग्रेसजनांना आपल्या पक्षाच्या अवस्थेविषयी चिंता आहे. पक्षाचे भवितव्य काय, नेता कोण अशाही प्रश्नांनी त्यांना ग्रासले आहे. पण हे प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यांच्या उत्तरासाठी प्रयत्न करायचे म्हणजे शरीर हलवणे आले. ते काही करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. याचाच अर्थ त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता नाही. म्हणजेच काँग्रेसींच्या मनातील हे प्रश्न तसेच राहून मन पराभूत होणार आणि शरीर जिंकणार. गेली काही वर्षे हे असे वारंवार होत असल्याने त्यांच्या या प्रश्नांची दखल घ्यायला हवी.

विशेषत: मिलिंद देवरा, शशी थरूर, अजय माकन, संदीप दीक्षित अशा अनेकांना अलीकडे प्रश्न पडू लागल्याचे दिसते, हे कौतुकास्पद म्हणायचे. कारण हा पक्ष तसा प्रश्न पडून घेणाऱ्यांचा नाही. ‘असतील श्रेष्ठी तर सोन्याची वेष्टी’ हे या पक्षीयांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान. हे ‘असेल माझा हरी..’ या उदात्त हिंदू परंपरेत मुरल्याचे लक्षण. या सगळ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची पूर्वपुण्याई. यांच्या पहिल्या पिढीने खस्ता खाल्ल्या, काहींनी स्वातंत्र्यलढय़ात भाग वगैरे घेतला, पण त्यांच्या नंतरच्या पिढीने जवळपास सहा दशके सत्ता राबवली. त्यामुळेही असेल. पण त्यांना प्रश्न पडायला उसंतच मिळाली नाही. पण अलीकडे सत्ता गेली. त्यामुळे त्याच्या पुढच्या पिढीच्या हाती वेळच वेळ. म्हणून प्रश्न पडणे साहजिकच. तसे ते आता पडू लागले आहेत. पण हे प्रश्न सोडवायचे कसे हे काही या पिढीच्या नेत्यांना माहीतच नाही. दिल्लीत पक्षश्रेष्ठी नावाने ओळखले जाणारे एक कुलदैवत असते आणि ते आपल्या संकटसमयी धावून येते एवढेच या पिढीस ठावके. त्यामुळे त्यांना तरी दोष कसा देणार? प्रभु रामचंद्राने पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार केला त्याप्रमाणे आपले पक्षश्रेष्ठी ‘पंजा’स्पर्शाने आपल्याला पुनरुज्जीवित करतील अशी या भाबडय़ांना आशा. ते काही होताना दिसत नाही. हे श्रेष्ठी म्हणवून घेणारे आपल्या उज्ज्वल भूतकालाच्या स्मृतीत रममाण झालेले. इतिहासातच अडकून पडलेल्यांस वर्तमानाची जाणीव नसते आणि म्हणून त्यांचा भविष्यकाल अंधकारमय असतो. ही अशी श्रेष्ठींची अवस्था. हा असा भूतकाळ काँग्रेसींच्या या पिढीने अनुभवलेला नाही. असेल तरी अगदीच थोडा. त्यामुळे त्यात रमण्याची सोय त्यांना नाही. म्हणून हे अस्वस्थ वर्तमान त्यांना सतावते. पण म्हणून हे काही हातपाय हलवून स्वत: कष्ट करू लागतील, तर नाव नको. म्हणून मग माध्यमांत फुसकुल्या सोडण्याचा उद्योग : काँग्रेसने काय करायला हवे आणि काय करायला नको याच्या चर्चा. आपापसातल्याच. पण माध्यमांच्या अंगणात केलेल्या. जे काही करायचे ते करण्याची तयारी कोणाचीच नाही. पण काय करायला हवे यावर मात्र यांचे भाष्य तयार. हे आजच्या काँग्रेसचे वैशिष्टय़. अचंबित व्हावे असे.

अचंबित अशासाठी की या पक्षातील नेत्यांची आजची पिढीच्या पिढी इतकी एकाच वेळी निष्क्रिय निघावी ही तशी आश्चर्याची बाब. उदाहरणार्थ मिलिंद देवरा. निवडणुका आणि काही एक दरबारीकारण याखेरीज हा इसम समाजकारणात गुंतल्याचे आढळल्यास पाचपन्नास काँग्रेसींनाच हृदयविकाराचा झटका येईल. त्यामानाने संदीप दीक्षित वा सचिन पायलट हे खूपच उजवे. पत्रके काढणे वा ट्विटरवर मतांच्या पिचकाऱ्या टाकणे यापेक्षा काही एक अधिक काम तरी ते करतात. या सर्वाची अडचण आहे ती आळसशिरोमणी राहुल गांधी ही. पण बोलणार कोण आणि कोणाला, हाही प्रश्नच. या राहुल गांधी यांची संसदेतील कामगिरी अधिक वाईट की संसदेबाहेरची हे ठरवणे मुरलेल्या काँग्रेसजनांनाही जमणार नाही. मध्यंतरी काही काळ ते अभ्यासाला लागलेसे वाटले. पण काही काळच. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अशा वेळी मातोश्रींनी मात्रेचे चार वळसे चाटवावेत तर त्यांचीच तब्येत ढासळलेली. आणि बहीण प्रियांका सदैव ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती..’ म्हणत भाऊबिजेतून काही बाहेर यायला तयार नाहीत. बुडास आग लागलेली असताना इतके निवांत राहता येण्यासाठी काही एक विशेष आध्यात्मिक वा दैवी प्रसादच हवा. या भावाबहिणींना तो मिळालेला दिसतो. या दोघांचे ठीक. असतात काही भाग्यवान.

पण म्हणून आपले काय, असा प्रश्न आता काँग्रेसजनांना पडू लागलेला दिसतो. परंतु त्या पक्षाची आजची स्थिती अशी आहे की केवळ प्रश्न पडण्याने ती बदलणार नाही. ती बदलावी अशी त्यांची इच्छा असेल तर त्यांना संभाव्य उत्तरांना भिडावे लागेल. म्हणजेच पक्षश्रेष्ठी नामक संकल्पनेस आव्हान द्यावे लागेल. प्रसंगी दोन हात करावे लागतील. याचे कारण या पक्षश्रेष्ठी नामक संकल्पनेची निष्क्रियता आता दिवसेंदिवस वाढू लागली असून त्यामुळे तिच्या अस्तित्वाबाबतच प्रश्न निर्माण व्हायला हवेत. महाराष्ट्रातील उदाहरण या संदर्भात ताजे आणि योग्य ठरावे. इतक्या मोठय़ा राज्यात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येण्याची सुतराम शक्यता इतक्यात तरी नाही. अशा वेळी शरद पवार यांच्या कृपेने आणि उद्धव ठाकरे यांच्या इच्छेने त्यांना सत्ता मिळाली. या तीन वाद्यमेळ्याच्या शुभारंभास, म्हणजे शपथविधीस सोनिया गांधी वा राहुल गांधी हजर राहिले नाहीत, ते ठीक. पण त्यानंतर यांतील एकानेही महाराष्ट्रात येऊन युती वा आघाडी जी काही आहे ती त्यांच्याशी संवाद साधायला नको? इतकी मूलभूत गोष्ट या नेत्यांना अद्याप करून दाखवता आलेली नाही. त्यानंतरही तेच. आपले पारंपरिक शत्रुत्व सोडून आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. असे करण्यात राजकीय शहाणपणा होता आणि या भेटीचा गवगवा न करण्यात मुत्सद्दीपणा होता. तो कधी नव्हे ते शिवसेनेने पाळला. हे तो पक्ष बदलत असल्याचे द्योतक. पण बदलाची गरज आणि राजकीय चापल्य काँग्रेस नेत्यांस काही दाखवता आलेले नाही. त्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी उभयतांचे छायाचित्र ट्वीट केले. किमान सभ्यता म्हणून राहुल गांधी यांनाही तसे करता आले असते. तेही नाही तर निदान आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला रीट्वीट लावून मम तरी म्हणण्याची सोय होती. तीही त्यांनी घेतली नाही. ‘व्हटावरचं जांभुळ तोंडात ढकला’ अशी मिजास एके काळी खपून गेली. यापुढे ती चालणार नाही.

म्हणजे कष्ट करावे लागतील आणि अंग झडझडून काम करावे लागेल. नसेल तसे करायचे तर आपली जागा रिकामी करून अन्य कोणा नेत्याहाती सूत्रे सोपवावीत. राजकारण हे २४ तास करावयाचे काम आहे. दहा ते पाच या काळात होते ती चाकरी. राहुल गांधींना हे कळत नसेल तर अन्य कोणा नेत्यांनी सांगण्याचे धाडस करावे. मराठी नेत्याने हा मान मिळवावा. सुरुवातीस उल्लेखलेल्या खांडेकरांशी येथील अनेक नेते अनभिज्ञ असले तरी तसे ते राजकीय कारणांसाठी का असेना, पण समर्थ रामदासांशी परिचित असतील. जो बहुतांचे सोसीना। त्यास बहुत लोक मिळेना, असे रामदास सांगून गेलेत. तेव्हा पक्ष वाढवायचा असेल तर बहुतांचे सोसण्यास पर्याय नाही.